भारतीय उपशास्त्रीय संगीत

-वर्षा हळबे

भारतीय अभिजात संगीताचा अजून एक महत्वाचा घटक म्हणजे उपशास्त्रीय संगीत. मागील लेखांमध्ये म्हटल्याप्रमाणे शास्त्रीय संगीत म्हटलं की “ख्याल”, “धृपद”, हे गानप्रकार डोळ्यासमोर येतात. उपशास्त्रीय गानप्रकारांकडे वळण्याअगोदर वरील शास्त्रीय संगीताच्या प्रकारांची थोडक्यात ओळख करून देते. “ख्याल” म्हणजे उर्दू भाषेत विचार. तर “ख्याला”द्वारे गायक, गायल्या जाणाऱ्या रागावर केलाला विचार सविस्तररित्या मांडू शकतो. ते सगळे विचार “आलाप”, “बोलआलाप”, आणि “ख्यालाच्या” उत्तरार्धात “तानांद्वारे” मांडले जातात. “ख्यालाही” आधी “धृपद” अस्तित्वात होते. “धृपादाचा” उगम वैदिक मंत्रांमध्ये आणि नाद योगावर आधारलेला आहे. १९सव्या आणि २०साव्या शतकात “धृपद” गायकी अस्तित्वात ठेवण्याची महत्वाची कामगिरी डागर बंधू (नसीर मुइनुद्दिन डागर आणि नसिर अमीनुद्दीन डागर) ह्यांनी केली.

धृपद
१९सव्या शतकाआधी ५ शकते तरी धृपद गायकी, बाबा बैरम खान आणि त्यांचे चुलत नातू झाकीरुद्दिन आणि अल्लाबंदे खान ह्यांनी रजपूत आणि मुगल राजदरबारांमध्ये, चालू ठेवली. “धृपद” गायकीची सुरुवात संथ आलापीने होते. नंतर त्यात लय वाढते आणि आवाजाच्या घुमारावर भर देऊन, जोरकस, लयबद्ध बेहेलावे गायले जातात. ह्या गायकीत लयबद्ध सृजनतेला महत्व आहे. एकपटीत, दुप्पाटीत, तिप्पटीत, चौपटीत “धृपद” गाऊन पुन्हा सम असते. “धृपादाला” साथ पखवाजावर केली जाते. पखवाजाला तबल्याचा पूर्वज मानतात. “धृपद” चौतालात (१२ मात्रा), धमारात (१४ मात्रा), झपतालात (१० मात्रा), सूलतालात (१० मात्रा), किंव्हा तीव्र तालात (१० मात्रा) गायले जाते. ह्या गायनप्रकारात मुरकी, फिरत, तान, ही “ख्यालाशी” निगडीत मूलतत्वे अजिबात वापरात येत नाहीत. पुढील लिंकवर टिचकी मारून तुम्ही डागर बंधूंनी गायलेलं राग शंकरातील धृपद ऐकू शकता.

धृपद (डागर बंधू)

उपशास्त्रीय संगीत म्हंटले की ठुमरी, दादरा, कजरी, सावनी, झूला, चैती, होरी, भजन हे सगळे गायनप्रकार डोळ्यासमोर येतात. भारतीय अभिजात संगीतातील गायक-गायिकांकडे बघता आणि वर्षोंवर्षे त्यांचे गायन ऐकले असं लक्षात येते की एकेकाचे एखाद्या खास उपशास्त्रीय गायन प्रकारावर विशेष प्रभुत्त्व आहे. ठुमरी म्हंटले की बेगम अख्तरीबाई, शोभा गुर्टू, गिरिजा देवी, ही नावे मनात येतात. टप्पा म्हंटले की मालिनी राजुरकरांचा हात धरणारं कोणी नाही! दादरा म्हंटला की आठवतो “कट्यार काळजात घुसली” ह्या संगीत नाटकातील, डॉक्टर वसंतराव (खाँ!) देशपांडे ह्यांनी गायलेला “सावरे ऐजैयो” हा दादरा. पुन्हा एकदा तो तितक्याच तन्मयतेने ऐकावासा वाटतो. चैती, होरी, कजरी, सावनी हे वेगवेगळ्या ऋतूंशी जुळलेले गानप्रकार आहेत. ह्यातील बरेचसे लक्ष्मी शंकर, डॉक्टर. अश्विनी भिडे-देशपांडे, शोभा गुर्टू ह्यांनी गायले आहेत.

ठुमरी
“ठुमरी”चा उगम १६-१७व्या शतकात उत्तर प्रदेशातील लोकसंगीतातून झाला. गंगा-यमुना ह्या नद्यांच्या मधल्या प्रदेशात “ठुमरी” प्रचलित झाली. “ठुमरी” हा उपशास्त्रीय गायन प्रकार खूप प्रसिद्ध आहे. “ठुमरी” हा शब्द “ठुमकना”, म्हणजे एखाद्या तालावर आकर्षक अशी “चाल”’ (नृत्य) करणे, ह्या शब्दावरून उगम पावला आहे. त्यामुळे “ठुमरी” मध्ये इंद्रियग्राह्यता हा घटक सर्वात महत्वाचा आहे. अर्थात काही ठुमऱ्या भक्तीरसप्रधानही आहेत. पण बहुतेक ठुमऱ्या भावात्मक असतात आणि त्यातील हीच भावपूर्णता गायनातून दाखवणे हे मूळ उदिष्ट असते. ठुमरीचे व्याकरण, तिची विद्याविषयक परंपरा अतिशय एकमेव आहे. अवधी, भोजपुरी, मिर्झापुरी ह्या बोलीभाषांमध्ये आधीच्या ठुमऱ्या रचल्या गेल्या. अर्थात काही ठुमऱ्या मराठी आणि बंगाली भाषेतही आहेत. ठुमरीतले शब्द अतिशय लडिवाळ असतात. उदाहरणार्थ “पाणी” ह्या शब्दाला “पनिया” असे काव्यमय रीतीने रचले जाते. “पिया” हा शब्द “पीयू” किंव्हा “पिहरवा” बनतो. ठुमरीमध्ये प्रेम, विरह, हृदयभंग, विभक्तन, मानवी नाती असे विषय हाथाळले जातात. जास्तकरून ठुमरीचे शब्द प्रेमात असलेल्या स्त्रीवर आधारलेले असतात.
ठुमरी गाताना “बोल-अंग” फार महत्वाचे असते. शब्दांच्या अर्थाला पूर्ण न्याय देण्याकरिता वेगवेगळ्या रागांचं मिश्रण करून “बोल-बाँट” दाखवली जाते. रागांच्या विविध रसांमुळे ठुमरीतील वेगवेगळ्या भावनांना योग्य तो न्याय देणे शक्य होते. त्यामुळे जरी ठुमरी हा उपशास्त्रीय गायनप्रकार असला तरी तो गाणे एवढे सोपे नाही आणि पक्की शास्त्रीय बैठक असल्याशिवाय तर नाहीच नाही कारण ही गाताना एका रागातून दुसऱ्यात जाऊन पुन्हा मूळ चालीवर येण अगदी सहजरीत्या घडलं पाहिजे! ठुमरी बहुतेक करून काही ठराविक रागांमध्ये बांधलेली असते; असे राग ज्यांचात “बडे ख्याल” गायले जात नाहीत आणि जे “लाईट” राग मानले जातात. उदाहरणार्थ, खमाज, पिलू, तिलंग, देस, तिलक-कामोद, मांड, जोगिया, कलिंगडा, शिवरंजनी, भैरवी. ह्या रागांमध्ये भावपूर्तीला जास्त वाव असतो. पुन्हा एकदा अपवाद हे आहेतच आणि काही ठुमऱ्या “मोठ्या” म्हणजे ज्या रागांमध्ये “बडे ख्याल” गायले जातात अशा रागांमध्ये सुद्धा बांधल्या गेल्या आहेत. उदाहरणार्थ, राग बिहाग, शहाणा, सारंग, पूर्वी, कल्याण, सोहोनी. ठुमरी ही ठराविक तालांमध्ये गायली जाते – दीपचंदी (१४ मात्रा), अद्धा त्रिताल (१६ मात्रा), इक्वाई (१६ मात्रा), सितारखानी (१६ मात्रा). अर्थात काही “बंध ठुमऱ्या” झपताल किंव्हा एकतालात देखील बांधलेल्या असतात. काही ठुमऱ्या ठाय लयीच्या केहेरव्यात किंव्हा दादरा तालात गायल्या जातात. उस्ताद बडे गुलाम अली खानसाहेबांनी गायलेली ही ठुमरी पहा किती “दर्दभरी” आहे ते!
ठुमरी (गुलाम अली)

दादरा
असा एक समज आहे की “दादरा” हा उपशास्त्रीय गायन प्रकार दादरा तालात गायला जातो. पण असं नाही आहे. जास्तीकरून थोड्या/कमी मात्रा असलेले ताल - केहेरवा, दादरा, खेमटा, चाचर ह्यांच्यात दादरा बांधलेला असतो. दादरयाची लय ठुमरीपेक्षा जलद असते. ठुमरीची बढत जास्त विस्तुर्त असते तसच दादरयाची छोटी आणि सुटसुटीत. ठुमरीला एकच स्थाई आणि अंतरा असतो पण दादरयाला अनेक अंतरे असू शकतात. ठुमरीत मानवी प्रेम संबंध हा विषय जास्त हाथाळला जातो पण दादरयात आणि दादरयाच्या शृंखलेत बसणाऱ्या इतर उपशास्त्रीय गानप्रकारांमध्ये (कजरी, झुला, चैती, होरी) प्रकृती, मोसमी विचरण, आणि मानवी भावना हे विषय हाथाळले जातात. पुढील लिंकवर टिचकी मारून तुम्ही डॉ. वासंतराव देशपांडे ह्यांनी गायलेला हा प्रसिद्ध दादरा ऐकू शकता:
दादरा- (वसंतराव देशपांडे )

कजरी
“कजरी” हा शब्द ”कजरा”, म्हणजे काजळ, ह्या शब्दापासून आला आहे. काजळ जसं काळं असतं तसच पावसाळी काळ्या ढगांसारखा एखाद्या प्रियकर किंव्हा प्रेयसीचा विरह दाटून आल्याचं वर्णन “कजरीमध्ये” असतं. काही मिर्झापुरी कजरींमध्ये पावसाळयाचा आनंदही व्यक्त केला जातो. पुढील लिंकवर टिचकी मारून तुम्ही श्रीमती गिरिजा देवी ह्यांनी गायलेली, रुपक तालातली, कजरी ऐकू शकता
कजरी (गिरीजा देवी)

सावनी

“सावनी” ही देखील पावसाळ्यात गायली जाते. ह्यातही मानवी भावना व्यक्त केल्या जातात. पावसाळा हा अतिशय सुंदर आणि मोहक ऋतू असल्यामुळे “सावनी” मध्ये प्रकृती सौंदर्याचेही वर्णन असते. शोभा गुर्टू ह्यांनी गायलेली, दीपचंदी तालात बांधलेली “सावनी” तुम्ही पुढील लिंकवर टिचकी मारून ऐकू शकता.

सावनी( शोभा गुर्टू)

झुला

“झुला” हा देखील उत्तर भारतात उगम पावलेला एक उपशास्त्रीय गानप्रकार आहे जो बायका पावसात झोपाळयांवर खेळताना गातात. ह्यातूनही शृंगाररस व्यक्त केला जातो. ह्यात कृष्ण-राधाची, रामाची वर्णने जास्त अढळतात. खालील लिंकवर तुम्ही गीरीजादेविंनी गायलेला “झूला” ऐकू शकता. तबल्याचा केहेरवा ठेका देखील कसा झोपाळा वर खाली झाल्यासारखा वाटतो आहे ते ऐका.
झुला (गिरीजादेवी)

चैती
“चैती” ही ग्रीष्मात, म्हणजेच चैत्र महिन्यात गायली जाते. ह्यात जास्तीकरून, होणारी वधू तिच्या वराकडे लग्नासाठी नवीन पेहेराव मागते आहे, असे वर्णन असते. ह्यात “हो रामा” हे शब्द खासकरून वापरले जातात. खालील लिंकवर ऐकूयात शोभा गुर्टू ह्यांनी गायलेली चैती.
चैती( शोभा गुर्टू)

होरी
जशी “चैती” ग्रीष्मात गायली जाते तसेच “होरी” ही होळी साजरी करण्याच्या वेळेस गायली जाते. ह्यात रंगांच्या उधळणीचे वर्णन असते. “होरी” जेंव्हा ठुमरी अंगाने गायली जाते तेंव्हा तिला “कच्छी होरी” असे म्हंटले जाते. खालील लिंकवर टिचकी मारून तुम्ही शोभा गुर्टू ह्यांनी गायलेली “होरी” ऐकू शकता ज्यात ब्रिजमध्ये खेळल्या जाणाऱ्या होळीचे वर्णन आहे:
होरी( शोभा गुर्टू)

बारहमासा
जसे एका ठराविक ऋतूमध्ये गायचे उपशास्त्रीय गानप्रकार आहेत तसेच “बारहमासा” ह्या गानप्रकारात बारा महिन्यात येणाऱ्या तीनही ऋतुंचे वर्णन असते त्यामुळे हे कधीही गायले जाते. खालील लिंकवर एक “बारहमासा” आहे. पण हे कुमौनी भाषेत आहे त्यामुळे अर्थासाठी अजून थोड्या संशोधनाची आवश्यकता आहे. पण ह्याच्या नुसत्या चालीवरून असं लक्षात येते की ही परंपरा कुठेतरी उत्तर भारताला शिखरांमध्ये उगम पावली असावी.
बारहमासा

भजन
“भजन” हा ही एक लोकप्रिय गानप्रकार आहे. पुरातन काळात होऊन गेलेल्या संतांवर उदाहरणार्थ सूरदास, कबीर, मीराबाई, तुकाराम, द्यानेश्वर ह्यांच्यावर बहुतेकशी भजने लिहिली गेली आहेत. त्यात पंडित भीमसेन जोशी ह्यांची अभंगवाणी तर प्रसिद्धच आहे. अर्थात भगवान राम, कृष्ण, शिव, गणपती, दुर्गा, विठ्ठल ह्यांच्यावरची भजनेही तितकीच प्रसिद्ध आहेत. भजनांद्वारे माणसाला अध्यात्मिक वळणावर एक दिशा मिळू शकते. त्याहीपेक्षा बहुतेक भजनांचे शब्द इतके सुंदर असतात की पुरातन कथा, संतांचे आयुष्य ह्याबद्दलही आपल्याला खूप काही शिकायला मिळते. ह्या लेखाचा शेवट पंडित भीमसेन जोशींनी गायलेल्या भैरवीतील एका अभंगाने करते आहे. भारतीय अभिजात संगीताची व्याप्ती खूप मोठी आहे. त्यात उपशास्त्रीय गानप्रकारांना कुठल्या एका रागाचे बंधन देखील नाही त्यामुळे ह्याच्या सौंदर्याला मर्यादा नाहीत.
भजन( पंडित भीमसेन जोशी

About the Author

पाऊस६९'s picture
पाऊस६९

I am an architect turned landscape architect by profession. I have a passion for writing poetry, fiction and non-fiction in Marathi, Hindi, Urdu and English. I am proficient in Indian Classical music and an ardent listener too. I love reading, playing tennis and badminton, going for long walks, contemplating, and making the most of life in every way!

I have recently published an e-book entitled "Poetry Plume" which is available on www.bookrix.comwww.amazon.com, andwww.bn.com