सोंग

सोंग
मनीषा साधू

 पावसाची रिपरिप सुरूच आहे. हा झडीचा पाऊस. थांबायचा नाही उद्यापर्यंत. रामश्यानं कांबळीतून डोकं बाहेर काढलं.अंधारल्या झोपडीत दिसण्यासारखं काहीच नव्हतं.त्यानं हात लांबवून चिमणीची वात मोठी केली. पण धुरकटल्या काचेत प्रकाशानं अंग चोरून घेतलं. त्यालाही या झोपडीचं दर्शन नको होतं जणू.रामश्यानं चुलीकडं पाहिलं. पहाटे पेटली होती ती.पार्वतीनं पहाटे भात रांधला होता.मीरची ठेचून,मीठ घालून तसच भांडं मधे ठेवलं तिनं.लेकरांनी हात घातला भांड्यात आणि पाठोपाठ रामश्यानं घातला संकोचत.भूक मंदावण्यापुरते घास लेकरांच्या पोटात गेल्याचा अंदाज आल्यावर त्यानं भांडं ओढलं मधून,अन पार्वतीकडे सरकवलं. ’पारोते, घे खाय!’ ‘खाऊ द्या लेकरान्ले’ म्हणतानाच तिनं ते स्वत:कडे ओढून बोटानं खरवडायला सुरुवात केली होती.ओटीच्या तांदूळाचा भात असल्यानं तांदूळ धूतले तरी लालसर,काळपट,केशरी असे पुजेचे सारे रंग घेऊन शिजायचा.कधी कणिक मिळालीच तर पानगे यायचे वाट्याला.मिळालं कहीही तरी सगळ्यांच्या पोटाला पुरत नाही.सगळे पोटभर जेवल्याचं कधी कोणालाच स्मरत नाही. पाऊस असाच सुरू ऱ्हायला तर उद्या जोगवा मागायला कसं फिरायचं या काळजीनं कपाळावर चोळत रामशानं झोपडीत नजर फिरवली.तिन्ही पोरं पोत्यावर अंथरलेल्या पिवळ्या प्लस्टिकच्या कागदावर वेडी-वाकडी झोपली होती.खोल गेलेल्या पोटावरचे हाडकुळे हात आणि वर आलेले मोठे टोंगळे अंधारातही उठून दिसत होते. ‘पारोते, भात हाय का शिल्लक पाय नं.’ ‘कुठून आसन वो?’ ‘पाह्यन वं,थे उपरनं हाय सोरत्याचं तिथं लटकवलेलं,थेच्यात पाय.’ ‘त्यांच काय पायी?’ ‘दिसतया कायतरी बांधलेलं’तो ताडकन उठला.सोरत्याचं उपरणं त्याच्याच खांद्यावर ऱ्हायलं काल.मुठभर काहीतरी बांधलेलं आहे त्यात.रामश्यानं सांभाळून गाठ सोडली.डोळे लकाकले.त्यात जवळपास दोन वाट्या ज्वारी होती. ’ह्ये पाय!’ तो ओरडल,अन गपकन स्वत:चं तोंड दाबलं.पार्वती उठून जवळ आली. ‘ऱ्हावू द्या,त्यांची हाय.वरडतील उद्या.’ ‘घे शिजव.’ ‘आवं ऱ्हावू द्या म्हनते ना.लेकरं झोपले आता.उठवलं तर कोनाचीच भूक भागायची न्हाई. ऱ्हावू द्या.निंघून जाईन रात्र.लागलं तर उठल्या उठल्या लेकरानलाच द्याव लागल खायला.’ ‘आत्ता शिजव माह्यासाठी!’धान्य दिसल्यावर रामश्याला भूक धरवेना.पार्वतीचा जीव गळला होता.तिला उठून काहीही करण्याची इच्छा नव्हती.दोन दिवसांपासून तिच्या पोटाला आधाराएवढंही अन्न मिळालं नव्हतं.पण पोरं झोपल्यानं दोघांनाही बरच खाता येईल या स्वार्थी विचारानं उठवलच तिला. ‘कन्या करती का काय?’ ‘मंग आता भाकरी थापत बसू का काय?’ ती रागानं म्हणाली.हलक्या हातानं तिनं ज्वारी रगडली.कण्या शिजवल्या.अन्नाच्या वासानं लहानग्यानं चुळबूळ केली.रामश्यानं त्याच्या पाठीवर हलकेच थोपटून त्याला परत निजवलं.आता मुलांनी अजिबात उठायला नको होतं त्याला. ‘पारोते,भावलाल म्हनला,पहाटे बरबटी रांधायली वैनी म्हनून,घिवून जाय बोल्ला मघा.आनती का जाऊन?’ ‘बरबटी? घिऊन जाय म्हनला?,आन मंगा का वो नाय सांगीतलं?लेकरानला घातलं आसतं वो खायला!’ती कळवळून म्हणाली. ‘तुह्या घरादाराले पुरल इतकं देनार हाय का कुनी?त्यानलेच पुरं पडंना. वाटीभर देत्याल.आन की कन्या सोबत खावू.’

 

पर्वतीला त्याच्या स्वर्थीपणाचा संताप आला.लहाना भिका मघा भुकेनं कळवळून रडला.कसाबसा झोपवला त्याला. ‘बाप हाय का काय?’ती घुम्म बसून राहिली. ‘जाय नं..’रामश्यानं कंबरेत ढोसलं तिला.एकदम कळ निघाली.चवथा लागलाय तिला हे माहित असूनही नसल्यासारखं चाललं आहे.तिलाही भूक धरवत नाही आताशात.पोटातलं पोरगं आपला वाटा मागतंच निर्दयपणे.ती उठली.कुडाच्या भिंतीवर एकाच खुंट्याला एकावर-एक लटकवलेल्या बहुरुप्यांच्या केसांचे टोप,मुंडासे,ओढण्या बाजूला करून तिनं निळं प्लास्टीक ओढलं.अंगावर ओढून घेत बाहेर पडली.वहीनीनं उसळ जास्त दिली तर पोरांना उठवून घास-घास द्यायची नाहीतर लहानग्या भिकाला खावू घालायची एकट्याला.आपल्याला काय,आजची रात्रही काढता येईलच.पाऊस थांबेल उद्यापर्यंत.उद्या मिळेलच काही ना काही. विचार करीतच ती भावलालच्या झोपडीपाशी आली. शे-दिडशे झोपड्यांचे गाव नाथजोग्यांचे.डवरी गोसावी,भराडी नावाने ओळखला जाणारा भटका समाज.नवनाथाचे भक्त.जोगी म्हणून वेशांतर करून जोगवा मागत फिरतात गावोगाव.उन्हाळ्यात चार महिने पोटापाण्यासाठी वणवण.तंट्याभिल,पोलीस,रामायणातील पात्र अशी विविध सोंगं घेऊन बहुरुपी म्हणून जोगवा मागणे हाच पोटापाण्याचा धंदा.आता या अवकाळी पावसानं पुढच्या काही महिन्यांची तजवीज कशी व्हावी समजेनासं झालय सगळ्यांना.घरात आताच अन्नाचा दाणा नाही.काही लोक निघून गेले तिकडे नागपूरकडे.भावलालची म्हातारी अन रामशाची दोन्ही लेकरं चिकनगुनियानं आजारी असल्यानं हे दोघं मागे राहिले.जवळपास भटकून जे काही मिळेल ते आणून आला दिवस काठत राहिले.कालच भावलालशी बोलला रामश्या, ‘लाल्या,आता नाही भागायचं गड्या.आता जाव लागंल आपल्यालेबी नागपूरकडं.लेकरं बरी हाय आता.म्हातारीचं काय म्हन्तू?’ ‘काय,म्हनाचं तरी काय आता.म्हनू नाई पन...मरत बी नाई म्हातारी.गौऱ्या गेल्या मसणात पन हे खटलं रिकामं करंना...जाऊ आपन,नाई मरायची ती माघारा.’ ‘दोघानच कसं गड्या? थे सुपडं हाय न गोदरीचं,थ्याले न्याचं?’ ‘थेची बाय गरोदर हाय.पहिलटकरीन हाय,यायचा थ्यो?’ ‘न यायला न काय झालं?लगीन झाल्यानं पोटं मरत न्हाय,उलट पोटं वाढती खानारी.येईल त्यो,विचार त्याले.’ ‘वैनी...’ पार्वतीनं लोटलेलं कुडाचं दार हळूच खडखडवलं. जोरात थाप दिली तर आत झोपलेल्या पोरांच्या अंगावर पडायचं. भावलालच्या बायकोनं डोकं बाहेर काढलं. ‘थे बरबटी देते म्हने यानले.’ ‘कोन?ह्ये म्हनले?’तिने डोके परत आत घातले.आतून दोघांचे एकमेकांवर ओरडण्याचे आवाज येऊ लागले. ‘पोटाला पुरना आन गावाले आवतन!’ ‘दे काहाडून थोडी.त्वा गिळली नव्हं दोनदा;मंग कायले कातावते?किलोभर आनली म्या.यका दमानं शिजीवली का काय?’ ‘म्या काढून ठिवली लेकरानसाठी.उद्या काई न्हाई मिळालं म्हन्जी?’काय हाडं देऊ माहीवाली चोखाले?’ ‘गप बैस! म्या बोलावलं त्यानले.दे पसाभर.’ भावलालचा आवाज चढला.आता ऐकणंच फायद्याचं नाहीतर मार बसेल हे ताडून तिनं नाईलाजानं वाडगंभर शिजवलेली उसळ आणली. ‘सुखीवाली बी दे.उद्याचं उद्या पाहू.’ तिनं भावलालच्या सुचनेकडे पूर्ण दुर्लक्ष केलं अन घाईघाईने बाहेर हात अन डोकं काढलं.हे सगळं ऐकूनही पार्वतीचा हात वाडगं घ्यायला पुढे झालाच. पार्वती झोपडीत शिरली.अंगावरचं प्लास्टिक कोपऱ्यात टाकलं अन चुलीपाशी आली.तोवर अर्धवट शिजलेल्या कण्यांचा रामशानं फडशा पाडला होता. ‘माय वं माह्यासाठी नाय ठेवल्या?’ती वैतागली. ‘आन इकडं.’ त्यानं तिच्याकडून वाडगं हिसकावलं.चवताळलेल्या मांजरीसारखी ती फिस्कारली, ‘लाज हाय का जिवाले?समद्या खाऊन टाकल्या अन हे बी गिळताय? लेकरं उपाशी झोपले तरी बी. ह्ये म्या भिक्याले देनार आहो.’ ‘थे झोपला हाय तं उठवून खायला घालती. मी जागा हाय, भूक भडकलीये माजी; आन इकडे.’ ‘माहीवाली भूक नाही दिसत तुमाले.का मले भूकच देल्ली नाय देवानं? हे चवथं ठिवलं पोटात,त्याले काय दगड माती भरवू?’ तिनं त्याच्या हातून वाडगं परत हिसकलं.रामश्या संतापला.त्यानं उभी लात मारली तिच्या कंबरेत.ती वाडग्या सकट भिंतीवर आदळली.खुंट्यावर लटकलेलं सामान अंगावर पडलं.कोपऱ्यातले भांडे गडगडले.त्या आवाजानं मुलं उठून बसली.परत मारामारी सुरू होणार म्हणून एकमेकांना बिलगून आल्या प्रसंगासाठी तयार झाली.

रामश्यानं चुलीतलं लाकूड ओढलं अन पिसाळल्या सारखा पार्वतीला मारत सुटला.भुकेनं त्याच्या मेंदुचा ताबा पुरता मिळविला होता.ती गुरासारखं ओरडू लागली.बाजूच्या झोपडीतून बाया माणसं धवली.’आरं,गाभन आय ना...सोड मुडद्या.’ कुणीतरी मुलांना ओढून बाहेर नेलं .बापड्यांनी रामश्याला दाबून धरलं.अगतिकता अन संताप यानं रामश्या रात्रभर थरथरत होता.आणि ठणकणाऱ्या अंगानं पार्वती कण्हत पडली होती.पोरं परत भडकलेल्या भुकेला विसरायला बघत होते. पहाटे रामश्यानं निघण्याची तयारी केली.नीळ लावलेला भक्क निळसर गुरुशर्ट,धोतर अन पांढरी टोपी घातली.पार्वती तापानं कणकणली होती.त्यानं कण्हणाऱ्या पार्वतीच्या अंगावरून न बोलता हात फिरवला.डोळे पुसत उठला. ‘कवा येतायसा?’ तिनं क्षीण स्वरात विचारलं. ‘ध्यान ठीव स्वत:च अन लेकरायचं.चारेक दिवसातच काय मिळाल ते आनून देतो आधी.मग पुढं जाऊ,बाकिच्यानले गाठू...’ जरा थांबून म्हणाला, ’ऱ्हाईल नं?’ ‘का सांगू?’ नजर फिरवत पार्वती म्हणाली. ‘न ऱ्हाईल तं बरं आसं वाटू लागलंय आता.आहे त्याच पोटायला मिळंना,आनखी एकाचे शाप कायला?’ रामश्या झटक्यात उठला.झोपलेल्या मुलांकडे बघायचं टाळून अन मनात येणारे पुढचे सगळे विचार,काळज्या गिळत त्याने झोपडीबाहेर पाऊल टाकले. भिवालाल हापशीपाशी उभा होता.सोरत्या अन सुपड्या दोघेही भाऊ हातावर तंबाखू चोळत निघण्याच्या बेतात होते. ‘दोघंबी यायले का?’ ‘ह्वय.’ ‘माघारा वस्तीत कुणी गचकलं का न्यायले चार खांदे भी न्हाय मांगं .बायानं पोरच फकस्त.’तीघही खिदळले.या विनोदानं रामश्याच्या अंगावर काटा आला.चिकनगुनीयानं फणफणलेले दोघं अन पार्वती...’आसं वंगाळ नका बोलू गड्या.देविमाय कृपा कर व बयो! सांभाळून घे!’त्यानं हात जोडले,त्याच्या पाठोपाठ तीघांनीही. ‘सोरत्या, किंगरी घेतली काय तुहीवाली?सोरत्याची किंगरी वाजली अन सुपड्याचं भजन;का जमलं मंग!’ ‘सोरत्यानं साद्या घेतल्या हाय नेसाले’ ‘परत थे तशी सोंगं काय करायची ऑं? आपून आपली छान जुनी सोंगं करू .थू नारद व्हय.’ ‘नागपूर मोठंजात शहर होय.साडीवाले नाचले का दनादन पैसा टाकते लोकं.’ ‘आपून आपला धंदा कारावा.जुनं थेच सोनं आसतं म्हनत्यात.’ ‘कोन विचारेना जुन्याले.जमाना बदलला हाय.आपल्यालेबी बदलाव लागतंय..’ नागपूरला गेल्यावर काय वेशांतर करायचं यावर चर्चा करीत ते बसथांब्याकडं निघाले.

भावलालनं तिघांच्याही तिकीटाची सोय केली होती. तिथे उतरल्यावर नागपूरच्या एका वस्तीत ते पोहोचले.त्यांच्या समाजाची काही माणसे तिथे अगोदरच पोहोचली होती.नागपूरची ही एक जुनी वस्ती. सोयी सुविधांचा अभाव असलेली. एकाला एक लागून असलेली घरे.अरूंद गल्ल्या.रस्त्यावर उघड्या नाल्या.गारुडी,मदारी,वाघाची सोंगं घेऊन अंगावर चट्टेपट्टे रंगवून नाचणारी माणसे,तृतीयपंथी असे सगळेच हातावर पोट घेऊन फिरणारे या वस्तीत अधून मधून दिसायचे. टी.व्ही.चा प्रभाव इथेही जोर धरत होताच.तरीही लोककलेचा क्षीण धागा या वस्तीशी बांधलेला अजूनही कायम होता.नाथजोगी शहरातील अशा वस्त्या आणि अद्यापही उरलेली अशी भोळी माणसे शोधीत वण्वणत होती. ‘का म्हनता सावरावजी;कसं चाल्लंय?यायला उशीर झाला आमाले.’ ‘लवकर येऊन बी आमी काय केलं?यंदा काय ठीक नाई.लोकानले टीवी ची करमनूक भावती.आता सोंगं घेऊन पोटं भरंना झालं.’सावरावजी म्हणाला. ‘दुसरं करनार तरी काय मंग आता?कामं लागंना हाताला,भीक मांगनंच बाकी ऱ्हायलं.’भीवा बोलला. ‘गावाकडं समदं ठीक हाय न्हवं?’सावरावनं विचारलं. ‘ठीक आसतं तं आजारी मानसं टाकून दगडाच्या काळजानं येतं ना आम्ही.’रामश्या बोलला. ‘चला,उद्यापासून तुम्ही बी चला सोबतीला.तू कोन हुनार रे सोरत्या?’सावरावनं विचारलं. ‘सोरत्याकडं दोन साड्या हाय.सोरत्या,सुपड्या नेसायलेत. दोघं फिल्लमवाल्या बायाचं स्वांग घेतील.म्या नारद हुतो’रामश्यानं सांगीतलं. ‘दोन फिल्लमवाल्या बाया अन नारद?’सावराव हसला मोठ्यानं. ‘यडा की काय तू? हे कंच जुगाड? माह्यावाली यक साडी हाय.तू बी बाई बन.’ ‘न्हाय बा’ रामश्या बोलला, ’आपून न्हाई बाईचं स्वांग घेतलं कधी.’ ‘मंग घे की आता.बाया म्हनून आतपर्यंत घुसता येईल वस्तीत.मंग आत गेलं का जोगवा मांगू.तसं तं कोनी घुसूच देत न्हाईत आजकाल,का जाना गा काय झालं तं.’ रामश्या तयार झाला.दुसऱ्या दिवशी तिघेही साड्या नेसले.विग लावून तयार झाले.पान चावून ओठ लाल केले.निघतांना परत पावडर फासली तोंडावर.भिवालाल पुरुषाच्याच वेषात होता.वेळ पडली तर पुरुष गोटात मागता येईल म्हणून. सावराव म्हणाला,’तुम्ही तिघे या भागाकडं जावा.आम्ही काल गेल्तो तिकडेच जातो.काही गल्ल्या बाकी हायत.’ ‘इकडून कुनीकडे निंगायचं?’सोरत्यानं विचारलं. ‘या वस्तीतून निंगायले यकच रस्ता हाय.हा रस्ता ध्यानात ठीवजाल.आतमंदी चक्रव्युहच जनू.घरच घरं हाय.मोठा रस्ता हा यकच.’ सावरावनं समजावलं.

तो बराच आधी आल्यानं वस्तीचे रस्ते त्याला बऱ्यापैकी महिती झाले होते. गेल्या काही महिन्यांपासून वस्ती अस्वस्थ होती.गुन्हेगारीचे प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढले होते.चोऱ्यामाऱ्या वाढल्या होत्या.मुलींच्या छेडखानीचे प्रकार अचानक वाढले होते.या वस्तीला अशा गोष्टींची सवय नव्हती असे नाही.अशाच वातावरणात पिढ्यानपिढ्या तयार झाल्या होत्या.परंतू आता बाहेरून येणारे गुन्हेगार,अन चोरीच्या नवनवीन तऱ्हा याने वस्ती त्रासली होती.त्यातच बायाबापड्यांची असुरक्षीतता ःइ नावी चिंता भेडसावत होती.शिकलेल्या नव्या तरुणांसाठी ही शरमेची बाब होती.त्यांनी एकी केली. वस्तीच्या छोट्याश्या एकमेव चौकाशी सदानंद,हरिष,राकेश उभे होते. ‘हे फार झालं.सालं काहीतरी करावं लागतं आता.’ ‘गस्त सुरू तं केली आहे नं बे.साले सापडू तं दे, हाणू एकेकाला.लमडीचे,वळून पाह्यचे नाहीत.’ ‘साले बायकांना त्रास देऊन ऱ्हायले बे. चाकू दाखवून दागीने काढून घेत होतेच, आता अंगावर हात टाकून ऱ्हायले. हिंमत वाढली साल्यांची.’ ‘खूप झालं बे.सापडले पाह्यजे आता. ‘जुग्याच्या पानठेल्याकडे कोणी बायकांच्या वेशातले माणसं फिरून ऱ्हायले म्हणे’ तपेश ओरडत आला.सगळे तिकडे धावले. रामश्या,सुपड्या,आणि सोरत्या,भिवालाल बरेच आतपर्यंत गेले होते. बरेच वेळ फिरून कहीही मिळालं नाही.बाया दारच उघडेनात.सगळे विचित्र नजरेनं बघताहेत असा त्यांना आता विश्वास होऊ लागला. ‘इतली वर्सं झाली,इतले गावं फिरलो पन असं कधी वाटलं भाई काऊन तं.’ भिवालाल म्हणाला. ‘मन कसनुसं होतंय पहाटेपासून’ रामशा म्हणाला. ‘नुसती पायपीट चाललीया,काय मिळंना.सावरावनं आपून चांगला भाग निवडला आसल,आपल्याले देल्ल इकडे धाडून...’सोरत्यानं बोलताबोलता भिवालालच्या खांद्याभोवती हात टाकला.सुपड्यानं बीडी काढली.चौघे जुग्याच्या पानठेल्याच्या बाजूला आडोशाला उभे राहिले.बीडी आळीपाळीने प्रत्येकाच्या ओठाची फेरी मारू लागली. ‘ते पाहा,लपून उभे आहे चोट्टे!साड्या घालून काळे धंदे करतात हरामखोर!’ हरिष म्हणाला. ‘अब्बे हेच लोक आहे हाडकेच्या पोरीचा सत्यानाश करणारे.’ ‘काय बोलतो?खरं का काय?अरे अशा माणसांना जिवंत नाही ठेवलं पाहिजे,साले भडवीचे!’

त्या चौघांपाठोपाठ आणखी काही जण येऊन उभे राहिले.सदानंदने त्वेषाने दगड भिरकावला.रामशाने दचकून पाहिलं, ’पळ सोरत्या...काय खरं दिसत नाई,लोकं मारायले.’सुपड्या बोलला. ‘पन आपून काई वंगाळ केलं नाही मंग कायले घाबरायचं.सांगू आपून त्याईले.’रामश्या म्हणाला.तोवर चारपाच गदड अजून आले.भिवालाल म्हणाला,’ ‘चला निंगा इथून.पळा बिगी बिगी..’तो वळून पळू लागला.तिघेही त्याच्या मागे. ‘अब्बे! पळाले साले.पकडा...चोर..चोर.’ ‘मारा साल्यांना, जाऊ देऊ नका.’ हाडकेच्या घरासमोर गर्दी जमली होती.त्याच्या दोन्ही मुलीसोबत कुणीतरी काळे केले होते,अन पांढरी पडलेली प्रेतं नाल्यात सापडली होती.पोलीस पंचनामा करून प्रेतं ताब्यात देऊन गेली होती.कुणीतरी या गर्दीला कळवले.दारासमोर प्रेतं टाकून हाडके धावला.त्याच्या पाठोपाठ त्याची चवताळलेली माणसेही धावली. ‘साल्ले! बायांची अब्रू घेते..’ ‘कातडं सोललं पाहीजे साल्यांचं.’ एकापाठोपाठ एक आवाज येऊ लागले.घराघरातून माणसे बाहेर पडली. पळणाऱ्या तिघांवर प्रत्येकजण हाती येईल ते भिरकावत होता.जमाव कृर होत गेला. चौघेही सैरावैरा धावू लागले.परंतू वस्तीच्या चक्रव्युहात ते पुरते अडकले होते.या गल्लीतून त्या गल्लीत...त्यांना मुख्य रस्ता सापडेना.साड्या घातलेल्या या तिघांना धावणेही कठीण झाले.गोंधळ वाढत गेला अन माणसेही.कुणालाच कुणाचा आवाज ऐकू येईना.मात्र गर्दीतला प्रत्येकजण आपला राग दगडाच्या रुपाने त्यांच्यापर्यंत पोहोचविण्याची धडपड करीत होता.संतापलेल्या कृर जमावासमोर चार प्राणी सैरावैरा धावून प्राण वाचविण्याची केविलवाणी धडपड करीत होते.गयावया करीत होते.परंतू दोक्यात राख घातलेल्या गमावाला त्यांचे कहीही ऐकायचे नव्हते.त्यांनी न्याय हाती घेतला होता.अक्कूयादव प्रकरणाने सगळ्यांची हिम्मत वाढली होती.रक्ताने माखलेले ते प्राणी क्षीण होऊन खाली पडले अन लाठाबुक्क्यांनी वस्तीने आपला असंतोष दाखवला. कुठूनतरी पोलीसला कळले.गाडी आली.जमावावर लाठीचार्ज करून पोलीसांनी गर्दी हटविली.पण तोवर जमावाचे न्यायदानाचे काम पार पडले होते.साडीतले तीन अभागी जीव तडफडून जागीच गतप्राण होऊन पडले.त्यांच्या पिशवीतून रंगरंगोटीचे साहित्य,विग,किंगरी इ.साहित्य अस्ताव्यस्त होऊन रक्तात विखुरले.भिवालालला अत्यवस्थ अवस्थेत पोलीसांनी गाडीत घातले.वस्तीत आत पांढरी पडलेली दोन मुलींची प्रेते पडली होती आणि वस्तीच्या तोंडाशी रक्तात माखलेली नाथजोग्यांची तीन प्रेते अस्ताव्यस्त विखूरली होती. गुंगीत चाललेला भिवालाल फक्त एकच बडबड करीत होता, ‘माघारा मुडद्याले खांदा द्यायले थांबलो हुतो...तीन खांदे कुठं गेले रे माजे?...यकाच खांद्यावर नाथजोग्याईची प्रेतं वाहायचं कुठलं सोंग घेऊ आता गड्यांनो...’ गर्दीतला प्रत्येक मनुष्य नवं सोंग पांघरून उभा होता.

Category: 

About the Author

admin's picture
admin