
मल्हार राग- भाग ३
वर्षा ह्ळबे
“मल्हार रागाची झंकार” हया श्रुन्खलेच्या अंतिम भागात आपण अर्वाचिन मल्हाराचे प्रकार अभ्यासणार आहोत. १९व्या शतकात तयार झालेल्या मल्हार रागाच्या प्रकारांना अर्वाचिन (modern) मल्हार म्हणतात. हे मल्हार राग बहुतेक करून प्राचीन मल्हार रागांमध्ये थोडे फेर-बदल करून किंव्हा इतर रागांचे मिया मल्हार रागाबरोबर मिश्रण करून तयार झाले आहेत. उदाहरणार्थ, राग सामंत मल्हार जो आजकाल अजिबात गायला जात नाही पण तरी हया रागाचे मूळ स्वरूप, एखाद्या रागाची उत्पत्ती कशी होते हया दृष्टीकोणातून, अभ्यासण्याजोगी आहे. राग सामंत मल्हारचे मूळ स्वरूप आहे, “सा नि़ नि़ सा, म रे मरे प रे म, रे म प नि ध प, म प नि नि सो सो नि प म प नि ध प म रे म, म रे नि़ नि़ सा|” हया श्रुन्खालेच्या पहिल्या भागात म्हंटल्याप्रमाणे कोमल निषाद असलेल्या राग मेघ-मल्हाराचे स्वरूप आहे, “सा रे म प नि सो| सा नि प म रे सा|” तथापि सामंत मल्हार हा वरील मेघ-मल्हारात शुद्ध धैवताचा वापर करून बांधला गेला आहे. मग असं म्हणता येईल की हा राग सूर-मल्हाराच्या जवळचा आहे. हो! पण सूर मल्हारात दोन्ही निषाद लागतात. धैवत असलेल्या मेघ-मल्हारात देखील दोन्ही निषादांबरोबर “नि ध नि सो” अशी स्वर-संगती येते त्यामुळे सामंत मल्हार रागाची एकमात्रता कायम राहते. अजून एक अर्वाचिन मल्हाराचे उदाहरण म्हणजे राग चंचलस मल्हार. हया रागाचा उल्लेख पंडित भातखंडे ह्यांच्या “हिंदुस्तान संगीत पद्धती” हया क्रमशः पुस्तकांपैकी भाग ६ ह्यात आहे. हा राग दोन प्रकारे गायला जातो. पहिल्या प्रकारात दोन्ही निषाद लागतात, गंधार कोमल लागतो आणि धैवत वर्ज्य आहे. रागाचा वादी स्वर मध्यम आहे आणि संवादी षड्ज आहे. रागाचे स्वरूप आहे, “ सा, परे रेप म रे सा, रे सा, सा नि़ रे सा, नि़ प़ प़, म़ प़ सा, नि़ सा रे, मग मगम, सारे सा, म प सो, सो नि म प सो नि सो, म प नि सो रै नि सो, प नि म प, रे म, सा रे, सा|” हया स्वरूपावरून सिद्ध होते की हा राग शुद्ध-मल्हार मध्ये सारंग आणि कानडा अंगाचे स्वर-समूह घालून तयार झाला आहे. दोन निषाद मल्हाराचे आहेत, रिषभाचा लगाव सारंग सारखा आहे आणि “मग मगम, सारे सा” हे कानडाचे अंग आहे. हया रागात बहुत्व षड्ज, मध्यम आणि पंचमाचे आहे आणि अल्पत्व निषाद, गंधार आणि रिषभ स्वरांचे आहे. राग चंचलस मल्हाराचा दुसरा प्रकाराचे स्वरूप असे आहे: “सा रे म, म रे रे प, नि ध नि प ध म प सो, नि ध प मरे म, रे रे नि़ सा, रे म प रे म, म रे प म नि ध नि प ध म प सो, सो नि ध प म रे रे म, रे रे प म, म रे नि़ सा|” हया चंचलस मल्हारात केवळ कोमल निषाद लागतो. त्यामुळे ह्यात मेघ-मल्हाराचे अंग येते. “सो नि ध प” ही स्वर-संगती राग देसचे अंग दाखवते आणि “नि ध नि प ध म प सो” ही स्वर- संगती राग शहाण्याचे अंग दाखवते. तथापि चंचलस मल्हाराचा हा प्रकार हया तीन रागांचे मिश्रण होय. इतर कुठल्याही मल्हाराच्या प्रकारात शहाणा रागाचे अंग दिसत नाही त्यामुळे हा राग त्याबाबतीत एकमात्र आहे. राग छाया-मल्हार हा अजून एक अर्वाचिन मल्हाराचा प्रकार आहे तो राग छाया आणि शुद्ध-मल्हार हया दोन रागांच्या संगमातून तयार होतो. ह्याचे स्वरूप आहे, “सा रे ग म प, प-रे, रे ग म प सो, ध नि प, प ग म रे सा” रागाच्या चलनामध्ये, “म रे, मरे प, प-रे”, “रे ग म ध प, म ग म रे, मरे प”, “प नि ध नि सो रै सो, सो, ध नि प, प-रे, रे ग म प, ग म रे सा” हया स्वर-संगती येतात. हया रागात पंचामावरील न्यास खूप महत्वाचा आहे. जर रिषभ किंव्हा मध्यम हया स्वरांवर जास्त न्यास दिला तर हा राग नट रागाकडे झुकू शकतो. पुढील लिंकवर तुम्ही पंडित रामश्रेय झा ह्यांनी गायलेला राग छाया-मल्हार ऐकू शकता: राग छाया-मल्हार - पं. रामश्रेय झा तीच बंदिश आता खास पंडित भीमसेन जोशींच्या शैलीत ऐकूयात: राग छाया-मल्हार - पं. भीमसेन जोशी हया लिंक वरील बंदिश, “सखी श्याम नाही आये मंदारवा”, ही गोस्वामी लालजी महाराज (निधन १९१०) ह्यांनी बांधली आहे. ह्याचे टोपण नाव “कुंवर श्याम” होते. हे केवळ दिल्लीच्या राधा-गोविंद मंदिरातच गायचे. हया “कुंवर-श्याम” परंपरेतील शेवटचे अधिकारी होते लक्ष्मणप्रसाद जयपूरवाले. लक्ष्मणप्रसाद ह्यांचे आज हयात असलेले चिरंजीव, गिरीधरप्रसाद, ह्यांनी त्यांच्या वडिलांच्या रचनांचे दोन भागात पुस्तक छापले आहे; “संगीत ज्ञान प्रकाश” हया नावाने. हया पुस्तकांमध्ये लक्ष्मणप्रसाद जयपूरवाले आणि “कुंवर श्याम” ह्यांनी बांधलेल्या बंदिशी आहेत. “कुंवर श्याम” हे मल्हार रागातील तज्ञ होते. पुढील लिंकवर त्यांनी बांधलेल्या अप्रचलित राग सुहा-मल्हारातील दोन बंदिशी तुम्ही ऐकू शकता. राग सुहा-मल्हार - बंदिश १ - लक्ष्मणप्रसाद जयपूरवाले राग सुहा-मल्हार - बंदिश २ - लक्ष्मणप्रसाद जयपूरवाले हया बंदिशींमध्ये इतका गोडवा आहे, भाव आहे त्यावरून “कुंवर श्याम” ह्यांची बुद्धिमत्ता आणि त्यांचा अभिजात संगीताचा अभ्यास लक्षात येतो. त्यांच्या लयकारीबद्ध गायकीच्या हया बंदिशी प्रतिक आहेत. अजून एक अप्रसिद्ध अर्वाचिन मल्हारच्या प्रकार म्हणजे राग अरुण मल्हार. पं. भातखंडयांच्या “हिंदुस्तानी संगीत पध्दती” हया पुस्तकात देखील नुसते रागाचे नाव आहे पण बाकी काही माहिती नाही. उपलब्ध स्थाई आणि अंतर्यावरून रागाचे स्वरूप असे आहे: “सारेगम, मरेरेप, निपनिगमग, मरेसा| रेगमगम मरे रेप, धधनिप धगपधगप (म)ग, मरेसा| रेगमगम, मरेरेप, पनिधनिसो| सोधनिप, सोधपम, मरेरेप धधनिपध गप(म)गमरेरेप, निपगमग, मरेसा, रेगमगम|” ह्यात “मरेमरेपसो धपम” हे शुद्ध मल्हाराचे अंग आहे. “सारेगमगम” हे गौड अंग आहे, “पनिधनीसो, धनिप” हे बिलावल अंग आहे, आणि “निपगमग” हे तिलंग अंग आहे. त्यामुळे अरुण-मल्हार शुद्ध-मल्हारमध्ये गौड, बिलावल आणि तिलंग हया रागांचे मिश्रण होय. हया रागात गंधार आणि धैवताचे बहुत्व असून, रिषभ आणि दोन निषादांचे अल्पत्व आहे. पुढील लिंकस् वर पं. रामश्रेय झा ह्यांनी गायलेल्या राग अरुण-मल्हारमधील दोन बंदिशी तुम्ही ऐकू शकाल. राग अरुण-मल्हार – बंदिश १ - पं. रामश्रेय झा राग अरुण-मल्हार - बंदिश २ - पं. रामश्रेय झा अजून अर्वाचिन मल्हारचे प्रकार म्हणजे राग रूप-मंजिरी मल्हार, तिलक-मल्हार (मिया मल्हार आणि तिलक-कामोद रागांचे मिश्रण. फक्त ह्यात मिया-मल्हारमधील कोमल गंधार येत नाही), सोरठ मल्हार (धुलिया-मल्हारच्या जवळचा पण ह्यात मींडयुक्त शुद्ध गंधार येतो आणि तोही अगदी कमी प्रमाणात. धुलिया-मल्हार मध्ये कोमल गंधार व्यवस्थित लागतो.) , देस-मल्हार, श्वेत-मल्हार, नायकी-मल्हार, केदार-मल्हार, झांझ-मल्हार, आणि चंद्र-मल्हार. अजूनही अविष्कार होतील आणि नवीन मल्हाराचे प्रकार बनत राहतील; पण सर्वांचे मूळ त्या प्राचीन मल्हाराच्या प्रकारांवर आधारित असेल, नाहीतर कुठेतरी मिया-मल्हार पाया बनेल असा अंदाज बांधायला हरकत नाही कारण वरील सर्व मल्हारांमध्ये हेच आढळले आहे.