वादळे

वादळे
-सोनाली

कुठे वाळलेली दिसेनात पाने
शिशिर रिक्तहाती निघाला कसा
वसंतास केला इशारा कुणी
किती काळ गेला कळेना असा

किती गर्द छाया कसे रंग गहिरे
कुठे कोवळी हासते पालवी
डहाळीस तारुण्य येई नव्याने
पुन्हा पाखरांना तरू बोलवी

कसा मी परतलो इथे आकळेना
जरा भान माझ्या जिवाला नसे
जुनी गंधवार्ता मला बोलवी अन
पुन्हा आठवांचेच लागे पिसे

कुठे मंद वारा जरासा जरासा
तरी हालतो वृक्ष हा आतुनी
कळावी कशी अंतरी ठेवलेली
मला वादळे या फुलांनी जुनी...

Category: 

About the Author

सोनाली's picture
सोनाली

मिळून सा-याजणी, मेनका , रोहिणी, अक्षर मासिकातून लेखन प्रसिद्ध.

लोकमत, लोकसत्ता, सकाळ, मटा या पेपरातून कविता, लेख 

शक्यतेच्या परिघावरून कविता संग्रह