व्हिएतनाममध्ये दिसलेला भारत

व्हिएतनाम डायरी-पर्यटकाच्या नजरेतून

१.व्हिएतनामात दिसलेला भारत

११ मार्च २०१४, मलेशिअन एअरलाईनने मुंबई,क्वालालंपर ते हनोई असा आमचा प्रवास सुरू झाला.या विमान-कंपनीचं विमान आश्चर्यकारकरित्या बेपत्ता झाल्याच्या बातमीला दोन दिवस झालेले.खूप सारा विमान प्रवास केलेला असल्यानं याबद्दल मनात फारशी भीती नव्हती.पण सावट होतंच. मलेशिया,थायलंड, कंबोडिया, फिलिपीन्स,सिंगापूर या दक्षिण-पूर्व आशियातल्या देशांना भेटी दिलेल्या असल्या आणि नुकतीच नेपाळ भूतानची सहल केलेली असली तरी व्हिएटनामबद्दल एक वेगळी उत्सुकता होती. ओळखीतलं फारसं कुणी तिथे जाऊन आलेलंही नव्हतं. वर्तमानपत्रात वाचलेले फुटकळ लेख,अमेरिकेशी झालेल्या युद्धासंबंधी  १-२ चित्रपट,एखादी कादंबरी, पर्यटनाच्या दृष्टीनं इंटरनेटवर वाचलेलं काहीबाही एवढाच मनात असलेला व्हिएतनामचा ऐवज.समाजवाद आणि (भांडवलशाही)लोकशाही असा तिढा सोडवून समाजवादाच्या झेंड्याखाली एक झालेला देश आत्ताच्या जागतिकीकरणाच्या जमान्यात कसा दिसेल या बद्दल उत्सुकता होती.

     यावेळी सहलीचा कार्यक्रम जरा भरगच्चच होता.पण भारतातल्या निवडणुकीच्या गलबल्यातून लांब आल्याचं बरंही वाटत होतं. (पण इथे आल्यावर त्या न सापडलेल्या दुर्दैवी विमानावरून आणि युक्रेन-क्रीमिया प्रकरणाचा आंतरराष्ट्रीय राजकारणाचा गलबला होताच टीव्हीवर.) व्हिएटनामच्या जुन्या राजधानीत हनोईत पोहोचलो.आगमन कक्षात बॅंकॉक,क्वालालंपुरच्या विमानतळासारखा ड्यूटीफ्री दुकानी झगमगाट आणि सांस्कृतिक सजावट दिसली नाही.आम्ही नुकतेच कोऱ्या कोऱ्या कलात्मक सजवलेल्या मुंबई-टर्मिनल २ वरून आलो होतो. त्यामुळे हा विमानतळ बघून जुना मुंबईचा विमानतळ आठवला आणि व्हिसाच्या रांगेत उभे राहिल्यापासूनच भारतात आल्यासारखं वाटू लागलं.आम्ही ऑनलाईन फी-नोंदणी करून आगमनाबरोबर व्हीसा घ्यायची प्रक्रिया आधीच केली होती.आता फक्त ४५ डॉलर भरून शिक्का मारून घ्यायचा आणि बाहेर पडायचं अशी कल्पना.पण आधी शिक्का का आधी कॅशियरकडे पैसे ते सांगायला कुणी माणूस कशाला,पाटीही नव्हती. आपल्याकडे पैसे भरल्याशिवाय (खाल्ल्याशिवाय!!??) काहीही होत नाही हा अनुभव असल्यानं कॅशिअरच्या पुढे लोकांनी रांग लावली होती तिच्यात सामील झालो.(इथे कॅशिअर शब्दाखाली 'कॅश ओनली' असं स्पष्ट पुणेरीत लिहिलेलं होतं).मग रांगेतल्या पहिल्याला कॅशिअर बाईनं "शिक्का आधी" असं सांगितल्यावर सगळे गडबडीने, रांग मोडून, जथ्थ्यानं शिक्केवाल्याकडे गेले (अगदी युरोपीय आणि इतर अभारतीयही) मग परत कॅशिअरकडे नंबर लागल्यावर आधीच मोजून तयार ठेवलेल्या डॉलरच्या नोटा पुढे केल्या.उगीच धांदरटपणा नको म्हणून. त्यातली ५० डॉलरची ची नोट परत करत त्या गणवेषधारीनं "जुनाट दिसतेय म्हणून दुसरी द्या" असं काहीसं मोडक्या इंग्रजीत सांगितलं. इथल्यासाऱखी फाटलेली नोट खपवायचा प्रयत्न करत असतो तर गोष्ट वेगळी.आता डॉलर काय कुणी मध्यमवर्गीय पर्यटक रुपयांइतके बाळगून असतं का? पण पुन्हा पाकिटात धुंडाळत पर्यायी नोट द्यावीच लागली.या डॉलरांच्या नोटा तरी इतक्या सारख्या का करतात कुणास ठाऊक !! तिनं जुनाट ठरवलेली नोट बॅंकेत घेतील अशी आशा मनात धरून विमानतळाबाहेर पडलो. बाहेर पडणाऱ्यात आम्हीच भारतीय होते.

    तरूण चुटचुटीत गाईड ओळखीचं हसू हसत पुढे आला.'हेइन' असं आपलं नाव सांगून आमच्याकडून वदवूनही घेतलं.गाडीत बसल्यावर त्याच्या भाषेतले गुड मॉर्निंग आणि नमस्ते हे शब्द शिकवायचा अल्प प्रयत्नही केला पण आमचं लक्ष दोन्ही बाजूला दिसणाऱ्या ओळखीच्या परिसराकडे लागलेलं होतं.

हिरवीगार भात शेतं,केळीच्या बागा,सगळं सपाट त्यामुळं दूरपर्यंतचा प्रदेश दिसत होता. पुणं सोडताना होती तशीच ढगाळ हवा. काही विरळ तर काही दिल्लीतल्या कोठ्यांसारखी चिकटून चिकटून, मधे अंतर न सोडता बांधलेली दोन तीन मजली घरं आणि (स्वस्तातली) हॉटेलं.रंग मात्र झगमगीत आणि दर्शनी भाग कमानदार किंवा काहीबाही सजावट केलेला.शेतातली पारंपरिक घरं मात्र फार दिसली नाहीत.हे सगळं आपलंसं पाहताना आपण व्हिएटनाममधे आहोत याचा अनुभव देण्यासाठीच जणू गाईड आणि ड्रायव्हरच्या नॉन स्टॉप सिंगसॉंग गप्पा बॅकग्राउंडला होत्या.त्याच्या नादानं आणि स्मूथ डार्ईव्हनं गुंगी येतीय असं वाटत असताना एकदम काही तरी लक्षात आलं. जाण्यायेण्याच्या दोन दोन लेनचेच हे रस्ते टोटल खड्डे रहित. हे कसं साधलंत म्हणून विचारलंच गाईडला.८० च्या दशकात रशियनांनी करून दिलेले म्हणून दणदणीत आहेत असं तो म्हणाला.

   आपल्या सारखाच शहर जवळ आल्यावर थोडा थोडा इंडस्ट्रिअल इस्टेटचा भाग दिसू लागला.विस्तीर्ण नदीच्या प्रदेशावरून पूल क्रॉस करताना ढगाळ हवेबरोबर स्मॉग जाणवू लागलं.हेही आपल्या सारखंच. नुकतीच बीजिंग मधल्या जीवघेण्या स्मॉगची बातमी वाचली होती ती आठवली.नवे नवे दिसणारे फ्लाय ओव्हर ओलांडले.वाढती दुचाकीस्वारांची संख्या लक्षात आली.कुटुंब आणि बरंच काही वाहून नेणाऱ्या या मल्टी पर्पज दुचाकींबद्दल नेटवर वाचलं होतंच. हनोईत बरंचसं भारतातल्या सारखं वाटत असताना शहरापर्यंतची सार्वजनिक स्वच्छता मात्र गाडीतून तरी बरी वाटली.

     जुन्या नव्या इमारतींचे भाग मागे टाकत हॉटेलशी पोहोचलो.भारतीय ओळखीच्या, मुद्दाम लावलेल्या

झाडांची गर्द झाडी असले्या छोट्याश्या गल्लीत होतं आमचं हॉटेल.स्वच्छता सजावटही छान. व्हिएतनामी म्हणावं असं काही नाही.खोलीच्या खिडकीतून हॉटेलच्या मागच्या बाजूला आपल्या सारखीच सुबक टॉवर आणि अधुनिक चाळवजा टॉवर यांच्या मधली जुन्या घरांची गिचमिडही दिसली आणि त्यातले जीवनरंगही दिसले वाळत घातलेल्या कपड्यांच्या रूपानं..एव्हाना जेवायची वेळ टळून गेली होती भोजन कक्षात आम्ही दोघंच.सूप,सॅंडविच,सॅलड अशी हलकी आणि सेफ ऑर्डर दिली (त्यातही एक ऑर्डर आणायला सेविका विसरली-हेही भारतीय म्हणावं का असं मनात आलं.)तोवर चार साडेचार वाजले.थंडी आणि ढगाळ हवा हे मात्र अपेक्षिलेलं नव्हतं.स्वेटर मफलरचा जामानिमा करून जरा पाय मोकळे करायला बाहेर पडलो.

   उखिडवाखिड टाइल्सच्या फुटपाथवरून थोडं चाललो. त्यातच फुटपाथवर पार्क केलेल्या स्कूटरींच्यातनं वाट काढावी लागत होतीच आणि मग तो नाइलाजानं तो सोडून रस्त्यावरूनच जपून चालण्याचा अस्सल भारतीय अनुभव घेतला.तोही आपल्यापेक्षा उलट्या दिशेनं जाणाऱ्या वाहनांचा.लहान मुलांच्या कपड्यांची आणि खाण्याची घरगुती दुकानं जिकडे तिकडे दिसली.मधून मधून लिकर शॉप्सही.अधुनिक पण साध्या पेहरावातली मालक मंडळी काही स्वागताला मात्र तत्पर तर काही 'घ्यायचं तर घ्या' छापाची आपल्याच कामात,गप्पांत गर्क. बहुतेक सारी दुकानं आणि खाऊ-गाळे कुटुंबानं चालवलेले. म्हणजे आगे दुकान पीछे मकान छापाचे.एकीकडे व्यवसाय आणि एकीकडे कुटुंबव्यवहार चालेलेल. अगदी भारतातल्या जुन्या शहर भागासारखंच. मग रस्ता थोडासा आडवून आपापल्या स्कूटरींवर बसलेल्या बायाबाप्यांची (अर्थातच बाया अधिक) गर्दी दिसली अगदी पुण्यातल्या सारखी. काय असेल म्हणून बघणार इतक्यात साई सुट्ट्यो म्हणून उधळलेली मुलं एका इमारतीतून बाहेर आली.शाळाच होती ती. आपापली मुलं शोधून त्यांना आपापल्याच वाहनांवर घेण्याची गर्दी उडाली. हे तर अस्सल पुणेरी. स्वतः आणि मुलांना हेलमेट,मास्क घालणं हे मात्र आजिबात आपल्यासारखं नाही. मग इवली इवली कचऱ्याची ठिगळं चुकवत पुढे निघालो. संध्याकाळची वाढू लागलेली गर्दी चुकवत, आलो तो रस्ता पुन्हा पायाखाली घेत परत हॉटेलात जायचं होतं.त्यामुळे जाताना वर जरा बघायचा प्रयोग केला तर वायरींची जंजाळं खांबांपासून खांबापर्यंत आणि खांबापासून घरांपर्यंत पसरलेली दिसली.पुढे तर कहरच. शेवटच्या वळणावर एका वायरींनी गजबजलेल्या विजेच्या खांबावर कुठलीही सुरक्षिततेची साधनं न वापरता चढून  दुरुस्ती करणारा माणूस दिसला.आता या पेक्षा व्हिएतनाममधल्या भारतीयत्वाची आणखी काही उदाहरणं द्यायची गरज आहे? दुसऱ्या दिवशीपासून मात्र पर्यटकांसाठी खास अशा गोष्टी बघायला जाणार म्हणजे मग त्या सुबक-सुंदर प्रेझेंट केलेल्या असणार याची खात्रीच.नेटवरून माहिती घेतली होती ना आम्ही.खूप सारी मंदिरं,पॅगोडा बघायचे होते. आपल्या कडच्या देवळांबाहेर असतो तसा बकालपणा नसेल हे ब्रोशर पाहून तरी वाटतंय पण बघू.होप फॉर बेस्ट.

-(व्हिएतनाम डायरी-पर्यटकाच्या नजरेतून- लवकरच साहित्यसंस्कृतीवर प्रकाशित होईल.)

About the Author

सुषमा दातार's picture
सुषमा दातार

Pune India
Education- Msc(Botony-Uni Pune),PG Dip.communication and journalism.PG Dip.Communication media for children.
Work experience.-teaching Mass Com.as a faculty at S.N.D.T. Pune(5 years)now as visiting faculty Uni.Pune.
Edited and designed Trimonthly 'Palak-Shikshak' for 10 years.member of editorial group for 'Nirmal Ranwara' (children's magazine) and 'Palaneeti'. Conduct training programs communication,relationship skills,film appreciation etc.Chairperson of 'Saath Saath Vivah Abhyas Mandal'.Founder member of 'Samwad' group of women puppeteers.freelance writer.
Publications-'Samwad Vishva' comprehensiveness book on Mass communication in Marathi. translation- ' Chitrapatache Saundarya Shastr' booklets on puppetry and parenting skills. translation published in series -'Vedi' by Ved Mehta. for children- ' Maza Tarangta Ghar' (sea farer's stories in form of travelogue )
email sushamadatar@gmail.com