शर्मिला फडके

शर्मिला फडके,जुई कुलकर्णी

अम्रिता  शेरगिल  असो  वा  प्रकाश  वाघमारे  शर्मिला  फडके यांनी  ज्यांच्याबद्दल लिहिले ते सगळे  चित्रकार  त्यांच्या लेखनातून छान  भेटतात .  जणू काही  त्यांच्या  स्टुडीओ ची  सैर  घडावी  तसा आनंद  मिळतो  . 

चित्र, त्याची निर्मिती प्रक्रिया , त्याच्या  निर्मितीच्या आजूबाजूचे किस्से , चित्रकाराचं  आयुष्य यांच्या  संबंधित  सामान्य  माणसाच्या  मनात  अतिशय कुतूहल  असतं . शर्मिला  फडके  यांच्या लेखनात या सगळ्या  गोष्टींचं  इतकं  सुंदर  सादरीकरण केलेलं असतं   की  चित्रकलेच्या  प्रांतातला एखादा नवखाही रेंगाळेल . 

चित्र  पत्रकारिता  हा  मराठीत  तसा  दुर्मिळ  प्रकार आणि  तो  रंजक असूनही  दर्जेदार  करणं हे  महत्वाच काम आहे .     

शर्मिला  फडके   यांची मुलगी मिथिला  फडके या  देखील पत्रकार  आहेत  .  त्या  टाईम्स  ऑफ  इंडिया मध्ये  काम  करतात.  

चित्रकलेविषयी  प्रथम  संस्कार  कुठे  आणि  कसे  झाले ?घरचं  वातावरण  कसं  होतं ? कलेला  पूरक  होतं  का ? 

चित्रकलेचे आवर्जून संस्कार बिंस्कार म्हणजे मुद्दाम चित्रं दाखवणं, किंवा आर्ट गॅलरीत घेऊन जाणं वगैरे लहानपणी घरातून झाले नाहीत. घरी कोणीही चित्रकार नव्हतं. शाळेत असताना एक जनरल चित्रकलेची ओळख होते तितकी झाली होती. पण मला चित्र पहायला मनापासून आवडायची. काढायलाही. दिवाळी अंक, मासिकांमधली दिनानाथ दलाल किंवा इतर चित्रकारांची चित्र, अगदी जाहिरातींमधेही काही वेगळ्या धर्तीची दिसलेली चित्र पुन्हा पुन्हा बघायचे, तशी काढायचा प्रयत्न करायचे. या काळात मला स्टेन ग्लास पेंटींगचं वेड लागलं होतं. माझी चित्रकला चांगली होती. चित्रकलेच्या परिक्षा दिल्या होत्या, चांगल्या ग्रेड्सही मिळाल्या. घरी त्याचं कौतुक होतं. आई-बाबा कॅम्लिन वगैरेंच्या स्पर्धांमधे भाग घ्यायला प्रोत्साहन द्यायचे. पण मला चित्रकार व्हावं असं मात्र कधीच वाटलं नाही. 

मुळात शास्त्र  शाखेचं  शिक्षण  असताना  कलेवर लिहणं हा  पेशा  म्हणून  स्वीकारावा   असं  का वाटलं. त्यामागची पार्श्वभूमी  काय  आहे? हा  निर्णय घेताना  काय  तडजोडी  कराव्या  लागल्या ?चिन्ह' मासिकात कसा प्रवेश  झाला आणि तिथल्या  वाटचाली विषयी शेअर करावेत असे , कलाकारांना भेटण्याचे  काही  विशेष  अनुभव  आहेत का?

मला आर्किटेक्चरला जायचं होतं. तेही जे जे स्कूलमधेच. पण बारावीनंतर आर्किटेक्चरच्या प्रवेश परिक्षेच्याच वेळी मी टॉयफ़ॉइडने आजारी पडले आणि माझा तिथला प्रवेश हुकला. त्याचं अत्यंत वाईट वाटलं. त्यावेळी मला जे जे स्कूल ऑफ़ आर्ट खूप आवडतं हे माहीत असल्याने बाबांनी मला तिथेच फ़ाईन आर्टच्या डिप्लोमाला प्रवेश घेण्याचा खूप आग्रह केला पण मी नकार दिला. मग मी बी.एस्सी केलं. पुढे एमेस्सीच्या पहिल्या वर्षात असताना माझ्या लक्षात आलं की आपण या क्षेत्रात पुढे करिअर करु शकणार नाही. बॉटनी आवडीचा विषय होता, पण त्यातच पुढे शिकत रहाण्याचा मनस्वी कंटाळा आला. त्यावेळी काहीतरी वेगळं करावं म्हणून मी के.सी कॉलेजातून पार्ट-टाइम ऍडव्हर्टायझिंगचा डिप्लोमा केला. मग पुढे कॉपीरायटींग करण्यात खूप रमले. मजा यायची. 

 

चित्रांचं, चित्रं बघण्याचं वेड अजूनही होतंच. सायन्स इन्स्टीट्यूटच्या जवळच जहांगीर आर्ट गॅलरी असल्याने तिथे किंवा समोरच पंडोलला जी चित्र-प्रदर्शनं लागतील ती आवर्जून जाऊन बघायचे. माझा मित्र जे जे स्कूलमधे होता त्यामुळे त्या वातावरणाशीही संबंध यायचा. बॉटनीचा अभ्यास करताना संदर्भ पुस्तकांकरता ब्रिटिश कौन्सिल लायब्ररी लावलेली होती. पण तिथे गेलं की अभ्यासाची पुस्तकं सोडून यूरोपियन पेंटर्सची पुस्तकं पहाण्यात, वाचण्यातच सगळा वेळ जायचा. चित्रकारांच्या जीवनातल्या घडामोडी, चित्र काढण्यामागच्या त्यांच्या प्रेरणा, त्यांनी त्याकरता उपसलेले कष्ट, त्यांच्या आयुष्याचाच भाग असलेला स्ट्रगल, पुढच्या काळात त्यांची गाजलेली चित्रं या सगळ्याबद्दल जाणून घेताना मन थरारुन जायचं. त्याच सुमारास ’चिन्ह’चे भास्कर कुलकर्णी, गायतोंडे विशेषांकही माझ्या जे जेतल्या मित्राच्या थ्रू माझ्यापर्यंत येऊन पोचले. ते वाचतानाही मन तितकंच थरारुन गेलं. असं काहीतरी आपल्याकडेही लिहिलं जातं हे त्यावेळी माहीत झालं. मग सतीश नाईकांशी ओळख झाली. पुढे मी जर्नालिझम केल्यावर कधीतरी त्यांनी ’चिन्ह’करता लिहिणार का? विचारलं. मी नाही म्हणण्याचा प्रश्नच नव्हता. 

चित्रकलेच्या विषयात लिहायला सुरुवात झाली चित्रकारांच्या मुलाखतींनी. आपण या क्षेत्रातले नाही तेव्हा आपल्याला जमणार का वगैरे नकारात्मक विचार मनातही आला नाही. स्वत:च्या लिहिण्याबद्दल, विषय समजून घेण्याच्या क्षमतेबद्दल आत्मविश्वास मनात होता त्यामुळेही हे झालं असेल.  मला आठवतय पहिली मुलाखत मी अतुल दोडियांची घेतली होती. त्यावेळी त्यांच्या अस्खलीत मराठी बोलण्याने, बोलताना मराठी साहित्यातले संदर्भ देण्याने मी प्रभावित झाले होते. त्यांनी आपुलकीने त्यांचा घाटकोपरचा तो सुंदर, त्यांच्या स्वभावासारखाच मनमोकळा स्टुडिओ दाखवला, चित्रं दाखवली. चित्रकार या प्राण्याबद्दल काही भीड जर मनात असेलच तर ती दोडियांच्या या सहज, अकृत्रिम वागण्यातून पारच नाहिशी झाली. चित्रकारांच्या मुलाखती घेताना आपली चित्रांबद्दलची आवड आणि चित्रकारांचं जीवन जाणून घ्यायची उत्सुकता या दोन गोष्टींची स्वत:जवळची सामग्री मला पुरेशी वाटत होती. पण नंतर तेव्हढच पुरेसं पडणार नाही हे लवकरच कळलं. मग मी भरपूर वाचत गेले. चित्रकला विषयक जे मिळेल ते. नाईकांकडे चित्रकलाविषयक संदर्भांचा खजिना असायचा. एखादा विषय ठरला की त्या विषयावरची कात्रणं, पुस्तकं, मासिकं अशा सगळ्याचा एक मोठा गठ्ठाच ते समोर टाकायचे. त्यातून बरीच माहिती मिळायची. पण हळू हळू तेही पुरेसं नाही हे लक्षात आलं. मुलभूत अभ्यास करायला पाहिजे असं वाटायला लागलं. मग आधुनिक आणि समकालिन भारतीय कलेच्या इतिहासाचा एक अभ्यासक्रम भाऊ दाजी लाड म्यूझियमतर्फ़े सुरु झाला तेव्हा तोही केला. मात्र अजूनही वाटतं की या सगळ्या पेक्षाही सर्वात जास्त शिकायला मिळतं प्रत्यक्ष चित्रकारांशी बोलताना आणि चित्रांची प्रदर्शन बघतानाच. प्रभाकर कोलते, सुधीर पटवर्धन, अतुल दोडियांपासून सिनियरमोस्ट रझा, अकबर पदमसी, अंजोली इला मेनन अशा चित्रकारांसोबत मुलाखतींच्या निमित्ताने ज्या गप्पा झाल्या त्यातूनच खरं, अनमोल असं शिकायला मिळालं.

 

स्वतःच  चित्रकला  प्रांतात काही  कलाकारी  करावीशी  वाटलं  आहे  का ?केली  आहे  का ?

स्वत: चित्रकार व्हावं असं मला लहानपणीही कधी वाटलं नाही आणि अजूनही वाटत नाही. मात्र स्केचिंग करायला आवडतं. त्यातही बॉटनीच्या अभ्यासामुळेही असेल पण झाडांची स्केचेस करायला किंवा त्यांच्या खोडाच्या टेक्स्चर्सची इम्प्रेशन घ्यायला मला खूप आवडतं, हर्बेरियम्स, फ़्लॉवर प्रेस करण्याचा छंद आहे, स्टेन ग्लास पेंटींग अजूनही मधुन मधून करते. कलेतली वैयक्तिक मुशाफ़िरी इतकीच. 

एक स्त्री म्हणून  या पेशात  काम  करताना  आलेले  काही  खास  अनुभव ?

चित्रकला क्षेत्रात स्त्री म्हणून काही वेगळे अनुभव आले नाहीत. स्त्रीत्वाचं भांडवल करण्याची मनोवृत्ती मुळातच कधी नव्हती त्यामुळे तशी कधी अपेक्षाही केली गेली नाही. इतरांनी कधी वेगळी वागणूक द्यावी असंही वाटलं नाही. 

 

स्वतःच्या   मुलीने  पत्रकार  म्हणून शिक्षण  आणि  करियर  करायचे  ठरवले  तेंव्हा  प्रतिक्रिया  काय  होती? 

आपण ज्या क्षेत्रात आहोत तेच क्षेत्र आपल्या मुलीनेही आपल्या मनाने निवडावं यासारखा दुसरा आनंद आणि अभिमान नाही. मिथिला, माझी मोठी मुलगी अगदी शाळेत असल्यापासून फ़ार सुंदर आणि सहज, स्वतंत्र मनोवृत्तीने लिहायची. इंग्रजी आणि मराठी दोन्ही विषयांमधलं तिचं वाचनही भरपूर, व्याकरण पक्क आणि दोन्ही भाषांमधे ती सहज व्यक्त होऊ शकते ही तिची फ़ार मोठी स्ट्रेन्ग्थ. मुळातच भाषा शिकण्याची तिला आवड. त्यामुळे तिच्यात छान लेखिका होण्याचे पोटेन्शियल आहे ही जाणीव मला कायम होती. पण म्हणून तिला तसं सांगून इन्फ़्ल्यूएन्स वगैरे कधी केलं नाही. मात्र सोशल कम्युनिकेशन्स मिडियात ती जेव्हा पोस्ट-ग्रॅड करत होती, तेव्हा ऍडव्हर्टायझिंग निवडावं की जर्नालिझम अशी तिची द्विधा मन:स्थिती झाली, त्यावेळी तिने मला सल्ला विचारला तेव्हा मात्र मी तो दिला. सध्या ती टाइम्स ऑफ़ इंडियामधे फ़िचर रायटर म्हणून जॉब करते. लेखनाच्या क्षेत्रात ती नक्कीच खूप पुढे जाईल, स्वतंत्र पुस्तके लिहिल याची मला खात्री आहे. आम्ही दोघीही एकाच क्षेत्रात असल्याने आमच्यातला संवाद आणि शेअरिंग त्यामुळे नक्कीच जास्त वाढले आहे. 

: जुई  कुलकर्णी

About the Author

जुई कुलकर्णी's picture
जुई कुलकर्णी

चित्रकार आणि कवी : जुई कुलकर्णी 2009 पासून फेसबुकवरून चित्र आणि कविता प्रकाशित .

स्व शिक्षित चित्रकार .

कवरपेज डिझायनिंग : मिळून साऱ्याजणी मासिक फेब्रुवरी 2012

मॅड स्वप्नांचे प्रवाह - काव्य संग्रह

शक्यतेच्या परिघावरून - काव्य संग्रह (आगामी)

रेखाटने : काही तीव्र मंद्र काही - काव्य संग्रह 'श्वासाचं बांधकाम ' हा स्वतःचा कविता संग्रह प्रकाशित

अक्षर दिवाळी अंक , 'व' मासिक यातून कविता प्रकाशित .