संदर्भांसहित स्त्रीवाद: स्त्रीवादाचे समकालीन चर्चाविश्व’

’संदर्भांसहित स्त्रीवाद: स्त्रीवादाचे समकालीन चर्चाविश्व’ 

शब्द प्रकाशनाने काढलेल्या ’संदर्भांसहित स्त्रीवाद: स्त्रीवादाचे समकालीन चर्चाविश्व’ हे पुस्तक मराठी ग्रंथव्यवहारात वेगळे ठरेल असे आहे. स्त्री मुक्ती आणि स्त्रीवाद या शब्दांना व्यापक सामाजिक अवकाशात आणण्य़ाचे मोलाचे काम येशू पाटील यांनी केले त्याबद्दल त्यांचे अभिनंदन! पुस्तकाच्या मुखपृष्ठावर असलेले विविध दिशांना न्यायचा प्रयत्न करणारे पूल आजची आपली संभ्रमित अवस्था दाखवतात. पण सगळ्याच सामाजिक बांधकामाच्या मुळाशी असलेले स्त्री-पुरुष नातेसंबंधांचे एकक जर स्वच्छपणाने मांडले तर मग अनेक संदर्भांचे आयाम जाणून घ्यायला मदत होईल असे - चंद्रमोहन कुलकर्णी यांनी केलेले मुखपृष्ठ सुचवते आहे. लाल, हिरव्या रंगाची सर्जकता या स्वच्छ प्रामाणिकपणाच्या पार्श्वभूमीवर असेल. 

 

हा ग्रंथ विद्या बाळ कार्यगौरव ग्रंथ आहे याचा उल्लेख गीताली वि.मं.ची सुरुवात वाचल्यावर लक्षात येते. विद्या बाळ हे नाव ’स्त्री’ आणि ’मिळून साऱ्याजणी’ या नियतकालिकांशी जोडले गेले आहे. त्यांची सुस्पष्ट आणि प्रांजळ विचारमांडणी गेल्या तीन पिढ्यांना नवीन विचारांचे पोषण पुरवत आली आहे. ’स्त्रीमुक्तीवाली बाई’ असा शिक्का किती पारदर्शकपणे आणि नम्रतेने बाळगता येतो याचे उदाहरण त्यांनी घालून दिले आहे. साहजिकच ग्रंथाच्या मलपृष्ठावरचे त्यांचे छायाचित्र स्वतः काही न म्हणता पुस्तकाकडे जायला सांगते. गीताली वि.मं. यांनी सुरुवातीलाच या ग्रंथनिर्मितीसमोरील आव्हाने मांडली आहेत. याला विद्या बाळ कार्यगौरव ग्रंथ म्हणावे का नाही, मुळात असा ग्रंथ काढावा की नाही ही चर्चा साऱ्याजणीच्या परिवरात झाली होती. समाजाने आपली कृतज्ञता व्यक्त करावी की नाही, मुळात अशी कृतज्ञता एखाद्या व्यक्तीबद्दल बाळगावी की नाही, कृतज्ञता या मूल्याचे सामजिक स्थान काय, पारंपारिक समाजव्यवस्थेत बदल घडवत असताना कृतज्ञता मूल्याचे परिवर्तन कसे करायचे? हे सगळेच प्रश्न महत्वाचे आहेत.  सामाजिक सुधारणांचा व्यक्तिगत आविष्कार आपण मैत्रभावाने आपला म्हणायला हवा. कृतज्ञता व्यक्त करावी, अशी कृतज्ञता म्हणजे व्यक्तीपूजा नाही असेही मला स्वत:ला वाटते. पण फक्त तिथेच न थांबता पुढे जाऊन चळवळींमध्ये मोकळी वैचारिक देवाणघेवाण असणे गरजेचे आहे. स्त्रीमुक्ती चळवळ ही काही संकुचित वर्गापुरती, गटापुरती नाही तर व्यापक सामाजिक परिवर्तनासाठी आहे हे स्पष्ट करायचे तर मग तिचे विश्लेषणही होणे गरजेचे आहे. हाही हेतू या ग्रंथनिर्मितीच्या मुळाशी आहे.

 

स्त्रीमुक्तीवाल्या बाया म्हणजे पुरुषद्वेष्ट्या, कुटुंब मोडणाऱ्या, स्वैराचारी, मुक्त लैंगिक स्वातंत्र्यवाल्या असे सोयी सोयीने समज पसरवणे चालू असते. सर्व माध्यमातून स्त्रीमुक्तीवाली बाई कशी त्याच रंगवलेल चित्र थोडफार असंच असतं. पण पुरुषाने या सर्व गोष्टी केल्या म्हणून समाजात पुरुषाला मात्र तुलनेने फार काही सहन करावे लागत नाही ही वस्तुस्थिती आजही आहे. मग ते सर्व एखादी स्त्री करते तर ते चुकीचे मानणे, तिला जगण नकोस करणे हा दुटप्पीपणाच आहे. असमान वागणूक आहे. पाश्च्यात्त्य आणि भारतीय समाजाचे सांस्कृतिक व सामाजिक दृष्टया असलेले वेगळेपण आपण मान्य करू या. तिथल्या स्त्रीमुक्तीच्या सगळ्या संकल्पना आपल्याकडे जशा त्या तशा लागू करणे म्हणूनच शक्य नाही हे सुद्धा स्पष्टच आहे. पण स्त्री मुक्तीची व्याख्या कुटुंब मोडणारी, स्वैराचारी वा पुरुषद्वेष्ट्या अशा स्त्रिया ही व्याख्या जगभरात कुठेच नाही ही नोंदही घ्यायला हवी. 

स्त्रीमुक्ती म्हणजे संपूर्ण जगाचा आवाका असणारे, त्यातल्या वंचितांची अवस्था--एकूणच विश्वाचे आर्त समजणारे आणि त्यासाठी जबाबदारीने उभे रहाणारे जीवन आपण निर्माण करायला हवे आहे असे म्हणणारे तत्वचिंतन आहे हे ध्यानात असू द्यावे. स्त्रीवाद हा पोषाख, खाण्यापिण्याच्या सवयी अशा गोष्टींमध्ये स्त्री आणि पुरुष यात स्पर्धा वा निवडीबद्दलची चर्चा करण्याइतपतच वरवरचा नाही.  एक व्यक्ती म्हणून स्त्री आणि पुरुष यांना समान अधिकार असणे, त्यांच्यात मैत्री्चे मूल्य असणे ही भावना बाळगणारे तत्त्व म्हणजे स्त्रीवाद आहे. कोणत्याही परिस्थितीत हे नाते प्रगल्भतेन जोपासणा्रे तत्त्वचिंतन म्हणजे स्त्रीवाद आहे. म्हणून आज जिथे स्त्री आणि पुरुष एकत्र राहतात, एकत्र  काम करतात तिथे स्त्रीवाद आहेच फक्त त्याकडे आपण कसे बघतो ते तपासणे हा प्रमुख मुद्दा आहे. 

 

स्त्री च्या आत्मभानासाठी, स्त्रीच्या शिक्षणासाठी, स्त्री-पुरुष समतेसाठी, स्त्रीच्या सामाजिक व वैयक्तिक प्रतिष्ठेसाठी फ़ुले दांपत्यापासून जो आवाज आधुनिक अवकाशात उमटला त्याचे फ़ायदे आज आपल्या समाजात सर्व स्त्रियांना मिळाल्याचे दिसते. स्वातंत्र्यपूर्व काळात लोकहितवादी, फ़ुले, आगरकर, रानडे, कर्वे, वि.रा.शिंदे, गांधी, दादा धर्माधिकारी, आंबेडकर अशी पुरुषांची मोठी परंपरा आणि मुक्ता साळवी, ताराबाई शिंदे, पंडिता रमाबाई, रमाबाई रानडे, कमला देशपांडे, जनाक्का शिंदे अशा कितीतरी बायका स्त्री शिक्षण, स्त्री-पुरुष समानता, प्रगल्भ स्त्री-पुरुष नाते, स्वतंत्र भारतातील स्त्रियांचे स्थान यासंदर्भांत काही म्हणत होत्या, काही एक चर्चाविश्व उभे करत होत्या म्हणूनच ब्रिटीश साम्राज्याच्या अंतानंतर ज्या वसाहती स्वतंत्र झाल्या त्यापैकी भारतातील स्त्रियांची परिस्थिती तुलनेने उजवी राहिली आहे. ७० च्या दशकात पाश्चात्य स्त्रीमुक्ती विचारांचा काहीएक प्रभाव आपल्याकडेही झिरपला. त्यातूनच मग व्यक्तिस्वातंत्र्याचे अर्थ, समतेचे अर्थ, सामाजिक स्वास्थ्याचे अर्थ आपल्या सामाजिक परिस्थितीत शोधणे, आपल्या कुटुंबसंस्थेमध्ये, स्त्री-पुरुष नात्यामध्ये काही बदल घडवणे, आर्थिक व सामाजिक समतेची आवश्यकता मांडणे या संदर्भांनी परत एकदा काही हलचल निर्माण केली. त्याच सुमारास प्रसिध्द झालेल्या स्त्रियांच्या आत्मचरित्रांनी आणि दलित आत्मकथनांनी वंचित आणि स्त्रिया यांच्या सामाजिक प्रतिष्ठेच्या संदर्भात काही मूलभूत आक्षेप उपस्थित केले. दलित साहित्य आणि दलित स्त्रियांची आत्मकथने यांनी आधुनिकता आणि प्रागतिकता यांचे दावे करणाऱ्या समाजाला अत्यंत वैध प्रश्न केले.  जात, वर्ग, धर्म या सगळ्याच व्यवस्थांमधला मूल्यभाव हा पुरुषसत्ताक होता, आजही आहे हे वास्तव २०१३ च्या टप्प्यावर परत एकदा प्रकर्षाने जाणवते आहे. त्यातूनच स्त्रीवादाच्या चर्चाविश्वाने परत एकदा अत्यंत प्रभावी चिकित्सा मांडायला सुरुवात केली आहे. 

 

स्त्री-पुरुष संबंध जितके भयमुक्त आणि प्रगल्भ तितकी सर्वच नाती आणि पालकत्वही जबाबदार आणि प्रगल्भ बनेल या जाणिवेतून स्त्रीमुक्तीच्या विचारांकडे पाहिजे. सामाजिक न्याय आणि समता यांची प्रस्थापना न्याय्य स्त्री-पुरुष नातेसंबंधांतूनच होऊ शकेल असे स्त्रीवादाचे म्हणणे आहे. म्हणूनच  स्त्रीवाद हा शब्द अधिक मोकळेपणाने आणि त्याविषयीचा पूर्वग्रह न बाळगता बघण्याची गरज आहे.

मुळात हा शब्द अस्तित्त्वात आला याचे कारण एक माणूस म्हणून मोकळा श्वास घेण्याचा पुरुषासारखा हक्क स्त्रीलाही आहे. असे असून प्रत्यक्षात जगभर स्त्रियांना दडपणे होती, त्यांच्यावर मर्यादा होत्या, त्यांना दुय्यम स्थान होते. स्त्रियांचे शोषण होत होते आणि होत आहे. स्त्रिया दडपल्या का जातात? स्त्री आणि पुरुष यांच्या साचेबध्द प्रतिमा का घट्ट केल्या आणि ठेवल्या जातात? जगातील हिंसा, अत्याचार, युध्द्खोरी, सर्वप्रकारची वंचितता यांचे बळी प्रामुख्याने त्या त्या समाजातील स्त्रिया का ठरतात? याचा विचार करत असताना आज स्त्री आणि पुरुष यांचे समाजव्यवस्थेतील स्थान आणि त्या स्थानाला दिली गेलेली प्रतिष्ठा याच्याशी हे सर्व निगडित आहे हे लक्षात येते. अधिकार गाजवणे, वर्चस्व गाजवणे या प्रबळ भावनेतूनच जेव्हा सगळी नाती नियंत्रित केली जातात तेव्हा त्या नात्यांना अत्यंत संकुचितपणाच्या साच्यांत बसवले जाते. अत्यंत मर्यादित अवकाशात त्यांची वाढ होते आणि मग त्यातून निर्माण होणाऱ्या असुरक्षिततेतून व भयातून हिंसा अव्याहतपणे होत राहते. हिंसेचे बळी दुबळे, वंचित आणि कमकुवत घटक ठरतात. मुले आणि स्त्रिया बळी ठरण्याचे हे प्रमुख कारण आहे. म्हणूनच जे दुसऱ्याच्या दुर्बलतेचा, असहायतेचा गैरफ़ायदा घेत वर्चस्व गाजवतात ती पुरुषसत्ताक व्यवस्था असे समीकरण आज चिकित्सेच्या मुळाशी आहे. म्हणजे लिंगावरुन स्त्री पुरुष ठरत असले तरी व्यवस्थेतील स्थानावरुन पुरुषभाव आणि स्त्रीभाव ठरतो. तिथे लिंगभेदाचा मुद्दा हा जात, धर्म, वंश, राष्ट्र यातील भेदाभेदांशी जोडला जातो. त्यामुळे मानवी प्रतिष्ठेचा, स्वातंत्र्याचा, समतेचा विचार हा मूलतः प्रगल्भ स्त्री-पुरुष नात्याशी जोडला आहे हे लक्षात घेतले पाहिजे.

 

या संदर्भ ग्रंथाविषयी थोडक्यात-

 

या ग्रंथाचे संपादन वंदना भागवत, अनिल सपकाळ आणि गीताली वि.मं. यांनी केले आहे. यात एकूण ४९ लेखकांचे योगदान आहे. वंदना भागवतांचे प्रास्ताविक चिंतन आणि गीताली वि.मं. नी घेतलेला मिळून साऱ्याजणी च्या वाटचालीचा आढावा हे एकत्रितपणे चिंतन आणि प्रत्यक्ष कार्य यांचे द्विदल मानता यावे. यात अनेक प्रसिध्द विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते, लेखक, समीक्षक, प्राध्यापक सहभागी झाले आहेत. वेगवेगळ्या विचारांनी काम करणारे, स्त्रीवादा बाबत विविध मते असणारे, स्त्री-पुरुष नात्याचा आपल्या सामाजिक आणि सांस्कृतिक भूमीवर उभे राहात विचार करणारे अनेकजण एकत्र येणे हे या ग्रंथाचे वैशिष्ट्य आहे. 

जात, धर्म आणि वर्ग यातील स्त्री-पुरुष नात्याचे भान मांडत असताना, भारतीय राजकीय तत्वचिंतनात स्त्री प्रश्नाची जाण कशी होती आणि आज प्रत्यक्ष व्यवहारात त्याचे स्वरुप काय आहे याची चिकित्सा करणारे लेख यात आहेत. याअर्थाने तत्वविचार आणि प्रत्यक्ष काम यांचा मेळ घालण्याचा प्रयत्न यात केलेला आहे. 

पुष्पा भावे, यशवंत सुमंत, गोपाळ गुरु, राजेश्वरी देशपांडे, दीप्ती गंगावणे, जयदेव डोळे, अरुणा पेंडसे राजा दीक्षित, सदानंद मोरे, प्रदीप गोखले, प्रतिभा पिंगळे, सुरजित कौर चहल, फ़क्रुद्दिन बेन्नूर, नीलीमा गुंडी, वंदना-बोकील कुलकर्णी, रेखा इनामदार साने यांच्यासारखे विचारवंत आणि सामाजिक बांधिलकी मानणारे प्राध्यापक, विद्युत भागवत, छाया दातार, जया सागडे, श्रुती तांबे, प्रवीण चव्हाण, अनघा तांबे, वंदना सोनाळकर, संजयकुमार कांबळे यांच्यासारखे स्त्री-अभ्यास केंद्राशी निगडित असणारे विचारवंत-प्राध्यापक तसेच कुमार केतकर, सदा डुंबरे, सुखदेव थोरात, साधना दधिच,अनिल सदगोपाल,प्रज्ञा दया पवार, मकरंद साठे अशी विविध क्षेत्राशी संबंधित प्रसिध्द नावेही यात सहभाग नोंदवतात. संध्या नरे पवार, मीनल जगताप, प्रतिमा परदेशी, सीमा कुलकर्णी संजय दाभाडे, अनंत फ़डके, किरण मोघे, फ़्लेविया अग्नेस, कल्पना कन्नबिरन, आनंद पवार, चयनिका शहा यांच्यासारखे प्रत्यक्ष कामात असणारे आणि त्या कामाची वैचारिक मांडणी करणारे लोक त्यांचे मौलिक अनुभव व त्यातून येणारे निष्कर्ष मांडतात.

 

हे पुस्तक कोणासाठी?

या पुस्तकाचे सर्वसामान्य वाचकाशी नाते काय? असा प्रश्न नक्कीच विचारला जाईल. त्याचे उत्तर देतांना वंदना भागवत म्हणतात "हे पुस्तक साधारणपणे सामाजिक शास्त्रे किंवा स्त्री अभ्यास केंद्र येथे अभ्यास करु इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना उपयोगी ठरु शकते हे उघडच आहे.  कुतुहल विस्तारणे, स्वतःकडे नव्याने बघणे हा जागतिकीकरणाचा अपरिहार्य परिणाम आहे; तो नाकारता येणार नाही. आपण इतक्या वेगाने आणि विविध अनुभवांना सामोरे जातो आहोत. आपल्याकडे असलेले, आपल्याला दिले गेलेले सगळेच नव्याने तपासणे गरजेचे आहे. ही गरज ज्यांना वाटते त्या सर्व वाचकांना हे पुस्तक एक महत्त्वाचा संदर्भ आहे. त्याशिवाय स्पर्धा, बाजारीकरणाच्या रेट्यात, आपणच संकुचित केलेल्या नातेसंबंधावर ज्यांना तोडगा शोधायचा आहे त्यांनी हे पुस्तक नक्कीच वाचले पाहिजे."

 

शब्द प्रकाशनाने हे पुस्तक फक्त हे ठराविक घटक डोळ्यासमोर ठेऊन बाजारपेठेत आणले आहे का? शब्द परिवार, मिळून सा-याजणी परिवार आणि अभ्यासाकरता हे पुस्तक घेणारे लोक वगळता एक मोठा वर्ग या पुस्तकापासून दूर आहे असे मला जाणवते आहे. ज्या वाचकांना अनेक कारणांमुळे या पुस्तकाविषयी कुतुहल वाटत नाही असे सर्व लोक त्या गटात आहेत.  कुतुहल वाटणे स्वाभाविक आहे पण ते का वाटत नाही त्याची कारणेही मला माहिती आहेत. पुस्तकाचा आकार पाहिल्यावर ते वाचायला जेवढा वेळ लागतो तेवढा वेळ आपल्याकडे आपल्या हक्काच्या माणसासाठी सुद्धा नाही ही आज अनेक घरांमध्ये वस्तुस्थिती आहे.  लोकांनी जगात प्रकाशित झालेले प्रत्येक पुस्तक वाचले पाहिजे अशी माझी बिलकूल अपेक्षा नाही हे सुद्धा नमूद करते. पण वाढती स्पर्धा आणि आधुनिक जीवनशैलीशी जुळवून घेत असलेल्या प्रत्येकाने ते पुस्तक किमान एकदा तरी वाचावे असे मला वाटते. भारतात किंवा भारताबाहेर राहतांना आज आपण दोन स्तरावर जगतो आहोत.- पारंपारिक आणि एक ग्लोबल स्तरावर! नवे जग, नवे अनुभव समोर, वेगळ्या वाटांवर चालतांना आपल्याला ता हरवत. आर्थिक दृष्ट्या सक्षम झाले तरी समाजाच्या संपन्न घटकाचे जगणे सोपे होते  ही जाणीव असली तरी अनेकांना नेमक काय करायचे ते उमजत नाही. 

 

ज्यांना समाजाभिमुख अशी कृती करायची आहे त्यांचे जगणे सोपे आहे का? आपल्याकडे जात, धर्म, वर्ग हे इतक्या व्यामिश्रपणे एकमेकांत मिसळले आहेत की समाजाचा एक कर्ता घटक म्हणून आपण कसे कार्यरत होऊ यावर आज खूपच ताण आहेत. काहीही करायचे झाले तरी आपल्या कृतीचा कोणता अर्थ कोणत्या संदर्भात घेतला जाईल याच्या इतक्या शक्यता निर्माण होतात की त्यातून केवळ आपल्या सुखाकडे बघावे आणि उगा राहावे अशी भावना प्रबळ होताना दिसते. त्याचबरोबर आर्थिक दृष्ट्या अधिकाधिक प्रबळ गटाच्या धारणा सगळ्याच क्षेत्रात प्रभावी ठरताना दिसतात. त्यातून सामाजिक न्याय, समता, चांगुलपणा, सत्यशोधन हे सगळेच बाजूला पडताना दिसते. थोडक्यात समाजासाठी जगण्याचा प्रयत्न करणारा हा एक गट सुद्धा झगडतो आहे.

एक सामायिक भावना मात्र कोणत्याही वादापलिकडे जाणारी आहे आणि ती म्हणजे आपल्या मुलाबाळांना एक न्याय्य, सुखकारक, सुरक्षित, स्वच्छ पर्यावरणाचे, आनंदी जग मिळावे. सकाळी उठल्यापासून तर झोपेपर्यंत असे जगता येते का? नाही. ते मिळवण्यासाठी आपला झगडा सुरु आहे. त्या झगडण्यात ऊर्जा खर्च होते आहे. आपण नाकारले जातो, आपल्यापासून काही हिरावून घेतले जाते. आपण किमान सुरक्षित जीवन जगण्याच्या मागे धावत आहोत ही वस्तुस्थिती आहे. त्याचा रेटा एवढा आहे की आपल्यावर बाजारीकरण व जागतिकीकरणामुळे नको असलेली तसेच अधिक तणाव निर्माण करणारी मूल्ये लादली जात आहेत हे उमगत नाही, उमगले तर त्यावर ताबा ठेवण्याचा विचारही मनाला स्पर्श करण्या एवढा आपल्याकडे वेळ नाही. त्याचा मनावर ताण आहे, भीती आहे, असुरक्षिततेची एक झालर आहे.या सर्वांवर उपाय शोधायचा असेल तर समाजातल्या दोन्ही घटकांना  मुळात ताण कुठे कुठे आणि कसे आहेत याचा विचार करणे गरजेचे आहे.

 

 निव्वळ भावाकुलतेतून प्रश्न सुटत नाहीत. दुःख दूर करायचे तर आपल्या भोवतालच्या जगाची चिकित्सा करावी लागते. .मैत्री, करुणा या मूलभूत मूल्यांची प्रस्थापना करायची तर दुःखाचा शोध, दु:खाची साथ असेल हे सुद्धा मनाशी पक्के असावे लागते. अवमानित होणाऱ्यांचे, सन्मानाने जगणे नाकारले गेलेल्यांचे जीवन आपल्या प्रयत्नांच्या आणि विचारांच्या गाभ्याशी असावे लागते. यादृष्टीने या पुस्तकात जात, धर्म आणि वर्ग या निकषांची जी चिकित्सा केली आहे ती आपल्या सगळ्यांच्याच अनुभवांशी जोडली जाते. अवमानित होणे म्हणजे काय आणि त्यावर कोणता उपाय असू शकतो याचे विविध पैलू यातील लेखनातून आपल्यासमोर येतात. सगळ्यात महत्वाचे म्हणजे स्त्री-पुरुष नाते संबंधांची प्रगल्भता म्हणजे काय? याचा ऊहापोह यातील लेखनातून करता येईल. हा ऊहापोह करण्याचे आपण टाळल्यामुळेच स्त्री आणि पुरुष दोघांचीही साचेबंद प्रतिमांतून कोंडी होते आहे. घुसमट वाढते आहे. त्यातून हिंसाही. आपल्याला आपले पूर्वग्रह आणि संकुचित विचारसरणी टाकून देऊन, झपाट्याने बदलणाऱ्या जगात नव्याने उभे राहायचे असेल तर एक सामान्य वाचक म्हणूनही आपण या पुस्तकाला नक्कीच भिडू शकतो.  हे भिडणे म्हणजे त्यात आत्मचिंतन आणि आत्मटीका सुद्धा आली. हिंसा आणि विनाश टाळणारी आपल्या मातीतली जीवनदृष्टी त्यामुळे वैश्विक करता येईल. भावनांना संवादाच्या आणि करुणेच्या मूल्याशी जोडले तर त्यातून मैत्रीची प्रस्थापना करणे शक्य होईल. 

 

या ग्रंथातले स्त्रीवाद हे चर्चाविश्व फ़ुले-गांधी-आंबेडकर यांची परंपरा निर्माण करु पाहणारे चर्चाविश्व आहे. जोतिबा फ़ुले आणि सावित्रीबाई फ़ुले यांचे जीवन परस्परांशी आणि सामाजिकतेशी किती एकरूप झाले होते, त्याने कोणत्या आव्हानांचा सामना केला आणि त्यातून आपल्याला काय मिळाले? गांधींच्या चळवळीत स्त्रिया निर्भय कशा झाल्या? त्या आत्मविश्वासाने रस्त्यावर येऊन अन्यायाविरुध्द आवाज कशा उठवू शकल्या आणि समाजपरिवर्तनाच्या कामांत सहभागी कशा होऊ शकल्या? आंबेडकरांनी कोणत्या सामाजिक स्तरातील स्त्रियांना आत्मविश्वास देऊ केला? कसा? त्यांचे स्त्री-पुरुष नातेसंबंधांचे संकल्पित चित्र काय होते? याचा विचार आपण तपासला तरीही आत्ताची आपली सांस्कृतिक कोंडी फ़ोडणे आपल्याला शक्य होईल. तसेच आपणच संकुचित केलेल्या आपल्या विचारांतून, नातेसंबंधांतून बाहेर पडलो तर जागतिकीकरणातून, बाजारीकरणातून आपल्यावर थोपली जाणारी मूल्ये आपण बाजूला ठेवू शकू. काहीएका विवेकानं मैत्रीच्या वेगळ्या, विविध शक्यता तयार करु शकू. तीच आजची आपली खरी गरज आहे. हे पुस्तक वाचण्यासाठी हे एक महत्वाचे निमित्त असू शकते.   

 

   

About the Author

सोनाली's picture
सोनाली

मिळून सा-याजणी, मेनका , रोहिणी, अक्षर मासिकातून लेखन प्रसिद्ध.

लोकमत, लोकसत्ता, सकाळ, मटा या पेपरातून कविता, लेख 

शक्यतेच्या परिघावरून कविता संग्रह