गोष्ट एका काळोखाची

गोष्ट एका काळोखाची

-प्रिया जामकर

 चेतनाची गोष्ट तुम्हाला सांगायलाच हवी असं हल्ली खूपदा वाटतं.पण हे जे माझं वाटणं आहे त्यामागे तिच्याविषयीचं माझं ममत्व,अभिमान,दुःख,काळजी वगैरे आहे असं कोणालाच काय,मलाही वाटत होतं.पण खरं कारण वेगळंच आहे.या मुलीनं मला पार अडकवून, जख़डून ठेवलंय.तिच्या कहाणीत मी बंद झालेय. बरं, त्या कहाणीत मला काही रोल असतां,काही ‘से’ असतां तरी माझ्यासाठी सोपं झालं असतं.पण मला काही रोलच नाही.हं, रोल एकच!मी ऐकायचं आहे आणि मूकपणे ‘चेतनाच’व्हायचंपण मी चेतना नाही. चेतना शेवटी ‘चेतना’आहे!आणि मला या कहाणीतून बाहेर पडायचय. जमलं तर चेतनालाही खेचून आणायचय..मला कळत नाहीए, या तटबंदीला भगदाड कसं पाडावं?कसा छेद द्यावा या काळोखाला?भूतकाळ पुसतां येणारच नाही..पण वर्तमानाचं कोवळं ऊन कसं निर्माण करावं?? मला माहीत नाही.फक्त एवढंच आहे माझ्या हाती की मी ही गोष्ट तुम्हाला सांगणार आहे.एक मोठं रिंगण आहे काळोखाचं; मी तुम्हाला आत घेणार आहे.

 

तशी मी काही घाबरत नाही हं संकटांना; आणि दुःख म्हटलं की मला जरा उत्तेजितच व्हायला होतं. माझ्या लहानपणी माझी एक मैत्रीण गावाला जायला निघाली.का कोण जाणे,ती निघताना मी रड रड रडले.माझ्या रडण्याचे आमच्या दोघींनाही नवल वाटले. कुठनं आलं एवढं रडू कोण जाणे! आणि मग ती मैत्रीण तिकडे गावाला जळून गेलीच. आमच्या गावची ती घट्ट मिटून आलेली संध्याकाळ आठवली की मला माझी ती मैत्रीण आठवते. माझं हे असं गुपितच आहे लहानपणापासून, मला आपसूक दुःखाचा अदमास लागतो. आतां सांगा, प्राजक्ताची फुलं भल्यापहाटे केव्हातरी गुपचुप झाडावरून पडतात..येतो का त्यांचा काही आवाज??पण मला नेमकी जाग यायची..गच्चीवरच्या कठड्यावरून वाकून मी प्राजक्ताचं झाड बघत बसायचे तासनतास..

 

त्यावेळी इकडे चेतना काय करत असेल? एका गावात ती ,एक गावात मी! आमच्याकडे दुपारी चार वाजता पाणी भरुन माझी आई स्वच्छ तोंड धुऊन पॉन्डस पावडर लावायची,मी तिच्या गुबदुल अंगाला घट्ट मिठी मारुन पॉन्डसचा आणि तिच्या स्वच्छ धुतल्या अंगाचा वास घेत सुखी व्हायचे. काय सुख असायचं लहानपणी..नुस्तं असं चारी बाजूनं..गोड शिरशिरी.. पण मन जरा तिडपागडंच होतं हं माझं! असा सगळा सुखाचा चमचमता प्रवाह असायचा आणि मधेच मी जरा भेदरुनच जायचे..कसली भीती अनामिक गं बाई.. हे सुख, हे क्षण, जाणार निघून.. ही आपली स्वच्छ,ताजी, निवांत आई गेली मरुन तर..?

 

आता वाटतं, लहानपणी अनुभवलेल्या त्या दुःखाच्या, एकटेपणाच्या  निसटत्याक्षणीं मी चेतनाशी तर नव्हते ना जोडली जात? ..आणि दुःख ना सालं वस्ताद असतं.लब्बाड लांडगं अगदी!! ते काय करतं, सुखात दडून बसतं. म्हणजे मी चेतनाला पहिल्यांदा भेटले.. तुम्ही एकदा पहाच तिला, अशी टवटवीत,जास्वंदीचं फूल गर्रेबाज!आली ना तुमच्यासमोर की उत्साह असा खळखळ सांडलाच समजा. काय बिशाद तुमची की तुम्ही तिच्याकडे दुर्लक्ष कराल? देवाचंच लेकरू ते; आई बाप दाखवायचे आपले कोणीतरी. मी अगदी पहिल्या भेटीतच चमकले. अरेच्चा!! इतका निर्मळ आनंद?? ती चार मुलींबरोबर आली होती,गेली जरा वेळाने. मी उत्साहाने सरांना म्हटलं,’ किती गोड मुलगी आहे ती, मला आवडली.’’सर हुं म्हणाले. आणि त्यांनी जोडलं मागाहून; ‘ पण बघ, तिला डायबेटीस आहे.’अच्छा!!! ही चाल आहे होय तुझी? मी मनात दुःखाला म्हटलं. पण मी म्हटलं ना तुम्हाला, दुःख ना लब्बाड लांडग आहे, ढोंगी कुठचं. तेव्हा मला कुठे माहीत होती चेतनाची गोष्ट?आम्ही मग भेटत गेलो. ती माझ्या विभागात आली शिकवायला. रोज भेटत राहिलो. विभागात, वर्गात,कॉलेजात हळूहळू ती सर्वांना आवडू लागली.मनापासून काम करणारं माणूस आवडतच की सगळ्यांना! पण नाही, एवढंच नव्हतं. तिचा तो सळसळता उत्साह, मागल्या पुढल्या अंगणात मातीवर झक्कास सडा टाकल्यावर कसं वाटेल ,मला नवल वाटायचं, हिला कसा डायबेटीस?? इतका नैसर्गिक आनंद ठासून भरलाय हिच्यात, आधीच तर लेकीबाळी म्हणजे घराचं वैभव, त्यात हिच्यासारखी लेक असेल तर काय वर्णन करावं त्या घराच्या भाग्याचं??मी आपली चेतना माझ्याबरोबर असण्याचा आनंद मनातल्यामनात गुपचुप साठवून ठेवायचे.रोज तिची वाट पाह्यचे.उगीच तिच्यावर अवलंबून राह्यचे.पण मी तुम्हाला सांगते,तुम्हाला जर एखादं पुस्तक लायब्ररीमधून शोधून हवं असेल तर तुम्ही ते चेतनाला सांगा.ती हमखास शोधून देणार. देणार म्हणजे देणारच. आणि पुस्तक शोधायचं म्हटलं ना की माझ्या मनावर खूप ताण येतो.आता कसं होणार आपलं? अशी एकदम काळजीच वाटू लागते.पुस्तकांना हे माहीत आहे.लहानपणापासूनच त्यांनी माझी काळजी घेतलीय..ती आपसूक येतात माझ्याकडे..हे एक गुपितच आहे, जसं दुःखाचं आणि माझं आहे ना, तसंच. पण चेतनाला पुस्तक शोधायला सर  लावायचे.मला सुरुवातीला सरांचा राग यायचा. काय सारखं बिचारीला वेठीला धरायचं? पण चेतना अशी पाहतां पाहतां जे त्या पुस्तकांच्या जंगलात घुसायची,आणि काळोखातून वेगाने मुठीत चांदणी पकडून यावी तशी विजयी चेह-याने आमच्यासमोर उभी राह्यची.मला बापडीला आदरच वाटायचा तिच्याविषयी.पण एक मात्र आहे हां की हिचा कध्धीसुध्दा हेवा वाटला नाही.ईतकी अतीव माया दाटून यायची.ती का? आता का? याला काय उत्तर? कदाचित देवाने तिची गोष्ट मागेच केव्हातरी माझ्या काळजावर कोरून ठेवली असणार.पण आता काळाच्या प्रवाहात विस्मरण होणारच की माणसाला,. तसं झालं मला विस्मरण, पण ते दुःख.. ते आहेच की.. लब्बाड कुठंच.. बोच-या मांजरी सारखं येतं पायात मधेमधे.लकलकतं काहीतरी..तुम्हाला काही कल्पनाच नसते पण अवचित तुमच्या ओठावर येऊन बसतं.अस्सा चकवा देतं सालं, आणि वर हसतं फिदी फिदी, हास हास. मी हसणार नाही,रडणार नाही,एकटक बघणार तुला.चल, खेळ खेळू. तुझी पापणी लवते की माझी..

 

पण एक गोष्ट मात्र मला तुमच्याजवळ कबूल करायला हवी. त्या बेट्या दुःखानं ना आमच्या चेतनाला काहीसं लबाड केलंय. आता मला तिची ही लबाडी आवडते ते सोडा. पण शेवटी लब्बाडी ती लब्बाडीच किनई? म्हणजे बघा इतके आम्ही सतत बरोबर होतो. अभ्यासावर बोललो, खूसूखूसू गॉसिपिंग केलं, हॉटेलात गेलो, शॉपिंग केलं, प्रवासात गायलो,नाचलो, समुद्रात डुंबलो,काळोख्या रात्री गपगुमान शेजारी बसून राहिलो, कध्धी म्हणून पठ्ठीनं ब्र काढला नाही. नोकरी मिळवताना सहानुभूती घेण्यासाठी तरी बोलावं की माणसानं काही, पण छे. शब्द नाही. आम्हाला कळणार कसं? आणि ही लबाडी नाही तर काय आहे काय? पण मी म्हणते असू दे, दुःखाची लबाडी नाही का सहन करत आपण, चेतना काय आपलीच!

 

पण तुम्हाला सांगते, मला शेवटपर्यत तिची गोष्ट कळलीच नसती.ही मुलगी स्वतःहून काही सांगतच नाही ना. आणि माझा स्वभाव चिकित्सक,म्हणजे भोचक नाही. तसं मी तिला एकदा विचारलं होतं, तुझ्या घरात तुझ्या आईचा फोटो कसा नाही ग, तू तिच्यासारखी दिसतेस, मग तिने  तिच्या आईचं गुणगाण केलं. आणि आई कशी अचानक अपघातात गेली ते सांगितलं. तिने सांगितलेला तो प्रसंग माझ्याडोळ्यासमोर तरळतो.. दोघे नवरा बायको दुचाकीवर लांब गावाला चाललेत..आणि बाई बोलता बोलता चालत्या गाडीवरुन पडते..आणि संपतच सगळं.चेतनाची गोष्ट कळल्यानंतर आता जेव्हा मी हा प्रसंग आठवते ना तेव्हा माझ्या मनावर खूप ताण येतो. मला वाटतं हा प्रसंगही घडलाच आहे.कुठे पण ?कोण ते नवरा बायको? बायको गेल्यानंतर आपल्या दोन सोन्यासारख्या मुलींना सांभाळणारा तो सह्रदय बाप आणि त्याच्या दोन गुणी मुली,एक अधिकच दुर्देवी,कारण तिला डायबेटीस झाला आहे. त्या बाईच्या गाडीवरुन कोसळल्यानंतरची सगळी गोष्ट मला माहीत होती..पण त्या आधीची गोष्ट??

 

मृत्यू नाही काही माणसाला खचवत. तो नाही माणसाचा चेंदामेंदा करत. मृत्यू किती क्षमाशील, मुक्तीदायी असतो. माझी आई अपघातात गेली आहे अशी दिमाखदार गोष्ट चेतनाने मला सांगितली.माझा विश्वास बसला.माझा विश्वास बसतोच. आणि बसणार नाही का? तुम्हीच सांगा.आतां हे आमचं पात्र जर ईतकं आनंदी, नैसर्गिक असेल तर नाही का बसणार विश्वास? अशा मुलीला काहीतरी अमंगल, बीभत्स, भीषण,दुर्देवाचा स्पर्श होण्याची काहीतरी शक्यता आहे का? म्हणजे अशी काही शक्यता असते तरी का? सांगा ना. मी मनातल्यामनात सगळ्या शंका, शक्यता पुसून टाकल्या. नव्हे,तसं काही नाहीच तर. आणि राहिलो की आम्ही बागडत. प्रश्न होते,काळज्या होत्या.पण इतकं काय मोठंस? करु की काहीतरी. मला काहीतरी सुचत गेलं,तिला सुचवत गेले, ती मेहनती होती, करत राहिली. असंच चाललं असतं हे शेवटपर्यत. पण शेवटी दुःख होतं ना.. ते खडबडून जागं झालं. च्यायला!! मला गुंगारा देतात की काय या पोरी? हिला सांगायचं सुचत नाही, तिला विचारायचं सुचत नाही..आं? मी मग रुजणार कसं? वाढणार कसं? मग ते दुःख,. लब्बाड म्हटलं ना मी तुम्हाला..आपसूक माझ्या ओठावर येऊन बसलं.

 

अशाच आम्ही बसलो होतो. अशीच एक कोणाची कहाणी होती. मी अस्वस्थ झाले होते. चेतना पहात होती माझ्याकडे. मी म्हटलं,’’ काय पाहतेस ग?ती म्हणे,’कशी तू पाघळतेस.’’मी म्हणाले,’असं नाही ग, आपली आयुष्यं सोपी आहेत त्या मानाने. आतां तू तुझंच बघ ना.तुझ्या बाबांच आणि तुझं नातं ईतकं हेल्दी आहे.म्हणून अशा परिस्थितीमधे सुद्धा ईतकी आनंदी असतेस. चेतना, अग आपल्या माणसाची इमेज तुटणं हे दुःख भयंकर आहे..आई नसणं हे एकवेळ सहन करणं सोपं आहे पण आई वेडी असणं हे तिच्या मृत्यूपेक्षाही भीषण नाही का?

 

मी बोलून गेले. आई वेडी असण्याचंच उदाहरण मी नेमकं का द्यावं? जेमतेम एक मिनिटभर चेतना गप्प झाली, आणि मग तिने ते वाक्य उच्चारलं,’’ प्रिया, माझी आई आहे. ती जिवंत आहे, पण ती वेडी आहे.’’

                                                           …………………

 

 प्रियाने नेमकं तेच उदाहरण का द्यावं? दोन वर्ष मी तिच्याबरोबर आहे पण तिला  राजश्री विषयी सांगायचं टाळत राहिले. रोजचंच मरण आपलं, आणि एकाच तिकीटावर पुन्हा पुन्हा कसला सिनेमा पाह्यचा? ईतक्या छान मजेत असतो आम्ही.. असू देत की एखादीतरी जागा अशी जिथे त्या बयेची छाया नाही. पण प्रियाच्या त्या वाक्याने मात्र सगळं कोसळलं.माझं आजवरच सगळं सोसणं,सगळी वेदना प्रियाला देऊन टाकून मी घरी आले. स्कूटर पार्क करुन जिने चढताना मनात देवाला म्हटलं,’’ माझ्याबाबतीत तू जरा जास्तच कठोर झालायेस हं.’’घरी आले तर माझं दुर्देव तिथेच येऊन बसलं होतं. का येते ही बाई माझ्यासमोर? ही समोर दिसली की व्देषानं माझं अंग तापतं. शिर उठते. माझं वाट्टोळं केलं हिने,आणि वर ही पुन्हा डोक्यावर पदर घेऊन साळसूदपणाचा आव आणून बसली आहे. वात्सल्यसिंधू जननीच की जशी. ‘’ तायडा कुठे गेली? मला तिला बघायचंय.’’काय बघायचंय??  मला नाही ना पण दाखवायच तुला माझं तोंड!!  सतत सूड उगवला हिने, माझा दोष काय तर मी मुलगी म्हणून जन्माला आले. कधी स्वीकारलंच नाही हिने मला. स्वतः तर उठलीच आयुष्यातून आणि माझ्याही जिवावर उठली वारंवार. गोष्टीतली सावत्र आई सुद्धा इतकी क्रूर नसेल.

 

देवाची तरी काय अजब खेळी!! मी आणि बनू पाठोपाठ मुलीच झालो आणि हिचं डोकं सटकतच गेलं. बनू लहान म्हणून सुटायची हिच्या तावडीतून पण मी मात्र अडकतच गेले. कधी तापत्या तव्यावर, कधी रूळावर, कधी नदीत.. मी जिवंत कशी राहिले हे एक कोडंच आहे. भयच भय असायंच लहापणीं. अशी बुक्कयानं मारायची, अश्शी मारायची, आणि बाबांना सांगितलं तर अजून मारेन म्हणायची. लटलट कापायचे नुस्ती. कावीळ होऊन आजारी पडले एकदा, तर नुस्ता भात आणि त्यावर तिखट खाऊ घालायची. त्यावेळीच कोमात गेले. डॉक्टरांनी गेली म्हणूनच ,सांगितलं, पण कशीबशी आले परत. का आले परत? किंवा माझ्याऐवजी तिच गेली असती तर? जर आणि तर.. पण आमच्या बाबांचे डोळे खाडकन उघडले. मग मात्र त्यांनी घटस्फोट घ्यायचं ठरवलं. बाकी राजश्रीला शहाणं म्हणायचं की वेडं हे मला अनेकदा कळत नाही.हिने कोर्टात आमच्या दोघींचा ताबा मागितला की!!  आमच्या बाबांच धाबंच दणाणलं. मी लहान, बनी त्याहून लहान, पोरींना नीट सुधरेल ना , अशी चिंता पडली. कायदे बायकांना संरक्षण देतात हे चांगलय, पण बाईच अशी कैदाशीण असते,तेव्हा?? ही इकडे मला छळायची, आणि जगासमोर मात्र डोक्यावर पदर घेऊन साळसूद बनायची. कोणाला वाटेल काय हिच्यावरच अन्याय होतोय.कोर्टात मला शेजारी चिमटे काढायची. धमकी द्यायची.लटलट कापतच कोर्टासमोर उभी राहिले. पण सांगितलं खरंच. म्हटलं,’’ खूप मारते मला ही. मला माझ्या बाबांजवळच राह्यचं..’’  तेव्हा कुठे सुटले तिच्या तावडीतून. पण घटस्फोट झाला तो बाबांसाठी, जगासाठी. ही सगळी माणसांच्या जगातील न्याय अन्यायची गणितं. पण देवाची खेळी वेगळीच आहे.घटस्फोट घेऊन तुम्ही कराल हो डाव बंद  पण त्याने टाकलेला डाव? त्याचं जाळं? त्यातून कसं सुटायचं?  त्याचा डाव खेळावाच लागतो,कितीही हरलं तरी, डाव सोडून जाता येत नाही.. हिने तरी कुठे मानलं तसं? छे छे.. ‘’ धनी आहात तुम्ही माझे. असं कुठे नातं संपतय होय? ते काय कागदावर असतं ? जळवासारखी चिकटलीय ही बाई आमच्या आयुष्याला. जळू असा जाईल होय? लचके तोडूनच जातो तो, हिचं तेच चाललय, आमच्या आयुष्याचे लचके तोडणं. घटस्फोटानंतरही राजश्री आमच्या शेजारीच आली राह्यला. आमचा मारण्यांचा वाडा पाडून अपार्टमेंट करायचं ठरवलं. हिने मागितला की एक फ्लॅट, त्याशिवाय जायलाच तयार नाही. शेवटी द्यावाच लागला. बसली आमच्या ऊरावर येऊन! मी माझ्या मैत्रिणींना पाहते, कशा सांभाळतात त्या आपल्या मुलांना. मला आईच माहीत नाही, तो शब्दच नाही माझ्यासाठी. नसतीच मला आई तर किती बरं  झालं असतं.माझी आई माझे बाबाच आहोत. तेच आई अन् तेच बाबा. बाबांच्या सहनशीलतेची कमाल वाटते. अजूनही बाळा बाळा करत तिला समजावत असतात. आणि या बाळाने मात्र त्यांच्या आयुष्याची वाट लावली. पण गंमत आहे हां. जगाच्या मते ती वेडी आणि तिच्या मते जग वेडं. ‘’मी चांगलीच आहे की,चला आपण राहू एकत्र. आणि या पोरींना द्या हाकलून. कुणाच्या आहेत या ? माझ्यातर नाहीत बाई. मला मुली होणं शक्यच नाही.सोडा बरं तुम्ही त्यांना आणि चला आपण राहू एकत्र.’’ असा तिळपापड होतो माझ्या अंगाचा. लहानपणी घाबरले हिला खूप. आतल्याआत घुसमटले. आणि त्यातून हे डायबेटीसचं दुखणं लागलं मागे. लग्न होउन या मारण्यांच्या घरातून निघून जाईल तर ते ही या डायबेटीस मुळे ठरत नाही.

 

लहानपणापासून याबाईची एकेक रूपं पाहिली. एक नंबरची कलाकार आहे. कधी बाबांच्या काळजीने बाईसाहेबांचा जीव खालीवर होणार. ‘’ असे कसे हो उघडे बसता तुम्ही?जा पाहू. शर्ट घाला अंगात. दृष्ट लागेल ना..’’शेजारी असली की रोज रात्री या बाईंची फेरी आहेच. ‘’ मला माझ्या धन्याला डोळे भरून पाह्यचंय. ‘’ चुलीत जा तिकडं. आणि तिचा धनी येऊन बसतो तिच्यासमोर. वर पुन्हा मला सांगतात.’’ बायडे, तिला डिवचू नको.तिला बघू दिलं की शांत असते ग ती..’’ डोंबल ह्यांचं, घ्या बायकोची बाजू. काढा आठवणी अजून. तिच्या हातचा स्वैपाक काय, तिच्या हातची रांगोळी काय, मारण्यांना म्हणे हिने रांगोळी काढेपर्यत रांगोळीच माहीत नव्हती. ओवाळा मग आता, पंचारती घेऊन. बाबा असे मऊ होतात आमचे, आणि दुसरी ती बनू. मला म्हणे,’’ तायडे तू विचार कर. आपण तिघे आहोत एकमेकांना. पण ती एकटीच आहे.’’ आणि आले की तिचे डोळे भरून.. बाई ग.. धस्स झालं माझ्या छातीत.. तिला सुनावलं ,’’ बने, खबरदार हं, पुन्हा जर असं बोलशील तर.’’पण तिला हा मायेचा पाझर फुटलाच कसा?  आणि मला नाही फुटत तो ? इतक्या वेळेला जिवावर उठली ही माझ्या, पण मी चांगली ताडमाड वाढले. एवढं हिचं ग्रहण जर सोडलं तर काय वाईट आहे माझं ?  चांगली शिकतेय पैसे कमवतेय, पंण तिच्याविषयीचा ओलावा मात्र पार गेला.संपलाच. राख राख झाली त्याची..

 

एकदाच फक्त जरासं वाईट वाटलं. अशीच आली ही घरी. चिडूनच. आणि सुरु झाले तिचे शिव्याशाप. मग माझा दादा मधे पडला. तर त्याला म्हणाली,’’ तू झोपतोस तुझ्या आईबरोबर.’’ झालं. संपलं. दादाने कमरेचा पट्टाच काढला.अशी सोलून काढलीन तिला. त्यावेळेला पहिल्यांदा माझ्या डोळ्यात थोडं पाणी आलं. हां आलं थोडंसं. पण आई म्हणून नाही, बाई म्हणून. पण ही कसली बहाद्दर, रडली नाही. दादा पट्टयाने मारतोय,ही धावतेय, रस्त्यावर, चौकात,. दादाच दमला शेवटी. तर म्हणते कशी,’’ आता पोलीसात जाते आणि या सगळ्या लोकांना साक्ष द्यायला लावते.’’स्वतःच साडी फाडेल, ब्लाउज फाडेल. आणि रेप अटेमप्ट चा गुन्हा दाखल करेल. लाज लज्जा तर सोडूनच दिलीय.

 

लहानपणी एकदा बाबांचे कपडे घालून गेली की चौकात. बाबांच्या मित्रांने दाखवलं, मारणे अहो , वहिनी बघा कशा आल्यात!! बाबांनी मग हातपाय जोडून कसंबसं घरी आणलं. पण लहानपणी मी खरी घाबरले ती त्या वेळी. घरात आम्ही दोघीच. आणि हिने सगळे कपडे काढले की अंगावरचे. पूर्ण नागडी. आणि मला म्हणाली,’’मी आता अशीच बाहेर जाणार..’’ पाच वर्षाची असेन. जरा इकडे तिकडे. भेदरुन गेले. आपली आई अशी कपड्याविना बाहेर जाणार ? काय करायचं आता ?  कसं मला सुचलं कोण जाणे. पण मी तिच्याशी काही बाही बोलत राहिले. आणि पटकन दार बंद करुन बाहेरुन कडी घातली, आणि धावत बाबांना बोलवायला गेले.. त्यादिवशी माझ्यासाठी आई संपलीच.

 

ती वेडी की शहाणी माहीत नाही,पण तिलाही कळत असणारच की माझा व्देष.. आणि मी काही तो लपवत नाही.. तिच्या माझ्यामधे आता जर काही उरलं असेल तर तो हा व्देषच आहे. बनीला वाटत असेल बाई माया, पण मला नाही. मी या व्देषानंच तिच्याशी जोडले गेलेय. मला त्यातून मुक्ती नाही. राजश्री मेल्यावरही नाही.  ती मेली तरी तिच्याविषयी माया वाटणार नाही मला. बाबा मला सांगतात .’’तिला डिवचूं नको. तिला शांत ठेवण्यातच आपलं भलं आहे.’’ प्रिया पण हेच सांगते. पण राजश्री प्रसंगच असे उभे करते की तेव्हा विचारपूर्वक शांतपणे वागताच येत नाही. माझ्याही नकळत वागलं जातं. तिला जो माझ्याविषयी व्देष वाटला, त्या व्देषानंच माझ्यातही जन्म घेतला, तो व्देषच रुजला आणि वाढला. आणि त्याचंच आता तिला आवाहन आहे. हे आता तिच्या माझ्यातील युद्ध आहे. आणि मी थेट लढणार. गनिमी कावा नाही. तेवढी उसंतच नाही. चांगली मस्त शिकणार, पैसे कमवणार, हसणार, आणि हिच्यावर मात्र डोळ्यातून आगच पाखडणार. चार क्षण बघण्याचे आणि फुका गोड बोलण्याचे सुख मी तरी तिला का देऊ?? अगदी परवाचाच प्रसंग सांगते. आल्या बाईसाहेब!! मी फरशीवर झोपले होते. आणि झालं ह्यांच सुरु..’’ताय,डा का अशी फरशीवर झोपली ? अंग धरेल की.’’मी ताडकन उठले. आणि तिला ओलांडून सरळ आतल्या खोलीत गेले. बदलला की मग बाईंचा सूर!! ‘’  ही टवळी अशी वागते काय माझ्याशी? आज हिला दाखवतेच.’’  असं म्हणत तीरासारखी घुसली की माझ्या खोलीत आणि सटकन कडी लावून घेतली. बाबा बनू दोघंही बाहेर ओरडायला लागले. खोलीत ही आणि मी आणि दाराला कडी. अश्शी घाबरले मी, म्हटलं, चला आज आपला जगाला रामराम. आणि अगदी तस्सच झालंही असतं. तरीही मी धीर करुन म्हटलं,’’ हे पहा, तुम्ही अंगाला हात लावू नका हां, सांगून ठेवते.’’ तर म्हणे,’’काय करशील ग सटवे तू, आं?थांब, मीच दाबते तुझा गळा.’’ आणि धरला की माझा गळा. एक क्षण.. दोन क्षण.. माझा आवाज बंद!! बाबा बाहेर मटकन खालीच बसले.मोठमोठ्याने रडायला लागले. आणि कुठून बळ आलं माझ्या अंगात रे देवा, अशी लाथ घातली तिच्या ओटीपोटाखाली, ती हेलपाटत भिंतीवर आदळली आणि मी सटकन कडी काढली. भीतीने आणि संतापाने मी लटलट कापत होते. आणि ती तर काय पेटलेलीच होती. तिने साडी ,ब्लाऊज फाडायला सुरुवात केली. बाबा आवरायला गेले तिला. मी बाबांना अडवलं,म्हटलं,’’ फाडू देत तिला साडी ब्लाऊज, फाडाच तुम्ही आज. आज तुम्हाला पुन्हा एकदा मला नागडंच बघायचय. तशाच जा तुम्ही ईथून चौकीवर.’’बाबांनी कसबसं आम्हाला आवरलं. तिला तिच्या घरी आणि मला ताईकडे पाठवली. ती माझ्याकडून डिवचली गेली होती.बाबांना सारखं असं वाटत होतं की ती पुन्हा काहीतरी करेल. पहिली गोष्ट तिने अशी केली की माझ्यावरच केस दाखल केली. पोलीसांनी बाबांना चौकशीसाठी नेलं. मला कळालं तशी मी ताईकडून सरळ चौकीवर गेले.एव्हाना आमच्या बाईंची ख्याती चौकीत पसरलेली असल्यामुळे त्यांनी आमच्यावर विश्वास ठेवला. पण फॉर्मलिटीज पूर्ण करणं आलंच की. ह्या बाईसाहेब तिथे बाकावर डोक्यावर पदर घेऊन अदबीने बसल्या होत्या.मला नाईलाजाने त्यांच्या शेजारीच बसावं लागलं.तर हळूच मला ऐकवतात कशा,’’आतां तुझं काही खरं नाही. जातेस तू आतमधे.’’ स्वप्न पहात होत्या मी तुरुंगात जाण्याची. पण इथंही मी त्यांचा विरसच केला म्हणा ना.

 

ते सगळं निस्तरून घरी आलो.हिचा एक प्रयत्न तर फसला. दोन दिवसांनी मी क्लासला जायला निघाले. स्कूटर काढली, आणि आली की ही मागून. धपकन बादलीच ओतली अंगावर..सूं सूं करत मी वास घेतला तर काय, रॉकेल!!  अंगाचं पाणी पाणी झालं माझ्या. ‘’अहो, काय करता हे? मेंटल झालात का तुम्ही?’’ ‘’ तुला बघायचय ना काय करते मी ते, थांब, तुला दाखवतेच काय करते ते.’’असं म्हणत तिने ब्लाऊज मधून काडेपेटी काढली. माझ्या नशीबाने ती काडी ओढलीच गेली नाही. मी जिवाच्या आकांताने रडत ओरडत जिन्याने वरती गेले. दादाने मला दुस-या मजल्यावर हाताला धरुन खेचली आणि घरात ढकलून बाहेरुन कडी घातली. आणि माझ्या दोन्ही काकवांनी तिला धरुन बडवली. दादाने मला रॉकेल टाकलेल्या अवस्थेत चौकीवर नेऊन गुन्हा नोंदविला, आणि मग येरवड्याचे लोक येऊन घेऊन गेले तिला. येरवड्याला ती आजवर खूपदा गेलीय. पण तिकडे बाईंचे वागणे नीटनेटके ना.. इथे आम्हाला पाहिलं की बिथरतं ह्यांचं डोकं. तिची आई घेऊन येते तिला येरवड्याहून. आणि टाकते आमच्या शेजारी आणून.. चार दिवस बरे गेले की झालीच सुरु बाईंची नाटकं.

 

या सगळ्याचा अंतच मला दिसत नाही. कसं संपणार आहे सगळं? यातून बाहेर पडण्याचा काहीतरी मार्ग असेल का ?  प्रिया म्हणते तटस्थ होऊन जा, चेतना. तिच्याविषयी तुला माया नाही, नसूं दे. पण व्देषातून बाहेर पड.’’ जमेल मला? माहीत नाही, खरंच माहीत नाही.

 

                                                …………………………………

 

त्यादिवशी चेतना भरभर बोलतच सुटली.तिच्या त्या शब्दांमधे मी पार गाडले गेले. मला रडू आलं का ?धक्का बसला का ? की माझं ते तिडपागडं मन याची वाटच पहात होतं ? रस्त्यावर वाहनांची गर्दी होती.. ती पाहून मला कधी नव्हे ते खूप बरं वाटलं.त्या गर्दीतून मी वहात वहात कशीबशी घरी पोचले..खूप भीती वाटली..आणि खूप गिल्टी वाटलं.. ते गिल्ट कशाचं होतं कोण जाणे.. पण दुःखाचा गारठा भिनत गेला माझ्यात..त्या गारठ्याने मला स्मृतीच्या गर्तेत ओढत नेलं..मृत्यूचा तो थंडगार स्पर्श नेहमी आठवतो मला. माझी आजी गेली तेव्हा मी तिच्याजवळ नव्हते, पण मला ती गेली त्याआधीच ती गेल्याचे स्वप्न पडले होते. ती जमिनीवर चटई टाकून झोपली होती. तिचा हात कुरवाळत मी म्हणत राहिले,’’आजी,अशी जाऊ नको ग मला सोडून, मला भीती वाटते.’’ आजी म्हणे,’’वेडी, त्यात काय भ्यायचं? तुला कळणार पण नाही. एक क्षण फक्त, मी आहे आणि नाही यामधे.’’ आणि ती गेली. तिचा हात, तिचे कपाळ, आणि आम्ही ज्या जमिनीवर बसलो होतो ती जमीनही एकदम थंडगार झाली, बर्फासारखी, आणि जमिनीवर कडेकडेने लालचुटुक मुग्यांची रांग लगबगत चालली होती. मला ती थंडगार मृतवत् जमीन आठवते, आणि मग उगाच जाणवतं, चेतनाने कधी राजश्रीच्या मांडीवर चुकून डोकं ठेवलंच असेल तर त्या मांडीचा स्पर्श त्या मृतवत जमिनी सारखाच वाटला असेल तिला...मला परत परत भीती वाटत राहिली..

 

लहानपणीं आई अण्णांच जेव्हा भांडण व्हायचं तेव्हाही अशीच खूप भीती वाटायची. आत्ताच्या आत्ता पाहुण्यांनी यावं, आणि सगळं घर गजबजून जावं असं वाटायचं. मी मग पाहुणे कधी येतील याची खूप वाट पाह्यचे. एकदा आईने रागाने आम्हा मुलांना म्हटलं, रहा आता तुम्हीच. मी जातेच निघून.’’ मी काळोखात जिन्यात बसून राहिले.मग आई आली. आम्ही अंगणात गाद्या टाकून झोपलो.शेजारी आई घोरायला लागली. मी मात्र चांदण्या मोजत पडून राहिले...आजही मी चांदण्या मोजायचं ठरवलं होतं.. हे माझं लहानपणीचं गुपित आहे..एक लक्ष चांदण्या मोजण्याचा संकल्प करायचा , पन्नास, पंचावन्न झाल्या की वा-याची एक मंद झुळूक येते..आणि मग गुंगी येते. पण ही सुद्धा देवाची चाल असावी..त्याच्या राज्यातल्या त्या एकूण एक चांदण्या आपल्याला कळूच द्यायच्या नाहीत.. आणि आज तर एकही चांदणी नाही आकाशात. लहानपणींच ते काळं निळं, घनदाट काहीसं खाली झुकलेलं ते आभाळ हरवूनच गेलं कुठेतरी.. आभाळाचा एकुलता एक आधार गेला..ईथे माझ्या गच्चीत आता फक्त काळोख आहे आणि वाहनांचे दिवे; दूरपर्यत त्यांची हालचाल आहे.. या दिव्यांच्या पलीकडे नदी आहे.. आणि नदीच्या पलीकडे.. चेतनाचे घर.. आता आमच्या दोघींच्या मधे फक्त ही नदी आहे.. याच नदीत  राजश्रीने तिला टाकून दिलं पण ती बुडली नाही.. तरंगत आली माझ्यापर्यत..मला अचानक आठवतंय की चेतना भेटण्यापूर्वी मला कवितेच्या या ओळी भेटल्या होत्या... ‘’एकसारखी वाहते आहे नदी.. मुळाशी कोणी रडत असले पाहिजे...’’ आता या वाहनांच्या दिव्यांना पकडून चेतनाच्या घरात मी सहज डोकावू शकते..तसे आता काळोखाचे तितकेसे भय उरले नाही,, काळजात थोडे लकलकते.. पण असू दे.. चालतं तेवढं....

 

                                                -   प्रिया जामकर   

Category: 

About the Author

प्रिया जामकर's picture
प्रिया जामकर