हिंदोळा

एका दिवाळीची गोष्ट
-सोनाली

 

ऑक्टोबर संपत आला होता. थंडीमुळे वाहणार वारं अधिकच बोचरं वाटत होत. त्यांच्या दारासमोर लावलेला आकाशकंदील हिंदोळे घेत होता. विझू नये म्हणून तिनं पणती खिडकीत ठेवली होती; पण आतल्या बाजूने-घरातच. लक्ष्मीपूजनाची सर्व तयारी झाली होती. त्यानं खिडकीतून बाहेर बघितलं. अमेरिकेत घराघरासमोर हॅलोविनची सजावट होती. त्यातल्या दीपमाळा बघून त्या दोघांना नेहमीच भारतातल्या दिवाळीची आठवण यायची. त्यांची दोन मुले अमेरिकेच्या दोन किना-यावर शिकायला गेली होती. नॉर्थ डेकोटातल्या त्या छोट्याशा गावात गेली चार वर्षे झाली तरी त्यांच्याशिवाय कुणी भारतीय नव्हते. त्यांनी भारतातल्या नातेवाईकांना ,मित्रमैत्रिणींना फोन, ईमेल करून दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या होत्या . फटाक्याच्या आवाजात बोलण स्पष्टपणे ऐकू आलं नाही, भारतात सर्वजण घाईगडबडीत होते त्यामुळे खूप बोलायच असूनही पटापट फोन आटोपले होते. त्यांच्या भारतातल्या स्नेह्यांपैकी अनेक जण दुस-या दिवशी वेकेशनकरता बाहेरगावी जाणार होते. सगळ काही अनेक वर्षांच्या नियमाप्रमाणे.. त्यांच वागणही तसच नेमाचं. भारतात असल्यासारखे त्यांनी दिवाळी निमित्त नवे कपडे, दागिने खरेदी केली. इंटरनेटमुळे सर्वच सोपं झाल होतं. भारतातले सांस्कृतिक कार्यक्रम बघणेही सहज शक्य होते. त्यांच्या गावात भारतीय ग्रोसरी स्टोअर नव्हते. शिकागोच्या भारतीय दुकानातून नेहमीप्रमाणे तिने ऑर्डर केलेली ग्रोसरी घरपोच आली होती. तिने शेव, चिवडा, चकली, रवाबेसनाचे लाडू आणि करंज्या केल्या होत्या. दोघांनी लक्ष्मीपूजन केले. न्यू जर्सी आणि कॅलिफोर्नियाला असतांना त्यांच्या घरी लक्ष्मीपूजनाच्याच दिवशी दिवाळीची पार्टी असे. अगदी वीक डे असला तरी.. तो युनिवर्सीटीत प्रोफेसर होता. मित्रमैत्रिणींबरोबर त्याच्या डिपार्टमेंटमधले सर्व भारतीय विद्यार्थी त्याच्या घरी दिवाळी साजरी करत. उगीच सणाच्या दिवशी डोळ्यात पाणी नको म्हणून तिन आठवांना दूर सारलं होत. त्याच्या एका विद्यार्थ्याचा फोन आला आणि मग दोघेही भूतकाळात हरवले होते. आता मात्र तिला राहवलं नाही. "राहूल आणि जय..दोन्ही मुलांना मी सकाळपासून चारदा फोन केला तरी त्यांचे काहीच उत्तर नाही.".. तिच्या आवाजात थोडी तक्रार आणि काळजी जास्त डोकावत होती. त्यानं नेहमीप्रमाणे अतिशय व्यवहारी पावित्रा घेतला - तो मुलांच्या बाजूनेच. "दोघेही म्हणाले होते खूप बिझी आहोत सध्या. वेळ झाला की फोन करतील. आज दिवाळी आहे हे विसरले असतील पण मराठी मंडळाच्या दिवाळीला जातील, युनिवर्सिटीत भारतीय विद्यार्थी दिवाळीची पार्टी करतात तिथे तर नक्कीच जातील दोघे. : रात्रीचा एक वाजत आला तरी तिला झोप लागली नव्हती. एवढा अभ्यास असतो का पासून रोपट ज्या मातीत वाढत तिथलच होत, संस्कार, मूळ गुणधर्मबिर्म काही नाही इथवर तिचे विचार भिरभिरले होते. तिनं पुन्हा स्वत:च्या मनाला बजावलं की मुलांच आयुष्य ते त्यांच्या इच्छेनुसार जगतील हे आपल्या दोघांनाही पटलं आहे. मग अपेक्षा ठेवायची नाही. अंधारातून प्रकाशाकडे नेणारी दिवाळी, मनामनात स्नेहाचा दीप लावणारी दिवाळी हे फक्त उगाचचं म्हणायचं का?आपणच सकाळी दोघांना फोन करु या. अशा विचारात तिने कूस बदलली. तेवढ्यात दारावरची बेल वाजली. तिच्या मोबाईल वर एस एम एस होता, "Aunti , its me , Bela, Happy Diwali. I am waiting at front door. Jay went to see my parents.." बेला म्हणजे जयच्या वर्गात आहे तीच भारतीय मुलगी..मग तिन. पुढच काही वाचलं नाही .ती झटकन उठून दाराकडे गेली. इतकी वर्ष मनात जपलेली रांगोळी, दिवाळीचे फटाके , रोषणाई, उत्साह सगळे तिला एकदम खरखुर वाटायला लागल होत. महाराष्ट्र

Tags: 

About the Author

सोनाली's picture
सोनाली

मिळून सा-याजणी, मेनका , रोहिणी, अक्षर मासिकातून लेखन प्रसिद्ध.

लोकमत, लोकसत्ता, सकाळ, मटा या पेपरातून कविता, लेख 

शक्यतेच्या परिघावरून कविता संग्रह