अकरावे पत्र

मूळ गुजराती लेखिका : हिमांशी शेलत                                                                    
अनुवाद: सुषमा लेले 

                                                                                                                                   
संबोधनाशिवायचे हे पत्र बाजूला सारू नका, प्लीज. जरा मोठं असलं तरी धीर धरून वाचा. तुम्हाला लिहिते लिहिते म्हणत पूर्ण तीन वर्षं मी वाया घालवली आहेत. किती पंचावन्नच्या असाल नाही का तुम्ही ? मी तर तुमच्याहून जवळ जवळ बारा एक वर्षांनी  मोठी आहे . आत्ता दोन वर्षांनी सदुसष्ट पूर्ण होतील मला. त्याआधी हे पत्र तुम्हाला पोहोचवायचं असा दृढ निश्चय केलाय मी. रात्रीचे साडेअकरा वाजलेत आणि तशी माझी निजायची वेळ केव्हाच टळली आहे. आज एवढ पूर्ण करूनच निजेन म्हणतेय.

तुम्ही मला ओळखता. प्रत्यक्ष आणि नावानेसुद्धा. आपण पहिल्यांदा त्रिलोकजींकडे भेटलो होतो, आठवतंय ? मी त्यावेळी त्यांच्या स्टडीरूम मध्येच होते आणि तुम्ही आलात. खुपच छान दिसत होतात तुम्ही तेव्हा.  तुमचं तिथे येण्याचं प्रयोजन काय होतं ते आता माझ्या नीटसं लक्षात नाहीये, पण इतकं नक्की आठवतंय कि तुम्ही त्यावेळी खूप आत्मविश्वासानं बोलत होतात आणि हो, त्रिलोकजींच्या  भारदस्त व्यक्तिमत्वाने  दडपून न जाता अगदी सहजपणे वागत बोलत होतात.  आपला चष्मा टेबलावर काढून ठेवीत त्रिलोकजींनी ज्या रीतीनं तुमच्याकडे पाहिलं त्याच क्षणी माझ्या हृदयाचा ठोका चुकला.  माझ्या लागलीच लक्षात आलं की  हा गृहस्थ आता खात्रीनं तुमच्या निकट पोहोचणार. अगदी शंभर टक्के खात्री होती मला त्याची. 

तुम्ही तर हात जोडून लगेच उठलात. त्यापूर्वी त्रिलोकजींनी  आपल्या दोघींची ओळख करून दिली होती. तसं पाहिलं तर मला अस्वस्थ होण्याची काहीच आवश्यकता नव्हती. तरी मला  थोडं बावचळल्यासारखं झालं होतं. त्रिलोकजींच्या तोंडचं एक वाक्य कदाचित याला जबाबदार असावं, " गोल्ड मेडलिस्ट आहे बरं का...थोड्याथोडक्या नाहीत चांगल्या सात भाषा अवगत आहेत." 

'असतील...ठीक आहे, त्यात काय मोठंसं ?' असा विचार मनात आणायचा मी प्रयत्न केला.  पण खरं सांगायचं तर तसं करण्याचा माझा प्रयत्न अगदी फोल ठरला हे मात्र मी तुमच्यापाशी आत्ता कबूल करतेय. त्यानंतर जे काही घडत गेलं ते आपण दोघीही नीट जाणतोच आहोत. त्रिलोकजींच्या व्यक्तिमत्वानं भारावून जाणे हे तुमच्यासारखीला जडच होतं.  अशक्यच  म्हणूया. आणि हे  असंच कित्येक वर्षांपासून घडत आलं होतं. माझ्या बाबतीत त्रिलोकजींनी तुम्हाला नेमकं काय सांगितलं होतं कुणास ठाऊक? माझ्या कौटुंबिक अडचणींमध्ये त्यांनी मला खूप मदत केली आहे असं सांगितलं असणार किंवा असंही सांगितलं असावं की माझे वडील त्यांचे स्नेही असल्याने ह्या शहरात माझी जवाबदारी त्यांनी आपल्या माथी घेतली आहे. आणखी एक शक्यता आहे - ते म्हणाले असावेत की  मी त्यांची एक जवळची मैत्रीण आहे... जे असेल ते  असो. त्यांनी त्यावेळी  जे काही सांगितलं ते तुम्ही मान्य केला असावं, नाहीतर असंसुद्धा असू शकतं की त्यांच्याबद्दल तुम्हांला वाटणारी ओढ इतकी उत्कट होती की माझ्याबद्दलच्या सगळ्या गोष्टी तुम्हांला अगदी गौण, झटकून टाकण्यासारख्या वाटल्या असतील. याला कारण अर्थात त्याचं व्यक्तिमत्त्वच.

अगदी खरं सांगयचं तर त्रिलोकजी हळूहळू तुमच्या सानिध्यात येताहेत हे पाहून मला खूप राग आला होता. पण तो राग काही काळच टिकला. नंतर मनात उरला तो  फक्त वात्सल्य भावच. मी मोठी नव्हते का तुमच्याहून ? मला समजून घेण्यात गल्लत करू नका. हे बोल गुरुता ग्रंथींनी ग्रासलेल्या व्यक्तीचे नाहीयेत. मी किनई अगदी सामान्य आहे. आकाशात उडू शकीन इतकी माझी सिद्धी नाहीये आणि तशी महत्त्वाकांक्षाही नाहीये. शिकता आलं तितकं शिकले आणि नंतर संशोधन कार्यात शिरले. तिथे सुरुवातीलाच त्रिलोकजी भेटले. त्यामुळे माझी कारकिर्दी त्यांनी घडवली असं म्हटलं तरी अतिशयोक्ती होणार नाही. त्या काळात कदाचित माझ्या चष्मा घातलेल्या बदामी डोळ्यांनी  त्रिलोकजींना भुरळ घातली असावी. मी स्वतः म्हणाल तर त्यांच्या प्रखर बुद्धिमत्तेने आणि शतकपूर्ण आवाजात आपली तर्कशुद्ध मते अगदी ठासून मांडणारा हा माणूस मला विलक्षण वाटत असे. एखाद्या युग पुरूषाहून तसूभर देखील कमी नाही. त्यांच्या हातून नक्कीच काहीतरी भव्यदिव्य घडणार आहे याची मला अगदी गळ्यापर्यंत खात्री होती. अशा पुरुषाच्या सानिध्यात राहण्याची मोहिनी मी तुम्हला वर्णन करून कशला सांगायला हवी? तुम्हांला माहीतच आहे की ती!  त्यामुळे त्यावेळी मी जे काही अनुभवलं त्याचं तुम्हाला आश्चर्य वाटायचं कारणच नाही.

तुम्ही आलात आणि त्रिलोकजींच्या जीवनावर जणू काही स्वार होऊन गेलात. त्यावेळीसुद्धा त्यांच्यातील  सद्सदविवेकबुद्धीने  ठरविक उंची गाठली होतीच. बोलण्यातील ऋजुता, मदत करण्यातील तत्परता, सहृदयता..सगळं अगदी जसच्या तसं अगदी साचेबंद होतं. कुणाला काही तक्रार करायला संधीच मिळायची  नाही इतकं काटेकोर वर्तन. असं असूनही कित्येकदा मला दूर सारून दिल्यासारखं , झिडकारल्यासारखं वाटायचं. वरून मात्र कुणाला तसं दिसत नसे. मी पूर्वीसारखीच  त्रिलोकजींकडे  जात येत राहिले. जणू काही घडलंचं नसावं अशी. तुम्हांला आठवतंय? विसावं शतक पूर्ण होणार म्हणून एक कार्यक्रम आयोजित केला होता. त्रिलोकजींनीच सगळं आयोजन केलं होतं. ह्या प्रसंगानिमित्ते जी स्मरणिका प्रकाशित करण्याचं ठरलं होतं, ते काम माझ्यावर सोपवण्यात आलं  होतं. तिकडे त्रिलोकजी तुम्हांला घेऊन फिरत होते... कधी एखाद्या उद्योगपतींच्या संकुलात, तर कधी कुणा वर्तमानपत्राच्या संपादकाकडे. एक दोनदा तर शहरापासून दूर असणाऱ्या फार्म हाऊसला देखील तुम्ही त्यांच्यासोबत जाउन आला होतात. अर्थात ही सगळी धावपळ कामानिमित्तच चालली आहे वगैरे दर्शवण्याचा त्रिलोकजींचा मरणप्राय प्रयत्न चालू होता. बिचारे त्रीलोक्जी! मुळात तुमच्या सानिध्यात राहण्याचा तो आटोकाट प्रयत्न होता हे त्यावेळी तुमच्याही लक्षात आलंचं असणार नाही का?

मला त्यावेळी असूया वाटत नव्हती असं खोटं मी मुळीच बोलायची नाही. अक्षरशः जीव पोळत होतं माझा. पण  त्रिलोकजींच्या स्वभावातली खुबी मला ठाउक होती. मी तसा विरोध  वगैरे प्रकट केला असता ना , तर जे करू नये ते करायलाही त्यांनी मागेपुढे पहिले नसते. म्हणून मग मी गप्पच राहिले. माझ्या चेहेऱ्यावरील प्रसन्नता तसुभरदेखील कमी होणार नाही याची जिवापाड काळजी घेत राहिले.  अतृप्तीची, नापसंतीची पुसटशी रेखाही दिसू दिली नव्हती तोंडावर. अभिनय उत्तम वठवत होते मी! शिवाय दुःखी होण्याने माझ्या अहंकारालाही तडा गेला असता...

त्यावेळी  पत्नीसुद्धा राहात होती घरात. तुम्ही भेटलाच असाल तिलाही. पुढे ती वारली. हृदयरोगाचा जोरदार झटका आला होता तिला. आपली सेवा-चाकरी किंवा काळजी यापैकी काहीच तिने त्रिलोकजींच्या  वाटयाला येऊ दिले नाही. उलट त्रिलोकजींना तिनेच प्रेमानं सांभाळलं होतं. त्यामुळे ती वारल्यानंतर त्यांना रितेपणा भासणं साहजिक होतं. त्यांच्या शोकमग्न अशा त्या दिवसांत तुम्ही त्रिलोकजींकडे  जास्त झुकत गेलात. मी त्या घरातील एक जवळची व्यक्ती म्हणून सगळं बघत राहिले फक्तं. तुमच्या सानिध्यात त्रिलोकजींचं दुःख हलकं होतं आहे हे सगळ्यांनीच मान्य केलं त्यावेळी. मीसुद्धा ते स्वीकारलं.

आता मी मूळ मुद्द्यावर येते. जे सांगण्यासाठी ह्या पत्राचा घाट घातला ती महत्त्वाची गोष्ट. त्रिलोकजी वारले त्याला चारेक महिने झाले असतील. त्यांच्या बहिणीने मला घरी बोलावलं. त्रिलोकजींचं सगळं अप्रकाशित साहित्य पुस्तक रुपात प्रसिद्ध करण्याचं त्यांचा बेत आहे. विशेष करून त्रिलोकजींनी जपून ठेवलेली  निरनिराळ्या लोकांची पत्रे. मोठमोठे नेते, कलाकार, देशोदेशींच्या प्रतिष्ठित व्यक्ती आणि स्वजनांची मिळून एक मोठी ट्रंक भरून  ही पत्रे आहेत. खरं वाटत नाही ना? त्रिलोकजी तसे अंगापिंडाने इतके धडधाकट आणि निरोगी  होते की मरणाचा विचार त्यांच्या मनाला शिवला देखील नसावा कधी. कारण हा माणूस इतका शिस्तबद्ध होता की निर्वाणीच्या व्यवस्थित सूचना दिल्यावाचून गेला नसता असा.
 
तर या ट्रंकेमधील  सगळी सामुग्री मला व्यवस्थित लावून त्यातील पत्रे निवडून, छाटून, आकडेवारीने लावायचं काम सोपवलं गेलं आहे. या पत्रांत बरीचशी खाजगी पत्रे देखील आहेत. पण  त्रिलोकजींची बहिण  मला परकं मानतच नाही ना! आता या कामाकरता त्यांनी तुम्हाला का बोलावलं नाही असा  विचार मनात आणून तुम्ही खिन्न -बिन्न  झालात तर त्यावर माझा काही इलाज नाही.

हं, या ट्रंकेमध्ये मला तुमची काही पत्रे सापडली आहेत, तशीच माझीसुद्धा आहेत. (त्यांच्या पत्नीचीही आहेत. ते बाहेरगावी गेले असताना लिहिलेली. आपण दोघींनी मात्र ते इथेच असून आपणही इथेच असताना लिहिलेली.) हो, चारेक पत्रे तुम्ही परदेशात गेला होतात त्यावेळी तिथून लिहिलेली आहेत हेही खरे. आता ही सगळी पत्रे नीटपणे वाचायची म्हणजे एक तपश्चर्याच म्हणा ना! त्रिलोकजींनी तुमच्या पत्रांना क्रम दिला आहे. प्रत्येक कव्हरवर लाल अक्षरात घातलेले क्रम आहेत आणि अशा अकराव्या पत्रात तुम्ही लिहिता आहात, "सु. बरोबरचे तुमचे संबंध शुद्ध मैत्रीचे आहेत, केवळ मैत्रीचे. त्यात स्त्री -पुरुषांत असणाऱ्या आकर्षणाचा लवलेशही नाही हे वाचून किती रोमांचित वाटले हे शब्दांत कसे लिहू? तुमच्या या संबंधांमुळे तुम्ही किती निंदा ओढवून घेतली आहे ते मला ठाऊक आहे. तेजोद्वेषाने पछाडलेल्या लोकांनी तुम्हाला दोष देण्यात मागे वळून पाहण्याचीही तसदी घेतलेली नाही. असं असूनही तुम्ही डगमगला नाहीत हे विशेष. प्रतिष्ठा पणाला लावून तुम्ही तुमची मैत्री जपलीत आणि विशेष म्हणजे त्या मैत्रीकडे आदराने पाहिले. तुमचे नैतिक धैर्य आणि पारदर्शी वर्तन पाहून माझ्या मनात इतकी उत्कट...'

बस्स! आपल्याला जे आत्ता हवं आहे ते इतकंच. बाकीची तुमची बिरुदावली खूप लांबलचक आहे . तिच्याशी मला कर्तव्य नाही, ती जागच्या जागीच राहो. मृत्यू  पावलेल्या प्रिय व्यक्तीबद्दल काही खोटंनाटं सांगायचं हा माझ्या दृष्टीनं अक्षम्य अपराध आहे. मी जे काही सांगणार आहे ते खरं असून त्याचा स्वीकार करा आणि त्यात जर कुठे शंका वाटत असली तर सरळ माझ्याकडे या. माझ्या खरेपणाची साक्ष देणारी त्रिलोकजींनी मला लिहिलेली पत्रे माझ्याजवळ आहेतच, केव्हाही येऊन ती तुम्ही वाचू शकता. 

मी आता जो कबुलीजवाब देणार आहे तो ऐकण्यासाठी मन घट्ट करा. त्रिलोकजींचे आणि माझे सगळ्या प्रकारचे संबंध होते. आम्ही अगदी संपूर्ण संसारसुख उपभोगलं आहे असंच म्हणा ना. त्यांच्या पत्नीपासूनसुद्धा आम्ही आमचे संबंध लपवलेले नव्हते. तुम्हांला त्यांनी काय सांगितले असेल याची मी कल्पना करू शकते;  पण असं का सांगितलं असावं ते मात्र माझ्या आकलनाच्या बाहेरचं आहे. खरं तर  त्रिलोकजी दांभिक वगैरे मुळीच नव्हते. माझ्याबरोबरच्या त्यांच्या संबंधांमुळे तुम्ही कदाचित त्यांच्या तितक्या निकट येऊ शकला नसतात अशी त्यांना भीती वाटत असावी आणि तुमच्याबद्दल त्यांना अतोनात... असो, जाऊ द्या.  असल्या तर्क-कुतर्कांना काही अर्थ नाही.  आपल्याला फक्त सत्य काय आहे त्याच्याशीच कर्तव्य आहे.

तुम्ही मला विचाराल की हे सगळं तुम्ही मला पूर्वीच  का बरं सांगितलं नाही... पण नव्हतं सांगायचं मला ते. ज्या पुरूषावर आपलं अगदी मनापासून प्रेम असतं ना, त्याला लज्जित व्हावं लागावं असं काही माझ्या तोंडून सांगायची माझी मुळीच इच्छा नव्हती. आज त्रिलोकजी हयात नाहीत तेव्हा स्पष्टीकरण देण्यास काहीच हरकत नाही. माझी खात्री आहे की  इतकं स्पष्टपणे सगळं कबूल केल्यानंतरही तुमच्या त्यांच्याबद्दलच्या प्रेमाला मुळीच ओहोटी लागायची नाही. ते पूर्ण पुरुष म्हणून जगू शकलेले एक अत्यंत प्रेमळ आणि सहृदय गृहस्थ होते. मर्यादापुरुषोत्तम असल्याचा दावा त्यांनी तरी कुठे केला होता कधी?  मग आपण का म्हणून त्यांच्या माथी दोष थापायचा उगाच?
 
तरीही मला आपलं वाटलं की त्यांना तुम्ही नीट जाणून घेणे आवश्यक आहे, ते जसे होते  त्याच स्वरुपात. कुठलाही कृत्रिम मुलामा किंवा वर्ख चढवलेल्या रुपात नाही. तुम्ही त्यांच्यावर प्रेम केलं असल्याने त्यांना पूर्णपणे जाणून घ्यायचा तुम्हांला अधिकार आहे. ज्याला सर्वस्व समर्पित केलं त्या पुरुषाला जाणण्याच्या स्त्रीच्या हक्काची मी आठवण करून देतेय. मी त्रिलोकजींना नीट त्यांच्या खुद्द पत्नीकडून नीट समजून उमजून  घेतलं होतं, अगदी तसंच तुम्हीही... आणि हो त्यांचा तर प्रेमविवाह होता. घरून पळून जाऊन , नातेवाईकांचा  विरोध असताना मित्रांच्या मदतीनं केलेलं लग्न. माहीत नसेल कदाचित तुम्हांला. सांगितलं होतं का हो त्यांनी तुम्हांला कधी याबाबतीत? 

मुळातच त्यांचं हृदय शिगोशिग प्रेमानं भरलेलं होतं. सगळ्यांनाच वाटायचं की हे माझ्या अगदी निकटचे आहेत अगदी... एखाद्या स्त्रीवर प्रेम करून रंक होऊन जाणाऱ्यांपैकी ते नव्हतेच. चहुकडे उधळून टाकल्यानंतरही त्यांच्या हृदयाचं प्रेमपात्र शिगोशिग भरून वाहात राहिलं.
 
यापूर्वी मी लिहिलंच आहे त्यानुसार तुम्हांला हे सगळं जर नापसंत वाटत असेल आणि स्वीकार्य नसेल  तर तुम्ही त्यांनी मला लिहिलेली पत्र वाचून पहा; मी ती अजूनही जपून ठेवली आहेत. तुमची सगळी पत्रे तुम्हांला परत करायची माझी इच्छा आहे. माझी पत्रे मी जाळून टाकणार आहे. मग या ट्रंकेमधील बाकीची पत्रे होईनात का प्रकाशित! माझी काहीच हरकत नाही त्याला. आपली दोघींची पत्रे मात्र प्रकाशित होण्यासाठी लिहिली गेली नाहीयेत. मला वाटतं ती राख होण्यासाठीच लिहिली गेली होती. आपल्याला कुठे हे माहीत होतं नाही का? 

मला मनापासून वाटतं आहे की माझा हा निर्णय तुम्हांला पटावा असाच आहे. कोण्या हळव्या मनाच्या व्यक्तीने आपली पत्रे वाचली तर एका उमद्या माणसाबद्दल नाहक गैरसमज पसरतील. काही खालच्या पातळीवरचे लोक त्रिलोकजीसुद्धा आपल्याच जातीचे होते असं म्हणून कुत्सितपणे हसतील. तर काही निंदक या नाजूक बातमीला सर्वत्र पसरवून त्यांची बदफैली करून जल्लोष साजरा करायलाही कमी करणार नाहीत. आपल्या संबंधातील ऋजुता, सूक्ष्मता आणि वास्तविकता कुणालाही समजण्यासारखी नाही. अगदी अशक्य आहे ते. त्रिलोकजींबद्दल आपल्याला जे वाटायचं त्याच्याशी इतरांचं काहीच देणं घेणं नाही. त्यामुळेच बहुधा असूया मला स्पर्शदेखील करू शकली नाही असं मला वाटतं. तुमचंही कदाचित तसंच असण्याची शक्यता आहे. जे प्रेम कधी बंधनकारक वाटलं नव्हतं ते नक्कीच एका विशिष्टं उंचीवर पोहोचलेलं होतं. सगळे काही तिथपर्यंत पोहोचू शकत नाहीत. त्रिलोकजींची ओजस्वी मूर्ती अस्पष्ट, धूसर होणं आपल्याला कसं बरं परवडेल? 

मग  आता  मी  आपली सगळी पत्रे ट्रंकेतून काढून घेते, ठीक आहे ना? तुमची पत्रे न्यायला तुम्ही याल ना? खरंच तुम्ही आलात तर दोघींची भेट होईल आणि छान गप्पाही होतील. अशा गप्पा ज्या आपल्या दोघींतच संभवू शकतात. तुमची वाट पाहतेय हं मी...येणार ना मग?

आपली विश्वासू ,
नावाची आता गरज उरली आहे का?

Category: 

About the Author

sushama lele

I am doing translations from Guarati to marathi