
ह्या लेखाच्या पहिल्या भागात आपण 'द क्वारटेट ऑफ सिंगिंग क्वीन्स' बद्दल वाचलं. मला नेहमी अशा कलाकारांबद्दल जास्त आदर वाटतो ज्यांनी खरोखरीच मरमरून गाणं केलं! अशाच दोन स्त्रियांबद्दल आपण ह्या लेखात वाचणार आहोत. ह्यांचे जन्म १९ व्या शतकाच्या उत्तरार्धातले आणि २० व्या शतकाच्या पूर्वार्धातले आहेत पण गाण्याची कारकीर्द २० व्या शतकालाच नाही तर चिरंतन पुरून उरणारी आहे! श्रीमती केसरबाई केरकर: १८९२ मध्ये जन्मलेल्या श्रीमती केसरबाई केरकर मूळच्या गोव्याच्या. आयुष्यभर त्यांनी मनापासून संगीताची सेवा केली. ज्या क्षणी त्यांना वाटलं की वृद्धपकाळामुळे त्यांचा आवाज पहिल्यासारखा राहिलेला नाही त्या क्षणी त्यांनी गाणं सोडलं! कधीच त्या प्रसिद्धी आणि प्रेक्षक-स्तुतीला बळी पडल्या नाहीत की फक्त लोकांची वाह-वाह मिळवण्यासाठी गायल्या नाहीत. जयपूर-अत्रौली घराण्याच्या अल्लादिया खानसाहेबांकडून त्यांनी मुंबईत गाणं शिकायला बरीच उशिरा सुरुवात केली. १० जुलै, १८९० साली त्यांचा जन्म गोव्यातील केरी ह्या गावात झाला. त्यांच्या मामांना गाण्याची आवड होती आणि केसरबाईंचे गाण्यातील गुण बघता ते त्यांना गावातील पुजाऱ्यांकडे गाणे शिकायला घेऊन जात. पण तिथे फक्त भजने आणि कीर्तने शिकायला मिळतं म्हणून शेवटी 'खरे' गाणे शिकायला आठ वर्षांच्या केसरबाईंना त्यांचे मामा उस्ताद अब्दुल करीम खान साहेबांकडे कोल्हापूरला घेऊन गेले. पण पुढची १९ वर्षं त्यांच्या गान-तपश्चर्येत बाधाग्रस्तच होती. दर वेळेस कोणी चांगला गुरु लाभला की त्या गुरूस कोणी धनाढ्य आपल्या आश्रयाला दुसऱ्या गावी बोलावून घेई. १९०८ मध्ये केसरबाई मुंबईला रहावयास गेल्या आणि म्हैसूर आणि पाटणा दरबारातील प्रसिद्ध सितारीया बरकतुल्ला ह्यांच्याकडून गाणं शिकू लागल्या. त्यानंतर एक वर्षभर पंडित भास्करबुवा बखले आणि पंडित रामकृष्णबुवा वझे ह्यांच्याकडून शिकल्या. पण गाण्याच्या तालनीत सारख्या पडणाऱ्या खंडाला कंटाळून केसरबाईंनी उस्ताद अल्लादिया खानसाहेबांकडेच शिकायचा ठाम निश्चय केला. खानसाहेबांनी शिकवण्यास साफ नकार दिला. केसरबाईंचाही हट्ट दांडगा! शेवटी खानसाहेब राजी झाले पण शिकवण्याच्या खूप अटी घातल्यानंतरच! आखिर १९२० साली केसरबाई अल्लादिया खानसाहेबांच्या गंडाबंद शिष्य बनल्या. खानसाहेबांना कळले की ही शिष्या किती प्रामाणिक मेहनत करणारी आहे आणि तिचे गान-कलेवर किती नितांत प्रेम आहे ते! दिवसातील ९-१० तास ते केसरबाईंना शिकवत. त्यांचे शिकवणे खूप शिस्तबद्ध असे. एकच पलटा १०० वेळा ते घोकून घेत ज्यामुळे केसरबाईंचं गाणं सुराला अतिशय पक्क झालं. १९३८ साली पंडित रविंद्रनाथ टगोरांनी केसरबाईंचं गाणं ऐकलं आणि त्यांना 'सूरश्री' हा खिताब दिला. टागोर म्हणले, “मी स्वतःला अतिशय भाग्यवान समजतो की केसरबाईंचं गाणं मला ऐकायला मिळालं. त्यांचं गाणं म्हणजे एक परिपूर्णते कलात्मक साक्षात्कार आहे. त्यांच्या गाण्यावरून हे सिद्ध होते की गाण्यात केवळ तांत्रिक परिपूर्णता असून चालत नाही. त्यात चमत्कृती आणि आविष्काराचीही तितकीच आवश्यकता आहे आणि हे केवळ एका जन्मजात प्रतिभाशाली कलाकारालाच शक्य आहे.” त्यामुळे जवळ-जवळ वीस वर्षं अत्याधिक श्रोत्यांना केसरबाईंचे गाणे आणि त्यांचा दैवी आवाज ऐकताच आला नाही ही मोठी खंतेची बाब आहे असं म्हंटल्यास अतिशयोक्ती होणार नाही. केसरबाई स्वतःच आपल्या गाण्याच्या कठोर समीक्षक होत्या; त्यामुळे आपलं गाणं दर्जेदार झाल्याशिवाय त्या श्रोत्यांसमोर गायल्याच नाहीत! ज्यांनी त्यांचं गाणं ऐकलं ते म्हणतात त्यांचा आवाज तिन्ही सप्तकात फिरणारा, अतिशय बुलंद असा होता. विजेसारखी त्यांची तान तार-सप्तकात जायची आणि तितक्याच चपळतेने मंद्र-सप्तकात यायची आणि मंद्र-सप्तकात देखील त्यांचा आवाजाचे घनफळ तितकेच राहायचे. त्यामुळे ध्वनिक्षेपक नसला तरी त्यांचा आवाज श्रोत्यांपर्यंत सहज पोहोचायचा. १९२० ते १९४६ खानसाहेबांनी त्यांना खूप सश्रम आणि कठोर तालीम दिली. स्वतःच्या प्रत्येक बैठकीत ते केसरबाईंना गायला लावत. ह्यातील सर्वात संस्मरणीय म्हणजे मुंबई येथील विक्रमादित्य संमेलनातील १९४४ मधील मैफिल! १९४६ साली ९०हून अधिक वर्षांचे खानसाहेब निधन पावले. त्यानंतर केसरबाईंची ख्याती महाराष्ट्रातच नाही तर भारतभर पसरली. स्थिर आवाज लावणे, स्पष्ट आकारात आलापी करणे, बंदिशीतील शब्दांचा वापर करून राग खुलवणे, तार-सप्तकात देखील खुला आवाज लावणे, ख्याल हा विलंबित किंव्हा मध्यम लयीतच गाणे, अनवट आणि अवघड राग गाणे ह्या सगळ्या केसरबाईंच्या गाण्याच्या खासियती होत्या. १९७७ साली केसरबाईंचे निधन झाले पण त्याच साली “व्हॅाएजर स्पेसक्राफ्ट” बरोबर जी “व्हॅाएजर गोल्डन रेकॉर्ड” पाठवण्यात आली त्यात केसरबाईंचे गाणे समाविष्ट केले आहे! त्यामुळे जरी आयुष्यभर त्या भाऊगर्दीपासून लांब राहू इच्छिल्या तरी अशा रुपाने त्यांचा आवाज अजरामर झालेला आहे. पुढील लिंकवर टिचकी मारून तुम्ही केसरबाईंनी गायलेला राग मालकौंस ऐकू शकता. त्यात त्यांच्या आवाजाच्या ताकदीचा आणि गाण्याच्या अविश्काराचा प्रत्यय तुम्हाला येईल. केसरबाई केरकर - राग मालकौंस केसरबाईंनी गायलेले अनेक अनवट राग खालील लिंकवर ऐकू शकता. ह्या गायिकेनी नेहमी राजा-महाराजांसमोर आपली कला सादर केली. कधीही रेकॉर्डिंगच्या मागे लागल्या नाहीत; उलटं ह्या सागळया चोचल्यांपासून लांबच राहिल्या. केवळ आपले गाणे परिपूर्ण कसे होईल ह्यावर भर देत त्यांनी आपले जीवन ह्या कलेला समर्पित केले. १९६९ मध्ये त्यांना भारत सरकारने पद्मभूषण बहाल केले आणि त्याच वर्षी महाराष्ट्राने त्यांना “राज्य गायिका” ह्या खिताबाने गौरविले. खालील लिंकवर तुम्ही त्यांनी गायलेले काही राग ऐकू शकता आणि काही रसिकांच्या त्यांच्याबद्दलच्या आठवणीही वाचू शकता. केसरबाई - राग: नट कमोद, गौड मल्हार, परज, मालकौंस, ललत, मारू-बिहाग, भैरवी केसरबाईंचे अजून काही राग खालील लिंकवर उपलब्ध आहेत, त्याचा लाभ जरूर घ्यावा. केसरबाई - राग: बसंती-केदार, हिंडोल-बहार, देस, गौरी, शुद्ध-कल्याण, वोयेजर रेकॉर्डिंग श्रीमती मोगुबाई कुर्डीकर: अल्लादिया खानसाहेब हे अतिशय कट्टर गुरु असल्यामुळे ते बाहेरचे कोणी शिष्य म्हणून सहसा घेत नसत. ह्याला अपवाद म्हणजे “सुरश्री” केसरबाई केरकर आणि “गान-तपस्विनी” मोगुबाई कुर्डीकर. ह्यांचा जन्म देखील गोव्याचाच; कुर्डी गावातला! त्या गोव्याच्या मातीतच जणू स्वरांची जादू आहे म्हणून एवढे गुणी कलाकार तिथे जन्माला आले. अगदी लहान असताना मोगुबाईंची आई त्यांना हरिदास नावाच्या एका भटक्या साधूकडे घेऊन जाई, गाणं शिकायला. पण ते फारच मर्यादित होतं! नंतर मोगुबाई ‘चंद्रशेखर भूतनाथ नाटक कंपनीत’ आणि त्यानंतर ‘सातारकर स्त्रीसंगीत मंडळीत’ केवळ उदरनिर्वाह चालविण्याकरिता काम करू लागल्या. पण काही वादविवादामुळे त्यांना ही कंपनी सोडावी लागली. ह्या धक्क्याने त्यांची तब्येत बिघडली आणि डॉक्टरांनी हवापालटासाठी गाव बदलण्यास सांगितले. सांगलीला बिऱ्हाड हलल्यावर त्या रामपूर-सहस्वान घराण्याचे इनायत खान ह्यांच्याकडे गाणं शिकू लागल्या पण काही कारणाने त्यांनीही मोगुबाईंना काही काळानंतर शिकवणे बंद केले. त्याच सुमारास उस्ताद अल्लादिया खानसाहेब सांगलीला औषध-उपचारांसाठी आले होते. मोगुबाईंच्या घरावरून जाताना त्यांचे गाणे कानावर पडे. एक दिवशी ते आपणहून मोगुबाईंच्या घरी गेले आणि स्वतःची ओळख करून दिली आणि मोगुबाईंना गाणं शिकवीन म्हणले. अशी एक आख्यायीका आहे की मोगुबाईंच्या आईने मरताना त्यांना सांगितले की जोपर्यंत मोगुबाई एक प्रख्यात गायिका होत नाहीत तोपर्यंत त्यांच्या आईच्या आत्म्याला शांती लाभणार नाही! ह्या दृष्टीनेही अल्लादिया खानसाहेबांचं मोगुबाईंच्या घरी जाणं हा केवढा मोठा योगायोगच म्हणायचा! पण मुलतानी, तोडी, पूर्वी, आणि धनश्री हे राग शिकून होईसतोवर अल्लादिया खानसाहेबांना मुंबईहून काही धनाड्य लोकांचा गानसेवा करावयास बुलावा आला. पुन्हा एकदा मोगुबाईंच्या वाटयाला नैराश्य आले. शेवटी काहीच पर्याय न राहिल्यावर मोगुबाई हिय्या करून मुंबईस रवाना झाल्या. पुन्हा एकदा मोगुबाई खानसाहेबांकडे शिकू लागल्या. पण थोड्याच दिवसात ज्या धनाड्य लोकांनी खानसाहेबांना मुंबईला बोलवून घेतले होते त्यांनी त्यांना बाहेरील कुणालाही शिकवण्यास बंदी घातली! मोगुबाई अगदीच निराधार झाल्या. शेवटी काहीच इलाज नाही म्हणून त्या बशीर खान ह्यांच्याकडे गाणे शिकू लागल्या. बशीर खानने त्यांना विलायत खान ह्यांची गंडाबंध शागिर्दी स्वीकारावयास सांगितली. त्याप्रमाणेच झाले! बशीर खान मोगुबाईंना शिकवू लागले. अल्लादिया खानसाहेबांना हे कळल्यावर त्यांना वाटले दुसऱ्या कुणाकडे शिकल्यामुळे मोगुबाईंच्या गळयावर वेगळेच संस्कार होतील आणि ते एका गुणी शिष्येला मुकतील आणि त्यांनी तिच्यावर घेतलेली सगळी मेहनत फुकट जाईल! शेवटी खानसाहेबांनी मोगुबाईंना आपल्या भावाकडे, हैदर खान, ह्यांच्याकडे शिकावयास सांगितले. तिथेही सुरळीत तालीम चालू असताना, मोगुबाईंची जलद प्रगती आणि प्रतिभा पाहून अल्लादिया खानसाहेबांच्या शिष्यांना त्यांचा मत्सर वाटू लागला. अल्लादिया खानसाहेबांच्या मागे लागून त्यांनी हैदर खानला दुसऱ्या गावी राहावयास जाणे भाग पाडले! एका गुणी कालाकारच्या मार्गात किती बाधा येऊ शकतात ह्याचे मोगुबाई एक उत्तम उदाहरण आहेत. आत्तापर्यंत मिळालेल्या तालमीचा मोगुबाई रियाझ करत राहिल्या पण अजून त्यांच्या आईचे स्वप्न संपुष्टात यायला अवकाश होता. त्यांचेच स्वतःच्या गाण्याबद्दल अजून समाधान झाले नव्हते. अजून त्यांना खूप खूप शिकायचे होते, पुढे जायचे होते. चांगल्या गुरुशिवाय ते शक्य नव्हते. एक दिवशी १५ महिन्याच्या किशोरी आमोणकरांना (प्रख्यात गायिका किशोरी आमोणकर ह्या मोगुबाईंच्या कन्या आहेत) मांडीवर घेऊन मोगुबाई हैदर खान ह्यांनी शिकवलेला एक अवघड पलटा घोकत बसल्या होत्या. मनातल्या-मनात त्या विचार करत होत्या की अल्लादिया खानसाहेब असते तर त्यांनी हा पलटा कसा गायला असता. किशोरीच्या चुळबुळीने त्यांनी डोळे उघडले तर काय अहोआश्चर्य! समोर खरचं अल्लादिया खानसाहेब बसले होते! मोगुबाईंचं एक सुंदर स्वप्न साकार होत होतं! त्यांनी लगेच अल्लादिया खानसाहेबांचा गंडा बांधला आणि त्यांच्याकडून मिळणाऱ्या अमूल्य ठेवणीची, ज्ञानाची अखेरपर्यंत जोपासना केली आणि त्याचा विकासही केला! १९६८ साली त्यांना संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार बहाल करण्यात आला. १९७४ साली पद्मभूषणाने पुरस्कृत करण्यात आले आणि १९८० साली संगीत रिसर्च अकादमीच्या पुरस्काराने सन्मानिले गेले. शब्द फेकण्याची लकब, कुठे कसा शब्द म्हणायचा ह्याला मोगुबाई खूप महत्व देत. रसिकांना खिळवून ठेवण्याएवढी त्या शब्दांमध्ये ताकद हवी – ज्या तऱ्हेने ते म्हंटले जातात त्यामुळे असे त्या म्हणत! मोगुबाईंनी एका मुलाखतीत म्हंटले आहे की आता त्यांना उमगते की तेंव्हा खानसाहेब शब्द-फेकीबद्दल काय सांगत. उतार वयात घेतलेल्या एका मुलाखतीत त्या म्हणतात की अजूनही त्यांना जिथे जिथे गाण्यात सौंदर्य दिसत तिथून ते घेण्याची धमक आणि इच्छा त्यांच्यात आहे. एवढ्या मोठ्या गायिका असून एवढा विनय! पुढे त्या म्हणतात की प्रत्येक गायक-गायिकेने कुठलेही गाणं ऐकल्यावर विचार करायला पाहिजे की जे ऐकलं ते योग्य आहे का, बरोबर आहे का, हे सौंदर्य कसे निर्माण झाले आहे? एकदा मोगुबाई वझेबुवांची मालकौंस रागातली एक तान गात होत्या, ती ऐकून वझेबुवा (रामकृष्ण वझे) त्यांच्या घरात आले. पण त्यांना आपली तान मोगुबाई कशा आणि का गात आहेत असे मुळीच वाटले नाही. उलट आनंद झाला की ह्यांनी किती छान पुनरावृत्ती केली आहे त्या तानेची. मोगुबाईंना खंत ह्या गोष्टीची वाटते की आजकाल अशी मनोवृत्ती राहिलेली नाही. प्रत्येकाला वाटतं तो गातो तेच बरोबर! मोगुबाई म्हणतात, “झोपेतून उठून जेंव्हा तुम्ही स्थाई आणि अंतरा गाऊ शकता तेंव्हा ते पाठ झाले असं समजायचं! जे आत्ता पाठ झालं ते आत्ता विसरतं. लक्षात तेंव्हा राहतं जेंव्हा ते प्रत्येक अवयवात भिनतं!” खालील लिंकवर टिचकी मारून तुम्ही मोगुबाईंनी गायलेले अनेक राग ऐकू शकता आणि त्यांची दोन भागात ध्वनिमुद्रित केलेली मुलाखत देखील ऐकू शकता. मोगुबाई - राग: सावनी-नट, बसंती-केदार, संपूर्ण मालकौंस, जैजैवंती, सुहा, खंबावती अशा ह्या दोन श्रेष्ठ गायिकेंनी मनोभावे संगीताची सेवा केली. प्रसिद्धी आणि पैसा आपोआप मागे आला; त्यांनी केला तो फक्त अथक रियाझ, जेथून मिळालं तेथून जतन केलेली संगीतातील सौंदर्यस्थळं आणि गाण्यावर भरभरून प्रेम! अजून खूप गायिकेंची नावे घेण्यासारखी आहेत पण ह्या लेखात ह्याच दोन हिऱ्यांचे पेहेलू पारखावेसे वाटले!