भारतीय अभिजात संगीतातील स्त्री गायिका (२०वे शतक पूर्वार्ध) – भाग १

१६व्या शतकापासून मुगल बादशाहांच्या दरबारात भारतीय अभिजात संगीत बहरत असताना तिथे अनेक तरुण मुली कथ्थक नृत्य करत असत आणि गझल आणि ठुमरी सारखे गायन प्रकारही प्रदर्शित करत असत. अर्थात तेंव्हा हे गायन प्रकार गद्यात म्हणजे कविता रूपात ऐकविले जात. त्यामुळे पाहिल्यापासूनच स्त्रियांची संगीत क्षेत्रात महत्वाची भूमिका होती आणि आहे. २०व्या शतकातील प्रसिद्ध गायिका म्हणजे गौहर जान (१८७३ - १९३०), केसरबाई केरकर (१८९२ – १९७७), रसूलनबाई (१९०२ – १९७४), मोगुबाई कुर्डीकर (१९०४ – २००१), सिद्धेश्वरी देवी (१९०७ – १९७६), बडी मोतीबाई (१९७४ नंतर काही वर्षातच निधन पावल्या), गंगुबाई हनगळ (१९१३ – २००९), बेगम अख्तर (१९१४ – १९७४), शोभा गुर्टू (१९२५ – २००४) आणि अजून अलीकडच्या म्हणजे किशोरी आमोणकर ते अश्विनी भिडे-देशपांडेपर्यंत बरीच नावे घेता येतील. ह्या लेखात आपण वाचणार आहोत २०व्या शतकाच्या पूर्वार्धावर आधिपत्य गाजवलेल्या ह्या स्त्रियांपैकी काहींच्या आयुष्याबद्दल, त्यांच्या संगीताबद्दल आणि कशा परिस्थितींमधून त्यांनी आपली कला जोपासली. नशीबाचा भाग म्हणा पण वरील काही नावे फार कमी प्रमाणात नावा-रूपाला आली. त्या स्त्रियांबद्दल आपण आधी जाणून घेऊयात आणि पुढील लेखात (भाग २) ज्यांना सुदैवाने जास्त प्रसिद्धी लाभली त्यांच्याबद्दल वाचूयात. गौहर जान: हिचे मूळचे नाव अॅजेलीना एयोवार्ड. ती एका आर्मेनिअन ज्यू इंजिनियरची मुलगी होती. तिची आई, विक्टोरिया (आणि नंतरची बडी मलका जान) ही भारतीय असून, नाच-गाणं शिकलेली होती. आई-वडिलांचे लग्न जास्त वेळ टिकले नाही आणि माय-लेकींनी बनारसला खुर्शीद नावाच्या एका मुसलमान धनाड्याकडे बस्तान हलवले. त्याला विक्टोरियाच्या कलेची जाण आणि कौतुक होत. तिथे तिने व अॅन्जेलीनाने इस्लाम धर्म अंगीकार केला आणि विक्टोरिया झाली “बडी मलका जान” आणि अॅजेलीना झाली “गौहर जान”. १८८३च्या सुमारास ह्या दोघी बनारसहून कलकत्याला रहावयास गेल्या आणि आईच्या मार्गदर्शनाखाली गौहर अनेक उस्तादांकडे शिकू लागली. उदाहरणार्थ, पतियाळा घराण्याचे कल्लू खान, रामपूरचे उस्ताद वझीर खान, कलकत्याचे प्यारे साहेब ह्या सर्वांकडून ख्याल गायकी, उस्ताद बिंदादीन महाराजांकडून कथ्थक, श्रीजन्बाईंकडून धृपद आणि धमार, आणि चरणदास ह्यांच्याकडून बंगाली कीर्तन. अवघ्या चौदाव्या वर्षी तिने पहिल्यांदा दर्भंगच्या महाराजांच्या दरबारात आपलं गाणं सादर केलं. एवढं कोवळं वय असूनसुद्धा महाराजांना तिचं गाणं फारच आवडलं आणि त्यांनी गौहरला आपली राजगायिका नेमलं. गौहर जान ह्यांची ख्याल, धृपद आणि ठुमरी गायकी फारच प्रसिद्ध होत गेली. पंडित विष्णू नारायण भातखंडे ह्यांनी गौहर जानना भारतातील सर्वात श्रेष्ठ ख्याल गायिका नमूद केले. १९०२ ते १९२०च्या दरम्यान गौहरने १० पेक्षा जास्त भाषांमध्ये ६०० गाणी “ग्रामोफोन कंपनी” द्वारे ध्वनिमुद्रित केली. एका गाण्याच्या ध्वनिमुद्रणाला गौहर त्या काळात तीन हजार रुपये घेत असे! तिच्या एका बैठकीची किंमत देखील एक ते तीन हजार असे! तिचे वैयक्तिक जीवन जरी वादग्रस्त असले तरी गायकी उच्च होती. दरभंग, रामपूर ह्या राजदरबारांमध्ये तिने राजगायिकेची भूमिका बजावली. नंतर काही दिवस गौहर मुंबईत देखील राहिली. तिच्या आयुष्याच्या संध्याकाळी तिला म्हैसूरच्या महाराजांकडून आमंत्रण आले आणि ती ऑगस्ट १९२८ला म्हैसूरची राजगायिका बनली. अर्थात ही भूमिका जास्त काळ टिकली नाही आणि जानेवारी १७, १९३० रोजी तिचे निधन झाले. पुढील लिंकवर टिचकी मारून तुम्ही ह्या महान गायिकेचा राग सोहनी ऐकू शकाल. नुकतेच तिच्यावर विक्रम संपथ ह्यांनी “My Name is Gouhar Jaan – the Life and Times of a Musician” ह्या नावाचे पुस्तक प्रकाशित केले आहे. http://www.youtube.com/watch?v=jY2UcFrUY4I रसूलन बाई: त्याच कालखंडातील अजून एक प्रसिद्ध नाव म्हणजे रसूलन बाई ह्यांचे. १९०२ साली ह्यांचा जन्म मिर्झापूर, उत्तर प्रदेश येथे एका गरीब घरी झाला. आपल्या आईकडून चालत आलेली गायन परंपरा त्यांनी चालू ठेवली आणि शंभी खान, असिया खान आणि मज्जू खान ह्यांच्याकडून त्यांनी गायनाचे धडे घेतले. पुरबी अंगाची ठुमरी आणि टप्पा ह्यात रसूलन बाई माहीर होत्या. बनारस घराण्याची गायकी त्या गात. त्यांचा पहिला कार्यक्रम धनंजयगडच्या महाराजांच्या दरबारात झाला. त्यानंतर ५ शतके त्यांनी गायन क्षेत्रात आपली हुकुमत गाजवली. त्या “ऑल इंडिया रेडियो” आणि दूरदर्शन वर गात आणि १९५७ मध्ये त्यांना संगीत नाटक अकादमीचा पुरुस्कार बहाल करण्यात आला. १९३५ साली “ग्रामोफोन कंपनी” ने त्यांची “फुल गेंदवा न मार, लगत करेजवा में चोट” ही प्रसिद्ध ठुमरी ध्वनिमुद्रित केली. त्यांचा शेवटचा कार्यक्रम काश्मीरमध्ये १९७२ साली झाला. उपहासाची गोष्ट ही की त्यांचे शेवटचे दिवस त्यांनी “ऑल इंडिया रेडियो” च्या शेजारीच एक चहाचं दुकान टाकून काढले! पुढील लिंकवर टिचकी मारून तुम्ही त्यांनी गायलेली “फुल गेंदवा न मार...” ही ठुमरी ऐकू शकता. ह्याच ठुमरीच्या ध्वनिमुद्रणाच्या वेळेला रसूलन बाईंनी “करेजवा” ह्या शब्दाच्या ऐवजी “जोबनवा” हा शब्द वापरला होता पण ते ध्वनिमुद्रण काही काळ हरवले होते. त्याच्या शोधावर, २००९ साली, सबा दिवान ह्यांनी एक माहितीपट काढला, “The Other Song” नावाचा. http://www.youtube.com/watch?v=Zkd2WG2NB8Y सिद्धेश्वरी देवी: ह्यांचा जन्म वाराणसी येथे झाला. त्यांचे आई-वडील खूप लवकर वारल्यामुळे त्यांचे संगोपन राजेश्वरी देवी ह्यांनी केले. राजेश्वरी देवी, सिद्धेश्वरी देवींच्या नात्यातच होत्या आणि स्वतः एक नामांकित गायिका होत्या. त्यांनी, त्यांच्या मुलीला गाणं शिकवण्याच्या प्रयत्नात, सिद्धेश्वरी देवींच्या अंगी असलेली गाण्याची कला ओळखली. त्यानंतर स्वतःचे मूल-बाळ नसल्यामुळे, सारंगी वादक सियाजी मिश्र ह्यांनी सिद्धेश्वरी देवींना दत्तक घेतले. नंतर त्यांनी गाण्याची तालीम देवासचे रज्जब अली खान आणि लाहोरचे इनायत खान ह्यांच्याकडे घेतली. ठुमरीत, आणि खास करून पुरबी-अंगाच्या ठुमरीत, त्या निष्णात होत्या. त्याचबरोबर ख्याल आणि उपशास्त्रीय संगीतातील सर्व गान प्रकारांमध्ये निपुण होत्या. दर्भांगच्या महाराजांच्या दरबारात गाताना कधीकधी त्यांच्या मैफिली रात्रभर चालायच्या. १९६६मध्ये त्यांना भारत सरकारने पद्मश्री बहाल केली. १९७३मध्ये रविंद्र भारती विश्वविद्यालयाने त्यांना ऑनररी डी. लिट. च्या पदवीने सन्मानिले. १९८९मध्ये मणी कौल ह्यांनी सिद्धेश्वरी देवींवर “सिद्धेश्वरी” नावाचा एक पुरुस्कृत माहितीपट काढला. सिद्धेश्वरी देवी “माँ” ह्या नावानेही ओळखल्या जातात आणि त्यांच्या कन्येने, सविता देवी ह्यांनी, त्यांच्यावर त्याच नावाचे पुस्तक देखील प्रकाशित केले आहे. विदुषी सविता देवी ह्या स्वतः एक गायिका आहेत. त्यांनी १९७७ साली “श्रीमती सिद्धेश्वरी देवी अकॅडमी ऑफ इंडियन म्युसिक” ची प्रस्थापना केली जेथे सिद्धेश्वरी देवींची गायनशैली शिकवली आणि जोपासली जाते. सध्या सविता देवी दौलत राम कॉलेज, नवी दिल्ली, येथे संगीत विभागाच्या प्रमुख आहेत. पुढील लिंकवर टिचकी मारून तुम्ही सिद्धेश्वरी देवींनी गायलेली भैरवी रागातील ठुमरी ऐकू शकता. ह्यात “पुरबी” अंग स्पष्ट दिसून येते. http://www.youtube.com/watch?v=IoC_k8n_7jE बडी मोतीबाई: ह्यांचा जन्म देखील मिर्झापूर, उत्तर प्रदेश मध्ये झाला. आपल्या वडिलांच्या प्रेरणेमुळे वयाच्या १४व्या वर्षी त्या बडे रामदासजी ह्यांच्याकडे ठुमरीचे शिक्षण बनारस येथे घेऊ लागल्या. नंतर सियाजी मिश्र आणि मिठाईलाल बीनकर ह्यांच्याकडे त्यांनी गाण्याचे धडे घेतले. खूप छोट्या वयात त्या बऱ्याच प्रसिद्ध झाल्या आणि लखनऊ आणि अलाहबादच्या “ऑल इंडिया रेडियो” वर गाऊ लागल्या. त्यांचे पुढील आयुष्य कलकत्ता येथे गेले आणि गौहर जान प्रमाणेच तिथे त्यांनी मौजुद्दिन खान ह्यांच्याकडे गाण्याची तालीम घेतली. ठुमरी गाण्यात त्या तरबेज होत्या; “बोल-बनाव की ठुमरी” ही त्यांची खासियत होती. १९७४ साली त्यांना आय.टी.सी.चा (इंडियन टोबॅको कंपनी – ज्यांनी कलकत्याची संगीत रीसर्च अकॅडमी सुरु केली) पुरुस्कार मिळाला आणि त्यानंतर काही वर्षातच त्यांचे निधन झाले. पुढील लिंकवर टिचकी मारून तुम्ही मोती बाईंचं एक तीन मिनिटांची भैरवी ऐकू शकता. http://moutal.eu/audio-archives/vocal/b/264-badi-moti-bai-of-banaras.html गौहर जान, रसूलनबाई, सिद्धेश्वरी देवी, आणि बडी मोतीबाई ह्या चौघींना “क्वॅारटेट ऑफ द सिंगिंग क्वीन्स्” असे म्हणत. ह्या चारही गायिकांचं कौतुक आहे की ज्या जमान्यात गाणाऱ्या बायका “तवाईफ़” म्हणून ओळखल्या जात, त्या जमान्यात तरीही त्यांनी संगीत सोडले नाही आणि ती कला जोपासायचीही सोडले नाही. उलट, मोठ्या तन्मयतेने ही आराधना चालू ठेवली आणि त्याचे चीज केले. आज त्या सामाजिक शापाची जागा धकाधकीच्या जीवनशैलीने घेतली आहे. रियाझ करायला वेळ नाही, संगीताचे चिंतन-मनन करायला वेळ नाही असे बऱ्याचदा ऐकायला मिळते. मग ह्या गतकालीन गायिकांकडून प्रेरणा घेऊन आपल्यालाही तितक्याच तन्मयतेने संगीताची सेवा करायला हरकत नाही! नाही का?

About the Author

पाऊस६९'s picture
पाऊस६९

I am an architect turned landscape architect by profession. I have a passion for writing poetry, fiction and non-fiction in Marathi, Hindi, Urdu and English. I am proficient in Indian Classical music and an ardent listener too. I love reading, playing tennis and badminton, going for long walks, contemplating, and making the most of life in every way!

I have recently published an e-book entitled "Poetry Plume" which is available on www.bookrix.comwww.amazon.com, andwww.bn.com