अरुण कोलटकरच्या कविता–काही टिपणे

१. रात्र झालेली होती. घरी यायला उशीर झालेला होता. दमलो होतो. आल्या-आल्या थंड पाण्याने अंघोळ केली आणि पलंगावर पाठ टेकली. बाहेर अंधाराकडे डोळे गेले आणि मग छताकडे पाहिले. काही क्षणांत डोळे सरावले; तेव्हा मनात एक ओळ लहरत-ठिबकत-ओघळत-ओघळत पृष्ठभागावर आली – म्हणजे मला निदान सकाळ होईपर्यंत छताकडं तरी बघता येईल निवांतपणे कोलटकरच्या ‘ढग’ कवितेतल्या ही शेवटची ओळ. मग उठून पुस्तक 

सुरुवातच कशी मस्तय, एकदम अनौपचारिक सहजच म्हटल्यासारखं, बोलल्यासारखं. कोलटकरच्या कवितांचं हे एक वैशिष्ट्य आहे. त्याच्या कविता बोलल्यासारख्या, सहज असतात. त्यामुळे त्या ‘कविता’ वाटतच नाहीत. त्यामुळेच त्या कधीकधी सटल व सूचक होतात. 

 

प्रत्येकाला अमुक इतके गाल असायला पायजेत असं कुठाय किंवा इतकेच कुले पाहिजेत असंही नाही दृश्यात्मकता हा कोलटकरच्या कवितांचे आणखी एक खास वैशिष्ट्य. या कवितेचंही शीर्षक आहे ढग. कवितेमध्ये पहिल्या ओळींच्या समूहात ढग असा शब्द येत नाही, पण ढगांचे आकार खासकरून – गोलाई-गोलसरपणा गाल किंवा कुले या शब्दांमधून काय छान सूचित केलाय. मला फँटसी आवडते. कल्पना लढवायला आणि त्यांची कल्पनाचित्र बघायला आवडतात. या माणसालाही जणू ढग खोलीत आलेत असं वाटतंय आणि मग तो त्याला गाल, कुले असं म्हणतोय. मला हे आणखीनच आवडतं. लगेच पुढचा प्रश्न मनात उमटतो की, खरंच खोलीत ढग आले असतील का डोक्यात किंवा मनात असतील? मग हे खरं मानायचं का? तेव्हा हॅरी पॉटरमधलं मला आवडणारं वाक्य आठवलं – डंबलडोरला हॅरी विचारतो की, हे जे काही घडतंय ना ते खरंय (वास्तव) की माझ्या डोक्यातलं आहे? डंबलडोर म्हणतो, ऑफकोर्स हॅरी, हे तुझ्या डोक्यातच आहे, पण म्हणून ते खरं नाहीये असं तुला का वाटतंय? पुढच्या ओळी आहेत – नाकडोळे कुठं असावेत कुठल्या प्राण्यांचे आणि त्यांनी कितीदा बदलावं यालाही काही नियम नाहीत माणसाला डोळे नाक हे एका विशिष्ट ठिकाणी असतात. म्हणून आपल्याला इतर दुसरीकडे कोणाचे डोळेनाक असतील तर वेगळं किंवा विचित्र वाटतं. हा मानवकेंद्री दृष्टिकोन कोलटकर सोडून देतो. ढगांना तर काय आकार बदलायची मुभाच आहे; नव्हे तो त्याचा एक गुणच म्हणावा लागेल. असे हे ढग खोलीत येतात, तेही कसे तर – तुम्ही एका खिडकीतनं येणार अधांतरी लोळत लोळत पोटातल्या खांदातल्या गालातल्या गालात हसत हसत गुडघ्यातल्या डोळ्यातल्या नाकातली मेकडं काढत काढत ढगांचे सतत बदलणारे आकार क्षणात डोळ्यांसमोरून सरकून गेले. अजूनही एखाद्या संध्याकाळी गच्चीवर गेल्यावर ढगांच्या आकारांमध्ये नाकडोळेचेहरे किंवा आकार शोधायचो व काही वेळाने तो ढग बदलला की, पुन्हा आकार शोधून कल्पना लढवायच्या, ही गंमत मला आठवली. कधी स्मायली, कधी ससा तर कधी आजोबांच्या पांढर्‍या केसांचा पुंजका... असे असंख्य आकार. इथे तर कोलटकर एखाद्या लहान मुलासारखी कल्पना करतो. वाटेल ते आकार धारण करण्याचे स्वातंत्र्य असलेले हे ढग जणू गुडघ्याला असलेल्या डोळ्यांतल्या नाकातली मेकडं काढतायेत! मग तो काहीसं गंभीर; पण खेळकरपणेच म्हणतो की, तुम्ही आलात तसेच दुसर्‍या खिडकीतून जात का नाहीत. म्हणजे त्याला छताकडे निवांत पाहता येईल, सकाळ होईपर्यंत. अशा या खेळकर, वर वर साधी वाटणार्‍या रचनेत मला काही गंभीर आणि खोल अर्थ सापडला. वेगवेगळे आकार धारण करणारे हे ढग म्हणजे जगताना वाट्याला येणार भोग – सुखदु:ख, बरेवाईट प्रसंग असावेत. जे ढगांसारखे असतात, येतात-जातात. त्यांना शाश्वत असा आकार नसतो, रूपरंग नसतो किंवा ठोस असं अस्तित्व नसतं. आणि मग छत आहे जगण्याची निरर्थकता. एकूणच जगण्याचा अफाट आवाका व पसारा पाहिला, तर ही सुखदु:ख फारच क:श्चित गोष्टी असतात, ती येतात, जातात. जे आपण कमावतो, मिळवतो, गमावतो त्याला आपण मेल्यावर किंवा जगतानाही दैनंदिन जीवनापुरता, तेही काही काळच अर्थ असतो. अन्यथा एका विशिष्ट पातळीवरून पाहिल्यास ते फारच छोटं व निरर्थक असतं. आणि मग हा कवी म्हणतो बाबांनो, ढगांनो, तुम्हा या खिडकीतून आलात आता त्या खिडकीतून गेलात तर बरं होईल, म्हणजे मला या छताकडे-निरर्थकतेकडे पाहू दे निवांतपणे! ....  २. समोरच्या दृश्याचं चित्रण करणं, मला आवडतं. कित्येकदा मी एका ठिकाणी बसलेलो असताना समोर दिसणार्‍या छोट्या-छोट्या गोष्टींचं अगदी तपशीलवार वर्णन मनातल्या मनात स्वतःशीच करतो. यात मी स्वतःलाही त्रयस्थपणे पाहतो व आपण कसे दिसत असू याची कल्पना लढवतो. अशा तपशिलांची मजा औरच असते. भरतकामाच्या कोर्‍या कापडावर काहीच नसावं आणि एक एक क्रॉस स्टीच भरत-भरत चित्र किंवा डिझाइन किंवा नक्षी पूर्ण करावी तसंच मला तपशिलांचं वाटतं. नुसता एक टाका निरर्थक असतो पण असे अनेक टाके एकाशेजारी एक आले की मात्र अर्थपूर्ण काही निर्माण होऊ शकतं.

 

कोलटकरची ‘इराणी’ ही अशीच छोट्या-छोट्या तपशिलांमधून उभी राहिलेली कविता आहे. इराणचा चकणा शहा पाहतो तडकलेल्या व सस्मित काचेआड केकला चढणारी क्रमिक बुरशी. क्वचित् विचलित करते त्याचे लक्ष सुशिक्षित बेकाराला राखी बांधताना अकृत्रिम माशी. कवितेला विशिष्ट लय-यमक आहे पण तो रूढ वृत्त-छंद यांच्यासारखा नाही. कवितेतील वाक्ये ही फिरवून किंवा जिथे आपण सहसा तोडत नाही अशा ठिकाणी तोडून यमक साधलंय. पहिल्या ओळी वाचल्यावर डोळ्यांसमोर इराणी हॉटेल व वातावरण उभं राहतं. खासकरून मुंबईकर या वातावरणाशी जास्त परिचित असतील किंवा पुण्यात ‘गुडलक’करांनाही हे परिचित असेल. आणि परिचित नसलं तरीही फार काही फरक पडत नाही. केवळ केक व सुशिक्षित बेकार या शब्दांवरून इराणी हॉटेलमधले गप्पांचे अड्डे डोळ्यांसमोर उभे राहतात. चर्चा करण्याचं आणि चकाट्या पिटण्याचं काम इराण्याच्या हॉटेलात व्यवस्थित चालतं! अनेक योजना, कल्पना इथे सुचतात, प्रत्यक्षात येतात, तर कधी इथेच मरून जातात. इराणी ही एक सामाजिक-सांस्कृतिक जागा आहे किंवा होती. काचेला गेलेल्या तड्यामुळे ती काच स्मित करतेय असं वाटतं. तर बेकाराच्या मनगटावर बसलेली माशी जणू काही त्याला राखी बांधतेय इतका वेळ ती त्यावर एकाग्रपणे बसलीए असं वाटतं. हे असे तपशील मांडून त्याकडे अशा अँगलने पाहणं हे खासच, मला आवडणारं – तपशिलाला कल्पनारम्यतेचा हलका मुलामा देऊन वास्तव-कल्पनेचा बुचकळ्यात पाडणारा खेळ करणं. त्यानंतरच्या कडव्यात निसर्गचित्रांची वर्णने आहेत. यातली वनराजीतली निर्जीवता कुशाग्र आहे, असे निवेदक म्हणतो. (म्हणजे ती मुद्दामच अशी ‘कुशाग्र’ काढलीएत की, ती निसर्गचित्र असूनही जिवंत वाटूच नयेत, असं सुचवायचं असावं. हॉटेलांमधली चित्र आठवतात!) त्यामुळे वारा त्यांना व्यग्र करू शकत नाही. म्हणजे त्यात जिवंतपणा नसावा किंवा ती काचेत बंद असावीत जेणेकरून ती वार्‍यावर फडफडणार नाहीत. पुढची ओळ अशी – अशा निसर्गचित्रांची होते ग्लासात अविद्राव्य तारांबळ टेबलावर ठेवलेल्या ग्लासामधल्या पाण्यामध्ये या चित्रांची वेडीवाकडी प्रतिबिंबं पडतात आणि जणू ती त्यांची त्या ग्लासात विरघण्यासाठी तारांबळ उडते! पण ती कृत्रिमता त्यात मिसळत नाही. त्यानंतरच्या ओळीत वैचारिक गप्पा रंगलेल्या असताना टेबलावर पडलेल्या चहाच्या ग्लासाचे वर्तुळ लक्ष वेधू इच्छिते. शेवटी बेकार सिगारेट पेटवून चहाच्या वर्तुळात जळती काडी ठेवतो. तेव्हा ती विझताना जराशी वर-खाली उठल्यासारखी होते. जणू काही बर्फाच्या लादीवरचं थंडगार प्रेत थोडा अधिक उबदार सोयरा आल्यावर उठून बसावं तसं. जळती काडी हे बेकाराच्या इच्छांचं प्रतीक असावं आणि थंडगार प्रेतासारख्या इच्छा-आकांक्षांमध्ये एखाद्या ‘उबदार’ बातमीमुळे थोडाशा जिवंतपणा त्यात आला असावा... एखादी डॉक्युमेंटरी पाहावी तशी कविता पाहिल्यासारखी वाटते. त्यावर कोलटकर तपशिलांवर कल्पना डकवतो आणि एक फँटसी-वास्तव यांची सरमिसळ करतो. ३. हे वास्तव भौतिक जग फॉर्म किंवा आयडिया यांची प्रतिकृती किंवा प्रतिबिंब आहे, हे प्लेटोच्या ‘वर्ल्ड ऑफ आयडियाज’ या सिद्धान्तामध्ये वाचले होते. म्हणजे असं की, गाईचं गोत्व हा फॉर्म आहे. ते बदलत नाही. त्यामुळे वास्तव जगातल्या गाईंमध्ये ते सर्वत्र आढळतं. त्यामुळे हे गोत्व समजणं हे सत्य व ज्ञान समजून घेणं आहे. जसं आत्मा हा मनुष्याचा फॉर्म किंवा आयडिया आहे व आपण त्यापासून तयार झालेली प्रतिकृती आहोत. या सिद्धान्तासारखीच कोलटकरची ‘या तावदानात’ ही कविता आहे. 

या तावदानात प्रतिबिंब झालेली ही खोली इथे बसलेली तू आणि मी इथले फर्निचर आणि ही एक दगडी भिंत हे सारे तिथे तावदानाच्या देशातील रीतिरिवाजाप्रमाणे वागते. तावदानाच्या घटनेला मोकळ्या मनाने मानते. या तावदानातल्या प्रतिबिंबांच्या प्रदेशाचे नियम आहेत, घटना आहे. खोलीतले सगळे तिथेही राहतात. पण इथले सगळे जिवंत आहे. पण तावदानात सगळे निर्जीव व कृत्रिम आहे. त्याला स्वत्व नाही. इकडच्यासारखीच तिथेही जाईची फुले आहेत पण तिथे ती कागदासारखी कृत्रिम आहेत. तिथे त्यांना सुगंध नाही. किंवा इथे हातात हात घेतल्यावर तिथे येणारी शिरशिरी तिथे नसते. किंवा इथे कितीही मोठ्याने ओरडलो तरी त्या प्रदेशात काहीच होणार नाही. म्हणजे मोठ्यांदा आवाज केल्यावर होणारी तोंडाची हालचाल किंवा शिरशिरी आल्यावर त्वचेवर होणारी सूक्ष्म हालचाल तिथे आहे. पण तोंडातून येणारा ‘आवाज’ तिथे नाही किंवा ‘शिरशिरी’ तिथे नाही. ज्या गोष्टींमुळे वस्तूंचे किंवा गोष्टींचे अस्तित्व सिद्ध होते त्या गोष्टी तिथे नाहीत. म्हणजे फुलांचा सुगंध तिथे नाही तसंच, स्पर्शाची शिरशिरी तिथे नाही. म्हणजे प्लेटोचा सिद्धान्तानुसार या कवितेतल्या ‘ती’ व ‘तो’ यांच्या खर्‍याखुर्‍या क्रियांची प्रतिबिंब तावदानात पडतात. या क्रिया म्हणजे फॉर्म, ते सत्य आहे. आणि त्यामुळे त्यांची प्रतिबिंब ही केवळ प्रतिबिंब आहेत. ती सत्य नाहीत. आणि याही पुढे जर ती व तो हेदेखील कोणाचीतरी प्रतिबिंब असतील, त्यांचा फॉर्म म्हणजे आत्मा समजलं? मग सत्य काय आहे? ४. वर उल्लेख केला आहे पण इथे पुन्हा करावासा वाटतो, तो कोलटकरच्या कवितेतील दृश्यात्मकतेचा. चित्रपट किंवा चित्र या दृश्यकला आहे आणि कविता ही भाषिक कृती. चित्रपटाला किंवा चित्राला जशी चौकट असते तशीच भाषेलाही एक अर्थाची तसेच प्रतिमांची किंवा चिन्हांची चौकट असते. कोलटकर अर्थांच्या किंवा चिन्हांच्या मर्यादेत दृश्यांच्या चौकटी किंवा अवकाश आपल्यासमोर उभे करतो. तो स्वतः व्हिज्युअल आर्टिस्ट होता. त्यामुळे दृश्यात्मकतेचा एक वेगळा पैलू त्याच्या कवितांमध्ये दिसतो. काही कवितेमध्ये तर त्याने अॅनिमेशन आणलंय. 

 

एक घास काऊचा होशील एक घास चिऊचा... या कवितेची सुरुवात लहान मुलाला गोष्ट सांगितल्यासारखी होते. मग स्टूल तरसासारखं, रेडिओ रानडुकरासारखा किंवा चिमटे टोळासारखे अंगावर येतील. अशा अनेक गोष्टींना त्यांच्या दिसण्यानुसार त्या काय होतील या उपमा वापरल्या आहेत. (आता आपण असे अॅनिमेशन असलेले अनेक सिनेमे नेहमी पाहतो.) कवितेचा शेवट असा – बघता बघता वस्तूंच्या रक्तात साखर होऊन जाशील. भोगवादामुळे, केवळ उपभोगाच्या हव्यासामुळे माणसासाठी वस्तू न राहता, वस्तूंनी माणसांनाच खाऊन टाकलंय, अशी गंभीर व भीतिदायक टिप्पणी केलीय. त्याच्या या कविता वाचताना वाटतं की, काहीतरी घडतंय, सांगितलं जातंय आणि कोणीतरी एक कॅमेरा घेऊन हे सारं तटस्थपणे टिपतो आहे. आणि त्यानंतर टिपणारा आपल्या सर्जनशीलतेनुसार टिपलेल्या गोष्टींची पुनर्मांडणी करून आपल्यासमोर ठेवतोय. ५. कोलटकर मला केव्हा भेटला याचं नेमकं व ठोस उत्तर देता आलं नाही, तरी त्याची शालेय किंवा ११वी/१२वीच्या वर्षात ‘ज्ञानेश्वरसमाधिवर्णन’ ही कविता होती. ती वाचली तेव्हा माझ्यावर रोमॅन्टिसिझमचा प्रभाव होतो व वयाचाही परिणाम असेल, पण तेव्हा ती कविता ‘भावली’ नव्हती. ‘गुंतली फासळी निर्माल्यात’ म्हणजे काय या प्रश्नाने मात्र तगादा लावला होता... हे असे वर्णन, त्यातला सांगण्याचा सूर वेगळा वाटला खरा, पण खरं सांगायचं तर पेलला किंवा झेपला नव्हता. मग त्यानंतर हळूहळू कोलटकर वाचला, एकदा नाही दोन-तीनदा वाचला आणि अजूनही वाचतो आहे. कवितेखाली नावही न लिहिता कविता कोणची आहे हे ओळखता यायला हवं, कवितेवर कवीचा ठसा हवा, त्याची स्वतःची अशी एक वाट त्याने तयार करायला हवी असं मला वाटत नाही. कविता किंवा साहित्य जर जगण्याच्या विविध अंगांचा शोध घेणारे, त्यावर प्रकाश टाकणारे, त्यांना कवेत घेऊ पाहणारे असेल तर त्याकडे एकच एक दृष्टिकोनातून का पाहावे, असा मला प्रश्न पडतो. कवी म्हणून स्वतःचीच पुनर्जोडणी-बांधणी आणि मग मोडणी का करू नये किंवा ती कवी म्हणून अत्यावश्यक आहे, असे मला वाटते. इथे जोडणी-बांधणी-मोडणी ही क्रिया आशय-शैली-फॉर्म इ. सगळ्याच गोष्टींबाबत लागू होईल. त्यातून नवनव्या गोष्टी गवसतील. काही फसतीलही. आणि या समेवर माझं आणि कोलटकरचं नातं जुळलं. आणि मला तो आवडू लागला.

 

त्याची एक कविता आहे – तू कोण आहेस? ती म्हणाली ज्या शय्यागृहात ती उतरवून ठेवी झोपण्यापूर्वी नग्नताही तेथूनच एकदा तिला मी पळवून आणले हे तो कवितेबद्दल किंवा सर्जनशीलतेबद्दल बोलतो आहे असे मला वाटते. पुढे लिहिलेय की, त्याच्या मिठीतच तिला जाग येते. पण ती त्याला ओळखत नाही. ‘तू कोणेस’ हा प्रश्न मात्र विचारते! तिचा प्रश्न कवी किंवा निवेदकाला समजतो. पण भाषा नवखी असते! सर्जनशीलता ‘व्यक्ती’ला ओळखत नाही, ती व्यक्ती, समाज किंवा कोणतीही ठोस ओळखीच्या (आयडेंटिटीटीच्या) पुढे जाते. ती थेट प्रश्न करते. सर्जनाची भाषा ही दर वेळी सवयीबाहेरची असते. ती नवनवा शोध घेत असते. त्यामुळेच ती दरवेळी अनोळखी होते. तिने कोण आहेस विचारल्यावर कोलटकर म्हणतो – मी तिला खोटे नाव सांगितले आणि पुनः नव्याने ओळख झाली कोलटकर म्हणतो की, भाषेपेक्षा प्रश्न समजला होता. कारण भाषा प्रयत्नपूर्वक शिकता येण्यासारखी असते. पण प्रश्न कसा पाडायचा हे कुठेही शिकता येत नाही, तर तो आतूनच यावा लागतो. तो कोठेही कोणत्याही क्लास-शाळेत जाऊन कसा पाडायचा हे शिकता येत नाही. सर्जनशीलता असे प्रश्न विचारते. आणि आपल्याला आपली नवी ओळख कळते. हा माणूस कवी म्हणून एकच एक चेहरा धारण करत नाही. तर अनेक चेहरे देत-घेत तो आपल्याला त्याच्या आतल्या, त्याच्या बाहेरच्या जगाची सफर करवतो – काही वेळा स्वतःच्या चश्म्यातून तर काही वेळा जगाच्या चश्म्यातून, काही वेळा त्रयस्थपणे तर काही वेळा एखाद्या भागाचा मायक्रोस्कोपखाली सूक्ष्मातला सूक्ष्म तपशील दाखवत... हे करताना अतिवास्तववादी, फँटसी, वास्तववादी, दृश्यात्मक, अस्तित्ववादी, आधुनिक-उत्तरआधुनिक इत्यादी इझम्सच्या सगळ्या वाटा चोखाळतो, त्यांची सरमिसळ करतो. आणि इझम्सच्या पुढे जातो. मला त्याच्या सगळ्याच कविता कविता कळल्या आहेत अशातला भाग नाही किंवा त्यातल्या कितीतरी कळता-कळता हातातून निसटल्या आहेत. काहींचे मला लागलेले अर्थ कदाचित त्याला अपेक्षित असलेले नसतीलही. मग अर्थ कळतो समजतो म्हणजे नेमकं काय होत असावं. कवी आपला अनुभव किंवा अनेक अनुभव किंवा जगणे यांची त्याच्या कल्पना-प्रतिभाशक्तीच्या जोरावर विशिष्ट अशी बांधणी करून त्याला जे काही म्हणायचंय किंवा सांगायचंय किंवा दाखवायचंय याचं एक कोडिंग तयार करतो. मी एक वाचक म्हणून ते कोडिंग सोडवायचा प्रयत्न करतो. त्यासाठी मी माझे अनुभव व आयुष्याचा वापर करतो. त्यातून त्या कोडिंगमधल्या सुप्त घटकांची उकल करतो. आणि माझा अर्थ लावू पाहतो किंवा लावतो. आता लावलेला हा अर्थ कवीला अपेक्षित असेलच असं नाही. पण तो अर्थ चुकीचा नसतो. आणि इथेच कविता कवीच्या पुढे जाते व ती वाचकाची होती. कवी इथे मरतो आणि कविता उरते. कोलटकर तर आता खराखुरा मेला आहे, त्याच्या ‘खेकड्यां’नी खरंच त्याला खाऊन टाकलंय; पण या आधीच तो कित्येकदा मेलाय व पुनःपुन्हा जिवंत झालाय.... -

प्रणव सखदेव ..... अरुण कोलटकरच्या कविता – अरुण कोलटकर प्रास प्रकाशन 

 

About the Author

प्रणव