शाळा- एक अविस्मरणीय अनुभव

~ मृदुल पटवर्धन

’शाळा’ चित्रपटातील व्यक्तिरेखांचे कॉस्चुम्स डिझाईन करशील का असे जेव्हा मला विचारण्यात आले तेव्हा ’नाही म्हणण्याचा’ प्रश्नच नव्हता. सशक्त कथा, त्यातली य निरागस पात्रे, १९७६-७७ चा काळ असे वर्णन असलेली शाळा माझ्या डोळ्यापुढे उभी होती. हे काम करण क्रिएटिव्ह तर होतच पण अतिशय आव्हानात्मक होत. कामाची सुरुवात अर्थातच अभ्यासाने झाली.पटकथा बारकाईने वाचली तेव्हा मला अस जाणवले की चित्रपटातली सर्व मंडळी मी आजूबाजूला पाहिली आहेत. माझे व माझ्या नातेवाईकांचे जुने फोटो, काही आठवणी, अनेकांशी चर्चा असे त्याचे स्वरूप होते. मी दिग्दर्शक सुजय डहाके, लेखक मिलिंद बोकील यांच्याशीही बोलले. त्यांच्या मनात ही पात्रे अतिशय स्पष्ट होती. अशा चर्चेनंतर या व्यक्तीरेखा मला अधिकाधिक उलगडत गेल्या.

या सर्व गोष्टींची सांगड घालून मी जोश्या, फवड्या, सूर्या, शिरोडकर, चिमण्य़ा, मांजरेकर सर, परांजपे बाई, बेंद्रे बाई आणि आप्पा ही सर्व मंडळी उभी केली. त्या काळातले कॉस्चुम्स म्हणजेच तसे कपडे किंवा तशी फॅशन आता नाही. म्हणून ते दुकानात तयार मिळणे शक्यच नव्हते. अनेकदा एखादा ठराविक कालखंड सिनेमात असतो तेव्हा त्या कालखंडातले पोषाख मुद्दाम तयार करावे लागतात. शाळाकरता ते तयार करण्यामागे एक अडचण होती- कॉस्चुम्स चे बजेट कमी होते. मनात एक विचार डोकावला- ७६-७७ चे कपडे काही जणांकडे असतील का? माझे नातेवाईक, मित्रमैत्रिणी अगदी सर्वांनी मदत केली. त्यांच्याकडे असलेल्या साडया त्यांनी मला आणून दिल्या. पुरुषांचे कपडे कापड घेऊन शिवून घेतले. मांजरेकर सर आणि नारू मामाचे शर्टस याकरता बेडशिटस वापराव्या लागल्या. तशी डिजाईन्स, तसे प्रिंट मला बेडशिटस मधेच दिसले. बेल बॉटम्स ही त्या काळातलीच फॅशन. नारू मामा, मांजरेकर सर, सुकडीचा बॉयफ्रेंड, बाबा आणि जोश्या या सर्वांकरता मी ती फॅशन वापरायचे ठरवले. मुलांकरता शाळेचे युनिफॉर्मस शिवून घेतले. पण वर्गातल्या सर्व मुलांचे युनिफॉर्म एका रंगाचे असले तरी अगदी सारखे दिसत नाहीत. काही मुलांचे युनिफॉर्म थोडे पिवळसर, थोडे मळलेले, काही स्वच्छ पांढरे, काही निळसर झाक असलेले असे मला हवे होते ...मग काय हळद, चहा, नीळ पाण्यात घालून प्रत्येक पाण्यात काही युनिफॉर्म बुडवून काढले. स्कॉलर बिबीकरचा निळा, गरीब पण मस्तीखोर फडव्याचा मळलेला , तर जोश्याचा पिवळसर झाक असलेला युनिफॉर्म असा तयार झाला.

शिरोडकरचे फ्रॉक्स शिवून घेतले. त्या काळात नववी मधल्य़ा मुलीही फ्रॉक घालत, कुंकू लावत, हातात बांगड्या आणि कानात रिंगा घालत. वेणीत गजरे घालत.एखादी लांब चेन घेऊन तिला गाठ मारून घालायची पद्धत होती. जोश्याची बहीण अंबाबाई पेटिकोट आणि त्यावर कुडता घालते, तिचे कपडे साडीतून शिवलेले आहेत. हे देखील त्या काळाशी सुसंगत आहे. सूर्या आणि फडव्या ही गुंड मुले! साधारणपणे गुंड मुले म्ह्टले की आपल्या डोळ्यासमोर जी प्रतिमा येते तशीच यांची वेशभूषा आहे. फडव्याचा शर्ट कायम इन न केलेला, सूर्याची चड्डी आणि शर्टाच्या बाह्या वर गुंडाळलेल्या.सूर्याला त्याच्या वडिलांसारखे गळ्यात रूमाल आणि गंध लावलेला दाखवले आहे. जोश्याच्या सर्वच शर्टावर चेक्सचा पटर्न आहे. जो त्या काळीही होता.शिरोडकरच्या घरी जातांना तो कसा जाईल? नक्कीच एक जबाबदार व्यक्ती वाटावी असा! म्हणून त्यावेळी मात्र त्याला त्याच्या वडिलांसारखा- तशा पॅटर्नचा शर्ट घालून जातांना दाखवले आहे. शिरोडकरला प्रपोज करतांना नारू मामा सारखा शर्ट त्याने घातला आहे! १९७६-७७ मध्ये बायका वेणीत, केसात फुले खोचत, गजरे माळत. काही जणी तर खरी फुलेच नाही तर अगदी खोटी फुले सुद्धा केसात खोवून येत. परांजपे बाईसारखे! परांजपे बाई मुलांच्या दृष्टीकोनातून सुंदर आणि ’हॉट’ अशा बाई. त्यांची राहणी जरा जास्त फॅशनेबल! स्लिव्हलेस आणि पारदर्शक असा २ बाय २ ब्लाऊज आणि लोंबती कानातली! बेंद्रे बाई शिस्तप्रिय आणि कडक-कॉटनची साडी, चष्मा आणि स्टॅंड कॉलरचा ब्लाऊज अशा वेषामुळे त्या तशाच वाटतात. काही बायका दोन वेण्या घालायच्या. कानात रिंगा घालण्याची पद्धत तर होतीच. सतत खांद्यावरून पदर घेणा-या अनेक स्त्रिया तेव्हा होत्या. बर्वे बाई तशा दाखवल्या. त्या काळात ’बायफोकल’ चष्मा लोकप्रिय नव्हता. म्हणूनच आप्पांना आम्ही दोन चष्मे दिले. एक जवळचे वाचण्याकरता आणि एक दूरचा.

माजंरेकर सर आणि नारू मामा त्या काळच्या तरूण पिढीचे प्रतिनिधी. सिनेमात जसे कपडे घालत ते पाहून तसे कपडे वापरण्याची, तसेच केस कापण्याचीही फॅशन होती. शोले त्याच दरम्यान रिलीज झाला होता. तो कालखंड उभा करण्यासाठी नारू मामा अमिताभ आणि धर्मेंद्र घालत असत तशा जॅकेटमधे दिसतो. तेव्हा गोलमाल मधल्या अमोल पालेकरचाही अनेकांवर प्रभाव होता. मांजरेकर सर तसेच अमोल पालेकर किंवा शशी कपूरसारख्य़ा हेअरडू मधे दिसतात. तेव्हा साईड लॉक्स ठेवायची पद्धत होती. त्याप्रमाणे सर्व पुरुषांना ह्यात कल्ले ठेवले आहेत. नंदू माधव यांनाही कल्ले ठेवले आहेत त्यामागे हेच कारण आहे. आनंद इंगळे ह्यांना मी मोठ्या चेक्सचे शर्ट आणि विसंगत टाय आणि आडव्या कडीचा चष्मा दिला आहे. त्या काळात असे दिसणा-या मंडळींचे काही फोटो मी पाहिले होते. चट्टेरी पट्टेरी चड्डीतले वैभव मांगले हे चाळीतले टिपिकल काका वाटतात. सारंग साठे आणि नचिकेत तेव्हाचे बंडखोर तरूण म्हणून शोभून दिसतात. ’शाळा’ हा एक अविस्मरणीय अनुभव होता, सर्व टीमने त्याकरता जीव ओतून काम केले. त्यातल्या व्यक्तिरेखा ख-या वाटाव्या हा आमचा उद्देश होता. कॉच्यूमविषयी कुणी आधी काही लिहिले का नाही अशी माझ्याकडे विचारणा होते!

चित्रपट बघतांना लोकांचे लक्ष चित्रपटाकडेच राहते, त्यांच्या डोळ्य़ासमोर तो काळ उभा राह्तो हे महत्त्वाचे. कॉस्चूम्स करतांना भडकपणा मुद्दाम टाळला आहे, कॉस्च्यूमचा मूळ उद्देश लक्ष वेधून घेणे हे नसून कथेला पोषक असे वातावरण निर्माण करणे हा आहे. लोकांच्या लक्षात कॉस्चूमस न राहता त्यांना चित्रपटातली पात्रे खरी वाटतात- ही मी केलेल्या कामाची पावती आहे.

~ मृदुल पटवर्धन

About the Author

मृदुल पटवर्धन's picture
मृदुल पटवर्धन

designed the Look and the Costumes for the very popular "Harishchandrachi Factory".
recent work comprises of Look and Costume design for the recently released film "Shala' , and forthcoming one 'Ajinkya "
Won V. Shantaram Award 2008-2009 for Best Costumes (Film- Harishchandrachi Factory which was sent to Oscars as the official entry by Indian Film Federation.)

I am now designing for one of the most awaited bollywood films, Ab Tak Chappan 2 directed by Nana Patekar.

Along with movies, I have also designed the styling for several Ad films.
To name a few brands, I would like to mention :

PNG Diamond Jewellery
Paranjpe schemes
Suhana Masala
Volkswagen
Kirloskar Pumps
PNG Silver Jewellery
Designed Costumes for Stage shows of Classical Dance
Designed for a DVD for Marathi Language Education Programme for the marathi children in the US.
Created a couple of articles regarding fashion for THE TIMES OF INDIA.
Designed sequences in Beauty Pageants and fashion shows.
successfully completed assignment of Ramp make-up & styling for fashion shows.
Designed a collection named ‘Gehneez’ ( gehna on kameez ), which got great response and was covered by The Times of India.
Designed Costumes for a period English play on Lokmanya Tilak.