आम्ही दैवाचे दैवाचे शेतकरी रे ...............

-प्रीती करमरकर

शेतात पिकं तरारलेली होती. एका शेतात भात, दुसऱ्यात भोपळे तर तिसऱ्या तुकड्यात गुलाब. हे म्हणजे नवलच होतं. इतकी वेगवेगळी पिकं नि झाडं होती त्या फार्मवर! पिकांची  कापणी करायला जास्त वेळ लागला नाही, आता हार्व्हेस्टर खरेदी केल्याने सगळं कसं पटकन उरकलं होतं! फळांनी लदलेली झाडं बोलवत होती. संत्री, चेरी, खजूर, काजू, फणस, जर्दाळू, प्लम आणि काय काय! एक एक झाड करत फळांची तोडणी सुरु केली. फारतर ४-५ मिनिटात तेही करून झालं. 

बातम्या सुरु होत्या.... अवकाळी पावसाने पिकांचं नुकसान, वादळाने फळबागांना फटका...

आता नांगरट करून काय पेरायचं ते ठरवायला हवं. धाड धाड करत ट्रॅक्टर सुरु झाला. बघता बघता सारी शेतं नांगरून झाली. आज काय पेरावं? कॉफी, टरबूज, फुलं की गहू-तांदूळ? ठरवायला थोडा वेळ लागला. एक धान्य, एक फळ, एक फूल असा तिचा नित्यक्रम होता. एकदा ठरवल्यावर पेरा व्हायला कितीसा वेळ, सीडर हाताशी होतंच. पेरणी झाल्यावर त्यावर खताची एक मात्रा देऊन तिनं ते काम हातावेगळं केलं.
 
वृत्तनिवेदक सांगतच होता..... ऐन हंगामात खतांचा, बियाण्याचा तुटवडा, शेतकऱ्यांच्या निदर्शनाला हिंसक वळण 
त्यानंतर तिने गायींच्या धारा काढल्या. त्यांना मायेने थोपटलं. गायींनीही लाडिक आवाज काढले. खुराड्यात जाऊन अंडी गोळा केली.  

इकडे बातमी सुरु होती, दुधातल्या भेसळीची, आणि त्यानंतर कुठेतरी अचानक कोंबड्या मरू लागल्याची.......

मग ती गेली डुकरांकडे. दोन डुकरीणीनी एक-एक पिलू दिलं होतं, ८-१० पिलांचा पोरवडा डुकरांनाही आता नकोसा झाला असावा. तिनी पिलांना खाऊपिऊ घातलं. मग मेंढ्यांची लोकर काढून, ती शेतात परतली. 

कोण्या गावात रानडुकरांनी धुडगुस घातल्याने उभं पीक हातचं गेल्याची कैफियत शेतकरी मांडत होते.

मग ती गेली बेकरीत. हो फार्मवर बेकरीही आहे. शेतातली कामं उरकल्यावर बेकरीत जाणे हा तिचा नित्यक्रम. बेकरीसाठी लागणारा कच्चा माल शेतातून मिळतोच. वर काही लागेल ते पुरवायला मित्रमंडळी आहेतच. तिच्या मित्रमैत्रिणींनी बनवलेले पाव-केक-कुकी विक्रीसाठी उपलब्ध होते. त्यातले काही खरेदी करून तिनी आपली रेसिपी करायला घेतली. काही सेकंदातच गार्लिक ब्रेड तयार! लगेच त्याची विक्रीही झाली. 

मग ती दुसऱ्या शेतावर निघाली. मुख्य शेतापेक्षा हे थोडं लहान होतं. इथे भाजीपाला काढण्यावर तिचा जोर होता. वांगी, मिरच्या, पालेभाज्या तयार होत्या. तिच्या मित्राने खताची एक जादा मात्रा दिल्याने भाज्या तरारल्या होत्या. तोडणी करून दुकान मांडलं नि विक्री सुरु झाली. 
       
आणखी एक बातमी..... कोथिंबीर, टोमॅटोचे भाव गडगडले, उत्पादन खर्चही भरून येत नसल्याने शेतकऱ्यांनी माल बाजारातच फेकला. 

हे सारं सारं करताना गंगाजळी चांगली ७-८ हजाराने वाढली होती तासाभरात. काही काळ नियमित शेती केल्याने तिची आवक चांगलीच वाढली होती. दुसऱ्या शेतावर आता टुमदार फार्महाउस उभं होतं. निळंशार तळं होतं, त्यात हंस विहरत होते. तळ्याकाठी सुंदर तंबू होता नि झाडावर रुबाबदार मचाण. अगदी हत्ती, घोडेही फार्मवर होते. आपला सुरेख फार्म पाहून ती खुश झाली. अजून काय काय सुधारणा(!) करता येतील त्याचा विचार करू लागली. हातात वाफाळलेला चहा आणि मनात शेताचे, शेतघराचे विचार! खुशीत ती गुणगुणायला लागली. जगात काय चालंलंय ते पहावं तरी म्हणून आतापर्यंत कानावर नुसत्याच पडणाऱ्या बातम्या ती लक्षपूर्वक ऐकू नि पाहू लागली.
     
>कुठे गोदामात धान्य सडत होतं तर कुठे निर्यातबंदीमुळे शेतकरी हवालदिल होते. एकाच दिवसात पाच शेतकऱ्यांच्या आत्महत्येची बातमी होती. कुठे पावसाने ओढ दिल्याने पिकं वाळून गेली होती आणि त्या दिवशी दुपारी तर आपल्या जमिनीसाठी आंदोलन करणाऱ्या  शेतकऱ्यांवर गोळीबार झाला होता. तीन शेतकऱ्यांचे त्यात बळी गेले होते.

त्रासिक मनाने टीव्ही बंद करून ती उठली. कप धुवायला काय वेळ लागला असेल तो, पण तोपर्यंतही तिला धीर धरवत नव्हता. झटक्यात ती कॉम्प्यूटरकडे वळली. फार्मव्हिलेतलं तिचं शेत नुसतं झगमगत होतं. त्या शेताला ना दुष्काळाची भीती, ना पुराची. ना वादळाची डर, ना कुठल्या जनावरांची. रोगकिडीची काळजी नाही की खत-बियाण्याची. पीक सोळा आणे येणारच. सारं कसं ठरलेलं, आखीव रेखीव. शेतीच्या वास्तवापेक्षा फार्मव्हिलेचं हे आभासी वास्तव फारच सुखदायी होतं. नव्या जोमाने ती कामाला लागली. पहिल्या शेतात पेरलेली स्ट्रोबेरी एव्हाना तयार झाली होती. तोडणी, नांगरणीसाठी तिच्या हातातला माउस सराईतपणे फिरू लागला आणि मग सगळं कसं सोपं, सुंदर वाटू लागलं.....      

(टीप- फार्मव्हिले हा एक सोशल नेटवर्किंग गेम आहे. फेसबुकवर हा गेम मोठ्या प्रमाणात लोकप्रिय झाला होता. शेती करणे, शेतीसंबंधातील सर्व कामे (ऑनलाईन ) करणे असे या गेमचे स्वरूप असून या गेममध्ये इतरांना (फेसबुक  फ्रेंड्सना) सहभागी करून घेता येते.) 
 

About the Author

प्रीती's picture
प्रीती

समाजशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण, Gender Studies मधे विशेष रस, स्त्री
अभ्यास केंद्र-पुणे विद्यापीठ, नारी समता मंच, यशदा येथे कामाचा अनुभव.
सध्या बाएफ मधे कार्यरत. 'Gender' संदर्भात अभ्यास, संशोधन व लिखाण,
ग्रामीण उपजीविका कार्यक्रम व त्यातील लिंगभाव आणि अन्य सामाजिक
मुद्द्यासाठी काम. कामा निमित्ताने देशभरात वा परदेशी प्रवास. वृत्तपत्रे
व मासिकातून लिखाण

इंटरनेटवरील active blogger. Pre-तरंग आणि my husband's recipes हे दोन ब्लॉग्ज