समृद्ध करणारा आणि ‘नेटका’!

माधुरी पुरंदरे यांच्या पुस्तकाचा परिचय
-प्रणव

काही घटना किंवा प्रसंग स्मरणांची दारं उघडतात आणि विचारचक्राची चाकं फिरवण्यास निमित्त ठरतात.
यावेळी निमित्त होतं, त्यांच्या ‘लिहावे नेटके’ या पुस्तक संचाला मिळालेला पुरस्कार. त्या पुरस्कार सोहळ्याला उपस्थित असताना अनेक गोष्टी आठवल्या –
गालिबच्या एका शेरामध्ये ‘कुल्प’ असा फारसी शब्द वाचला होता. आणि त्यावरून मराठीत ‘कुलूप’ असा शब्द आला असल्याचं थोडं शोधल्यावर कळलं. किंवा अगदी साधा वाटणारा टेबल किंवा पेन्सील हा शब्द इंग्रजीतून मराठीत आला आणि इतका रुळला की, आता तो मराठीच वाटतो.
कॉलेजात कट्ट्यावर, ‘चल ना एक कटिंग मारू यात’ आणि ‘एक मॅटिनी टाकू या. पैशाचा झोल करू रे काहीतरी...’ अशी भाषा मी सर्रास वापरली आहे किंवा अजूनही वापरतो.
भाषा म्हणजे काय चीज आहे! ती सतत बदलत असते. तीत देवाण-घेवाण होत असते. त्यातून सतत भाषा नवी होत असते. नवे शब्द तयार होतात, जुने शब्द पुन्हा नव्या रूपाने वापरात येतात. भाषा म्हणजे मानवी मन, मानवी जगणे यांच्याशी निगडित गोष्ट. सगळा जिवंत, रसरशीत मामला. दैनंदिन जगण्याला – व्यवहाराला चिकटून असलेला...
कॉलेजात असताना मला भाषाशास्त्र हा विषय होता. तो आवडायचा. पण त्यातले नियम व सिद्धान्त वाचून मला नेहमी कंटाळा यायचा. म्हणजे ते पटायचे, दैनंदिन गोष्टींमध्ये त्यांचा प्रत्ययही यायचा. पण तरी वाटायचं, इतका जिवंत, सतत बदलणारा हा विषय, पण त्याची मांडणी इतकी रुक्ष व कोरडी का? सायन्सवाल्यांना असते तशी याची प्रयोगशाळा का नसावी, किंवा आम्ही कट्ट्यावर जे बोलायचो ती एक प्रयोगशाळाच नव्हती काय?

मग थोडं अजून मागे जाऊन डोकावून पाहिल्यावर लक्षात आलं की, शाळेतही तर व्याकरणाचा भाग असाच रुक्ष व रखरखीत तर असतो. त्याचा फायदा काय तर स्कोअरिंग नसलेल्या भाषेच्या पेपरात पाठांतर केलं तर पैकीच्या पैकी गुण मिळवून देणारा विभाग, इतकंच! मग आणखी थोडं मागे गेलो – अंकलिपीपर्यंत. त्यातली मांडणी व चित्र तर शक्य तितकी अनाकर्षक कशी करता येतील ती केलेली!
भाषा ही जगण्याला आवश्यक असलेली – जगण्याला चिकटूनच असलेली अत्यावश्यक गोष्ट. साधं ‘मला भूक लागली आहे’ ही मूलभूत गरज पुरवायलाही आपल्याला कोणतीतरी भाषा व तिची विशिष्ट रचना यांचा वापर करावा लागतो. लहानपणी आई, बाबा व आजूबाजूच्या लोकांकडून अवगत होणारं हे अवजार पुढे विविध ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने वापरावं लागतं. असं असूनही हे अवजार मुळातच ज्या वयात धारधार करून नीट अवगत व्हायला हवं, त्यासाठी आवश्यक गोष्टींबाबत, साधनांबाबत इतकी अनास्था का असावी?.... किंवा काही जणांनी अशी साधनं तयार करायचा प्रयत्न केला असेलही, ती आपल्याला माहीत नसतील. त्याचा शोध घेतला पाहिजे...
नंतर हे सगळं काहीसं विस्मृतीत गेलं होतं. आणि आज त्याने पुन्हा डोकं वर काढलं ते माधुरी पुरंदरे यांच्या ‘लिहावे नेटके’ या त्यांच्या पुस्तक संचाने. मला पडलेल्या वरच्या प्रश्नाला एक ठोस उत्तर आहे माधुरीताईंचा पुस्तक संच – लिहावे नेटके.

लिहावे नेटके हा पुस्तक संच मी अनेक वेळा चाळला, पाहिला, वाचला आहे आणि दर वेळी माधुरी ताईंनी केलेलं हे काम पाहून मी थक्क झालो आहे. हा संच म्हणजे व्याकरण, चित्रं, भाषाशास्त्र व वेगवेगळ्या शैलीतलं ललित साहित्य यांचं मिश्रण आहे. म्हणजे व्याकरणातील विविध विषय यात समजावून सांगितले आहेत. पण ते सांगताना त्यांचं उदाहरण देण्यासाठी छोट्या छोट्या रूपक कथा, गोष्टी, उतारे, प्रसंग, कविता असे विविध लेखनप्रकार रचले आहेत. आणि त्यानंतर त्याला पूरक चित्रे माधुरीताईंनी काढली आहेत. तर काही ठिकाणी संदेश भंडारे यांचे फोटो वापरले आहेत. त्या उतार्‍यांखाली त्या विषयाबद्दलचे गमतीशीर व मेंदूला खाद्य पुरवतील असे स्वाध्याय दिले आहेत. त्याचीच उत्तरे उत्तरांच्या छोटेखानी पुस्तिकेत दिलेली आहे. मुख्य म्हणजे यातले स्वाध्याय हे ‘स्पून फिडिंग’ करणारे नाहीत. तर विचार करायला लावणारे, प्रत्यक्ष कृती करायला लावणारे आहेत.

या पुस्तकातली सगळ्या सूचना अनेकवचनी आज्ञार्थी म्हणजे ‘करा’, ‘हे सोडवा’ अशी नसून ‘तू हे कर’, ‘तू सोडव’, ‘विचार कर’ अशा प्रथमपुरुषी – संवाद साधल्यासारख्या आहेत. त्यामुळे हे पुस्तक व वाचक यांमध्ये आपोआपच मोकळं नातं जोडलं जातं व विषय समजायला-कळायला अधिक सोपा होतो.
वर्णमाला, अनुस्वार, क्रियापद, कर्ता, सर्वनाम, काळ, आज्ञार्थ, ल्यबन्त, विभक्तीप्रत्यय, विशेषण, क्रियाविशेषण, समानार्थी, समोच्चारी, उपसर्ग, लेखन-संवादभाषा, प्रश्न आणि उत्तर, संभाषण, वाक्यरचना, वाक्प्रचार, परिच्छेद, तुलना, अव्यय आणि जोडाक्षरं या विषयांचा या पुस्तकात समावेश आहे. इतकंच काय तर मुद्रितशोधनासारख्या विषयाबद्दलही यात रंजक पद्धतीने विवेचन करण्यात आलं आहे. चित्रवाचन हे भाषा शिकण्याचं, स्वतःला भाषिक अंगाने समृद्ध करण्याचं उत्तम साधन असतं. म्हणूनच आवश्यक ठिकाणी स्वाध्याय म्हणून चित्रंही दिली आहेत व त्या अनुषंगाने प्रश्न विचारले आहेत.
मुळातच भाषा ही विविधांगी असते. एका भाषेतही अनेक बोलीभाषा किंवा पोटभाषा असतात. ती कोणत्याही एका गटाची किंवा क्षेत्राची मक्तेदारी नसते, तर ती सर्वव्यापी व सगळ्यांसाठी खुली असते.

पुस्तकाचा उद्देश सांगताना माधुरीताईंनी लिहिलंही आहे की, भाषा हा केवळ कथा-कादंबर्‍या-कविता लिहिणार्‍यांसाठी राखून ठेवलेला प्रांत नव्हे. प्रत्येकालाच आपापल्या क्षेत्रात, आपल्या व्यवसायात भाषेचा वापर नेटकेपणाने करता यावा लागतो, योग्य प्रकारे आणि आत्मविश्वासाने बोलता आणि लिहिताही यावे लागते. भाषा मुळातच कच्ची राहिली, तर कोणाताही विषय नीट समजणे कठीण होऊन बसते. म्हणूनच मुलांसाठी हा संच तयार करण्यात आला असला तरी माझ्यामते बी.ए किंवा एम.ए.च्या विद्यार्थ्यांसाठी किंवा भाषेची आवड असणार्‍यां सर्वांसाठी हा संच वाचनीय आणि संग्रही ठेवावा असा आहे.
‘वर्णमाला’ या पहिल्याच प्रकरणातील ‘लृ’ या स्वराबद्दलची माहिती अशी दिली आहे –
हा स्वर मात्र आपल्या वर्णमालेत उगाचच आहे. खापरपणजोबांच्या काळातील एखादे भांडे आता कसल्याही उपयोगाचे नसूनही आपण प्रेमाने जसे सांभाळून ठेवतो, तसा हा स्वरही आपण सांभाळून ठेवला आहे. असू दे बापडा. तो आपल्याकडे काही मागत नाही तोवर ठीक आहे.
क्रियापद या प्रकरणाचे शीर्षकच मोठे मजेदार व उद्बोधक आहे –
बोलणे, चालणे, गाणे, नाचणे, उडणे आणि बुडणे
काही तरी करणे... करत राहणे...

आणि हे समजावण्यासाठी लिहिलेला मजकूरच किती तरल आहे आणि सोबत काढलेले चित्रही खास आहे!
मजकूर असा –
“माझं घर ना, एवढं... नाही, एSSवढं उंच आहे.”
ती मुलगी चवड्यावर उभी राहते आणि ताणून ताणून हात उंच करत घराची उंची दाखवते.
“घर उंच असलं की काय होतं?” मी विचारतो.
“पावसाचा ओलाओला ढग छपरावर राहायला येतो. त्यातून पाण्याचे काचेसारखे मोठ्ठे थेंब पडतात. मी ते गोळा करते, माळेत ओवते आणि माझ्या खिडकीवर तोरणासारखे बांधून टाकते. सकाळी वारा येतो. थेंबांची माळ हलते आणि तिच्यातून किण् किण् किण् आवाज येतो. मग मी जागी होते.”
“अरे वा! आम्हालाही तुमच्या या घरात यायला आवडेल,” मी म्हणतो.
“आमच्या उंच घरात यायचं, तर आमच्याएवढं छोटं व्हावं लागतं. तुम्ही तर केवढे मोठ्ठे आहात!” ती खर्‍याखुर्‍या काळजीच्या सुरात म्हणते, “तुम्ही मोठ्ठे कशाला झालात? म्हणूनच अशी शिक्षा मिळते.”
“आमची चूक झाली,” मी अपराध्यासारखे म्हणतो आणि कान पकडतो.
मग तिला मनापासून हसू येते.

हा उतारा किती सूचक आहे! आणि त्याच्याशेजारचं चित्रंही मस्त आहे – एक लहान मुलही आपल्या फ्रॉकच्या ओच्यामध्ये ढगांचे थेंब गोळा करते आहे आणि शेजारी घर आहे.

मुलगी,घर आणि पाऊस

या उतार्‍यातली क्रियापदे बोल्ड – ठळ केलेली आहेत. आणि त्यावरचा स्वाध्याय खालीलप्रमाणे –

ह्या छोट्या संवादातील काही शब्द ठळक केले आहेत. त्यांना क्रियापद म्हणतात हे तुला ठाऊक आहे. कोणती क्रिया केली, हे आपल्याला क्रियापदामुळे लगेच कळते हे तर झालेच; पण त्यामुळे वाक्याचा अर्थ पूर्ण होतो, हे महत्त्वाचे. थोडक्यात, ज्या शब्दामुळे केलेली क्रिया तर कळतेच, पण वाक्याचा अर्थही पूर्ण होतो, त्यालाच क्रियापद म्हणायचे.

यातली सहज सोपी शैली ती संकल्पना समजण्यास सोपी पडावी या हेतूने केली आहे. पुढे स्वाध्यायातही क्रियापद ओळखण्यासाठी दिलेली वाक्येही नेहमी जगताना येणार्‍या अनुभवांवर आधारित आहेत. त्यामुळे ती आपलीशी वाटतात आणि हे काहीतरी आपले आहे, आपल्याशी संबंधित आहे, अशी भावना जागृत होऊन शिकणे छान होते.
उदा –
ती दर रविवारी सकाळी उशिरा उठते.
नाटकला गेल्यावर मामा दहाव्या मिनिटाला झोपतो.

कोणतीही भाषा शिकण्यासाठी त्यात निर्माण झालेले साहित्य वाचावे लागते व त्यासाठी ते माहीत असावे लागते. माधुरीताईंनी नकळत, कोणताही उपदेश न करता सहजपणे मराठीतील काही पुस्तकांची नावं वाचकांना कळावी यासाठी सूचक पद्धत वापरली आहे –

वाचनाच्या तासाला ग्रंथालयातून आणलेली पुस्तके परत नेऊन देण्याची जबाबदारी सुधन्वाची होती. तास संपल्यावर त्याने स्वतःच सगळी पुस्तके क्रमाने लावली. आता ती लहान गठ्ठे करून पोहोचवायची की नाही? हा एेटीत सगळ्या पुस्तकांचा मनोरा करून हातांवर तोलत निघाला आणि समोरून येणार्‍या आमोदला धडकला. मग काय! पुस्तके अशी अस्ताव्यस्त पडली.
सोबतचं चित्र - खाली नाकावर चश्मा घातलेला सुधन्वा पडलाय आणि सोबत अस्ताव्यस्त पुस्तकं पडलेली आहेत.
सुन्धवा आणि पुस्तके

त्या पुस्तकांची नावं अशी –

सखा नागझिरा, तराळ अंतराळ, उपरा, चौघी जणी, खजिन्याचा शोध, व्यक्ती आणि वल्ली, हितोपदेश, झेंडूची फुले, आठवणीतल्या कविता, महाभारतातील गोष्टी, जंगलाचे देणे, माणदेशी माणसं, ऋतुचक्र इ. 
आणि त्यावरचा स्वाध्यायही मस्त आहे -
आता ती क्रमाने लावायला मदत कर. खाली उभ्या करून ठेवलेल्या पुस्तकांवर वर्णक्रमाने त्यांची नावे लिही.

आता यामुळे वर्णमालाही कळली आणि नकळतच मराठीतली प्रातिनिधिक स्वरूपाची काही पुस्तकेही कळली.
भविष्यकाळ प्रकरणातील हा खालील काव्यात्म उतारा पहा –

एक दिवस असा येईल, जेव्हा माझी सावली
मला सोडून जाईल.
चिमणी माझ्या खिडकीची वाट वाकडी करणार नाही
आणि जाईल उडून कुण्या अनोळखी प्रदेशात;
जिथे नसेन मी, किंवा तुम्ही, किंवा आणखी कुणीच.
एक दिवस असा असेल, जेव्हा ढग पडतील हिरवे-निळे
आणि झाडे काळी-कबरी.
त्या दिवशी झर्‍याचे जहरी पाणी फूत्कारेल नागिणीसारखे.
पण तो दिवस असा असेल, जेव्हा खर्‍या नागिणीला मात्र
तोंड लपवून राहावे लागेल; आपली कातडी बचावण्यासाठी
त्या दिवशीची उन्हे असतील निस्तेज.
वार्‍याच्या पायांवरून गेलेले असेल वारे
अन् त्याला आलेले असेल पांगळेपण.
करणार नव्हतो त्या दिवसाचा विचार.
राहणार होतो मजेत, अज्ञानाच्या गुंगीत.
पण त्या गुंगीतही स्वप्ने पडतात आणि जाग येते धसक्याने.
वाटते, उगवला की काय तो दिवस!....

अर्थांचे विविध तरंग उमटवणारा हा मजकूर केवळ भविष्यकाळच सांगत नाही तर मानवी हस्तक्षेपामुळे मानव आणि निसर्ग यांच्यातले बिघडत चाललेले संबंधही विशद करण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे केवळ अभ्यास किंवा सराव एवढाच या पुस्तकातल्या उतार्‍यांचा उद्देश नसून वाचकांचा किंवा मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा, त्यांना साहित्यातले किंवा भाषेच्या लेखनाचे विविध प्रकार कळावे व यामुळे त्यांचे व्यक्तिमत्त्व समृद्ध व्हावे हा असे मला वाटते. तसंच या उतार्‍यांमधून लहान मुलांचं तसेच मोठ्या माणसांच्या विविध मनोअवस्था नेमक्या टिपल्या आहेत. त्यामुळे यातले प्रसंग व पात्र जवळची वाटतात आणि आपण काहीतरी व्याकरणाविषयी किंवा भाषेविषयी शिकतो आहोत असं वाटत नाही!

प्रश्न आणि उत्तर या प्रकरणातली पुढील गोष्टही अशीच सूचक आहे –

सतत प्रश्न विचारणार्‍या एका छोट्या राक्षसाची गोष्ट लहानपणी वाचली होती. त्याच्या प्रश्नांनी हैराण झालेले त्याचे आईबाबा शेवटी त्याला एका विहिरीत बसवून ठेवतात. बिचारा राक्षस जाणार्‍यायेणार्‍यांना हाका मारत राहतो. पण त्याच्या प्रश्नांचा धसका सगळ्या गावानेच घेतलेला असतो. बरा आहे विहिरीतच, असा विचार करून कुणीच त्याला बाहेर काढत नाही.

ही गोष्ट वाचल्यावर मला पुन्हा प्रश्न पडायचे. कोणी रचली असेल ही गोष्ट? त्याला त्यातून काय सुचवायचे असेल? म्हणजे मुलांनी प्रश्न विचारायचेच नाहीत का? असे असेल, तर ते मनात येतातच कशाला? न विचारता प्रश्न मनातच ठेवले, की ते सारखे चुळबुळ करतात. मग त्यांचे काय करायचे? मोठ्या माणसांना प्रश्नांचा इतका त्रास का होत असेल? कोणते प्रश्न विचारले तर त्यांना बरे वाटेल? मुळात त्यांना नेमक्या कोणत्या गोष्टीचा त्रास होतो? प्रश्नांचा की उत्तरे देण्याचा? ज्यांना प्रश्नच पडत नाहीत अशी मुले जगात कुठे असतील? तिथे तरी मोठी माणसे आनंदात राहत असतील का? घरात, शाळेत, सगळीकडे मोठ्या माणसांनी खोल विहिरी खणून ठेवल्या आहेत, प्रश्न विचारणार्‍या मुलांना कोंडून घालण्यासाठी. त्यापेक्षा उत्तर देणे सोपे नाही का? आपण मोठे कधी आणि कशामुळे होतो? प्रश्न पडण्याचे थांबल्यावर की प्रश्न पडण्याचे थांबल्यामुळे?
कोण देईल या प्रश्नांची उत्तरे?

राक्षस आणि प्रश्न

विशेषण या प्रकरणातलीच मायळू राक्षसाची गोष्ट पहा –

एका मायाळू आणि गप्पिष्ट राक्षसबाळाची गोष्ट एेकताना मुले हसून गडाबडा लोळत. इतर राक्षसमुलांमध्ये राहून तो सुधारावा म्हणून त्याला त्याच्या आई-बाबांनी शाळेत घातलेले असते. वर्षअखेरीस त्याच्या प्रगतिपुस्तकावर शेरे असतात :
प्रगती – असमाधानकारक
स्वभाव – दयाळू व काही बाबतीत हेकट. कितीही समजावले, तरी इतर भांडखोर राक्षसबाळांशी प्रेमानेच वागण्याचा हट्ट करतो. भांडणांमध्ये व मारामार्‍यांमध्ये कृतिशील सहभाग घेण्यास साफ नकार देतो. त्याचा परिणाम होऊन वर्गातील वातावरण बिघडते व शांतताग्रस्त होते. पालकांनी येऊन भेटावे.
वर वर गमतीशीर वाटणार्‍या गोष्टीतून मला असंही वाटलं की, यात आपल्या समाजाचे वर्णन केले आहे की काय! इतरांपेक्षा वेगळं करू पाहणार्‍याला किंवा वेगळं राहणार्‍याला गोष्टीतल्या या राक्षसबाळासारखंच बहुसंख्यांच्या व्यवस्थेकडून अशीच वागणूक मिळत असते, नाही का? आणि केवळ काही ओळींत माधुरीताईंनी ते सांगितले आहे. अशा रूपक म्हणाव्यात अशा गोष्टी पुस्तकात बर्‍याच आहेत.
छोटा राक्षस

भाषा येते म्हणजे आपण एक प्रतिमाच तर पाहून त्याला जोडला गेलेला अर्थ लक्षात ठेवत असतो. त्यानुसार बोलत-लिहित असतो. त्यामुळे कोणतीही गोष्ट शिकताना सोबत चित्रं असतील तर ती शिकणे अधिक सोपे जाते. माधुरीताईंनी यातल्या लेखनाप्रमाणे विविध शैलीतली चित्रे यात काढली आहेत. (ती प्रत्यक्षातच पहावी अशीच!) म्हणजेही लघुचित्र ते अमूर्त चित्रशैलीची चित्रं यात पाहावयास मिळतात. स्वाध्यायामध्येही वेगवेगळ्या सूचनांसाठी प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी चिन्हं दर्शवली आहेत. ती स्वतः माधुरीताईंनी तयार केली आहेत.

उदा. कठीण स्वाध्यायासाठी चिमणी, त्याहून कठीण स्वाध्यायासाठी बेडूक तर वहीत सोडवावा लागणारा स्वाध्याय असेल तर त्यासाठी कागदपेन अशी चित्रं आहेत. त्यामुळे हा पुस्तकसंच केवळ लिखित भाषाच नाही तर दृश्य भाषेच्या संवेदनाही जागृत करते व त्या समृद्ध करण्यास मदत करते.
कठीण

कठीण स्वाध्याय

कठीण

वहीत सोडवायचा स्वाध्याय

वही

उत्कृष्ट छपाई आणि उच्च दर्जाचे निर्मितीमूल्य असलेल्या या संचाचे मुखपृष्ठ मात्र अधिक चांगले करता आले असते असे वाटते. मुखपृष्ठाची कल्पना चांगली असली तरी त्यात फोटोंपेक्षा चित्रांचा अधिक समावेश असायला हवा होता असे वाटते.
मराठी मरेल किंवा मरते आहे असे गळे काढणापेक्षा, शांतपणे कोणताही गाजावाजा न करता माधुरी पुरंदरे यांनी केलेलं हे काम केवळ ‘ग्रेटच’ म्हणावं लागेल. हे पुस्तक एकरेषीय नाही तर ते अनेक अंगांनी मराठी भाषा, तिचं व्याकरण समजावून सांगते. समजावून सांगण्याच्या अनेक पद्धतींचा शोध घेते. पुस्तक लिहिताना ते विविध अंगांनी मांडताना जास्तीत जास्त चांगलं करण्यासाठी काय करता येऊ शकतं याचा शोध घेते.

मला असं वाटतं, समीक्षकांपुढे व वाचकांपुढेदेखील या पुस्तक संचाने याला काय म्हणायचं असा महत्त्वाचा प्रश्न निर्माण केला आहे. कारण यात दृश्यात्मकतेचं भान देणारी चित्रंही आहे, ललित साहित्यही आहे. आणि शिवाय यात उपयुक्त असलेले स्वाध्यायही आहेत. मग याला म्हणायचं काय, हा प्रश्न फार महत्त्वाचा आहे. हा प्रश्न मराठी साहित्य पुढे नेणारा आणि समृद्ध करणारा आहे. यामुळे मराठी भाषा समृद्ध होणार आहे!

- प्रणव सखदेव
(सर रतन टाटा ट्रस्टच्या पराग इनिशिएटिव्ह या शैक्षणिक प्रकल्पांतर्गत लिहावे नेटकेला आर्थिक साहाय्य केल्यामुळे हा संच इतक्या ‘नेटक्या’ व रंगीत स्वरूपात प्रकाशित करण्यात आला आहे. ज्योत्स्ना प्रकाशनने उत्तम निर्मिती केली आहे.)

लिहावे नेटके – भाग १ व २ आणि उत्तरांची पुस्तिका
लेखिका-चित्रकार – माधुरी पुरंदरे
किंमत – ४०० रु.
पाने – एकूण ६१० + ८० (उत्तरांची पुस्तिका)

About the Author

प्रणव