तुकाराम अनप्लग्ड!

-उत्पल

श्रेयनामावली बघत बघत आम्ही, म्हणजे मी आणि मन्या बोडस, एक्झिटच्या दिशेने सरकत होतो. बाहेर आलो, पार्किंगमध्ये आलो. बोडसाने गाडी काढली. मी मागे बसलो आणि आम्ही निघालो. संतोषचं हॉटेल आलं, मिसळ आली, पाणी आलं, पण बोडस तोंड उघडेना. मग मीच सुरू केलं, "विद्रोही तुकाराम दिसतो सिनेमातून." "हं...पण भाषा?" मन्या. "भाषेचं काय?" मी. "अरे पुणेरी वळणाचं मराठी बोलतात पात्रं. एकदा तर आवली 'ठीक आहे' असं म्हणाली. ऐकलं नाहीस?" मन्या. "कधी?" मी. "अरे असं काय करतोस? तुकाराम झाडाखाली बसलेला असतो बघ. आवली भाकरी घेऊन येते. एवढ्या उन्हाचं कशाला आलीस असं तुकाराम विचारतो. त्यावर ती 'ठीक आहे' असं म्हणते! मला तर वाटलं ही आता 'ऊन होतंच जरा, पण दॅट्स ओके' असं म्हणते की काय? आणि कास्टिंग? चारशे वर्षांपूर्वीचं कुणबी कुटुंब वाटत होतं का रे ते? अरे अभिनय चांगला असणं हा एक भाग झाला. पण मुळात चितळ्यांच्या दुधा-तुपावर वाढलेला तोंडवळा कसा लपणार?" "हे तुझं काहीतरीच. अशी अगदी परफेक्ट माणसं मिळणं सोपं नसतं. आणि मुख्य म्हणजे त्यांना अभिनय यावा लागतो." मी. "मग करू नका सिनेमा!" मन्या पटकन म्हणाला. "हद्द झाली मन्या. लोकांना आजवर न दिसलेला तुकाराम सिनेमातून दिसला आणि तू च्यायला सालं काढतोयस सिनेमाची. कौतुक करा की जरा." मी. "कमाल झाली. सिनेमा हे प्रॉडक्ट आहे. कलात्मक आहे, पण प्रॉडक्ट आहेच ना? सिनेमा जर सिनेमा म्हणून नसेल झाला तितकासा परिणामकारक, तर ते सांगायला काय हरकत आहे? प्रोसेसबद्दल कौतुक आहेच. पण फायनल प्रॉडक्टचं काय? आणि शिवाय प्रोसेसमध्येच अनेक फटी दिसतात..." मन्या. "म्हणजे?" मी. "अॅटनबरोचा गांधी अंतर्बाह्य 'गांधी' वाटतो की नाही? तुला गांधी पटतात की नाही हा मुद्दा अर्थातच नाही. पण 'गांधी' सिनेमा तुकडा आहे की नाही? कारण न्याय देऊन हाताळला आहे विषय. मुख्य म्हणजे हाताळणी संयत, प्रसंगी संथ पण परिणामकारक आहे. उगीच प्रसंगांचा भडिमार नाही. म्हणून 'गांधी' राहतो तुमच्याबरोबर. 'तुकाराम' राहत नाही. काही तुकड्यात चांगला वाटतो. पण एकसंध अनुभव नाही. प्रसंगांची रेलचेल न करता थोड्याच पण जास्त परिणामकारक घटनांतून आणि लक्षात राहतील अशा फ्रेम्समधून भाष्य करता येतं. ते न करता तुकड्यात विखरून टाकायचं प्रयोजन कळत नाही. कलादिग्दर्शन ठीक आहे, पण सगळं असं चकचकीत का? कपडे अगदी सर्फ एक्सेलने धुतल्यासारखे स्वच्छ कसे? चारशे वर्षांपूर्वीच्या काळाचा, स्थळाचा आणि माणसांचा 'अनुभव' येतो का सांग बरं..." मन्या. "अरे हो. पण म्हटलं ना, मर्यादा असतात. तशी माणसं मिळायला लागतात. " मी पुन्हा म्हटलं. "प्रश्न हा आहे की तुम्ही अशी माणसं उभी करायचा प्रयत्न करता की आहे त्यातूनच चेहरे शोधता?" मन्या. "आता हे दिग्दर्शकाला विचारायला हवं. तू असंही बघ की मराठी सिनेमाचं बजेटही कमी असतं." मी. "कास्टिंग तर जमूच शकतं. जमवायला हवं. तिथे तडजोड नाही. 'दो बिघा जमीन' मधला बलराज साहनी, 'गंगा-जमुना'तला दिलीपकुमार आठव. त्या मातीतले वाटतात ना? ' 'जैत रे जैत मधला मोहन आगाशे 'आगाशे' वाटतो का? आणि प्रभातच्या तुकारामाचं कास्टिंग जर इतकं परफेक्ट असू शकतं तर पन्नास-साठ वर्षांनंतरच्या तुकारामाचं का नाही? थोडा लांब जातोय, पण मेल गिब्सनचा अॅपॉकॅलिप्टो पाहिलाय आपण. त्यातलं कास्टिंग आठव. कुठून कुठून माणसं गोळा केली होती. सगळे नवीन होते बऱ्यापैकी. पण काय इम्पॅक्ट होता!" मन्या. "बाप रे! हॉलिवुडशी वगैरे तुलना?" मी म्हटलं. "तुलना असं नाही रे. पण सिनेमा करतानाचं गांभीर्य बघ. रीसर्च बघ." मन्या. "हं...पाव-पॅटिस खाणार का?" मिसळ संपत आली होती आणि मन्या पेटला होता. म्हणून मी जरा रूळ बदलला. "अं...हो..पण दोघात एकच घे." मन्या. "मला सांग मन्या, तू एका पटकथेवर किती दिवस झगडतो आहेस? दुसऱ्याला बोलणं सोपं आहे राजे..." मी. "पटकथा हा वेगळा विषय आहे. सिनेमाचा एकत्रित परिणाम ही दिग्दर्शकाची जबाबदारी आहे." मन्या गंभीर होत म्हणाला. "आणि मुळात मला पटकथा लिही म्हणून विनायकनं सांगितलं. मी काही आपणहून गेलो नव्हतो." विनायक पाटील हा एक मित्रच. जबरा धडपड्या. कॉलेजला असताना मी एकदा लागोपाठचे दोन शोज बघायचा विक्रम केला होता. त्याचं माला अजूनही अप्रूप वाटतं. पण विनायक कमाल होता. मॅटिनी आणि फर्स्ट शो असं त्याने कित्येक वेळा केलं होतं. सिनेमातच जगणारा हा आमचा मित्र यथावकाश त्याच उद्योगात पडला. सध्या त्याच्या पहिल्या फिल्मची जुळवाजुळव सुरू होती आणि पटकथेसाठी त्याने मन्याला पकडलं होतं. मन्या उदयोन्मुख लेखक. पटकथेला भिडला खरा, पण त्याचा घाम निघत होता आणि विनायक पटकथेसाठी त्याच्या मागे होता. "सांगायचा मुद्दा हा की सिनेमा हे तसं गुंतागुंतीचं प्रकरण आहे. सोपं नाही ते. आणि मराठी सिनेमा केवढा तरी पुढे आलाय. तू म्हणतोस तसं व्हायला कदाचित अजून काही वर्षं लागतील. पण ठीक आहे मी म्हणतो. हळूहळू होईल सगळं. मला वाटतं की आपण अशा प्रयत्नांचं स्वागतच करायला हवं." मी. 'समीक्षेसह..." मन्या. आता पाव-पॅटिस आलं होतं. दोन मिनीटं शांततेत गेली. मग मन्या बोलता झाला. "मुळात तुकारामावर सिनेमा करायचाच कशाला?" "वा! का नाही करायचा?" मी. "तुकाराम आज रिलेव्हंट आहे का? असल्यास कुणासाठी?" मन्या. "काय बोलतोस? तुकारामाची गाथा आजही घराघरातून वाचली जाते. चारशे वर्षं एखाद्या कवीचा प्रभाव टिकून राहणं ही काय साधी गोष्ट आहे?" मी किंचित चिडून विचारलं. "तुकाराम हा अचाट कवी होता हे तू मला सांगू नकोस. तुकारामाचे अभंग हा आपला ठेवा आहेच. त्याच्या अभंगातून त्याने लोकांना शहाणपण दिलं हे खरं आहे. हे काम संतांनी केलेलं आहेच. शिवाय आपले चंद्रकांत पाटील म्हणतात तसं मराठीतील अनेक कवींनी तुकारामाच्या सावलीखालीच आपलं साहित्य सिद्ध केलं आहे - यात कोलटकर आहेत, मनोहर ओक आहेत, नेमाडे, दि.पु.चित्रे, नारायण सुर्वे आहेत. तुकाराम हा आद्य विद्रोही कवी होता. बरोबर?" मन्या. "हो. बरोबर आहे." मी. "आता मला सांग महाराष्ट्रातील शेतकऱ्यावर तुकारामाचा प्रभाव आहे? तुकारामाचे अभंग त्याला पाठ आहेत? त्यातील विद्रोह त्याला दिसतो?" मन्या. "हो.." मी म्हटलं. "मग जर तुकारामाने आपल्या काव्यातून व्यवस्थेला आव्हान दिलं असेल तर महाराष्ट्रातील शेतकरी आपल्या प्रश्नांकरता एकत्र येऊन संघर्ष का नाही करत?" मन्या. "म्हणजे काय करायचं?" मी. "आजवर महाराष्ट्रात त्रेपन्न हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. भारतात एकूण दोन लाख सत्तर हजारच्या आसपास. आता मला सांग तुकोबांचे अभंग पाठ असणारा आपला शेतकरी दादा याबद्दल काय करतो? लाखोंच्या संख्येने वारीला जाणारे शेतकरी लाखोंच्या संख्येने एकत्र येऊन आपल्या प्रश्नांसाठी मंत्रालयावर मोर्चा का नेत नाहीत? तुकारामाचा विजय कशात आहे? वारीत? अभंगांच्या पाठांतरात? की शेतकरी समृद्ध-समाधानी होण्यात?" मन्या तळमळीने बोलत होता. मी जरा शांत झालो. डोक्यात गोंधळ. तुकाराम, कविता, शेती, शेतीचे प्रश्न, वारी, भक्ती आणि ग्रामीण अर्थव्यवस्था...सगळं जोडलेलं आहे? माझ्या मनातलं ओळखल्यासारखं बोडस म्हणाला, "म्हणशील तर सगळं जोडलेलं आहे, म्हणशील तर सुटं सुटं आहे. मला तरी सगळं जोडलेलं आहे असं दिसतं. म्हणून वारसा, विचार, मूल्यं जपणं हे आवश्यकच. पण आजचा काळ, आजचे प्रश्न आणि आजचं पर्यावरण विसरून कसं चालेल? वारसा जर इतका समृद्ध आहे तर वर्तमान इतकं अस्वस्थ का?" मन्या. "ग्रामीण महाराष्ट्राचा तुझा मुद्दा विचार करण्यासारखा आहे. पण इतरांना तुकाराम कळेल ना? लोक तुकाराम वाचतील, समजून घेतील. नव्या पिढीला तुकाराम कळेल." मी म्हटलं. "काही अंशी मान्य. पण हे इतरजण आणि त्यांची पिढी काय करणार आहे तुकाराम वाचून? आज जे लोक सिनेमाला आले होते ते काय करतील असं तुला वाटतं? तू आणि मी काय करू? आपण जसे मिसळ खायला आलो तसेच आत्ता काहीजण बाहेर जेवायला वगैरे गेले असतील. शनिवार संध्याकाळ. जेवूनच घरी जाऊ वगैरे. उद्या रविवार. आराम. परवापासून विप्रो किंवा कॉग्निझंट किंवा असंच काही. नवीन पिढी इंग्लिश शाळेत. अॅन एंशंट मराठी सेंट याव्यतिरिक्त तुकारामाची नोंद काय? तुला कितीही न आवडो, पण तुकाराम ज्या मातीतला त्या मातीशी आपला संबंध उरलेला नाही." मन्या निर्णायक स्वरात म्हणाला. "हे जरा जास्त होतंय. लाईफस्टाईल वेगळी असली तरी मुळं तुटतात का अशी?" मी. "मुळं दिसतात की. गुढीपाडव्याला मुलीला नऊवारी घालून, वर्षातून एकदा-दोनदा सत्यनारायण घालून आणि आषाढी एकादशीला वऱ्याचे तांदूळ आणि दाण्याची आमटी खाऊन. मग वर्षभर जयंत्या आणि उत्सव आहेतच मुळं दाखवायला. पण त्यापलीकडे काय? सांस्कृतिक वारसा जपायचा आणि संस्कृतीचे अश्रू कुणी पुसायचे? आणि खरं सांगू का, यात कुणाचा काय दोष? संस्कृती सांभाळून जितके पैसे मिळतो त्यापेक्षा जास्त पैसे जर तिच्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केल्यामुळे मिळत असतील तर लोक तेच करणार. परंपरा, वारसा आणि पैसे पुरवणारी यंत्रणा यात निवड करायची वेळ आली तर तू काय निवडशील?" मन्या. "पैसे पुरवणारी यंत्रणा." मी यांत्रिकपणे म्हटलं. "त्यामुळे मग तुकाराम उरतो सिनेमापुरता! आणि तुकारामच कशाला, इतरही ऐतिहासिक व्यक्ती उरतात सिनेमापुरत्या. त्यातूनही मी तुझा मघाचा मुद्दा अंशतः मान्य करतोय. आता जर तुकाराम सिनेमातून कायम राहणार असेल तर मग तो काळ जिवंत करणं, ती माणसं जिवंत करणं आणि त्यातून वास्तवाची तीव्रता आणि तुकाराम घडण्याची प्रोसेस नीट उलगडून दाखवणं हे सगळं किती महत्वाचं ठरतं? कास्टिंग किती महत्वाचं ठरतं?" मन्या. "हो. खरं आहे." मी अखेरीस शरणागती पत्करली. पण मला बोडसावर थोडं तरी स्कोअर करायचं होतं. म्हणून त्याला म्हटलं, "एकूणात तुला रिलेव्हन्समध्ये रस आहे तर. इतिहासात नाही." "इतिहासातही रस आहे. पण वर्तमानसापेक्ष रस आहे." मन्या. "मग उद्या जर ज्ञानेश्वरांवर किंवा एकनाथांवर सिनेमा काढायचं ठरलं आणि पटकथा किंवा संवाद लिहायचं काम तुझ्याकडे आलं तर काय करशील?" मी. मन्या पाव-पॅटिसचा शेवटचा तुकडा खाता खाता थबकला. त्याने पाणी प्यायलं. मागे टेकून बसला. मान किंचित उचलून डोळे बारीक करत म्हणाला. "लिहीन." बोडस खरं बोलल्याचं मला समाधान झालं होतं आणि त्याला थोडं तरी नामोहरम केल्याचा सूक्ष्म आनंदही झाला होता.

( मुखपृष्ठ- रमाकांत धानोकर)

About the Author

उत्पल's picture
उत्पल

जन्मतारीख : १० फेब्रुवारी १९७७
शिक्षण : डिप्लोमा (मेकॅनिकल इंजिनियरिंग), बी.ए. (समाजशास्त्र), एम.बी.ए. (मार्केटिंग)

१९९५ पासून ७ वर्षे इन्डस्ट्रिअल सेल्स आणि मार्केटिंगमध्ये काम. त्यानंतर मार्केट रीसर्च व जाहिरात क्षेत्राचा ८ वर्षांचा अनुभव. सप्टेंबर २०१० पासून कंटेंट रायटर व कॉपीरायटर (मराठी व इंग्लिश) म्हणून काम. 'मिळून साऱ्याजणी' या मासिकात संपादन साहाय्यक म्हणून काम. 'आजचा सुधारक' या मासिकाचा प्रतिनिधी, साहाय्यक.

कविता आणि वैचारिक, ललित लेखनात रुची. हंस, मौज, अंतर्नाद, साप्ताहिक सकाळ, परिवर्तनाचा वाटसरू, पुरुष उवाच, मिळून साऱ्याजणी या नियतकालिकांतून कविता व लेख प्रकाशित.