प्रेमाचा समंजस स्वीकार

काय आहे प्रेमाची व्याख्या?
-सोनाली जोशी

तुमच्या वर्गात एकमेकांवर जीवापाड प्रेम करणारे कुणी होतं का? कसं होतं त्यांचं जग? काय बदल झाले त्यात? असे प्रश्न मनात येतात का? मी आज एक छोटी प्रेमाची गोष्ट सांगणार आहे. अशाच मुलामुलींची.

ते दोघे कधी एका शाळेत असतात, कधी एका कॉलेजात. तर कधी तिचे वेगळे कॉलेज, त्याचे वेगळे कॉलेज असते. पुढे काय करायचं, शिक्षण, नोकरी याविषयीची तिची आणि त्याची निवड वेगळी असते. लव्ह यू, मिस यू अशी प्रेमाची बोलणी ते करतात. ते करता करता एक दिवस साक्षात्कार होतो की, आता यापुढे तिची आणि त्याची भेट होणार नाही. हे काही एकदम घडलेलं नसतं. त्यांना दोघांना हे माहीत असतं. काही वेळा त्यांच्या घरच्यांना याची कल्पना असते, पण ही भेट होणार नाही, हे पचवणं सोपं नसतं.

दोघांचं मन ताटातूट होऊ नये म्हणून सर्व गणित मांडून बघतं. खरं सांगायचं तर एका ठरावीक कॉलेजमध्ये आणि हीच ब्रँच घ्यायची अशी दोघांचीही पॅशन.. एक मन म्हणत असतं, कदाचित मार्कच मिळणार नाहीत, मग दूर जाण्याचा प्रश्नच मिटेल.. एकमेकांच्या मिठीत असताना दुसर मन सांगत असतं की, बी प्रॅक्टिकल.. चार-पाच वर्षाचा तर प्रश्न आहे. टचमध्ये राहणं किती सोपं आहे! एसएमएस, फोन, ऑनलाइन व्हीडियो चॅट आहे. शिवाय सुटीत भेटता येईलच! पण मनात धाकधूक असते ‘आपण आपल्या जीवलग व्यक्तीपासून कायमचं दुरावणार नाही ना?’

काही वर्षापूर्वी हे सर्व फक्त पडद्यावर वा कथा-कादंब-यात पाहायचं असा समज होता. आता हे सर्व अनेकांच्या आयुष्यात घडतं. बालावाडीपासून या प्रेमाची सुरुवात होते. मुलं क्रश आहे, हा मुलगा मला आवडतो, ही मुलगी मला आवडते असे शब्दप्रयोग करतात.

मिडलस्कूल वा हायस्कूलपासून त्यांची प्रेमकहाणी सुरू होते. कॉलेजमध्ये प्रेमात पडलंच पाहिजे, अशी पूर्वअट घालत नाही हे नशीब. बदलत्या काळात प्रेमाचा आविष्कार अधिकच थेट, भडकपणे केला जातो. घराघरातले राजकुमार आणि राजकन्या प्रेमात पडतात. साध्या कारणाने प्रेमी युगुल दुरावणं हेसुद्धा ओघाने आलंच. त्याकरता अगदी विश्वासघात करावा लागतो असं नाही. त्याकरता कोणतंही कारण पुरेसं असते. हा दुरावा कधी थोडय़ा कालावधीचा असतो तर कधी कायमचा! सध्याच्या झपाटय़ाने प्रेमात आणि प्रेमातून बाहेर पडायच्या व्यवहारी जमान्यात सगळं सोपं आणि तसंच व्यवहारी झालं आहे का? तर उत्तर नाही, असं द्यावं लागेल. भावुक असणं, एकतर्फी प्रेम करणं तसंच विरहाचा उत्सव करणं हेसुद्धा आज बघता येतं. अधूनमधून तू नही तो वह सही, असं वागणं दिसलं तरी दिल तो टूटता ही है!

प्रेमभंगाचा, दिल तो टूटता हैच्या भावनेचा स्वीकार करणारे अनेक प्रकारचं लेखन माध्यमातून आपल्यापुढे येतं. विरहगीतांचा तर खास प्रांतच! माणसाचं प्रेम व्यक्त करायची पद्धत बदलली तशी विरहगीत बदलली. मला स्वत:ला आशावाद निर्माण करणारी गीतं जास्त आवडतात. त्या विरहाचा उत्सव साजरा करणारी गीतंसुद्धा आपलीशी वाटतात. सनम बेवफा म्हणण्यापेक्षा आता मुलंमुली वेगळा विचारही करतात. त्या विरहात, दुराव्यात किंवा ब्रेक अपमध्ये अनेक घटक जबाबदार असतात, हे माहीत असून प्रेम करतात. माझ्याच ओळी या निमित्ताने आठवल्या.

तुला बोलावतो सागर, तुला बोलावती वाटा
तुझ्या-माझ्या मध्ये कायम, जसे अंतर तशा लाटा

असं हे अंतर स्वीकारून कसं करायचं असतं प्रेम? अस प्रेम करणं शक्य आहे का?
प्रेमी किंवा दोन मित्र-मैत्रिणी एकमेकांपासून दूर गेले तरी दोघांचा संवाद एकदम बंद होतो, असं नाही. या नात्यांना ऑन-ऑफ स्वीच असतो, पण अनेकदा त्यात कालावधी असतो.. जेवढं जवळचं नातं असतं तो कालावधी अतिशय त्रासदायक, भीतीदायक आणि मनाला हुरहूर लावणारा असतो. संवाद बंद झाला तर नात्याच्या इमारतीची पडझड सुरू होते.

दोन वेगळ्या शहरांत, गावात गेलेले हे प्रेमी जीव दिनक्रम सुरू करतात. त्यांचं कॉलेज सुरू होतं. दोघांचा संवाद सुरू असतो. मग हळूहळू बोलण्यात, एसएमएसमध्ये नव्या फ्रेंड्सची नावे यायला लागतात. ती कशी स्पेशल आहे, तो कसा अमेिझग आहे ते बोलता बोलता कळतं. तुलना होते, चिडचिड होते, भांडणं होतात. तिला त्याच्या मिठीत शिरता येत नाही. त्याला तिला किस करता येत नाही.. अगदी हवं असलं तरी ती दोघं एकमेकांसाठी नसतात. नव्या मित्रमंडळीमध्ये ते रमतात. हळूहळू दोघंही मान्य करतात की असं घडणार होतंच.. बट दे आर स्टिल टुगेदर.

नोकरीनिमित्त वेगळ्या ठिकाणी दोन वेगळ्या देशांत राहणारे प्रेमी काही अशा विरहाला अपवाद नसतात. नात्याची समाजमान्य मोहोर मिळाली म्हणून विरहाचा कालवधी अगदी सुखकर होत नाही. विरह हा जीवघेणा असतो. ती प्रेमाची सत्त्वपरीक्षा असते.

कॉलेज वा नोकरी असताना कधी सुटी मिळते. त्या सुटीत एकमेकांची भेट होते. दोघांनाही जाणवतं, ती आणि तो सेम आहेत पण खूप गोष्टी बदलल्या आहेत. दोघं मुद्दाम सगळ्या जुन्या आठवणी, ठिकाणं यांची उजळणी करतात. दोघांनाही नव्या मित्राचे, मैत्रिणीचे एसएमएस येतात.. मिस यू चे.. मग होतो पुन्हा वाद, पुन्हा भांडण आणि पुन्हा स्पष्टीकरण देणं.. स्पर्शानेही खात्री पटत नाही.. सुटी संपते.. प्रेमावरचा अविश्वास सुरू होतो..

दोघांना मित्रमैत्रिणी म्हणतात, ‘लाँग डिस्टन्स वगरे काही खरं नसतं.’
इतक्या स्टोरीज, सिनेमा सिरियल्स, मित्रमैत्रिणींची उदाहरणं.. शादी के बाद भी अफेअर्स होते है.. मन तसंच विचार करू लागतं. ‘जब जरूरत है उस वक्त अगर साथ नही तो व्हॉट इज द पॉइंट?’ दोघांनाही थोडं पटतं, थोडं अमान्य असतं. अशा दोघांपैकी कधी तो असतो दुस-या राज्यात, ती असते थेट दूरदेशी!
कधी कधी तर पार दुस-या टोकाला. तिच्याकडे दिवस असतो त्याच्याकडे असते रात्र! तो तिला धीर देतो, तिला धीर धर, हसत राहा म्हणतो. तिचं हसणं हे त्याची ताकद असते. तिचा उत्साह त्याला आश्वस्त करतो! एकमेकांपासून दूर ते जुन्या आठवणी जागवत असतात. तो चांदण्या बघताना गुणगुणतो,

येते गालावर खळी हसलीस की सुमुखी
दूरदेशी झिळमिळे चांदण्यांची पालखी!

तिलाही माहिती असतं की, या एकमेकांच्या आठवणी २४ तास सोबत करतात. पण त्याच आठवणी दिवस-रात्र छळतातही. आयुष्याचं काय? ते थांबत नाही. मग काय करायचं? प्रेमात बुडाल्यावर इतर गोष्टी दुय्यम ठरतात. अनेक आवश्यक गोष्टी मागे राहतात. दुरावा आणि विरह अधिकच गडद करतो त्यांची काळजी.

दोघांनाही कळत असतं की, अभ्यास नाही, जीपीए कमी, एटीकेटी, एवढा खर्च, शिवाय वर्ष वाया जाईल! त्यापेक्षा ज्याचा त्रास होतो ते बंदच करायचं. मग दोघं ठरवतात, आपण सध्या फक्त बेस्ट फ्रेंड्स आहोत. आजूबाजूला असे अनेक असतातच-दरवर्षी बॉयफ्रेंड-गर्लफ्रेंड बदलणारे. या दोघांना तसं व्हायचं नसतं. पण नाईलाज आहे, असं वाटायला लागतं. र्वष पुढे सरकतात, बेस्ट फ्रेंडचे ते फ्रेंड्स होतात. अधूनमधून ते एकमेकांना कॉन्टॅक्ट करतात, ई-मेल लिस्टमधे असतात, फोटोज शेअर करतात. दोघांनाही अनेकदा जाणवतं, ‘समिथग इज मिसिंग’. तिला त्याला विसरता येत नाही तरी ती आयुष्य जगणे सुरू ठेवते. तो तिला विसरलो आहे, हे दाखवायचा प्रयत्न करत राहतो. जमले तर दोघे सुटीत भेटतातही. बरोबर नवा जोडीदार असतो. पण हाच जोडीदार कायम असेल याची खात्री नसते. तसेच त्या दोघांना आपण पुन्हा एकत्र येऊ, याचा विश्वासही धरता येत नाही. एकमेकांची साथ सोडायला नको होती, हा विचार मात्र मनात सुरू असतो. ही हुरहुर जीव नकोसा करते.

काही प्रेमी पुन्हा एकत्र येतात. काही दुरावतात. त्यातले काही पहिल्या प्रेमाची आठवण आयुष्यभर मनात ठेवतात. शाळेपासून एकत्र असणारे दोन मित्रमैत्रिणीसुद्धा पुढे आयुष्यात एकमेकांपासून वेगळे होतात. अशा दुरावण्याकरता अगदी नशीब किंवा नियती जबाबदार असतात असं नाही. तर अनेकदा नाती टिकण्याकरता वा मोडण्याकरता आपण केलेली निवड त्याला जबाबदार असते. आपण आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यावर असतो. त्या टप्प्यावर बदलत्या काळाबरोबर लाँग डिस्टन्स रिलेशनशिप स्वीकारावी लागते. आज करियर महत्त्वाचं मानलं की, ही वस्तुस्थिती आहे. दोन देशांत असलेले अनेक विवाहित आपल्या परिचयाचे आहेत. पूर्वी केंद्र सरकारच्या विविध संस्थांत काम करणारे जसे दोन ठिकाणी राहत, त्याचंच हे निराळं स्वरूप. सहवास असला की, प्रेम वाढतं असं नाही, पण कायम राहण्याची शक्यता असते. कारण थेट संवाद साधता येतो. हाडामांसाचं आपलं माणूस आपल्या समोर असतं. हा संवाद कमी होतो, त्याला अनेक कारणं आहेत. सहवास नसणं हे त्यात महत्त्वाचं कारण. पण संवाद कमी होणं, हे कोणत्याही नात्याला पोषक नाही, हे मनात पक्कं ठरवा.

दुराव्याच्या फेजमध्ये दोघांमधला संवाद सुरू असणं, ही महत्त्वाची बाब आहे. प्रेमावर विश्वास आवश्यक आहे. दोन मित्र, दोन मैत्रिणी अथवा अगदी आईवडिलांपासून दूर जाणं सोपं नसतं. प्रत्येक नात्याचा कस एकमेकांपासून दूर असताना लागतो. एखादी व्यक्ती आवडली असेल तिचा सहवास हवासा असेल तर ते व्यक्त करा. पण त्या संबंधाची सक्ती करू नका. ते नातं एक मोकळीक दिली तर कदाचित वाढेल. नात्यात मालकी हक्काची भावना अगदी सहज निर्माण होते. ती कमी करण्याचा प्रयत्न करा. कारण मालकी हक्क आला की मत्सर आला, द्वेषही आला. प्रेम असणं म्हणजे त्या व्यक्तीला ताब्यात घेणं, तिच्यावर नियंत्रण ठेवणं असा अर्थ नसतो. रिलेशनशिपमधे नाईलाज म्हणून मोकळीक द्यायची नसते. तर पझेसिव्ह न होता तसं करणं, मोकळा संवाद असणं, हे महत्त्वाचं आहे. असं केलं तर खरं प्रेम कायम राहतं.

आपल्या करियर किंवा ध्येयाचा पाठपुरावा करणा-या प्रत्येकाला प्रिय व्यक्तीचा दुरावा अटळ असतो. दुरावा अथवा विरह अटळ आहे, म्हणून कुणी प्रेम करत नाही, असं घडत नाही. अगदी एकटी राहणारी, एकाकी असणारी माणसंसुद्धा प्रेम करतात. प्रेम म्हणजे बंड, प्रेम म्हणजे युद्ध असं चित्र आपल्याला माध्यमातून दाखवलं जातं. प्रेम आहे तर ते कृतीतून दिसू द्या, असंसुद्धा म्हणतात. पण प्रेम फक्त एवढंच नसतं. अनेकदा प्रेम मौनात असतं. एखादी व्यक्ती आता आपली होणार नाही, असा समंजस स्वीकार करणंही प्रेम असतं.

प्रेमावर विश्वास ठेवा आणि या दुराव्याचा उत्सव करा हाच ख-या प्रीतीचा संदेश आहे!

About the Author

सोनाली's picture
सोनाली

मिळून सा-याजणी, मेनका , रोहिणी, अक्षर मासिकातून लेखन प्रसिद्ध.

लोकमत, लोकसत्ता, सकाळ, मटा या पेपरातून कविता, लेख 

शक्यतेच्या परिघावरून कविता संग्रह