गुणवंत व्हा!

गुणवंत व्हा!
-सोनाली जोशी

रस्त्यावर अपघात झाला, एखादा मुलगा मदत मागतो आहे, असं चित्र दिसलं तर आजच्या काळात अनेक शहरांतून लोक हे फोटो काढतील, माध्यमांना ती बातमी देतील, पण पुढे होऊन आपला वेळ, पैसा वा इतर प्रकारची मदत करणार नाहीत, असं चित्र दिसतं. असं फक्त भारतात, भारतातल्या मोठय़ा शहरांत घडतं असं नाही. जगभर मोठय़ा शहरांत कमी-अधिक प्रमाणात असा अनुभव येतो. का बरं असं घडतं? लोकांमध्ये असलेला सहानुभूतीचा अभाव, स्वकेंद्रित आणि स्पर्धात्मक दृष्टिकोन याकरता जबाबदार आहे, असं म्हणतात. या स्पर्धेत उत्तम प्रकारे उत्तीर्ण होणारे आम्हाला मानवाच्या कल्याणासाठी काही करायचंय असं सांगतात हेसुद्धा आपण पाहतो. उदाहरणार्थ, दहावी-बारावीचे गुणवत्ताधारक! मग पुढे किती जण ते प्रत्यक्षात आणतात? आई-वडील झाल्यावर आपल्या मुलांना ते कसं घडवतात? दहावी-बारावीचे रिझल्ट लागले! सगळ्या माध्यमांतून त्याचा आढावा घेतला गेला.

या घटनेनं माझ्या मनात पुन्हा जुने प्रश्न उभे राहिले. अनेकांना त्यांच्या अपेक्षेनुसार मार्क्‍स मिळाले. पण अनेक जणांचा हिरमोडही झाला. त्यानिमित्ताने आपण आपल्या दहावीच्या रिझल्टकडे पुन्हा एकदा पाहिले, हे तुम्हाला जाणवलं का? डोळ्याला जे दिसतं, जे कानावर पडतं त्याच्याशी आपण स्वत:ला जोडून घेण्याचा प्रयत्न करत असतो. अनेकदा हे नकळत होतं. माध्यमाची ही एक ताकद आहे. अशा जोडून घेण्याशी दहावी-बारावीचा रिझल्ट त्याला अपवाद नाही. आयुष्यात आपली स्वप्नं, आपले आदर्श, आपलं यश प्रत्येकाला हवं असतं. या सर्व संकल्पनांमध्ये वैषम्य आणि खेद असे अविभाज्य घटक आपण पचवत असतो. त्याची पहिली चव अनेकांकरता दहावीच्या रिझल्टचे रूप घेऊन येते. भविष्यात कधी विस्मरणाला सामोरं जावं लागलं तर माझा मेंदू या दहावीच्या रिझल्टवर येऊन थांबेल, याची मला पक्की खात्री आहे!

दहावीचा रिझल्ट लागला की, मी दरवर्षी दहावी होते! माझ्या या म्हणण्यात गंमत नाही तर थोडा विषाद आहे. तोच दहावीचा पेपर पुन्हा मला देता यावा, मला आणखी एकदा संधी मिळावी, असं अनेकदा वाटलं आहे. किंबहुना माझ्यासारखं मत ब-याच जणांचं असेल. त्याचं कारणही तसंच आहे. दहावीला माझं मेरिट सात मार्कानी हुकलं होतं. मी मेरिटमध्ये येणार हे एवढं डोक्यात पक्कहोतं की, फक्त क्रमांक कोणता एवढी उत्सुकता होती. यात गर्व वा अभिमान असं काही नसून ही वस्तुस्थिती होती असं म्हणते. पण रिझल्ट लागल्यावर पास होणारा विद्यार्थी नापास झाला तर जसं होईल, तसंच आमच्या घरचं वातावरण होतं. मी मेरिट आलेल्या विद्यार्थ्यांचे फोटो बघत असे, तसे त्या वर्षीही पाहिले. डोळे भरून पाहिले. थेट लातूर ते रत्नागिरीचे! या रांगेत माझाही फोटो आला असता.. पण आला नव्हता.. अपेक्षाभंग, निराशा आणि आई-वडिलांना आनंद देण्यात आपण कमी पडलो, ही भावना आतल्या आत कुरतडत होती.

मार्कलिस्ट हातात आली तेव्हा मराठी आणि संस्कृत या दोन विषयांत मला अपेक्षेपेक्षा एकूण तीस मार्क कमी पडले होते. अकरावीला प्रवेश घेताना असा अपेक्षाभंग होईल हे मनात होतं. म्हणून सायन्स शाखेचे दोन ग्रुप न घेता मी जीवशास्त्र सोडून दिलं.. म्हणजे गणिताशी संबंधित शाखाच आता यापुढे घेणार होते. बारावीचा अभ्यास करताना सतत काळजीत होते. अभ्यास कमी, काळजी जास्त! मनात बंडखोर विचारसुद्धा येत. पेपरात लिहायचेच नाही, एखाद्या चाचणीला अभ्यास करायचाच नाही इत्यादी.. माझा दहावीचा रिझल्ट बोर्डाने बारावीला दिला! पण मी बारावीला मेरिटमध्ये आले त्याचा फार काही आनंद झाला नव्हता. दहावीचे आता भरून निघाले, अशी फक्त भावना होती. आपला नंबर लागला, पण त्यामुळे कुणाचा गेला असेल का अशी विचित्र भावना पण मनात डोकावली.

दहावी-बारावी ही फक्त सुरुवात असते असे सगळे जण म्हणतात. त्याचे कारण मात्र नंतर उमगते. त्या वर्षामध्ये आणि त्यापुढील चारेक वर्षात शिक्षण, शिक्षणपद्धती आणि एकंदर शिक्षण व्यवहार नावाचा प्रकार अस्तित्वात असतो, त्याची ओळख झाली. माहिती असणे आणि मान्य करणे यात फरक असतो. हा व्यवहार मला आजही मान्य नाही.

दहावी-बारावीच्या रिझल्टच्या निमित्तानं अनेक गोष्टी पडताळून पाहता येतील. एखादा विषय किती समजला आहे याचा आणि कागदावर मिळालेले मार्क याचा संबंध नाकारता येत नाही. पण तेच एक सत्य नसतं, ही बाजू हळूहळू कळते. मार्काचा बागुलबुवा, यशस्वी होण्याचे निकष हे सर्व आपणच तपासून पाहिले पाहिजेत. यशस्वी व्हायचं आहे असं मनात ठेवून आपण वागत असतो. एक यश मिळालं की, पुढच्या यशामागे जातो. यश मिळाल्याचा आनंद असतो पण प्रत्यक्षात आपल्याला वाईट वाटतं. आपण अनेक दु:खं, निराशा आपलीशी करतो. त्याला तशी कारणंही आहेत. यशस्वी होणं हे एकमेकांच्या तुलनेतही अनेकदा जोखलं जातं. आधीची पिढी, दहा एक वर्षापूर्वी उत्तीर्ण झालेली मुलं, एकाच घरातली दोन-चार र्वष पुढे असणारी भावंडं.. सर्व नाती स्पर्धेत भरडली जातात. स्पर्धा अटळ आहे, पण त्यात आपण भरडलं जाणं अनावश्यक आहे. स्पर्धेची सुरुवात दहावीपासून होत असेल पण त्याला बळी पडणं थांबवण्यासाठी प्रयत्न केव्हाही करता येतात. त्या प्रयत्नांकरता पहिलं पाऊल म्हणजे आपण आदर्श आहोत, अशा भ्रामक कल्पनेचा त्याग करावा लागेल. तुलनेचा, एकमेकांना जोखण्याचा त्याग करावा लागेल.
पराजयाची भावना

दहावी-बारावी वा पदवी मिळली म्हणून ही स्पर्धा थांबत नाही. खेद आणि वैषम्य या शब्दांचा अर्थ पहिल्यांदा तेव्हा अनुभवता येतो. तुम्ही म्हणाल की, जेमतेम १५-१६ र्वष वय आहे, एवढं मोठं आयुष्य समोर आहे, तेव्हा खेद किंवा वैषम्य कसं जाणवेल? दोन वेळच्या जेवणाची, पुढच्या शिकण्याची सोय झाली आहे तर एवढय़ा टोकाच्या भावना मनात येऊ नयेत. पण कदाचित दोन वेळच्या जेवणाची सोय झाली आहे, त्यामुळे अनेक शक्यता आहेत, नव्या संधी आहेत, यशस्वी होण्याची स्वप्नं आहेत म्हणूनच अपयश जास्त खुपत असतं.

एखाद्याचा मनाविरुद्ध रिझल्ट लागतो, तेव्हा आणखी कॉलेजातल्या वा शाळेतल्याच कुणाचा प्रेमभंगही झालेला असतो. दोघांनाही घडलेल्या घटनेचं दु:ख होतं. प्रेमभंग लक्षात राहायला हवा आणि दहावी-बारावी मागे पडायला हवी असं मनात येणं साहजिकआहे. पण तसं सहसा घडत नाही. कारण आपण स्वत:ला दुस-यांच्या नजरेतून तपासत असतो. अमक्यानं म्हटलं मला एखादी गोष्ट येते की आपण जास्त आनंद व्यक्त करतो. म्हणजे एखादी गोष्ट लेखी स्वरूपात आली, दृश्य स्वरूपात चार लोकांपुढे आली की त्याचं महत्त्व वाढतं असा आपला समज आहे. म्हणून या दहावी-बारावीची महती जास्त वाटते!

प्रेमभंग झाला, हे कोणत्याही कागदावर भरून दिलं जात नाही. कोणत्याही डेटिंग वा वधू-वर सूचक मंडळात ही माहिती आजही द्यावी लागत नाही. दहावीपेक्षा केव्हाही प्रेमभंगाचं दु:ख जास्त असतं, असं आपण सर्व जण मान्य करू, पण हा दहावीचा रिझल्ट कुठेही गेलो तरी उगाळला जातो! एखाद्याचा प्रेमभंग लपून राहतो, पण दहावीचे मार्क लपत नाहीत! लपवता येत नाहीत. खेद आणि वैषम्याची पहिली झलक तेव्हा दहावीला मिळते. वैषम्याची कारणं अनेक असतात-अपयश, पुन्हा संधी मिळावी अशी इच्छा, नाकत्रेपणाची जाणीव. थोडक्यात आपण चुकीचा पर्याय निवडला, अशी एक भावना आणि मिळालेले अपयश या दोन्हींचा एकत्र परिणाम खेद आणि वैषम्य वाटण्यात होतो.

मी हा क्लास लावायला हवा होता, त्याच्याशी मैत्री करायला हवी होती, तिच्या/त्याच्या प्रेमात पडायला हवे होते, वेगळी नोकरी स्वीकारायला हवी होती अशी यादी वाढत जाते. थोडक्यात, आपण आदर्श अशी एक संकल्पना असते त्याच्या तुलनेनं आपल्याला जे मिळालं आहे ते तोलतो. ते कमी पडलं की आपण दु:खी होतो. आपल्या हातात दुसरा पर्याय होता अशी जाणीव सतत मनात असते, पण ते पर्याय आपल्याला स्वीकारता येत नाहीत, आपण ते स्वीकारले नाहीत हे आपलं मन मान्य करत नाही. आदर्शाशी तुलना हा वैषम्याचा, खेदाचा मूळ स्रेत आहे. आपण आपल्याला आदर्श मानत असतो आणि आपली प्रत्येक कृती बरोबरच आहे असा आपला पक्का समज असतो. आपण एकदा आदर्श आहोत असं मान्य केलं की आदर्श जी निवड करतात ती चुकीची असू शकत नाही हे दुसरं गृहितक असतं. थोडक्यात आपल्याकडून चूक होणं ही संकल्पना आपल्या आदर्श असण्याच्या समजाला छेद देणारी असते. हे वस्तुस्थिती आणि संकल्पना यातलं अंतर वैषम्याचं, खेदाचं दुसरं कारण आहे.

आशावाद आणि वस्तुस्थिती

आपण तुलनेने श्रेष्ठत्व ठरवत असतो, पण ती स्थिती कायमस्वरूपी नसते हे आपल्याला माहिती असतं. म्हणूनच त्याचा अहंकार वा न्यूनगंड बाळगणं योग्य नाही. आई-वडिलांनी सर्वगुणसंपन्न मूल ऑर्डर केलं आणि त्यांचं तसं मूल जन्माला आलं असं घडत नाही, हे त्यांनी लक्षात ठेवायला हवं. मुलाचा आत्मविश्वास आणि त्याचा तुमच्यावरचा विश्वास कायम राहणं हे या नात्याचा आधार आहे. तो निर्माण कसा करायचा?

मुलांच्या मनात आपण सर्वोच्च नाही, आपण आदर्श नाही, आदर्शाच्या जवळचे नाही म्हणजे जगायला नालायक आहोत, अशी एक भावना मनात निर्माण होते. पण वस्तुस्थिती तशी नसते. म्हणूनच असे विचार मनात न येता अधिकाधिक दर्जेदार काम होण्याकरता प्रयत्न सुरू ठेवणं पुरेसं आहे. ते मनात असेल तर समाधानी राहता येईल, सकारात्मक आणि वस्तुस्थितीचं भान असलेला दृष्टिकोन ठेवता येईल. या दृष्टिकोनाची सुरुवात थेट दहावीत होत नाही तर लहानपणापासून मुलांना हे सांगणं गरजेचं आहे. लहान मुलांना म्हणजे पर्यायाने त्यांच्या स्पर्धात्मक दृष्टिकोन ठेवणा-या पालकांना. मुलं म्हणजे त्यांच्या हातातले खेळणं नाही, त्यांच्या यशस्वी जगण्याचं मोजमापही नाही, हे त्यांनी समजून घेणं आवश्यक आहे. बदलती जीवनशैली, स्पर्धा व वेग यामुळे पालक आणि मुलांचं नातं अधिकाधिक गुंतागुंतीचं होत आहे. ही गुंतागुंत समजून घेणं, त्याला सामोरं जाणं याकरतासुद्धा या आदर्श आणि तुलनात्मक अट्टहासाचा मार्ग मारक आहे. दोन पिढय़ांत मतभेद असतात, संघर्ष असतो. पण हे अंतर आणि हा संघर्ष अशा जोखण्यामुळे, तुलनेमुळे वाढतो हे तर स्पष्टच आहे. समुपदेशक म्हणतात की, मुलांवर प्रेम असेल तर तुलना टाळा. तुलना करणारच असलात तर मुलांचा आत्मविश्वास वाढेल अशी तुलना करा. आई-वडिलांनी तुलना केली की, मुलं तुलना करतील हीच शक्यता जास्त आहे. तसंच आई-वडील समाधानी राहिले तर तो समाधानाचा दृष्टिकोनही मुलांच्या मनात राहील ही शक्यता आहे. समाधानी राहणं म्हणजे जे मिळालं त्याचा मालकी हक्क गुणदोषांसकट स्वीकारणं. दर्जा वाढवण्याचा प्रयत्न थांबवणं, असं नाही. एकंदर आपण आशा बाळगणं आणि वस्तुस्थितीला सामोरं जाणं या दोन्ही गोष्टी आज आवश्यक आहेत.

वास्तवाचा एक भाग माणुसकीसुद्धा आहे! फक्त नात्यातली माणुसकी नाही तर नात्याबाहेरची, समाजातली, एक व्यक्ती म्हणून समाजाशी जोडून घेणारी माणुसकी. लहानपणापासून स्वावलंबन आणि सेवाभाव याचा अनुभव मुलांना असणं आवश्यक आहे. मार्काबरोबर मोबदला आणि पैसा याचे गुणोत्तर तपासण्यापेक्षा मी काय समाजाला दिलं याचं फक्त एकतर्फी गुणोत्तर तपासणं गरजेचं आहे. योगदान छोटंसं का असेना ते नियमित स्वरूपात असावं, ही खूणगाठ मुलांनी लहानपणी बांधली पाहिजे. हावी-बारावीचे रिझल्ट लागले की, मुलं ख-या अर्थाने गुणवंत होतील!

About the Author

सोनाली's picture
सोनाली

मिळून सा-याजणी, मेनका , रोहिणी, अक्षर मासिकातून लेखन प्रसिद्ध.

लोकमत, लोकसत्ता, सकाळ, मटा या पेपरातून कविता, लेख 

शक्यतेच्या परिघावरून कविता संग्रह