
आठवांची उजळणी -पण योग्य कारणासाठी!
-सोनाली जोशी
मनाशी जपलेलं
हरवतं,
मन दुखवतं
तसं असतं
अगदी लहान
अगदी सोपं
जशी
आईची टिकली
बाबांच्या पाकिटातले
चार आणे
चुरगळलेल्या
पुडीमधले खारे दाणे
ताईची खोडी
थोडी लाडीगोडी
दादाचा धपाटा
रुसूबाईचा कोपरा
हक्काचं असं
बरंच काही..
एका वळणावर
हळूहळू सारं
परकं होतं
या ओळी माझ्या कवितेमधल्या आहेत. अशा साध्या गोष्टींना महत्त्व देणं म्हणजे कमीपणा! असा एक काळही आयुष्यात येतो. काही तरी हटके किंवा जमान्यासारखं करायच्या नादात आपण खूप साध्या गोष्टी गमावतो, हे नंतर समजतं. स्वकेंद्रित होत जाणा-या माणसांच्या जगात ढीगभर जीवाभावाचे मित्रमैत्रिणी मिळतील अशी अपेक्षा नाहीच. त्याउलट जुळलेले सूर बिनसायला फार कष्ट घ्यावे लागत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. यामध्ये चूक आपलीसुद्धा असते. लक्षात येत तोवर कधी कधी खूपच उशीर झालेला असतो. माझ्याबाबत सांगायचं तर मला आयुष्यातून काही काळ दूर गेलेली माणसं सुदैवाने पुन्हा संपर्कात आली, असं म्हणेन.
काल-परवाचीच गोष्ट. शास्त्रीय संगीताची आराधना करणारी, संगीताचे कार्यक्रम करणारी पुण्यातली एक गायिका. तिचा फोटो बघताना ही कदाचित आपल्या वर्गातलीच असावी असं मनात आलं. त्या मुलीची आणि माझी पंधराएक वर्षात भेट नव्हती. शाळा संपल्यापासून तिच्याशी संपर्क नव्हता. (तिला) त्या गायिकेला निरोप पाठवला. तिचं उत्तर आलं तेव्हा कळलं की, ती वर्गमैत्रीणच आहे!
या मैत्रिणीला लहानपणापासून गाण्याची आवड होती. संगीताची मुळातच जाण होती. शाळेपासूनच तिच्या लेखी संगीत हाच एक विषय अभ्यासक्रमात होता. आम्ही दोघीही सध्या आवडीच्या प्रांतात काम करतो आहोत. बोलता बोलता ती म्हणाली, ‘‘तू काडयापेटयाची कव्हरं गोळा करतेस का आता? मला शाळेतलं आठवतं आहे. तू तुझ्या मुलांना सांगितलंस का त्याविषयी?’’तिनं काडयापेटय़ांच्या कव्हराचा विषय काढला त्यासरशी मला कचरापेटीपासून पानपट्टीपर्यंत घेतलेला कव्हरांचा शोध आठवला. एकदा बोलता बोलता मी मुलांना त्याविषयी माहिती दिली होती, पण वरवरची.
मी चौथी-पाचवीत असेन. माझ्या मामाची फिरतीची नोकरी होती. आता मुले जशी पोकिमॉन कार्ड्स वा कार्टुनचं कलेक्शन करतात तसे तेव्हा कुणी शंख-शिंपले जमवत. आवडत्या हीरो-हिरॉईनचे वा क्रिकेटपटूंचे फोटो जमवणारे तर बरेच जण होते. कुणी पोस्टाचे स्टँम्प! माझा मामा व मामेभाऊ काडयापेटयाची कव्हर जमावत होते. एक पुरुष, फिरतीची नोकरी आणि मामा पान खात असे. त्यामुळे मामाला काडयापेटया मिळणं अधिक सोपं होतं, हे ओघानं आलंच. अर्थात, ते काही कळायचं माझं वय नव्हतं. मुळात एखादी गोष्टी पुरुषाला शक्य आहे तर ती स्त्रीलासुद्धा शक्य आहे, अशा वातावरणात मी वाढत होते. मला काडयापेटयाची कव्हरच जमवायची होती.
मी एक वही तयार केली होती. माझा उत्साह काही काळ टिकेल असं घरच्या सर्वाना वाटलं होतं. साधारण दोन-चार महिन्यांत लहान मुलांचा उत्साह ओसंडतो आणि ती नव्या गोष्टीच्या मागे लागतात असं अनेकदा आपण बघतो. पण मामाकडून होणारा सततचा पुरवठा माझा उत्साह वाढवणारा होता. विकत घेण्यापेक्षा, कुणी आयतं देण्यापेक्षा, स्वत: कव्हर मिळवण्यात एक धमाल होती हे लवकरच माझ्या लक्षात आलं. जाडजूड अशा वह्या भरल्या होत्या. त्याकाळी जाता-येता मनात असायची फक्त काडयापेटी. तेव्हा लायटर इतके सर्रास दिसत नसत. सिागरेट पिणा-या व्यक्तीच्या चार हात दूर राहणारी मी मग देऊळ असो, शाळा, ऑफिस कुठेही माझी नजर काडयापेटीची कव्हर शोधत असे. सिगारेट पिणारी एकही स्त्री मला तेव्हा ठाऊक नव्हती. आमच्याकडे येणारे, नातेवाईक वा मित्रमैत्रिणी सगळ्यांना एव्हाना माझ्या काडयापेटयाच्या कव्हराचा ध्यास समजलेला होता. अनेक जण आठवन ठेवून ट्रिपला गेले, बाहेरगावी गेले की माझ्याकरता काडयापेटी आणत. त्याची मदत मोलाची होती. किराणामालाची दुकानं हा पहिला थांबा. नियमितपणे शहरातल्या मुख्य दुकानांत नव्या काडयापेटया शोधणं हा दररोजचा उद्योग. बस यायला वेळ असे, तोवर आपण भटकून यायचं. पुढे तर हातात सायकल आली मग विचारायलाच नको. तो छंद वा आवड माझी एकटीची होती असं नव्हतं. आपल्याकडे असलेली कव्हरं दुस-याला दे आणि बदल्यात वेगळं कव्हर घे, अशी देवाणघेवाण मी करू लागले होते. फक्त एक गोष्ट कायम होती की, अशी देवाणघेवाण करणारे सर्व मुलगे होते. मी माझ्या लहान भावाला बरोबर घेऊन मस्तपैकी हव्या त्या कव्हराच्या मागे जायचे.
शाळा, अभ्यास सांभाळून माझ्या काडयापेटया कव्हर गोळा करणं सुरू होत्या त्यामुळे घरी कुणी फार आक्षेप घेतला नव्हता. कचरापेटीशिवाय बस स्टॉप, कॉलेजचा कट्टा, चहाची टपरी, सायकल/पंक्चर दुरुस्त करतात अशी दुकानं इत्यादी काडयापेटया मिळायची ठिकाणं होती. बस स्टॉप व कॉलेजमध्ये मुली असतात पण कट्टयावर तशा कमीच. निदान तेव्हा तरी. इतर ठिकाण ही पुरुषांची मक्तेदारी. लहान होते तेव्हाची गोष्ट वेगळी होती. पण जसं जसं शरीरात होणारे बदल बाहेर दिसू लागले तसे या ठिकाणी मुली का नसतात, याची उत्तरसुद्धा मिळाली. तिथे असणारी माणसं, त्यांच्या गप्पा, त्यांचा स्त्रीकडे, एखाद्या तरुण मुलीकडे बघायचा दृष्टिकोन अशा विविध गोष्टी मी काडयापेटीच्या निमित्ताने शिकत गेले. सर्वसाधारणपणे पालक ज्या जगापासून आपल्या मुलीला दूर ठेवतात, त्या जगात डोकावून बघण्याची संधी मला मिळाली होती. लोकांचा सिगारेट-बिडीचा एक आवडता ब्रँड असतो, पान कुठलं हवं ते ठरलेलं असतं, तसं काडयापेटीचं मात्र नव्हतं. कामापुरती कोणतीही काडयापेटी चालायची. तरी एखाद्या भागात एका ठरावीक चित्राच्या काडयापेटया जास्त खपतात हे मला समजू लागलं होतं. काडयापेटीचा आवाज, काडी ओढल्याचा आवाज, त्याचा वास, सिगारेटचा वास.. याचा अभ्यास ओघानं झाला. आवाज आला की अंदाजे किती काडया शिल्लक असतील, असा हिशेब डोक्यात सुरू व्हायचा! सिगारेट पिणारा काडयापेटीच्या काडया वाया घालवत नाही. एकाच फटक्यात काडी ओढतो, आजूबाजूला कुणी असेल तर त्यांनाही देतो असा माझा अनुभव होता. तसा नवशिका काडी ओढण्याच्या पद्धतीवरूनही ओळखता यायचा.
काडयापेटीकरता शेजारी ताटकळत उभं राहिलं असलं की कधी तरी कुणी तरी विचारायचं, ‘‘काय सुरू आहे?’’ मग भाऊ, दादा करून किंवा काडयापेटीचं कव्हर पाहिजे, असंही कधी तरी सांगून मोकळं व्हायचं. कधी बाबांचे मित्र दिसत. त्यावेळी हा माणूस सिगारेट पितो, असा मनातला भाव चेह-यावर न येऊ देता काय काका करून वेळ निभावायची. त्यांनी आपल्या बाबांचा विषय काढण्याआधी आपणच ‘‘सांगते बाबांना, तुम्ही विचारलं होतं म्हणून,’’ असं सांगून आपण मान खाली घालून तिथून निघून यायचं. एखादं व्यसन ही कुणाची मक्तेदारी नाही. व्यसन करण्यात फार मोठेपणा नाही, हे सर्व मुद्दे आलेच, पण ते नंतर. आधी काडयापेटी महत्त्वाची. पण या सर्वाचा दुसरा एक परिणाम असा झाला की, माझ्या वर्गातल्या काही मुली, काही मुलं, ‘ही आता गेली वाया’ असं लेबल लावून मोकळे झाले होते. मी अशा ठिकाणी जाऊ नये म्हणून ते आडून तर कधी स्पष्ट सूचना करायचे. त्या वयात आजूबाजूचे मुलगे एखाद्या मुलीला संरक्षण द्यायचा प्रयत्न करतात, त्यामागे उद्देश काय असतो इत्यादी गोष्टी मला कदाचित जरा जास्तच लवकर कळल्या होत्या. माझ्या छंदापायी काही तथाकथित उच्चभ्रू मित्रमंडळी मी गमावली असतील असं नंतर वाटलं, पण त्या बदल्यात मला माणसं बघता आली, समजून घेता आली. स्पर्श वा बोलणं राहिलं दूर.. नुसत्या नजरेची भाषा कशी असते, ते मी योग्य वयात शिकले. खर या गोष्टी निसर्गत: प्रत्येकाजवळ असतात. आपले संस्कार त्यातले काही गोष्टी दडपून टाकणं पसंत करतात इतकाच फरक. ‘दो आँखे’ नावाचं वेष्टण असलेली काडीपेटी तेव्हा खूप सहज मिळत असे.
या ‘दो आँखे’ने मला एक वेगळी दृष्टी दिली यात संशय नाही. शहराच्या वेगळ्या भागात, अनोळखी गल्लीत आयुष्य भलतीकडे गेलं असतं, पण सुदैवाने माझं तसं काही झालं नाही. त्याचं सगळं श्रेय तथाकथित समाज टपोरी म्हणतो त्या पण माणुसकीचं भान असलेल्या लोकांना! माझी आणि त्यांची वेगळी लाइन त्यांनी मान्य केली होती. शाळा, परीक्षा, मार्क, सगळं नीट सुरू होत त्यामुळे काडयापेटय़ांवरून आईबाबांची बोलणी अशी खाल्ली नव्हती. मित्रमैत्रिणींशी थोडीफार बाचाबाची वगळता तसं ठीक होतं सर्व. एकदा मात्र आई रागावली. नीटस आठवत नाही, पण एका हॉटेलात मोसंबीचा रस पिण्याचं निमित्त झालं असेल. कशामुळे तरी पोट बिघडलं होतं. वरून-खालून पार गळती लागली होती. पोटात पाण्याचा थेंबही राहिना. आई डॉक्टरांकडे घेऊन गेली. सलाइन लावण्याआधी मला दवाखान्यात शिरताना मी दाराशी एक माणूस बसला होता, हे पाहिलं होतं. त्याच्याकडे असलेल्या काडयापेटीची मला उत्सुकता होती. डॉक्टरांनी आत बोलावलं आणि काडयापेटी राहिली! आईला हे सांगितल्यावर आई जाम ओरडली होती. तब्येत बिघडलेली असताना हे बरं सुचतं! तिने सुनावलं होतं.
माझ्याकरता केलेली जागरणं आणि माझ्या तब्येतीचं तिला आलेलं टेन्शन मी आता समजू शकते. ते माझं दहावीचं वर्ष होतं. आजारपण थोडक्यात निभावणारं प्रकरण नव्हतं. नंतर रिपोर्टमध्ये समजलं की, कावीळ होती. पिवळा रंग जेव्हा दिसू लागतो तेव्हा तसा उशीर झालेला असतो. आजारपणात माझी सहामाही परीक्षा बुडाली होती. या कशाचा विचार न करता मला मात्र काडयापेटी दिसत होती, म्हटल्यावर तिचं चिडणं स्वाभाविकच होतं. आई रागावली म्हणून मी गप्प झाले होते. तो माणूस निघून गेला आणि काडयापेटी राहिली, हे मात्र मी मनात असंख्य वेळा म्हणाले होते. काडयापेटी मागे पडली पण मोसंबीच्या रसावर माझा राग अजूनही आहे. कोणत्याही जाहिरातीत, सीरियलमध्ये फळांचा रस दिसला की, मला ते सलाइन आणि कावीळ आठवते. फळांचा रस मी पीत नाही, असं नाही, पण मनात धाकधूक आहे ती कायमचीच.
मैत्रिणीशी बोलता बोलता आमच्या दहावीचा विषय निघाला. माझ्या मैत्रिणीला मी आजारी पडले होते ते आठवलं. परीक्षा बुडाली हे एका अर्थी बरंच झालं होतं. दहावीचा अनाठायी बाऊ केलेला होता याविषयी माझं आजही दुमत नाही. पण प्रत्येकाला त्या चक्रातून आणि चरकातून जावंच लागतं. आयुष्यातला एक महत्त्वाचा टप्पा इत्यादी म्हणायचं! बारावीनंतर मी दुस-या शहरात शिक्षणासाठी जाणार होते. दरम्यान नवी काडयापेटी बाजारात येणं, वा एखादं कव्हर माझ्याजवळ नसणं याचं प्रमाण खूप कमी झालं होतं. मी आठवणींच्या गठ्ठयापासून दूर व्हायचं ठरवलं. काडयापेटयाच्या कव्हरानं मला एक ओळख दिली होती. एक शॉर्ट टर्म म्हणून असं ध्येय दिलं होतं. एकमेकांची मदत करण्याचा वस्तुपाठ गिरवता आला होता. आता वेगळं काही करायचं होतं. एक दिवस एका स्नेह्यांच्या मुलाला मी सगळ्या काडयापेटया-कव्हर चिकटवलेल्या वह्या दिल्या. मी दुस-या शहरात आले. काडयापेटीचं कव्हर बघण्याची उत्सुकता पुढची दोन-चार वर्ष छळत राहिली. लायटर्स जास्त दिसू लागले. काडयापेटीभोवती ग्लॅमर तसं नव्हतंच. स्वयंपाकघरातही काडयापेटी शोधावी लागेल असा काळ आला. तरी अगदी अमेरिकेत आल्यावरही मी मामेभावाला दोन-चार नवी मॅचबॉक्सची कव्हर पाठवली होती.
असं म्हणतात की, आपली स्मरणशक्ती खूप असते. पण तिचा वापर मात्र आपण अतिशय निवडक प्रकारे करतो. जे फायद्याचं, जे आवश्यक तेवढं लक्षात ठेवण्याची सवय आपण लावून घेतो. मनाला त्रासदायक गोष्टी टाळण्याकडे आपला कल असतो. ते तब्येतीकरता चांगलंच असतं. तरी काही गोष्टी विसरता येत नाहीतच. अशा क्षणांची, गतकाळाची आठवण यायला, त्या आठवात रमायला तुम्ही ६० वर्षाचे असले पाहिजेत, असा नियम नाही. अगदी ४०चे असावेत, अशी अटही नाही. फक्त मागे वळून बघण्याची इच्छा आणि नव्याने पुढे आलेले क्षण स्वीकारायची तयारी असावी. हे वळून बघायचं ते दु:खी होण्याकरता नाही. नाईलाज म्हणून अनेक गोष्टी वर्तमानात स्वीकारतोच आपण! माग वळून बघायचं त्या क्षणाला हिमतीने आणि आनंदाने स्वीकारायला. माझी मैत्रीण भेटण्याचं निमित्त झालं. आठवणींमध्ये मिळालेली ऊब काडयापेटीच्या कव्हरातून पुन्हा समोर आली. कुणाला ती ऊब संगीतात मिळेल, कुणाला क्रिकेटच्या गप्पांत, कुणाला आवडत्या पदार्थाच्या कृतीत! हे सर्व क्षण महत्त्वाचे!