शंकर वैद्य - कालस्वराचे प्रतिभा दर्शन !

-श्रीरंजन आवटे
 
   कवीला मरण नसते. कवी कधीही मरत नाही. कवितेचे अमीट ठसे ज्यांनी आसमंतात उमटवले आहेत, त्यांना मरता येत नाही. सदैव जिवंत राहण्याचा ‘अभिशापच’ त्यांना असतो. शंकर वैद्य हे त्यातलेच एक होत !
 
शंकर वैद्यांनीच एका कवितेत म्हटल्याप्रमाणं
 
“हा असा पाउस पडत असताना
तुमच्यासारख्या अनोळखी तरूणीला विश्वासानं माझ्या छत्रीत यावंस वाटलं…. याचं बरं वाटलं..!!”
 
पावसात भिजलेल्या तरुणीप्रमाणेच मराठी रसिकताही त्यांच्या नितळ कवितेच्या छ्त्रीत विश्वासाने विसावली होती.  स्वरगंगेच्या काठावर दिलेल्या वचनाला जागणारा हा कवी साध्या सोप्या भाषेत मराठी रसिकांच्या हृदयात हात घालत होता. साधं सोपं लिहिणं ही सर्वाधिक कठीण गोष्ट असते.
 
It is simple to read. It is simple to write
It is simple to live ……..then what is difficult ?
Being simple is difficult !
 
ही साधं असण्याची कला कविवर्य शंकर वैद्य यांना साधली होती आणि म्हणूनच त्यांच्या संवेदनांचा अविष्कार अधिक तरल आहे. प्रासादिकतेच्या या वैशिष्ट्यामुळं अनेक वाचकांपर्यंत शंकर वैद्यांचे शब्द पोहोचले. सुरांची जोड मिळताच शब्दही सजले,धजले आणि मराठी रसिकांना खुणावू लागले. गीतकाराला कवींच्या मांदियाळीतून वगळणे आणि गीतकाराला कवीपेक्षा कमअस्सल समजणे या मराठी साहित्यातील वैशिष्ट्यपूर्ण गोष्टींमुळं शंकर वैद्यांकडे दुर्लक्ष झाले, हे खरं आहे.  या प्रकारच्या किरट्या दृष्टिकोनामुळं कवी/ गीतकार/कविता यांचा परिचय होण्यापासून देखील वाचक मुकतो.
 
या साहित्यबाह्य घटकांचा विचार न करता शंकर वैद्य लिहित राहिले आणि सुरांनी सजलेल्या वेशात भेटत राहिले.
 
 कवितेतला कवी आणि त्याचे वैयक्तिक आयुष्य यांचा सहसंबंध क्वचितच असतो;पण शंकर वैद्य मात्र याला अपवाद ठरतात. वैयक्तिक आयुष्यातही उदात्त जीवनमूल्यांची कास धरणारा हा गीतकार अत्यंत मिश्कील होता. त्यांच्या विनोदबुध्दीबद्दल कवी संतोष पवार यांनी सांगितलेला एक किस्साः लहान मुलांना मुळाक्षरं शिकवताना वैद्य सर म्हणाले-
 
क कसा क कसा ?
कंबरेवर हात विठोबा जसा  !
 
शंकर वैद्यांनी अनेक मुळाक्षराचे असे आकार बालगोपाळांकडून गिरवून घेतले. ख घ प अशी गम्मत करत शेवटी
 
ढ कसा ढ कसा
स्वत:लाच विचारा
नि गप्प बसा !
 
    दुसरा एक किस्सा पं हृदयनाथांनी सांगितला आहे. कुसुमाग्रजांच्या एका कवितेवर चर्चा सुरु असताना पं. हृदयनाथ मंगेशकर म्हणाले, "कुसुमाग्रजांचे "म्यानातून उसळे' हे गीत स्वरबद्ध करताना शिवशाहीर आणि वैद्य दोघेही उपस्थित होते. त्यामध्ये "तलवारीची पात' असा शब्द असल्याचे बाबासाहेब म्हणाले,  ‘तर’ हा शब्द "तरवारीची पात' असा असून, हा मूळ अरबी शब्द असल्याचे वैद्य यांनी सांगितले. एका मौलवीला विचारले तेव्हा त्यांनी "तरवारीचा' असाच शब्द असून, तो पार्शियन असल्याचे सांगितले. तेव्हा "त्यामधील र हे अक्षर अशक्त वाटते,' अशी टिप्पणी बाबासाहेबांनी केली. त्यावर वैद्य यांनी "ल हे अक्षर फतकल मारून बसल्यासारखे वाटते,' अशी कोटी केली.  पुण्यातल्या स.प महाविद्यालयात शिकल्याने खोडकर वृत्ती अंगात भिनली असल्याचे ते अनेकदा सांगत.
 
केशवसुतांच्या भाषेत घड्याळ अविरत वदत राहते- ‘आला क्षण गेला क्षण’ ! ‘आला क्षण गेला क्षण’ हाच तर नियम आहे इथला. याचा रिमाइन्डर लावला आहे घड्याळाने;पण साहिरने म्हटल्याप्रमाणे-
 
“मै हर एक पल का शायर हूं, हर पल मेरी कहानी है”
 
वैद्यांनीही आपले कवीपण त्यांच्या वाट्याला आलेल्या क्षणावर पिंपळपानांच्या नाजूक रेखांसारखे अलगद कोरले आहे. आज पार्थिवाने ते आपल्यासोबत नसले तरी हे या क्षणावर कोरले गेलेले पिंपळपान सदैव आपल्याला त्यांची आठवण करुन देत राहील आणि  या कालस्वराच्या प्रातिभ दर्शनाने आपण आजप्रमाणे उद्याही स्तिमित होत राहू !

 

About the Author

श्रीरंजन's picture
श्रीरंजन

शैक्षणिक पात्रताः 

फर्ग्युसन महाविद्यालयातून भौतिकशास्त्रात पदवी- 

  स.प महाविद्यालयातून पदव्युत्तर पदवी- राज्यशास्त्र 

  

परिचयः-

  • संपादक, पाखरांची शाळा ( बालकांसाठी्चे मासिक)
  • सल्लागार संपादक, सुंबरान (मासिक)
  • ‘कवितारती’, ‘अक्षर’, ‘परिवर्तनाचा वाटसरु’, ‘ऐसी अक्षरे’(ऑनलाइन दिवाळी अंक), ‘अनाहत’ ( इ-नियतकालिक) यामध्ये कविता प्रसिध्द
  •  दै.सकाळ,लोकमत,दिव्य मराठी,महाराष्ट्र टाइम्स, कृषीवल साप्ताहिक लोकप्रभा,कलमनामा, परिवर्तनाचा वाटसरु, ऐसी अक्षरे,’कलात्म’ मध्ये सामाजिक,राजकीय, साहित्यिक विषयांवरील लेख प्रसिध्द.
  •  ‘जागतिकीकरणाचे चित्रण करणारी कविता’ या विषयावरील राष्ट्रीय चर्चासत्र, मंचर पुणे येथे याच विषयावरील शोधनिबंधाचे वाचन. 
  • अनेक राज्यस्तरीय वक्तृत्व आणि वादविवाद स्पर्धांमध्ये यश संपादन