बहिष्कार- पन्ना नायक, अनुवाद- दिलीप चित्रे

बहिष्कार

"बहिष्कार" हा गुजराती भाषेतील महत्त्वाच्या कवयित्री पन्ना नायक यांच्या निवडक कवितांचा मराठी अनुवाद! पॉप्युलर प्रकाशनाने प्रकाशित केलेला आणि दिलीप चित्रे यांनी अनुवादित केलेला हा संग्रह आवर्जून नोंद घ्यावा असा आहे. 

चंद्रमोहन कुलकर्णी यांनी केलेल्या बोलक्या मुखपृष्ठापासून या संग्रहातला प्रत्येक शब्द वाचकाच्या मनात रेंगाळतो. गेली चार तपाहून अधिक काळ पन्नाबेन कविता लिहीत आहेत. वयाच्या ऐंशीव्या वर्षीही त्या सजगपणे, प्रगल्भपणे आणि निर्भयपणे शब्दातून जाणिव व्यक्त करतात. त्यांच्या सहा संग्रहातल्या वडक कवितांचा अनुवाद बहिष्कार या संग्रहात आहेत.त्या कविता वाचतांना रोजच्या जीवनातले प्रसंग वेगळे

परिमाण घेऊन समोर उभे राहतात.
...आणि मी मात्र
प्रत्येक वेळी संभोगानंतर
तुला लगेचच झोप लागते
.. आणि मी मात्र
माझ्या कधीही
जन्माला न येऊ शकणा-या
बाळाच्या विचाराने
कूस बदलत
दु:स्वप्नातच अडकून पडते.

 

त्यांच्या कवितांमध्ये भारतीय तसेच अनिवासी भारतीय कवींच्या कवितेत आढळ्णारे परदेशातील संदर्भ सहजपणे येतात.

लिफ्ट

“आपलं आयुष्य़
तळमजल्यावरून पाचव्या मजल्यावर
जाणा-या लिफ्टमधील
दोन अपरिचित व्यक्तींची टक्कर व्हावी
तसं.”

निसर्गवर्णन, प्रतिमा, परदेशातले वातावरण असे विविध शब्द आणि संदर्भ कवितांमध्ये आहेत.

चला, उठू या
सन-टॅन्ड झालेली दुपार
आता सकाळसारखी कोवळी राहिलेली नाही.

ती कविता नुसती स्मरणरंजन नाही. ती कविता जळजळीत आहे, आश्चर्यचकित करणारी आहे. तसेच विचार करायला लावणारी आहे. वेगळ्या प्रतिमा कवितेत प्रकर्षाने दिसतात.

त्या कवितेत आठवणींचे फक्त कढ नाहीत. तर त्या आठवांकडे, भूतकाळाकडे अलिप्तपणे, हळवे होऊन तसेच काही वेळा अतिशय कठोरपणे बघण्याची वृत्ती सुद्धा आहे.

माझ्या घरासमोर
माझ्या घरासमोर
माझा भूतकाळ
सिमेंटचा रस्ता होऊनच उभा ठाकलाय.

आजारपण, विरह, प्रेम, विभक्ती, मातृत्वहीनता, मृत्यू अशा भावना ही कविता समर्थपणे व्यक्त करते. पानगळ या कवितेत त्या म्हणतात,

माझ्या देहाची पानंसुद्धा
आता हिरव्याकडून पिवळ्याकडे,
थोडीशी लाल- तपकिरी होण्याकडे
झुकू लागली आहेत.

कधी कधी
जीवनाची पावलं धुळीनं माखू नयेत
म्हणून
कधी कधी मी मृत्यूला
माझं अंगण झाडतांना पाहते.
त्यांची कविता समाजातील स्त्री शोषण, दांभिकता, हिंदू संस्कृतीच्या पदराखाली दडून चालवलेली स्त्रीची उपेक्षा इत्यादी अनेक गोष्टींवर प्रहार करते.

स्त्रीस्वातंत्र्य
दोन पायांपैकी
कुठला पाय
उकळत्या पाण्यात बुडवायचा
आणि कुठला
बर्फाच्या ढिगा-यात
याचा
स्वतंत्र निर्णय घेण्याचा
दिलेला अधिकार
म्हणजेच स्त्रीस्वातंत्र्य.

या संग्रहातल्या विविध कवितांमधून पुरुषांच्या खोटारेडेपणाचे, अधिकारवाणीचे पुरावे ही कविता देते. हिंदू संस्कृती आणि मुलगा वा मुलगी दोघांना वाढवतांनाचा भेदभाव स्पष्टपणे ही कविता व्यक्त करते.

माझं शरीर
रोज रात्री
लग्नाचा कर वसूल करणारे
त्याचे ओठ
माझ्या ओठांमधील अमृत शोषून घेत आहेत.

गुजराती साहित्यात काय इतर भारतीय भाषांतही त्या काळात स्त्रियांनी थेटपणे अशाप्रकारची अभिव्यक्ती स्वीकारली नव्हती त्या काळात पन्नाबेन लिहीत होत्या.

याच कवितेत त्या पुढे लिहितात
नजरेनंच माझ्या शरीरावरची
सगळी वस्त्रं ओरबाडली जात आहेत
त्याचवेळी
देशोधडीला लागलेली
तुझी आठवण
माझ्या शयनगृहाचा बंद दरवाजा ठोठावते आहे.

छंदोबद्ध रचनेऐवजी त्यांची कविता मुक्तछंदात आहे. ती लय नाद आणि रस-रूप-गंध-स्पर्श अशा विविध संवेदनातून फुलते. आपल्या बदललेल्या आयुष्य़ाचे, जीवनमानाचे परिणाम अधोरेखित करते.

अनिवासी भारतीयांच्या दांभिकतेचे, श्रीमंतीचे, अनिश्चितता, असुरक्षितता आणि भयाने पछाडलेल्या स्वभावाचे नेमके वर्णन काही कवितांमध्ये येते.या कविता जणु डोळ्यात घातलेले अंजन आहे.

मित्राच्या सत्तराव्या वाढदिवशी  या कवितेत त्या म्हणतात,”

त्याच कंटाळवाण्या गप्पा होत्या.
तेच फालतू विनोद होते.
तीच कृत्रिम हसणी होती...

तेच "वी हॅव मेड इट" चे अहंकार होते.

..

एका हातात दारूचा ग्लास आणि
दुस-या हाताने शेंगदाणे फाकता फाकता
इंडियासाठी आपण काही करायला हवं
अशी अपराधीपणाची भावनाही होती.

पन्नाबेन यांच्या काही कवितांवर विशिष्ट कालखंडाची मोहोर, ठराविक काळाचे संदर्भ आहेत. तसे असले तरी त्यात व्यक्त झालेली भावना मात्र कोणत्याही काळात वाचकाला स्वत:शी जोडता येईल  अशी आहे.

नातं

कोणा उपाशी होमलेस अमेरिकन माणसाने
शुक्रवारी घराबाहेर ठेवलेला
ट्रॅशकॅन उपसावा त्याप्रमाणे
शनि-रविवारी
एक भारतीय
दुस-या भारतीयाच्या घरी
काश्मिरी गालिच्यावर ठेवलेल्या
पारदर्शक काचेच्या
टेबलावर
आकर्षक बोल्समध्ये
काठोकाठ भरलेले
बदाम..काजू..पिस्ते
यात
शोधत असतो
एकदुस-याशी जडलेलं
नातंच!

या कवितेत आत्मशोध आहे. या कवितेत तडफ आहे. पण अनुभव हा केवळ व्यक्तिगत न राहता तो सार्वत्रिक होतो हे या कवितांचे खरे यश आहे.

हा संग्रह वाचला तर पारंपरिक गुजराती समाजाच्या सर्व संकल्पनाच पन्नाबेनच्या कवितेने मुळापासून ढवळून काढल्या, उखडून टाकल्या असे वाटते.

दिलीप चित्रे यांनी केलेला अनुवाद वाचतांना या कविता इतर भाषेतून मराठीत आल्या आहेत हे जाणवत नाही. त्या अनुवादित आहेत असे वाटत नाही इतके हे लेखन ओघवते आणि सहज आहे, कुठेही भाषिक कसरत करावी लागली आहे असे जाणवत नाही.

मराठी कवितांमध्ये धीट कविता, स्त्रीवादी कविता यांची अनेक उदाहरणे आहेत. प्रामाणिक अशी आणि भीती न बाळगणारी ही कविता मराठी वाचकांना अवश्य वाचावी अशीच आहे.

-सोनाली जोशी

About the Author

सोनाली's picture
सोनाली

मिळून सा-याजणी, मेनका , रोहिणी, अक्षर मासिकातून लेखन प्रसिद्ध.

लोकमत, लोकसत्ता, सकाळ, मटा या पेपरातून कविता, लेख 

शक्यतेच्या परिघावरून कविता संग्रह