
एखादी गोष्ट जाळून किंवा जळून जी राख उरते ती मला कायम एक संकल्पना वाटत आलेली आहे वा एखादी संज्ञा; अनेक पैलू असलेली, अनेक आयाम असलेली. म्हणजे सगळं काही संपून पण ती उरलीये जी व्यक्ती सापेक्ष आहे, जी वस्तू सापेक आहे. राख ती एकच. पण ज्या गोष्टीचं, ज्या भौतिक अस्तित्वाचं रुपांतर त्या राखेत झालेलं आहे तिचं स्वभाव वैशिष्ट्य आपसूकच त्या राखेला मिळतं. मानवी देहाचं दहन होऊन जी राख उरते त्या राखेल त्या देहाचे सगळे स्वभाव विशेष लागणारच. उदबत्ती जळून जी राख उरते ती आपण अंगारा म्हणून लावतो, लाकूड जळून जी राख उरते तिच्याकडे त्या दृष्टीने नाही बघत आपण. याचाच अर्थ राखेमध्ये कुणाचं अस्तित्त्व उरलेलं आहे फार महत्व आहे. जेव्हा लौकिक अर्थाने एखाद्या गोष्टीचा किंवा व्यक्तीचा क्षय होतो तेव्हा तो झाल्यानंतर जे उरते ते रूपक म्हणजे ' राख '
अश्या या राखेनं किती ऋतू बघितले असतील नाही? किंवा आपण असं म्हणूयात की या राखेत आपल्याला किती वेगळे संदर्भ बघायला मिळतील. कित्येक वेगळ्या परिवर्तनाची बीजे या राखेत गवसतील कारण त्या राखेची निर्मितीच दहनाने झालेली आहे. म्हणजेच निर्मितीच्या किती वेणा आपल्याला राखेत अनुभवायला मिळतील असं मला वाटत. कधी त्या राखेत संदर्भाविना नुसतंच जळणं बघायला मिळेल तर काही वेळेला राखेत आपल्याला जाणवेल कुठल्याश्या पराभवाचं शल्य. एखादे वेळी राखेत आपल्याला कुण्या एकाच्या आयुष्याच्या अस्तित्वाचं दहन झालेलं झालेलं दिसतं तर काही वेळेला एखाद्या राखेत जिद्द असल्याची पण जाणीव होते. जेव्हा सगळं काही संपून सुद्धा राखेल जाणिवांचे कोब फुलायला लागतात तेव्हा त्या राखेतून एक नवीन आयुष्य, नवीन अस्तित्व, नवा विचार, नवी धारणा जन्म घेते. मला वाटतं तेव्हा त्या राखेला पण स्वतःची धन्यता वाटतं असणार. म्हणजे निर्मिती प्रक्रिया जी आपण म्हणतो ती किती अगाध आहे याची जाणीव होते. सगळं काही नष्ट होऊन सुद्धा त्या विनाशातून नवनिर्मितीची प्रेरणा आकार घेऊ लागणे हा असा जर त्या राखेच आत्मा असेल तर तो खचितच अमर म्हणायला हवा.
आपण जेव्हा अस्थी पाण्यात विसर्जित करतो तेव्हा त्या मागची मला जाणवलेली धारणा अशी की तो जो देह होता ज्याच्या अस्तित्वाचं ती राख प्रतीक आहे. ती जेव्हा पाण्यावर सोडली जाते तेव्हा त्या अस्तित्वाचा जो विचार होता त्याला आपण प्रवाहित करतो.म्हणजेच तो विचार आपण मुक्त करतो. याचाच अर्थ त्यामुळे राख ही भौतिक अर्थाने फक्त राख न वाटता तो एक विचार वाटायला लागते. त्या विचाराची प्रत्येक वेळेची परिभाषा वेगळी आहे. कारण त्यामागची अस्तित्वाची संकल्पना निरनिराळी आहे . त्यामुळे जाळून किंवा जळून उरते ती फक्त ' राख ' असं न वाटता नवनिर्मितीची अनुभूती मला त्यात जाणवते .