कलाकार आणि त्याची कला

कलाकार आणि कला यांच्यातलं नातं फार सुंदर आहे. अव्यक्त आणि अश्राप. प्रकृती जेव्हा कलाकाराला कलेनी तिचा प्राकृतिक शृंगार करायला सांगते ना तेव्हा कलाकार आणि कला त्यांच्यात खरं मनोमिलन होत असत. तो एक संवाद असतो, मूक संवाद, त्या दोघांमध्ये. लेखनकला , चित्रकला,संगीत, नृत्य, वादन आणि अश्या कितीतरी कलांद्वारे जेव्हा प्रकृतीला व्यक्त करायचं असतं तेव्हा कलाकर आणि कला त्याच्यातलं गूज म्हणजे ती प्रतिभा बहराला येणं. हा सर्व संवाद बाहेरच्या जगासाठी अव्यक्त असतो.
समोर काही तरी दिसलं आणि त्या नुसत्या दिसण्यातून जर भावनेला साद घातली तेव्हा भावनेच्या द्वारे मग लेखन प्रक्रिया सुरु होते. कविता स्फुरत असताना प्रथम त्या आशयाच्या, विषयाच्या ज्या भावना असतात त्या मनाच्या दारातून डोकावतात. तेव्हा आपण काहीच न बोलता काय चाललय ते मनातून बघत राहायचं. मग ती भावना आली की तिच्या पाठोपाठ शब्द येतात आणि मग त्यांच्यात संवाद सुरु होतो ते सगळं बघणं फार सुंदर असतं.
 
 एकदा भावना बोलती झाली ना की मग कसं सगळं अलवार घडत जातं, मुद्दाम ठरवून काही करायला लागत नाही, लागत नाही म्हणण्यापेक्षा मुद्दाम काही करतच येत नाही. भावना आणि शब्द यांच्यातला संवाद ऐकण्यासारखा असतो. शांतपणे बसून ऐकण्यासारखा. आपल्याला फक्त तेव्हडीच परवानगी असते. जसजसा संवाद घडत जातो तसतसे ते शब्द आकार घेऊ लागतात. एखादा गोफ विणला जातोय असं वाटतं, अप्रतिम वीण घातली जाते, एकातून दुसरी, दुसरीतून तिसरी आणि मग तो गोफ पूर्ण होतो. ते एक लेणं असतं. 
चित्रकार जेव्हा चित्र काढायला घेतो तेव्हा पण तो त्याच्या रंगांना भावनेच्या सान्निध्यात सोडून देतो आणि मग त्यांचा मिलाफ म्हणजे समोर दिसणारी कलाकृती, अजरामर कलाकृती. 
कलाकार आपली कला सगळ्यांसमोर सदर करत असताना जरी भौतिक अर्थानी समोर दिसत असेल पण मनातून केव्हाच त्यांनी स्वतःला त्या कलेच्या स्वाधीन केलेलं असतं. जिथं समर्पण येत ना तिथं त्या समर्पणातून जी अनुभूती येते ती अलौकिक असते. तिची प्रचिती फार विलक्षण असते. देवासमोर बसून आपण जेव्हा हात जोडतो तेव्हा काही वेळेला आपण देवाकडे नुसते बघत असतो आणि डोळ्यातून अचानक धारा वाहायला लागतात. आपण आतून कुठेतरी देवाशी संवाद साधलेला असतो आणि त्या संवादातून उमलेला हुंकार म्हणून ते अश्रू असतात. 

सगळ्यात मोठा कलाकार म्हणजे निसर्ग. फुलंपान , पक्षी , पाणी , हवा , दगड , माती अश्या कितीतरी त्याच्या कला. त्यांच्यातला संवाद काय सुंदर असतो . सूर्य उगवताना किंवा मावळताना क्षितीजावर उमटणारे रंग ही त्यांच्यातल्या संवादाचीच परिणीती. झाडाला आलेली कळी, पक्षांनी घातलेली साद, समुद्राच्या लाटांची गाज, विजेची लकाकी, ढगांचा गडगडाट, फुलांमधले सुगंध, पाण्याचा खळखळ आवाज हे सगळे संवाद आहेत असं वाटतं, निसर्ग नावाच्या कलाकारानी त्याच्या कलांशी साधलेले संवाद. 
कला कुठलीही असो जेव्हा कलाकार त्या कलेपुढे नतमस्तक होऊन समर्पित होतो तेव्हा त्या कलेची पूजा घडते. मग कधी ती शब्दांची फुलं वाहून ती पूजा केली जाते, कधी रंगांची उधळण करून ,कधी घुंघरांच्या आवाजात आणि कधीकधी वाद्यांच्या तालात. या पूजेतून साकार झालेली अभिव्यक्ती विलक्षण असते, अलौकिक असते.

About the Author

अभिरुची's picture
अभिरुची
नाव : अभिरुची रमेश ज्ञाते 
शिक्षण : MSc Comp Sci
नोकरी : लेक्चरर ( इंजिनिअरिंग आणि डिप्लोमा ला Microprocessor , electronics , computer science शिकवते )
आवड : कविता लेखन , ललित लेखन करते . शास्त्रीय संगीताची आवड आहे . पेन्सिल स्केचिंग करायला आवडतं . 
ठिकाण  : पुणे