समाज

समाज काय म्हणेल या गोष्टीला आपल्याकडे फार महत्त्व दिलं जातं ...

जेव्हा स्वतःसाठी काही करायला आपण जातो ना म्हणजे अगदी स्वतःसाठी जगण्याचा विचार जरी करत असू तेव्हा कित्येकांच्या मनात हा प्रश्न आल्याशिवाय रहात नाही ' समाज काय म्हणेल?म्हणजे स्वतःसाठीचे कुठलेही निर्णय घेण्यासाठी आपल्याला समाज नावाच्या सर्वोच्च न्यायालयाहून देखील वरती असणाऱ्या संघटनेकडे डोळे लावून बसावे लागते. आपल्या एकंदरीतच सगळ्या विचारसरणीवर समाजाचं गारुड आहे.… नव्हे ते घातलं गेलंय आपल्यावर. आपण या समाजाचं देणं लागतो, आपला समाज आपल्याला सामावून घेतो म्हणून अशी कारणे त्याकरता दिली जातात.पण समाज म्हणजे कोण आहे? आपल्यासारख्या लोकांनीच समाज तयार होतो. मग आपल्या जगण्याचे दाखले आपण त्याच्याकडून का घ्यायचे?प्रत्येक गोष्टीभोवती एक चौकट आखली गेलीये आणि ती गोष्ट तशी त्या चौकटीत राहूनच झाली पाहिजे असा नियम लोकांनी म्हणजे पर्यायानी आपणच बनवला. त्यामुळे जेव्हा त्या चौकटीच्या बाहेरचा विचार केला जातो तेव्हा मग ते सगळंच अब्रम्हण्याम.
जे लोक या चौकटीत राहून विचार करतात ते समाजात राहण्याच्या लायक आणि जे नाही करत ते नालायक अशी अगदी फार सरळ आणि सोपी व्याख्या तथाकथित समाज सुधारकांनी केलेली आहे.
 पण जेव्हा अश्या कुठल्याही बंधनात, चौकटीत स्वतःला न बांधून घेणारे लोक जेव्हा काही वेगळे म्हणजेच ठराविक पठडीतले निर्णय घेत नाहीत तेव्हा त्याच्याकडे सामाजिक दृष्टीने गुन्हेगाराच्या नजरेनीच बघितले जाते. उदाहरणार्थ जर काही कारणांनी नवरा बायकोत वितुष्ट येत असेल तर कित्येक बायका फक्त समाज काय म्हणेल या एका भीतीपोटी नवऱ्याबरोबर आयुष्यभर राहतात आणि संपूर्ण आयुष्य नरक करून टाकतात. समाजाची इतकी जरब का असावी? आपण इतक्या नरकयातना आपण भोगतोय तेव्हा समाज आपल्या मदतीला येत नाही हा विचारही त्या स्त्रीच्या मनात येत नाही. सुटका करून द्यायला वा मदतीलाही समाज नसतो. सुटका सोडाच पण ती बाई जिवंत आहे की मेलीये याचं कुणाला देणघेण नसत. म्हणजे तश्या त्या संसारात राहून एक वेळ मरण जरी आले तरी चालेल पण तो संसार तिथे त्यागता कामा नये असा विचार समाजात पक्का भिनला आहे. संसार मोडण्याची आपल्याकडे तशी परवानगी नाही. म्हणजे समाजानी ती दिलेली नाहीये. स्वतःचे सुख ठरवण्याचा अधिकार जेव्हा इतर लोकांकडे दिला जातो ना खरतर तिथे सामाजिक अधःपतनाची सुरुवात होते. स्वतःला काय हवंय हे ठरवण्याचा अधिकार आपण आपल्याकडेच ठेवायला नको का?त्यावर कुणीही येउन अधिकार सांगून जायला ही कुठली सामाजिक जबाबदारी? जर एखादी स्त्री एकटी रहात असेल, मग कुठल्याही कारणाने असो तर त्या स्त्रीकडे बघण्याचा सामजिक दृष्टीकोन अतिशय हीन असतो. म्हणजे कुणी बाई अशी एकटी राहूच कशी शकते? कुठल्याही पुरुषाची मदत न घेता? तिचं ते तसं राहणं सगळ्यांचाच डोळ्यात खुपत राहतं .

सामाजिक विचारसरणीत बदल होतं नाहीये असं मी अजिबातच म्हणणार नाही. पण ते फार अपुरं आहे. म्हंणजे मग त्या दृष्टीने विचार करायला गेलं तर त्या बाबतीत आपला समाज फार काळाच्या फार मागे आहे असं म्हणाव लागेल. या काही दशकात आपल्याकडे प्रेम विवाहांना संमती मिळायला लागली आहे. पण प्रेमविवाहापायी  अजूनही जीव घेतले जातात हे सुद्धा आढळतेच.

हे चाललय ते अतिशय चुकीचं चाललंय आणि ते बदलण्याची नितांत गरज आहे हे फार कमी लोकांना वाटतं. सगळ्यांना ही जाणीव होतं नाही हीच खरी शोकांतिका आहे. त्या चौकटीच्या बाहेर पडून काही वेगळे करू पाहण्याची लोकांमध्ये हिम्मत नाही हे सुद्धा ओघानं आलच. हे सगळे बदलायला हवेच आहे त्याशिवाय आपल्याभोवतीची दुषित हवा शुद्ध होणार नाही. सगळ्यांचेच जीव या अश्या सामाजिक अशुद्ध हवेत गुदमरून जातील .... 

About the Author

अभिरुची's picture
अभिरुची
नाव : अभिरुची रमेश ज्ञाते 
शिक्षण : MSc Comp Sci
नोकरी : लेक्चरर ( इंजिनिअरिंग आणि डिप्लोमा ला Microprocessor , electronics , computer science शिकवते )
आवड : कविता लेखन , ललित लेखन करते . शास्त्रीय संगीताची आवड आहे . पेन्सिल स्केचिंग करायला आवडतं . 
ठिकाण  : पुणे