आणि मला तर माझ्या बायकोवर प्रेम करायचंय !

“क्षणोक्षणी स्फोट वाढत होते. काळ्याकुट्ट अस्वल्या ढगांनी आकाशाला आकाशातूनच हद्दपार केलं होतं. चंद्र तर कधीचाच त्यांच्या लोहमुठीत चिरडला गेला होता. आता आकाशात आग ओकणा-या विमानांची नुसती रेलचेल होती. माझ्या आजूबाजूची झाडं कुठे जळत होती, तर कुठे उन्मळून पडली होती. खेळाच्या मैदानासभोवताली प्रेक्षागृह बांधलं गेलं होतं आणि तिथे कमी कपड्यांतल्या बाया नाचवत होते……”

 

                     नुकतंच लग्न झालं होतं. निवांत सुट्टी टाकून मी नव्या-नवेल्या बायकोसह या टुमदार शहरात आलो होतो. असंख्य छोट्यामोठ्या टेकड्यांवर मिळून वसलेलं हे शहर आणि चहूबाजूला नजर जाईल तिथवर हिरवीगार आणि शिखराला बर्फाच्छादित शिखरं... हॉटेलात सामान टाकून आम्ही ह्या शहरातल्या लोकांसारखेच साध्याच कापडाचे;पण उत्तम कलाकुसरीचे कपडे घालून तयार झालो आणि फिरायला बाहेर पडलो. एकमेकांच्या हातात हात घालून आम्ही भटकत होतो. टेकड्यांचे उतार चढाव लक्षात घेऊन बांधलेले दगडी रस्ते. दोन्ही बाजूला छोटीशी गटारं. गटारं? छे, त्यातून वाहणारं पाणी तर स्वच्छ चमकत होतं! पूर्ण दगडी बांधणीच्या शहरात अनेक जागा मोकळ्या सोडलेल्या. कुठे खेळायला पक्की मैदानं तर कुठे शांतपणे लोळत आकाशाशी प्रश्नोत्तरे करावीत अशा हिरव्यागार बागा. शहराच्या मध्यभागी एक विस्तीर्ण चौक होता. आणि चौकाच्या मध्यभागी एक सुंदर कारंजं! अनेकजण तर कारंज्याबाजूला उभं राहून त्याच्या उडणार्‍या तुषारात सचैल न्हात होते, कुणीतर चक्क ते पाणी पीत ही होते. पण कुठेच गोंधळ नाही अन्‌ गजबज नाही. होती ती निव्वळ निसर्गाशी एकरूप माणसांच्या हालचालीची गाज. चित्रातला देखावा वाटावा असं ते कारंजं पाहून आम्ही दोघंही हरखलोच. आमचे हात हातात नकळत अजूनच घट्ट झाले. अंगठीची बोटावर खूण यावी अशी बांधल्यासारखी बोटं एकमेकांत गुंफली गेली. आणि आजूबाजूच्या बाजारपेठेकडे चक्क दुर्लक्ष करत आम्हीही त्या तुषारांत हरवून गेलो.

पण काही क्षणच... जमीन विचित्र थरथरू लागली. ती थरथर काही क्षणातच टिपेला पोचली. कारंज्यातला मनोरा निखळून वाकडा झाला आणि आकाशात सूर्य असतानाही डोळे दिपवणारा एक प्रचंड प्रकाशाचा पुंजका पलिकडल्या दरीत चमकला. कान करपून गळून पडतील की काय अशी भिती वाटावी,असा उच्च पट्टीतला आवाज आमच्यावर लगोलग येऊन आदळला आणि एक काळाकुट्ट अस्वल्या ढग निरीच्छ डुगडुगत दरीतून आकाशगामी झाला. आता माणसांची निवांत गजबज, गाज; शुद्ध गोंधळ झाली होती. त्रेधा उडाली होती सर्वांचीच पार. ह्या अकल्पित घटनेने शहराचं रुपडं पालटून गेलं होतं. शांतता जाऊन सगळी अनागोंदी माजली होती. बायको खूपच घाबरली होती. अगदी गप्प झाली होती. तिला घेऊन पुन्हा हॉटेलवर निघालो. वाटेत पुन्हा तेच खेळण्यासाठीचं मैदान लागलं तिथे कुणातरी नेत्याची पोस्टर्स लावली गेली होती आणि स्टेज उभारणं चालू होतं. बॅडमिंटनच्या तुटक्या रॅकेटला कुणीतरी झाडावर लटकावून दिली होती. तिचे घड्याळाच्या लंबकाप्रमाणे झोके चालू होते. आम्ही पुढे निघालो. हॉटेलवर आलो खरा पण मला माझी उत्सुकता शांत बसू देईना. बायकोला रूमवर जाऊन आराम करायला सांगितलं आणि मी बाहेर पडलो.

कारंज्याकडे न जाता मी आता दुसरीच दिशा पकडली. इथे लोकांचा फार ओघ नव्हता. स्फोटाचा तो आवाज अजूनही कानात घुमत होता. त्यामुळेच की काय आजूबाजूची अरण्यशांतता डाचत होती. गटारांचं पाणीसुद्धा, उगाचच वाटलं असेल, पण गढूळलेलं दिसलं. आता उतार लागला. त्यावरून धावत खाली उतरलो तर थोडी पसरट समतल जागा होती. इथपासून पुढे रस्ता मातीचाच होता. इथूनच पुढे ती दरी असावी असा मी कयास बांधला. वरून दोनचार विमानं गेली. पुढून दोनचार विमानं आली. आगीचे लोळ एकमेकांवर फेकले. खूप चित्रविचित्र यांत्रिक आवाजांचे आकाशावर ओरखडे ओढत ती कुठेतरी दिसेनाशी झाली. मागे एका टेकडीवर एक उंचसा मनोरा बांधला होता. त्यावर एक जुनी वाटावी अशी एक आकाशदर्शनाची दुर्बिण होती. तिकडूनच बहुधा लहान लहान मुलांचे हसण्या खिदळण्याचे आवाज येत होते. मी तिकडे पळालो. एका दमात मनोरा चढून गच्चीवर पोचलो. तिथूनच उभ्या उभ्या त्यांचं निरागस हसणं, खिदळणं, खेळणं पाहू लागलो. उदाहरणार्थ कुणी गोरीगोमटी, नाकेली, घार्‍या डोळ्यांची मुलगी बसक्या नाकाच्या, बटबटीत डोळ्यांच्या, काळ्याकुट्ट मुलाच्या खांद्यावर हात टाकून जोडीनं बडबडगीत म्हणत होती. कुणी घरात चिंचपानाची पोळी आणि करवंदांची आमटी करून इवल्याशा ताटल्यांतून सगळ्यांना वाढत होती. त्यांचं असं एकमेकांत, निसर्गात गुंतणं फार लोभस होती. मग मी ही मूल झालो आणि त्यांच्यात जाऊन बसलो. त्या चिंचपानाच्या पोळीतला एक घास तोडून मग तो करवंदाच्या आमटीत बडवून मग बत्तीस वेळा चावून खाण्यात किती किती मजा आहे की काय सांगू!

पुन्हा तेवढ्यात तीच थरथर... मनोरा तुटून पडतो की काय असंच वाटू लागलं. थरथर टिपेला पोचली तेव्हा पुन्हा एकदा तो कान करपवणारा आवाज आमच्यावर येऊन आदळला. मग मात्र माझं पोरपण फार काळ टिकलं नाही. मी सगळ्या मुलांचं कोंडाळं करून त्यांच्याभोवती माझ्या हातांचं कडं केलं. एक काळाकुट्ट अस्वल्या ढग निरीच्छ डुगडुगत दरीतून आकाशगामी होत होता. थोड्या वेळानं ती गोरी मुलगी म्हणाली, "काका एवढे मोठे होऊन तुम्ही घाबरलात? देवकाका मुद्दामूनच फोडतात असे दिवे घातलेले फुगे; आपल्याला घाबरवायला; पण आम्ही नाही घाबरत. आम्ही शूर आणि शहाणी मुले आहोत.". असं म्हणून एक करवंद त्या आंबट चिंबट चिंचपानांसोबत मला दिलं. मी घेतलं नाहीच तर आल्या पावली परत फिरलो. कुणातरी द्रष्ट्या आकाशनिरीक्षकाला तार्‍यांची सैर जिने कधी काळी घडवून आणली असेल त्या दुर्बिणीचा मात्र रद्दी ढीग झाला होता. हिरव्यागार जमिनीवर त्या दूरगामी काचा असंख्य ठिकाणी रुतल्या होत्या. आता असे बारिकसारीक फुगे जवळपास प्रत्येक डोंगरामागून फुटत होते. दरवेळेस शहराबाजूचं अरण्य काळं पडत चाललं होतं. मी झपाट्याने शहराच्या वरच्या भागाकडे निघालो. आता दगडी रस्त्यांमधून भेगा पडत होत्या. वेडेवाकडे निघालेले दगड पायांना काचत होते. मी वर आलो खरा पण त्या कारंज्याकडे जायची मला भितीच वाटली. न जाणो त्या कारंज्याची कशी अवस्था झाली असेल. काही वेळापूर्वी ज्याच्या थुईथुई तुषारांत आम्ही प्रेमालाप करत होतो त्याची उध्वस्त अवस्था माझ्याच्याने नक्कीच बघितली जाणार नव्हती. आजूबाजूच्या अरण्यप्रदेशात जागोजागी वणवे पेटले होते. वणव्यांच्या काळ्याकुट्ट धुराने आकाश काळं पडत चाललं होतं. त्या दिवशीच्या सूर्यास्ताला आकाश रंगीत झालं नाही. फक्त भग्न होत काळं काळं विझत गेलं.

असल्या ह्या घाणेरड्या प्रदूषणाने माझे डोळे चुरचुरायला लागले. च्यायला शांतपणे हनीमूनला एखाद्या टूरिस्ट स्पॉटवर जावं तरी साली हीच गर्दी, हाच गोंधळ आणि हेच प्रदूषण. अचानक मागून घोषणांचे आवाज आले. मागच्या दोन रस्त्यांवरून पांढर्‍या कपड्यांतली आणि सोन्याचांदीत मढलेली अनेक लोकं हातात रंगीबेरंगी झेंडे घेऊन त्यांच्या नेत्यांचा जयजयकार करत येत होती. माझ्यासमोरच्या चौकात दोन्ही मोर्चे एकत्र आले. मोर्च्यातली पुढली सोन्याचांदीत मढलेली माणसं मग अचानक गायब झाली; झेंडे पायदळी तुडवले गेले आणि गटारांतलं आधीच गढूळलेलं पाणी लाल होऊन वाहू लागलं... मी जिवाच्या आकांताने तिकडून पळालो. कुठे पळालो, किती वेळ पळत होतो, कसा पळालो काही कळलं नाही. उडणारा श्वास जमिनीवर आला तसं परिस्थितीचं भान आलं. बारीकशी अंधारी गल्ली होती. कचर्‍याचा सडका वास भरून राहिला होता. आजूबाजूच्या अंधाराचा प्रभाव म्हणून असेल पण इकडे शांतता जाणवत होती. मी थोडा सैलावलो. बायकोच्या आठवणीने एकदम कससंच होऊ लागलं. अंधारात कुठूनतरी तिचा स्पर्श व्हावा असं वाटू लागलं. पण त्या सडक्या वासानं वैतागलो च्यामारी. वाटेत आलेल्या दारूच्या कॅनला लाथ घातली आणि तिथून निघालो. आता समोर अजून एक मनोरा आला. पण ह्या मनोर्‍यावर मात्र खेळणारी लहान मुलं नव्हती. तर होता एक वेडा. मधेच उकिडवा बसे. मधेच उठून नाचे. त्याने इथल्या लोकांसारखेच साधेसुधे ढगळ कपडे घातले होते. पण एक फरक मात्र होता, त्याला कपड्यांवर उत्तम कलाकुसर करवून घ्यायला वेळ मिळाला नव्हता. त्याने दाढी वाढवली होती आणि हिरव्या नोटांचा पटका बांधून त्याचे घाणेरडे उद्योग चालू होते. त्याने दिवे घातलेले फुगे फोडून फोडून समोरच्या डोंगरावरचा सगळा बर्फ वितळवला. मग जेव्हा डोंगराच्या पायथ्याचं गाव बर्फाच्या थंड पाण्यात वाहून गेलं तेव्हा तो जाऊन पुन्हा उकिडवा बसला. ह्या काळवंडलेल्या आकाशाकडे कसली करूणा भाकत होता देव जाणे. अवघ्या काही क्षणात झालेल्या त्या गावाच्या वाताहतीने मी मुळापासून हादरलो. मी हॉटेलच्या दिशेने पळत सुटलो. मला कसंही करून माझ्या बायकोला भेटायचं होतं.

क्षणोक्षणी स्फोट वाढत होते. काळ्याकुट्ट अस्वल्या ढगांनी आकाशाला आकाशातूनच हद्दपार केलं होतं. चंद्र तर कधीचाच त्यांच्या लोहमुठीत चिरडला गेला होता. आता आकाशात आग ओकणा-या विमानांची नुसती रेलचेल होती. माझ्या आजूबाजूची झाडं कुठे जळत होती, तर कुठे उन्मळून पडली होती. खेळाच्या मैदानासभोवताली प्रेक्षागृह बांधलं गेलं होतं आणि तिथे कमी कपड्यांतल्या बाया नाचवत होते.

माझे पाय रक्ताळलेत, कपडे फाटलेत. शुद्ध कधीही हरपेल आता माझी. एका तुटक्या झाडाच्या बुंध्याशी तरी बसावं म्हणतो आता. मगाचचा तो बॅडमिंटन रॅकेटचा लंबक आता थांबलाय. कदाचित कायमचाच? जमीन आता पुन्हा थरथरतेय. ह्यावेळेस जरा जास्तच. अजून एक स्फोट आणि आख्खी पृथ्वीच फेकली जाईल तिच्या परिवलन कक्षेबाहेर. आणि पुन्हा एक कान करपवणारा तीव्र आवाज आणि हा काळाकुट्ट अस्वल्या ढग कारंज्यातून आकाशगामी होतोय. मला बायकोला भेटायचंय..... ..आणि मला तर माझ्या बायकोवर प्रेम करायचंय !

-आल्हाद महाबळ
alhad.mahabal@gmail.com

Category: 

About the Author

आल्हाद's picture
आल्हाद

 उत्तम फोटोग्राफी करणारा आल्हाद हा तरुण आश्वासक लेखक आहे.