देशातील जातीय सलोखा : महत्त्व, गरज आणि आवश्यकता

 देशातील जातीय सलोखा : महत्त्व, गरज आणि आवश्यकता
- बी. राजेश मीरा 

 

 

नुकतेच बडोदा आणि दिल्लीमध्ये धार्मिक दंगे झाले. उत्तर प्रदेशमध्ये पोटनिवडणुकांच्या आधी ६०० हून अधिक  दंगे अवघ्या २ महिन्यात घडले. लव्ह जिहादच्या मुद्द्यावरुन जाणीवपूर्वक हिंदू मुस्लीम तणाव वाढवण्याचा प्रयत्न समाजविघातक शक्तींनी केला. या  सा-या पार्श्वभूमीवर जातीय सलोख्याविषयी बी राजेश मीरा या तरुणाने केलेले हे चिंतन

------

प्रस्तुत विषयाचा अभ्यास करत असताना, जातीय सलोखा बिघडवणा-या घटना व त्यामागची सामाजिक, राजकीय,सांस्कृतिक, ऐतिहासिक, आणि आर्थिक व त्यासंबंधीची  कारणमीमांसा करणे अधिक  गरजेचे वाटते. जगातील अतिशय मोजक्याच प्राचीन संस्कृतींमध्ये भारतीय संस्कृतीचा समावेश होतो. १८ व्या शतकाच्या पूर्वार्धापर्यंतचा कालखंड आपण बघितला असता. एक गोष्टस्पष्टपणे जाणवते. राजेशाही व धार्मिक सत्तेचा प्रमुख हा राजा असे व संस्कृतीरक्षणाची जबाबदारी त्याच्यावर असे. बहुतांश भारतीय राजे किंवा सेनानी हे शांततेचे अग्रदूतही राहिलेले आहेत. सम्राट अशोकापासून अकबरापर्यंत आणि सम्राट हर्षवर्धनापासून छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंत राजांनी युध्दापेक्षा लोककल्याणावर अधिक भर दिला. या काळामध्ये राजा कोणत्याही जाती-धर्माचा असला तरीही सर्व प्रजा आनंदाने राहू शकत होती आणि केवळ त्याचमुळे भारतीय संस्कृतीची ओळख जगाला ‘अहिंसक आणि ‘सहिष्णू’ संस्कृती’ अशीच आहे. भारतीय पुराण आणि साहित्यामध्ये देखील असे अनेक संदर्भ आपल्याला मिळतात.-

“अयं निजः परो वेती गुणना लघुचेतसाम /

उदारचरितानां तु वसुधैव कुटुम्बकम //”

म्हणजेच, हा माझा, तो दुस-याचा अशी क्षुद्र मनाच्या माणसांची वृत्ती असते. याउलट मोठ्या मनाच्या माणसांना सर्व पृथ्वी हेच आपले कुटूंब वाटते. आपली भारतीय संस्कृती किती व्यापक आणि उदार आहे याचेच दर्शन या सुभाषितातून होते. सर्व जगाला वंदनीय अशा तथागत बुध्दांपासून विसाव्या शतकातील थोर विश्वपुरुष महात्मा गांधींपर्यंत अनेक भारत रत्नांनी केवळ ‘आप-आपसातील भेद विसरून ‘एक होवूया... जगात शांती नांदवूया |’ असाच मंत्र अवघ्या मानवजातीला दिला. या ठिकाणी स्वामी विवेकानंदांचे उदाहरण अतिशय बोलके आहे.सदैव सर्वोत्कृष्टतेचा ध्यास असणार-या स्वामीजींना अखंड भारता संदर्भात एक विधान केलेले आहे.

‘वैदिक विचारशक्ती, इस्लामी शरीरसंपदा आणि ख्रिस्ती मन असलेला भारत माझे स्वप्न आहे’

या ओझरत्या आढाव्यानंतर  सतराव्या शतकापर्यंत भारतीय समाजात जातीय वादंग, धार्मिक दंगे किंवा तत्सम घटना अभावानेच आढळतात. १४ व्या शतकात युरोपात सुरू झालेले प्रबोधनाचे लोण जगभर पसरले होते. कागद आणि टाईपरायटरच्या शोधाने जग भयंकर जवळ आले होते. नवसुधारणावाद्यांच्या परखड लिखाणाने माणूस अन् माणूस वैचारिकरित्या ढवळून निघतहोता. औद्योगिक क्रांती घडवून माणसाने यंत्राला गुलाम बनवल होते. मानवाच्या ज्ञान, कला आणि उपभोगाच्या इच्छा कितीतरी वाढल्या होत्या. मार्क्सवादाचे लोण पसरत होते.व्यापाराच्या निमित्ताने तर बिटीशांना सारा भारत माहीतच होता. नेमकी त्याचवेळी आमची राजसत्ता स्वतःच्या तुंबड्या भरण्यात गुंतली होती या सा-याचा फायदा घेत ब्रिटिशांनी १८१८ पर्यंत संपूर्ण भारत आपल्या कब्ज्याखाली आणला. त्यानंतर १८५७ च्या उठावात देखील हिंदू मुस्लीम एक होऊन लढले. विविध जातीसमूह खांद्याला खांदा देऊन लढले आणि म्हणूनच ब्रिटिशांनी ‘फोडा आणि राज्य  करा’ ही नीती अवलंबली. सहिष्णुता हे आपल्या संस्कृतीचे वैशिष्ट्य असले तरी  बिटीश यथावकाश जातीय धार्मिक विष पसरण्यात कमालीचे यशस्वी झाले होतेकारण समाजातील अज्ञान आणि योग्य नेतृत्वाचा अभाव. या ठिकाणी एक उल्लेख महत्त्वाचा वाटतो तो म्हणजे बिटीश राजवट सर्वार्थाने भारतासाठी नुकसानकारक नव्हती. एक देश म्हणून भारताची बांधणी, भौतिक सुविधा, आथिर्क  सुधारणा, रेल्वे ,इंगजी, बदलते शिक्षण आणि आचार विचार ब्रिटिशांनी भारतीयांना दिले; पणस्वातंत्र्य-समता-बंधुता ही त्रिसूत्री त्यांनी भारतातकधीच राबवली नाही.

महात्मा फुले लिहीतात-

“असा कसा देवा तू हा धर्म निर्मियेला |

गरीबांची दुःखितांची दया नही रे तुला |

तुझ्या राज्यामध्ये देवा का ही शिवाशीव?

कुणी श्रेष्ठ, कुणी नीच का हे भेदभाव?’’

किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे नेतृत्व करताना शिकागोमध्ये विवेकानंद म्हणाले होते ‘‘माझ्या बंधू भगिनींनो !’’;  पण त्याचवेळी भारतात ‘माझा धर्म श्रेष्ठ माझी जात श्रेष्ठ’ अशी संकुचित भावना उदयास येत होती. या परिस्थितीची विवेकानंदांना पूर्ण कल्पना आली होती म्हणूनच त्यांनी त्यासाठी उर्वरित आयुष्य खर्ची घातले.

 स्वातंत्र्यानंतरचे पर्व अधिक महत्वाचे आहे. १५ ऑगस्ट १९४७नंतर जन्माला आलेल्या भारत नावाच्या देशाचे तत्वज्ञानच मुळी सार्वभौम धर्मनिरपेक्ष,समाजवादाच्या पायावर उभे राहिले. “जे मनुष्यच नाहीत अशा भारतीय लोकांना स्वातंत्र्य देऊन काय फायदा? आणि ते टिकवण्याची पात्रता त्यांच्या अंगी आहे काय?’’तत्कालीन ब्रिटिश पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांचेभारतासंबंधीचे हे उद्गार; पण भारताला स्वातंत्र्य देण्याशिवाय पर्यायच नाही अशी परिस्थिती जेव्हा निर्माण झाली त्यावेळी ‘मुस्लीम लिग’ स्वतंत्र पाकिस्तानच्या मागणीवर अडून बसली. भारताच्या प्रगतीला अडसर म्हणजे पाकिस्तानची निर्मिती ही कायमस्वरुपी पाचर ठोकून ब्रिटीश निघून गेले पण त्याचवेळी सर्वात दुर्दैवी घटना घडली ती म्हणजे देशाची फाळणी. केवळ धार्मिकआधारावर पाकिस्तानची निर्मिती झाली आणि नंतर लगेचच हजारो हिंदू व मुस्लिम ठार मारले गेले. हजारो स्त्रियांवर बलात्कार झाले. लाखो लोक बेघर झाले आणि त्याहून अधिक आपल्याच मायभूमित निर्वासित. याचे अतिशय हृदयद्रावक वर्णन  ‘ट्रेन टू पाकिस्तान’पुस्तकातून दिवंगत पत्रकार लेखक खुशवंत सिंह यांनी केले आहे. यानंतर मात्र सर्व धर्माची शिकवण प्रेम व शांतताआहे ही मान्यताच गळून पडते. हिंदू धर्माला ‘सहिष्णू’ म्हणताना लाज वाटावी असा १९४७ चा अत्याचारांचा इतिहास सांगतो. इस्लामचं प्रागतिक स्पष्टीकरण देणारे त्या शब्दाचा आशय आणि अर्थच प्रेम व शांतता असल्याचे सांगतात;परंतु त्या धर्माच्या नावावर झालेले अत्याचार व हिंसाचार त्यांना मान खाली घालायला लागवणारे आहते आणि या सार्‍याचे कर्ते करविते येशूचे‘शांतीदूत’ म्हणवून घेताना ख्रिश्‍चनांना लाज आणणारे आहे. फाळणीच्या घटना एवढ्यावरच थांबत नाहीत. काहीच महिन्यानंतर‘सर्वधर्मसमभावाचे धोरण म्हणजे मुस्लिम अनुनय ’ असा आरोप लावून सा-या जगाला शांततेची शिकवण देणार्‍या राष्ट्रपित्याचा खून एका हिंदूने घडवून आणला. महात्मा गांधीचा  अंत ही भारताच्या इतिहासावर दूरगामी परिणाम करणारी घटना आहे.ज्याची कसर कशानेही भरून येऊ शकलेली नाही. स्वातंत्र्याच्या उंबरठ्यावरच असणार्‍या राष्ट्रातील सर्वोच्च नेत्याचा अंत जातीय घटनांच्या पार्श्‍वभूमीवरघडावा ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे.१९५० च्या दशकात जातीय संघर्षांनी किती परमोच्च बिंदू गाठला होता हे त्यावेळच्या भारत पाकिस्तान आंतरराष्ट्रीय संबंधातून उलगडते. पं.नेहरू आणि लियाकत अली या दोन नेत्यांनी दोन्हीराष्ट्रांतील अल्पसंख्यांकाना असणारा धोका लक्षात घेऊन त्यांच्या संरक्षणासाठी करार करावा लागला. हा करार ‘नेहरू लियाकत अली करार’ म्हणून दोन्ही देशातला पहिलाच करार होता. यातून जातीय सलोख्यामागची आवश्यकता स्पष्ट होते. त्या काळी आणि आजही संघर्ष हा फक्त दोन धर्मांमधला किंवा हिंदू मुस्लिम असा भाग नव्हता. हिंदू धर्मामधल्या अनेक पोटजातींमधीलसंघर्षाने सुद्धा उग्र रुप धारण केले होते. दलित म्हणून हिणवल्या गेलेल्या समाजाने आपल्यावरील अस्पृश्यतेच्या अन्यायाला वाचा फोडून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली बौद्ध धर्मांतर केले त्याचे स्पष्टीकरण देताना बाबासाहेब म्हणतात- ‘‘आजघडीला प्रज्ञा, करुणा आणि समता शिकवण असणारा एकच धर्म आहे तो म्हणजे बौद्ध धर्म आणि लाखो अनुयायांसह त्यांनीधर्मप्रवेश केला. भविष्याच्या दृष्टीने जातीय आणि धार्मिक सलोखा किती महत्त्वाचा आहे हे या घटनेतून दिसून होते. अशीच एक घटना. १९८१ साली तामिळनाडूमधील मिनाक्षीपूरम येथे घडली. स्थानिक दलितांनी अन्याय होतो म्हणून मुस्लिम धर्मात प्रवेश केला आणि या घटनेचे पडसाद देशभर उमटले. या सर्व धार्मिक घटनांनी व्यथित होऊन कविवर्य सुरेश भट लिहितात,

“सांग मला दळणा-या दाण्या, जात माझी नेमकी,

ज्याचे पीठ झाले मघा, ते दाणे कुठले होते?’’

जातीय सलोखा आणि आंतरराष्ट्रीय संबंध यांचे फार जवळचे नाते राहिले आहे. काश्मीरचा प्रश्‍न, त्यामागची धार्मिक पार्श्वभूमी आणि त्यातून उदयास आलेला हिरवा आणि भगवा दहशतवाद. देशामध्ये सतत घडणारे बॉम्बस्फोट ह्या दहशतवादाची भीषणता स्पष्ट करण्यास पुरेसे आहेत. आज काश्मीरमधील धार्मिक प्रश्‍न, मुस्लिमांची सामाजिक परिस्थिती, हिंदूचे स्थलांतरण आणिभारत पाकिस्तान आंतरराष्ट्रीय संबंध हा दोन देशच नव्हे तर सार्‍या जगापुढील चिंतेचा विषय आहे. काश्मीरच्या मुद्द्यावरून लालबहाद्दूर शास्त्रींचा संशयास्पद मृत्यू अजूनही सा-या भारताला हळहळायला लावतो. अशीच दुसरी घटना म्हणजे ‘खलिस्तानी चळवळ’ शीख समुदायासाठी स्वतंत्र खलिस्तानच्या चळवळीने उग्र रुप धारण केल्यावर ती दडपण्यासाठी पंतप्रधान इंदिरा गांधींनी‘सुवर्ण मंदिरावरलष्करी कारवाई घडवून आणली. या कारवाईत शीख चळवळीचे झालेले नुकसान हा इंदिराजींच्या हत्येचे मुख्य  कारण. या हत्याकांडानंतर सारा भारत शीखविरोधाने पेटून उठला आणि देशभर शिखांवर जे अत्याचार झाले हे मानवतेला काळिमा फासणारी घटना आहेत. श्रीलंकेमध्ये भारतीय वंशाच्या तमीळ नागरिकांवर होणारे अत्याचार हा भारतीय सरकारच्या दृष्टीनेडोकेदुखीचा प्रश्न राहिलेला आहे. श्रीलंकेमधील सिंहली विरुद्ध तमीळ संघर्षामध्ये LTTE या दहशतवादी संघटनेचा बीमोड करण्यासाठी ‘शांतीसेना’ पाठवण्याचा निर्णय तत्कालिन पंतप्रधान राजीव गांधी यांनी घेतला. या निर्णयामुळे दुखावून तामिळ नागरिकांनी बॉम्बस्फोट घडवून ‘राजीव गांधीची’ निर्दयीपणे हत्या घडवून आणली. आजही तामिळनाडूतील लोकप्रतिनिधींकडूनसरकारला या प्रश्‍नासंदर्भात सतत धारेवर धरून अस्मितेच्या राजकारणाचा डाव साधला जातो. १९७१च्या बांग्लादेश फाळणीनंतर तेथील निर्वासितांचे ईशान्य भारतातील अतिक्रमण हे भारताच्या अंतर्गत सुरक्षेपुढील आव्हान राहिले आहे. गेली ४० वर्षे या प्रश्नावरून ईशान्य भारत सतत धुमसतोय. आज मंबईसहीत सर्व प्रमुख शहरांमध्ये ह्या बांग्लादेशींचे अतिक्रमण हा स्थानिकांनाडोकेदुखी ठरणारा मुद्दा होऊन बघतोय. ज्यायोगे योग्य खबरदारी अभावी भविष्यातील संघर्ष अटळ वाटतो. बांग्लादेशी निर्वासितांचा मुद्दा राजकीय पक्षांकडून ‘हिंदू-मुस्लिम’ चौकटीत रंगवून त्याचा राजकिय लाभ उठवणे यापलीकडे राजकिय पक्षांनी काही भूमिका पार पाडलेली नाही.

    वरील चारही घटनांचा विचार करता केवळ जातीय सलोख्याच्या अभावामुळे भारताने अतिशय धडाडीचे आणि कर्तृत्ववान असे तीन पंतप्रधान गमावले. तिघांच्याही हत्येनंतर त्याचे देशभरात उमटलेले सामाजिक पडसाद, सर्वसामान्यांची हत्यासत्रे, आर्थिक व आंतरराष्ट्रीय धोरणांवरील परिणाम, त्यातून देशाचा व पर्यायाने प्रत्येक भारतीयाचा झालेला तोटा बघितल्यावर जातीयसलोख्याची गरज स्पष्ट होते. पंतप्रधानांच्या हत्येनंतर निर्माण होणारी राजकिय अस्थिरता आणि पोकळीचा थेट परिणाम आर्थिक सुधारणा कार्यक्रम, ठोस निर्णयांचा अभाव, व्यवस्थेतील शिथिलता, डबघाईला आलेली अर्थव्यवस्था, प्रभावी नवनेतृत्वाची कमतरता या दुष्टचक्रातून सतत देशाच्या प्रगतीला खीळ घालत राहिली आहे. दलित आणि महिलांना याचा मोठा फटका बसला आहे. जातीय तेढीचे महिलांवर होणारे परिणाम विशद करताना ‘डाकुराणी फुलनदेवी’ चा उल्लेख करावासा वाटतो. दलित महिला म्हणून बलात्कार झाल्यानंतर उच्चवर्णीयांचा सूड उगवण्यासाठी फुलन ४० ठाकूरांचा खून करते. भारतातील सगळ्यात लोकप्रिय गुन्हेगार ते कैदी आणि खासदारास असा प्रवास केल्यानंतर तिची होणारी हत्या, पुन्हा जातीय सलोखा आणि महिलांचासहभाग याबद्दल गंभीर व्हायला भाग पाडते. जातीय सलोखा आणि त्याचे राजकीय परिणाम हा तर प्रत्येक भारतीय नागरिक, पुढारी आणि प्रसारमाध्यमांच्या चर्चेचा आवडता विषय बनला आहे. याची सुरूवात बघितली तर मला वाटते राममंदिर आणि बाबरी मशीद हे याचे मूळ आहे. लोकांच्या विध्वंसक धार्मिक भावनांना खतपाणी घालून त्याचा अतिशय नियोजनपूर्वक राजकीयलाभ उठवला गेला. १९८९ साली लालकृष्ण अडवाणी यांनी राममंदिराच्या उभारणीसाठी समस्त हिंदुस्तानचे समर्थन मिळावे,म्हणून रथयात्रा काढली होती. लालूप्रसाद यादवांनी धर्मनिरपेक्षतेची ढाल पुढे करत अडवाणींना अटक करून राजकीय लाभ उठवला. यानंतर चिडलेल्या संघ परिवार व भाजपने देशभरातून कार्यकर्त्यांची फळी उभारत हा मुद्दा अतिशय प्रतिष्ठेचा बनवला. ज्याचेपर्यवसान तीनशे वर्ष जुनी अतिशय पवित्र बाबरी मशीद पाडण्यामध्ये झाले. भारतीय संविधानानुसार सर्व ऐतिहासिक वस्तूंचे जतन करणे ही सरकारची जबाबदारी आहे. या सर्व प्रकरणामध्ये कल्याणसिंग यांची राजकिय भूमिका व पोलिसांची निष्क्रियता संशयास्पद वाटते. बाबरी मशिदीचे पतन हा तर भारतीय संविधानावरच हल्ला वाटतो. बाबरी मशिदीनंतर, देशभर हिंदू मुस्लिमदंगली धुमसत राहिल्या व १९९३ च्या बॉम्बस्फोटांनी मुंबई शहर बेचिराख करून सोडले शिवसेनेसह अनेक हिंदूत्तववादी नेते व संघटनांचा यातील सहभाग आणि त्यानंतर प्रसिद्ध झालेली व्यक्तव्ये मुस्लिम द्वेषात्मक वाटतात. या घटनेनंतर मुस्लिमांच्या मनात अस्थिरता व संशयास्पद भावना निर्माण होऊन समाजातील सलोखा निर्माण करण्याच्या सर्व प्रयत्नांना तिलांजलीमिळाली. अनेक  मुस्लिम युवक दहशतवादाकडे वळाले. भारतीय राजकारणात याचे ठळक परिणाम दिसून आले. त्यामध्ये १९९५ साली शिवसेना-भाजप युतीला महाराष्ट्रात सत्ता मिळाली. १९९७ - ९८ साली भाजपच्या नेतृत्वाखाली देशात सत्ताबदल झाले. या सत्तास्थापनेमध्ये बहुसंख्येने असणा-या हिंदूंचे भावनिक राजकारण करून सत्तासंपादन हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. हेसारे कमीच म्हणून २००२ साली गुजरातमध्ये भीषण गोध्रा हत्याकांड घडवून आणले गेले. बाबरी मशीदीचे पतन ते गोध्रा हत्याकांड या घटना बघता सर्वोच्च न्यायालयाने अनेक राजकीय नेत्यांवर ठपका ठेऊन त्यांना दोषी धरले आहे. आजचे दुर्दैव म्हणजे भारतीय राजकारण याच सर्व नेत्यांभोवती फिरत आहे.  न्यायालयाने  तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदींना क्लीन चिट दिलेली असली तरी सर्वोच्च न्यायालयाने २००४ साली निरीक्षणांमध्ये त्यांच्या जाणीवपूर्वक निष्क्रियतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण केलेले आहे. बजरंग दल, विश्व हिंदू परिषद, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांची याबाबतची भूमिका चिंता निर्माण करणारी आहे. 

            

१.बाबरी मशीद उध्वस्त करताना समाजविघातक शक्ती             २. गोध्रा दंगल

 

आज फेसबुक आणि सोशल मिडिया संबंध पिढीसाठी सामूहिक व्यासपीठ म्हणून पुढे येतोय. याची चूणूक नुकत्याच १६ व्या लोकसभेमध्येही दिसली. याच फेसबुकवरून जेव्हा आमच्या थोर राष्ट्रीय पुरुषांची विटंबना घडवून आणली जाते त्यावेळी तरुणाई धर्माच्या झेंड्याखाली दडून जी विघातक कृत्ये करते ही सध्या भारतीयांसाठी शरमेची बाब आहे. विकृती करणारे कोणत्याही धर्माचेअसोत.त्यांना शिक्षा व्हायलायच हवी पण हे काम पोलिस आणि न्यायव्यवस्थेचे आहे. सामान्य जनतेने का कायदा हातात घ्यावा? ज्या छत्रपती शिवाजी महाराजांवर आम्ही हिंदूधर्माचे लेबल लावून त्यांना जाती धर्माच्या चौकटीत डांबून बघतोय, तो माझा राजा समाजकंटकाच्या संकुचित मनांएवढा लहान होता काय? छत्रपतींचा इतिहास आणि सर्व धर्मांबद्दलचा प्रेम आणि आदरबघितल्यावर त्यांची आभाळभर उंची सहज दिसते. अशा  भावना भडकवण्याने महाराजांची उंची तसूभरही कमी होत नाही. हीच गोष्ट सर्व महापुरुषांकडे बघितल्यावर सिद्ध होते; पण हा समतेचा, राष्ट्रभावनेचा संदेश समाजात पोहचायला हवा त्यासाठी गरज आहे. जातीय सलोख्याची आणि परस्पर विश्‍वासाची.

समाजातील कोणतेही गैरकृत्य घडल्यानंतर सर्वप्रथम मुस्लिम, दलित किंवा कनिष्ठवर्गीयांकडे बोटे दाखवली जातात. अनेकदा तपासाअंती हे गुन्हे उच्चवर्गीयांकडून किंवा राजकीय प्रवृत्तींकडून घडल्याचे सिद्ध होते पण तोपर्यंत सार्‍या समाजाला याची शिक्षा होते. आज महात्त्मा गांधीपासून आंबेडकरांपर्यंत आणि पंडित नेहरूंपासून डॉ. कलामांपर्यंत राष्ट्रीय नेत्यांना जातीधर्माच्याचौकटीत बंद करून त्यांच्यावर चिखलफेक करणारा नववर्ग उद्यास येतोय; पण ही टीका करताना ज्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा उपयोग केला जाता  ते वरील नेत्यांमुळेच मिळाले याची पुसटशी कल्पनादेशीखल या पिढीला आहे का, हा प्रश्‍न मला नेहमीच सतावतो. हा वर्ग असाच भरकटत राहिला तर उद्याच्या भारताची चिंता वाटते. मग लोकशिक्षणातून जातील सलोख्याची निकड स्पष्ट होते. साहित्य आणि चित्रपट माध्यमांतून सामाजिक विषमता सदैव ओतप्रोत भरलेली आढळते. १९७० पर्यंतच्या साहित्य आणि चित्रपटांमध्ये फाळणीच्या घटनांचाकरूण इतिहास ठळकपणे दिसतो. चित्रपटांमध्ये ‘दो बिघा जमीन’, ‘पथेर पांचाली’, ‘मदर इंडिया’, ‘सुजाता’,’व्यास’, ‘जागते रहो’… इ. चा प्रामुख्याने उल्लेख करता येईल. साहित्यामध्ये हिंदी आणि उर्दुसाहित्यावर फाळणीची मोठी पकड दिसते. ७० ते ९०च्या दशकात आंबेडकरवादी किंवा दलित साहित्य तसेच विद्रोही साहित्य हा नवा प्रकार विषमतेच्या पार्श्‍वभूमीवर उदयास येऊनलोकप्रिय झाला आजचे भारतीय साहित्य अधिक खुले आणि मुक्त वाटते. पण जगभरातल्यास सामाजिक विषमतेची एक किनार त्याला सदैव लाभली आहे. नागराज मंजुळे या दिग्दर्शकाचा सत्यकथेवर आधारित ‘फॅन्ड्री’ हा चित्रपट सामाजिक विषमता ठळकपणे नोंदवतो.मंडल आयोगाने अल्पसंख्यांकांसाठी २७% आरक्षणाची तरतूद केल्यानंतर उठलेले जातीय दंगे असोत, भंडाराजिल्ह्यातील ‘खैरलांजी’ हत्याकांड असो किंवा अलीकडचीच नगरच्या नितीन आगेची हत्या असो, वा जवखेडा हत्याकांड या सार्‍याच घटना अंतर्मुख व्हायला भाग पाडतात

    रामचंद्र गुहा यांनी त्यांच्या ‘इंडिया अफ्टर गांधी’ या ग्रंथात भारतातील अंतर्गत संघर्षाचे, वेधक विवेचन केले आहे. त्यांच्या मते भारतीय समाजातील संघर्ष मुख्यतः जात, धर्म, वर्गसंघर्ष व लिंगभाव या अक्षांना छेद देऊन प्रवास करतात. यातील प्रत्येक पैलूचे सविस्तर विवेचन करून ते म्हणतात की, संघर्षाचे हे सर्व पैलू कधी स्वतंत्ररित्या तर कधी एकत्रितपणे कार्यरत सतात.त्यांच्या मते काही वेळा या भेदभावांच्या सहाय्याने सामाजिक संघर्षांना खतपाणी घातले जाते. सामाजिक संघर्षाची प्रयोगशाळा म्हणून एखाद्या इतिहासकाराच्या दृष्टीकोनातून भारतातील जातीय संघर्ष आणि सलोख्याचा मागोवा घेत असताना, वारंवार ऐतिहासिक संदर्भ द्यावे लागतात. भारतातल्या अभिव्यक्तीची व्याप्ती, प्रचंड विविधता, आणि प्रसारमाध्यमांचा आवाका बघताअडुसष्ठ वर्षात भारत जो अखंड राहिला ही सगळ्या जगाला आचंबित करणारी पण भारतीयांची छाती अभिमानाने फुलवणारी घटना वाटते. भारत आणि पाकिस्ताने हे दोन देश एकाच वेळी स्वतंत्र झाले; पण तुलनात्मकरित्या अभ्यास करताना भारताच्या प्रचंड यशात व अखंडतेत ‘सर्वधर्मसमभाव’ ह्या धोरणाचा विशेष वाटा आहे. पाकिस्तानची धर्माच्या आधारावर मनाजोगती निर्मितीहोवूनसुद्धा विघटन झाले.आजही पाकिस्तान प्रचंड धुमसतोय याचे कारण म्हणजे, जातीय भावनेला खतपाणी घालणारी धोरणे आणि शासन. या घटनेतून भारतीयांना योग्य बोध मिळतो. हीच एकी आणि अखंडता टिकवण्यासाठी जातीय सलोखा फार महत्त्वाचा आहे.

                 ‘आयडिया ऑफ इंडिया’ ही एक महत्वाची संकल्पना आहे. या देशातल्या विविधतेवर हा देश भक्कम आहे. विविधतेने नटलेला आणि वेगवेगळ्या परंपराचा पाईक होऊ पाहणारा हा देश जातीय दंग्यात नि विव्देषात अडकू नये म्हणून आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करायला हवेत.

कुसुमाग्रजांनी म्हटलं आहे – प्रेमच आहे सा-या संस्कृतीचा सारांश. जातीय सलोख्यासाठी प्रेमाचा धर्म समजून घ्यायला हवा.

“या माझ्या बांधवांनो, अखिल मानवजातींनो,

धर्म मानू एकतेचा, मंत्र देऊनी प्रेमाचा

तल्लीन होऊन विश्‍वशांती स्थापूया

या , गड्यांनो जाती-पाती संपवू या”

जातीय सलोखा निमूर्या!’’

हे गीत गात गात त्यानुसार कृती करु या

 

- बी. राजेश मीरा 

(  फर्ग्युसन महाविद्यालयातून भौतिकशास्त्रात पदवी घेणारा राजेश उत्तम वक्ता, लेखक आणि कवी आहे) 

 

कविता/ लेखन पाठवण्यासाठी पत्ता-eksakhee@gmail.com

-- 

About the Author

राजेश's picture
राजेश