सुटीची निवांत सकाळ

 सुटीची निवांत सकाळ. कामाला जायची घाई नसते. चहात पोळी बुडवायची घाई नसते. सुटी असल्यामुळे आंघोळीची पाण्याची बादली  बघून एकदा अंगावर काटा येवून गेलेला असतो. परत काटाळायची इच्छा नसते.डायनिंग टेबलजवळ बसून wass up वाचन चालू असतं.. शाळेतल्या मित्र मैत्रिणींना सकाळपासूनच उत आलेला असतो. मिनिटाला ६.५९ ह्या स्पीडने मेसेजेस येउन पडत असतात. पेपरपेक्षा आजकाल wass up चांगल्या बातम्या व फोटो दाखवते असा समज पक्का झालेला असतो. किचनमध्ये खर्रर्र, फ़ास्स्स, थाप थाप असे आवाज येत असतात. नेहमीसारखाच किचनमध्ये डोकावतो. बायकोची नाश्त्याची तयारी चालू असते. घरी असल्यावर भाजी निवडायची असं सांगितलं असतं, त्याची आठवण होते. उगाच मटारच्या शेंगांमध्ये हात जातो. बायको हातावर कालथा उगारते. मी मटार निवडल्यावर दाण्यांपेक्षा अळ्याच जास्त निघतात असं तिचं म्हणणं असतं.
 'आलूमटरच्या ऐवजी अळीमटर कर ना" असा (फालतू) सल्ला मी देतो. तिला सकाळी सकाळी मारलेला हा पी जे आवडत नाही. एकंदरीत संवाद माझ्या पथ्यावर पडतो...
परत डायनिंग टेबल आणि परत wass up ...

बरेच खर्रर्र, फ़ास्स्स, थाप थाप असे आवाज संपल्यावर किचन मधून पराठा सदृश काहीतरी बाहेर येतं. त्याशेजारी कटलेट सारखं काहीतरी असतं... 
मी भारावतो.भांबावतो.अचंबित होतो.गहिवरतो.वरमतो.. 
सर्व भावना एकत्र उचंबळून येतात.
काहीच समजत नाही.. 
समोर बसलेल्या माझ्या मुलाच्या चेहऱ्यावर आनंद असतो. 
पराठा आणि कटलेट एकत्रपणे माझ्याकडे पहात असतात. काहीही झेपत नाही.
ऑलिव ग्रीन, येलो ऑकर आणि ऑरेंज असे रंग एकत्र केल्यावर तयार होणार्या रंगाचं कटलेट असतं, त्यावर मक्याचा दाणा लुकलुकत असतो.
पानात शेजारी ऑफ व्हाईट आणि वायोलेट रंग, त्यात थोडा हिरवा अशा रंगाचे पराठे असतात.

अन्नपदार्थांचे भाव आशावादी, माझे भाव ओशाळभूत आणि बायकोचे भाव विजयी असतात.
"आज नं एक नवीन पदार्थ केलाय.. छान दिसत्ताहेत न?"
 पहिल्यांदा आवंढा आणि मग घास !! 
"मस्तच आहेत" उगाच खोटं कौतुक.
"पण काय आहे ते तर सांग"....
माझं जीवशास्त्र खुंटलेलं.. नाही गेस करता येत. तिच्या विजयात भर... 
"मका? ज्वारी? बाजरी? काही नाही तर शेपू?"
सर्व गेस चुकीचे..
"अळकुडीचे कटलेट आहेत..." 
अळकुडी? काय पण...
"आणि पराठे? ते कसले आहेत? "
"कोनफळ!!"
" को न फ ळ ? त्याचे पराठे?"
"अरे हे खाऊन घे.. आज जेवायला उशीर होणारे.. शिवाय आत्याने लाडू पाठवलेत, त्यातलाही घे एक"
"कसला लाडू आहे? हा क्रिम्झन रंगाचा? हा लाडू आहे? कसला आहे पण?""
"बीटाचा"
"बी टा चा लाडू ?
पुढच्या रविवार पासून उपास करायचे नक्की झालेलं असतं !!!!
-सारंग लेले, आगाशी.

About the Author

सारंग लेले