रसेल मला असा भेटला……!

रसेलला एकदा एका ब्रिटीश महिलेने विचारलं- “ जर तुमची आणि देवाची भेट झाली तर तुम्ही त्याला काय विचाराल ?” क्षणाचाही विलंब न करता रसेल म्हणाला, “ मी देवाला विचारलं असतं की तुझ्या अस्तित्वाचा एवढा कमी पुरावा का ठेवलास ?” बर्ट्रान्ड रसेलसोबतच्या भेटीबद्दल सांगतोय कौस्तुभ महाडिक  

    साधारण मी आठवीत असेन तेव्हा मला इंग्रजी शिकवणारे महेश होमकळस सर यांनी मला बर्ट्रान्ड रसेलचं पुस्तक वाचायला दिलं, रसेल कोण हे तेव्हा माझ्या गावीही नव्हतं. कॉन्क्वेस्ट ऑफ हॅपीनेस हे पुस्तक मला सरांनी दिलं होतं. संपूर्ण पुस्तक वाचून मला एक शब्दही कळाला नाही. मला काही कळालं नसल्याचं मी सरांना बोललोही;पण सर म्हणाले सातत्याने वाचत रहा. मी सतत वाचत राहिलो रसेलला आणि रसेलची आणि माझी भेट इन्टरेस्टिंग होऊ लागली. मला रसेलच्या लेखणीतलं सौंदर्य कळू लागलं आणि माझ्या लक्षात आलं की रसेल हा किती ताकदीचा तत्वज्ञ आणि कवीमनाचा माणूस आहे; पण दुर्दैवाने त्याच्याकडे दुर्लक्ष झालेलं आहे. 

       महत्वाच्या तत्वज्ञानी माणसांच्या मांदियाळीत बर्ट्रान्ड रसेलचे नाव अग्रस्थानी आहे. बहुआयामी व्यक्तिमत्व असलेला रसेल समजावून घेणं मला गरजेचं वाटतं. ब्रिटिश विवेकवादी, तत्वज्ञ, निबंधकार बर्ट्रान्ड आर्थर विल्यम रसेलचा जन्म १८ मे १८७२ रोजी झाला. त्याचं महत्वाचं योगदान तर्क आणि तत्वज्ञान या क्षेत्रामध्ये आहे. विश्लेषणात्मक तत्वज्ञानाचे तो संस्थापक मानला जातो. सात दशकांच्या त्याच्या आंतरविद्याशाखीय करियरमध्ये त्याने नैतिकता, राजकीय सिध्दांतन, शैक्षणिक सिध्दांतन, धार्मिक अभ्यास, विचारांचा इतिहास..इ विषयांमध्ये सखोल योगदान दिले. त्यांच्या लेखनशैलीची तुलना व्हॉल्टेअर सोबत केली जाते. दोघांच्याही लेखनात विनोदी,शैलीदार आणि प्रचंड प्रभावी भाषावैशिष्ट्ये दिसून येतात.

    ख-या अर्थाने हा माणूस अष्टपैलू होता. त्यांच्या बहुआयामी क्षमता एका ओळीत सांगता येतील- शिक्षणाने तर्कवादी, स्वेच्छेने तत्वज्ञ, त्यांच्या ऐतिहासिक कर्तृत्वाने नोबेल विजेता.( The History of western philosophy या ग्रंथासाठी त्यांना १९५० साली नोबेल पुरस्कार मिळाला)  रसेलचं तर्कशास्त्रातलं सगळ्यात मोठं योगदान म्हणजे रसेलनं मांडलेले पॅराडॉक्स. (विरोधाभासाचे विधान) प्रिन्सिपल्स ऑफ मॅथेमॅटिक्स हे पुस्तक लिहिताना त्याच्या या पॅराडॉक्सची कल्पना आली. त्याच्या या शोधामुळे तर्कशास्त्रात सेट थेअरी, गणिताचे मूलभूत घटक आणि त्यामागील तत्वज्ञान याच्यात अमूलाग्र बदल झाले. त्याचं आणखी एक महत्वाचे योगदान म्हणजे त्याने मांडलेल्या सिम्पल थिअरी आणि रॅमीफाइड थिअरी.

   ज्याप्रमाणे रसेलने गणिताचा पाया शोधण्यासाठी त्याने जे तर्कप्रारुप वापरले तेच त्याने तत्वज्ञानाचा पाया शोधण्यासाठी वापरले. तार्किक आदर्श भाषेचा त्याने आग्रह धरला. जगाचे स्वरुप समजावून घेण्यासाठी अशी भाषा अधिक संयुक्तिक असल्याचे त्याचे मत होते. विज्ञान आणि तत्वज्ञान यांच्यासाठी एक समान पध्दतीशास्त्र ( methodology) असण्याची नितांत आवश्यकता त्याने प्रतिपादित केली. त्याचे तत्वज्ञानाचे तार्किक विश्लेषण पाहून त्याचे हे पध्दतीशास्त्र सहजपणे लक्षात येते. 

रसेलच्या समाज-राजकीय तत्वज्ञानाची मुळं त्याच्या कौटुंबिक पार्श्वभूमीत दडली आहेत. रसेलचे आजोबा अर्ल रसेल यांनी क्वीन व्हिक्टोरियासाठी पंतप्रधान म्हणून १८४०-१८६० दशकांमध्ये कार्य केले. रसेलचे आई-वडिल हे त्यांच्या काळातील प्रभावी मूलगामी विचारवंत होते. त्याचे वडील हे नास्तिक होते आणि नामवंत राजकीय विचारवंत जॉन स्टुअर्ट मिलचे ते जवळचे मित्र होते. रसेलच्या वडिलांनी मिलला बर्ट्रान्डसाठी धर्मनिरपेक्ष मार्गदर्शक बनण्याची विनंती केली होती; पण दुर्दैवाने रसेलच्या बालपणातच मिलचं निधन झालं. नंतरच्या काळात मात्र रसेलच्या लेखणीवर मिलच्या विचारांचा मोठा प्रभाव पडला. रसेल हा कट्टर नास्तिक मनुष्य होता. जगाच्या निर्मितीचे पहिले काहीतरी कारण असावे (First Cause) असे रसेलला पटले होते; पण वयाच्या अठराव्या वर्षी मिलचे आत्मचरित्र वाचताना रसेल एका ओळीपाशी थबकलाः “ मला कोणी निर्माण केले,या प्रश्नाचे उत्तर देता येणार नाही कारण या प्रश्नाचे उत्तर दिले तर देवाला कोणी निर्माण केले हा प्रश्न स्वाभाविकपणे उदभवतो.” या एका वाक्यामुळे जगाच्या निर्मितीच्या पहिल्या कारणाबाबतची मिथ्या धारणा त्याच्या लक्षात आली. रसेल हा नास्तिकवादाचा पुरस्कर्ता होता. १९४८ मध्ये त्याने बीबीसीच्या एका सुप्रसिध्द चर्चेत फ्रेडरिक कोपल्स्टन या ख्रिस्ती तत्वज्ञासोबत सहभाग घेतला. ‘व्हाय आय ऍम नॉट अ ख्रिश्चन’ या त्याच्या सुप्रसिध्द निबंधात रसेलची नास्तिकवादा बाबतची मांडणी दिसून येते. रसेलला एकदा एका ब्रिटीश महिलेने विचारलं- “ जर तुमची आणि देवाची भेट झाली तर तुम्ही त्याला काय विचाराल ?” क्षणाचाही विलंब न करता रसेल म्हणाला, “ मी देवाला विचारलं असतं की तुझ्या अस्तित्वाचा एवढा कमी पुरावा का ठेवलास ?” 

  एका बाजूला रसेलचा सामाजिक चळवळीतील सहभाग तर दुस-या बाजूला त्याचे विपुल लेखन याच्यातून रसेलचे सामाजिक-राजकीय तत्वज्ञानातील  योगदान दिसून येतं. आण्विक दहशतवादाच्या विरोधातली त्याची भूमिका सर्वश्रुत आहे. व्हिएतनाम युध्दातील पाश्चात्य देशांचा सहभाग याच्याविरोधात त्याने भूमिका घेतली. त्याला त्याच्या या कृतींमुळे अनेक वेळा तुरुंगवास भोगावा लागला. त्याच्या या जाहीर भूमिकांमुळे त्याला ट्रिनिटी कॉलेज,कॅम्ब्रिज,  सिटी कॉलेज न्युयॉर्कमधून काढून टाकण्यात आले.

    बर्ट्रान्ड रसेल हा अल्बर्ट आइनस्टाइनचा जवळचा मित्र होता. त्या दोघांनी मिळून शीतयुध्दाच्या काळात रसेल- आइनस्टाइन जाहीरनामा प्रसिध्द केला. यातून त्यांनी आण्विक शस्त्रांचे धोके पटवून दिले. काही मूठभरांनाच आइनस्टाइनचा सापेक्षतावाद समजला त्यापैकी एक म्हणजे रसेल होता. ‘ए बी सी ऑफ रिलेटीवीटी’ या पुस्तकातून त्याने सर्वसामान्य लोकांना समजेल अशा भाषेत सापेक्षतावाद समजावून सांगितला. पुस्तकाच्या पहिल्या पानावर रसेलने लिहिले आहे- “ Einstein has done something astonishing, but very few people know exactly what it is ! ”

रसेलच्या व्यक्तिगत आयुष्यावर टीका केली जाते. त्याच्या वैवाहिक अपयशांवर चर्चेचे गु-हाळ  सुरु असते. रसेलने चार लग्नं केली. डोरा ब्लॅक सोबतच्या प्रेमसंबंधांची त्याच्या अनुयायांमध्ये मोठी चर्चा होत असे. डोरा स्वतः एक समाजवादी-स्त्रीवादी शिक्षिका असल्याने तिचा रसेलवर मोठा प्रभाव पाडला. नंतरच्या पिढ्यांवर देखील रसेलचा मोठा प्रभाव पडला. अगदी नोम चोम्स्की, नॉर्बट वीनर, प.जवाहरलाल नेहरु . इ अनेकांवर हा प्रभाव दिसून येतो. असं असलं तरी आजच्या आधुनिक जगात तो एक दुर्लक्षित विचारवंत आहे. रसेलचं जीवन सारांशाने मांडण्याचे अनेक प्रयत्न झाले त्यातील एक लक्षणीय प्रयत्न ऑक्सफर्ड विद्यापीठाचा तत्वज्ञ ए जे एयर यानी केला आहे. तो म्हणतो- “ The popular conception of a philosopher as one who combines universal learning with direction of human conduct was more nearly satisfied by Bertrand Russel than any other philosopher of our time!”

रसेलच्या जीवनाचा सारांश दस्तुरखुद्द त्याच्याच लिखाणातून प्रतिबिंबीत होतो. ‘मी का जगलो?’ या प्रश्नाचे उत्तर देताना रसेलचं सुप्रसिध्द उत्तर त्यानं त्याच्या मनोगतात दिलं आहे. हे उत्तर एखाद्या सुंदर भावतरल कवितेसारखेच आहे. रसेल म्हणतो- तीन साध्या;पण माझ्यावर प्रचंड प्रभाव पाडणा-या अंतःप्रेरणांनी माझ्या जीवनावर राज्य केलं आहे.

त्या म्हणजे-

प्रेमाची शाश्वतता
ज्ञानाचा शोध
मनुष्याच्या जीवनातील व्यथांबद्दलची अपार करुणा 

या त्याच्या विचारांचा माझ्यावर मोठा प्रभाव पडला आहे. 

-कौस्तुभ महाडिक 

kaustubhm27may@gmail.com

( राज्यशास्त्रातून पदवी घेणारा कौस्तुभ विविध विषयात पारंगत आहे. बर्ट्रान्ड रसेलचा चाहता ही देखील त्याची महत्वाची ओळख )

About the Author

कौस्तुभ महाडिक's picture
कौस्तुभ महाडिक