राइट टू किस !

राइट टू किस !

- कल्याणी माणगावे

 

“वयाच्या १८व्या वर्षी आपण भारताचे सज्ञान नागरिक म्हणून ओळखले जातो,आपल्याला मतदानाचा अधिकार मिळतो, देश चालवणारे लोकप्रतिनिधी आपण निवडू शकतो तर आपल्याला हवा तो जोडीदार  निवडून त्याच्या संमतीने त्याला अथवा तिला सार्वजनिक ठिकाणी चुंबन का करू शकत नाही ?” रोखठोक सवाल विचारते आहे कल्याणी माणगांवे


 

प्रेम म्हणजे नक्की काय ?
प्रेम म्हटल्यावर पहिल्यांदा आठवते ती मंगेश पाडगावकर यांची कविता-
“प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं तुमचं आणि आमचं सेम असतं.” 

तुमचं आमचं प्रेम सेमच असेल तर त्याला मर्यादा कशाला हव्या बरं?

प्रेम म्हणजे निसर्गाने निर्माण केलेले दोन नात्यातले भावबंध.  या भावनेचं महत्त्व प्रत्येकाच्या मनात वेगळं असतं कारण स्वभाव हे वेगळे असत .कोणासाठी ती एक आसक्ती असू शकते तर कोणासाठी कोणासोबत   शेअरिंगची, अनुबंधाची भावना म्हणजे प्रेम असं मला वाटतं. मानवी जीवनात सगळ्या नात्यात प्रेम हे असतंच. मुलाचे आईवर असलेले प्रेम ,  भावंडांचे एकमेकांवर असलेले प्रेम ;पण मुलाचं मुलीवर व मुलीचं मुलावर असणा-या  प्रेमाचं  काय?या नात्याला तितकी मान्यता नसते,त्या प्रेम  नसतो, अवहेलना जाते, हे चुकीच नाही का?? इतर प्रेमात वात्सल्य, जिव्हाळा वगैरे वगैरे आणि या प्रेमात म्हणे फक्त वासना असा शिक्का मारुन आमचा प्रेम करण्याचा मार्गावर नाकाबंदी करण्याचा हा प्रयत्न नाही का ?हा प्रश्न आम्हा युवकांना आज पडतो आहे.

                     आज आम्हा युवा वर्गाला आमचं प्रेम व्यक्त करण्याच स्वातंत्र्य नाही का?स्वतःला आपण “MODERN,FORWARD”  समजतो;पण वास्तव पाहता हे चित्र वेगळं  दिसतं. प्रत्येक नागरिकाला व्यक्त होण्याच स्वातंत्र्य आहे पण समाजात त्याला विरोध केला जातो.आपण स्वतंत्र भारताचे स्वतंत्र नागरिक आहोत  जाणीव लोकांना  देणं मला गरजेचं वाटत.केरळ मध्ये झालेल्या घटनेत एक प्रेमी युगुल त्या कॅफेमध्ये चुंबन करत होते तर त्यांना काही संघटनेतील लोकांनी त्या जोडप्याला मारहाण केली.या हिंसाचाराला उत्तर म्हणून “kiss of love”   या नावाची चळवळ  सुरु झाली.युवकांनी स्वत:हून पुढे येऊन  व्यवस्था बदलण्यासाठी केलेला हा कल्पक मार्ग आहे.संविधानाने दिलेलं व्यक्तीस्वातंत्र्य हे प्रत्येक  व्यक्तीचे असून ते त्याला/तिला मिळाले पाहिजे असा सूर सर्व युथमध्ये दिसून आला.
                                भारतीय संस्कृतीच्या नावाखाली,धर्माच्या नावाखाली या प्रेमी युगुलांची अवहेलना होते त्यांना त्यांचं प्रेम लोकांसमोर व्यक्त  करायला रोखणारे आपण कोण,असा प्रश्न पडतो. भारतीय संस्कृतीत अनेक प्रकारच्या संस्कृती आहेत ज्यामध्ये कामासुत्राची संस्कृतीही येते. खजुराहोतली शिल्पं आपल्याच देशात कधीकाळी काढली होती हे आपण विसरलोत का ?
ही  संस्कृती  आपल्या देशाला लाभलेली आहे व ज्यांना जे हवे ते निवडण्याचे स्वतंत्र प्रत्येकाला दिलेलं आहे.कोणतीही गोष्ट कोणावर लादता येत नाही, लादू नये हाच तर लोकशाहीचा गाभा आहे.
आसारामसारख्या धर्माच्या नावाखाली अंधारात खून बलात्कार करण्याचे समर्थन करणारे उजळ माथ्याने उजेडात होणा-या प्रेमाच्या अविष्काराला विरोध करत आहेत, याचे सखेद आश्चर्य वाटते.
जेव्हा  kiss of love  सारख्या   चळवळी  होतात याचे कारण म्हणजे युवकांना मध्ये हिंसाचाराच्या कृतीबद्दल असलेला संताप व या संघटनेतील लोकांच्या हिंसाचाराला विरोध आहे.टाळी एका हाताने कधीच वाजत नसते.एखादी व्यक्ती अथवा संघटना विचारधारेच्या पलीकडे जाउन विकासाचा विचार करतील,हिंसाचाराला विरोध करतील तेव्हा समजती मानसिकता बदलेल.भारतीय नागरिकांमध्ये अभाव जाणवतो तो म्हणजे सहिष्णुतेचा,सहनशीलतेचा.ब-याच विषयांवर अभ्यास नसताना कृती केली जाते.आज याच कारणांमुळे सामाजिक सहिष्णुता घटत आहे.प्रत्येक व्यक्तीच्या  भावनांचं आदर हा झाला पाहिजे,त्याला विचारंचे स्वातंत्र्य आहे,स्वतःला व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य आहे.,त्याच्या बुद्धीला जे योग्य वाटेल तो ते अंगीकृत करू शकतो.माणसाच्या बदलत्या गरजांबरोबर तो आज बदलेला दिसतो. काळाप्रमाणे,वेळेप्रमाणे अनेक गोष्टी बदलतात हे साहजिकच आहे व त्या स्वीकारल्याही गेल्या पाहिजेत अशी आज आम्हा युवकांची इच्छा असते.प्रेमाचा बदलता फॉर्म आता स्वीकारायला हवा.
वयाच्या १८व्या वर्षी आपण भारताचे सज्ञान नागरिक म्हणून ओळखले जातो,आपल्याला मतदानाचा अधिकार मिळतो, देश चालवणारे लोकप्रतिनिधी आपण निवडू शकतो तर आपल्याला हवा तो जोडीदार  निवडून त्याच्या संमतीने त्याला अथवा तिला सार्वजनिक ठिकाणी चुंबन का करू शकत नाही ?
                           विकसित देशांमध्ये व्याक्तीवादाला महत्त्व दिले जाते,जिथे व्यक्तीला त्याचे अधिकार दिले जातात.भारतीय संस्कृतीत व्याक्तीवादाला मोडून  काढायचे प्रयत्न झालेले दिसतात.त्याला व त्यांच्या इच्छांना,महत्वकांक्षाना दुय्यम दर्जा दिला गेलेला आहे.आपल्याला गरज आहे एक मुक्त व्यवस्था बनवण्याची.चुंबन करणे कि न करणे व कुठे करणे ही  व्यक्तिगत बाब  आहे.समाजात जगात असताना ज्याला त्याला स्पेस ही खूप प्रिय असते. या स्वतंत्र स्पेसमध्ये केलेली ढवळाढवळ कोणालाही आवडत नाही.
                    किस ऑफ लव्ह ही चळवळ म्हणजे युवावर्गाचे ठाम विधान आहे- होय आम्हाला प्रेमाचा अधिकार आहे.प्रेमाचा सार्वजनिक अविष्कार करण्याचेही आम्हाला स्वातंत्र्य आहे. राइट टू किस हा आमचा हक्क आहे आणि तो आम्ही मिळवणारच !

- कल्याणी माणगावे (विविध सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होणारी कल्याणी फर्ग्युसन कॉलेजमधून बीए करते आहे. सध्या पोलिटिकल सायन्स कोरम इवेन्ट आणि वक्तृत्व व वादविवाद मंडळाची ती समन्वयक आहे) 

     mangavekalyani@gmail.com 

About the Author

कल्याणी's picture
कल्याणी