समतादूत महात्मा फुले

फुल्यांच्या १२४ व्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या कार्यातून, ग्रंथांमधून त्यांच्या विचारांचा आढावा घेण्याचा प्रयत्न केला आहे सागर जासूद या तरुण लेखकाने. मानवतावाद, समता, स्वातंत्र्य, बंधुता, सामाजिक न्याय अशी प्रागतिक मांडणी करणा-या महात्मा फुल्यांच्या विचारांना अभिवादन करत त्यांच्यावरील सदर लेख प्रकाशित करणे आम्हाला औचित्यपूर्ण वाटते.

-संपादक

फुल्यांचा आज १२४ वा स्मृतीदिन;पुण्यतिथी नव्हे किमान फुल्यांच्या विचारांशी सुसंगत वागले बोलले पाहिजे. फुल्यांचे समकालीनत्व ध्यानात घेण्यासाठी फुल्यांचे विचार समजून घेतले पाहिजेत. फुल्यांचा काळ समजून घेतला पाहिजे.  साधारणपणे फुल्यांची पार्श्वभूमी सांगायची झाली तर-उत्तर पेशवाईत जोतिबांचे पूर्वज पुण्याला येऊन फुलांचा व्यवसाय करु लागले. पेशव्यांनी त्यांना ३५ एकर जमीन इनाम दिली व मूळचे गो-हे हे फुले झाले. जून १८१८ मध्ये पेशवाई संपून इंग्रज राजवट सुरु झाली. दुस-या बाजीरावाच्या अंदाधुंद कारभाराला व धूर्त ब्राम्हणी व्यवस्थेच्या घट्ट विळख्याला जनता त्रासली होती.  सामान्य जनतेने इंग्रजी राजवटीचे केलेले स्वागत हे केवळ जितांनी जेत्यांना दिलेली सक्तीची मानवंदना नसून ते उस्फूर्तपणे केलेले आधुनिकतेचे स्वागतही होते. “इंग्रजांच्या राजवटीत काठीला सोने बांधून काशीहून रामेश्वरला गेले तरी काही चोरीला जाणार नाही” असा विश्वास लोक व्यक्त करत ही बाब नोंदवण्यासारखी. ख्रिस्ती मिशन-यांनी सुरु केलेल्या शाळातच जोतिबांनी १८४७ पर्यंत आपला शैक्षणिक अभ्यासक्रम पूर्ण केला. इंग्रजी मिशनरी शाळेतील आधुनिक शिक्षण, थॉमस पेनच्या ‘राइट्स ऑफ मेन’ या ग्रंथाचे वाचन यामुळे जोतिबांच्या मनात लोकांची फसवणूक करणा-या धर्मसत्तेविरुध्द चीड निर्माण झाली होती. मानवतावाद, विश्वबंधुत्व, समता, मानवी हक्क यांची बीजं रोवली गेली.  स्त्री- शूद्रांमध्ये शिक्षणाचा प्रसार केला तर कनिष्ठ वर्गातील लोक सामाजिक समतेसाठी लढा देतील. उच्चवर्णीयांच्या मानसिक गुलामगिरीविरुध्द बंड करतील, या आशेने जोतिबांनी शिक्षणाचा प्रसार सुरु केला आणि म्हणूनच जोतिबांना भारताचे पहिले ‘महात्मा’ आणि पहिले सत्यशोधक म्हणून ओळखले जाते. 

   इंग्रजी सत्तेतील भारतातील साम्राज्यवादाविषयी बोटचेपी भूमिका घेतल्याचा आरोप जोतिबांवर अनेकदा केला जातो. लढाऊ राष्ट्रवादाचा जनक (?) मानले जाणा-या वासुदेव बळवंत फडक्यांना जोतिबांनी 'रामोशी कुणब्यांना फूस लाऊन तोंडघाशी पाडणारा दरोडेखोर' ठरवले होते. या उठावाची संभावना ‘ इंग्रजी सत्ता उलथवून पेशवाई भिक्षुकशाही आणण्याचा प्रयत्न’ अशी जोतिबांनी केली होती. बहुजन समाजाच्या हितास असणारा धोका जोतिबा ओळखून होते. ‘राष्ट्र’ ही संकल्पना १९व्या शतकाच्या पूर्वार्धात तपासताना उच्चजातीय उच्चवर्गीय हितसंबंध कायम ठेवण्याच्या प्रयत्नांच्या स्वरुपात पहावी लागते. त्याचप्रमाणे १८५७चा उठाव हा ‘भटपांड्यांचा उठाव’ आहे असे होते. ब्रिटीश सत्ता अशी बंडे मोडून काढण्यात कायम सरस ठरणारच होती, असे फुल्यांचे मत होते. पेशवाईचे दाहक अनुभव ताजे असताना फुल्यांच्या भूमिकांना दोष देता येत नाही. विशेष म्हणजे ज्या कॉन्ग्रेसने राजकीय स्वातंत्र्य मिळवून दिले तिचे स्वरुप १९२० पर्यंत उच्चवर्गीयच होते. राष्ट्रीय सभेच्या बैठकाही “गॉड सेव्ह द क्वीन”ने सुरु होत आणि संपत. 

१८५४ साली प्रसिध्द झालेल्या ‘मनुस्मृतीचा धिक्कार’ या पुस्तकात जोतीराव म्हणतात की शूद्रातिशूद्रांमध्ये नेहमीच कलह रहावा आणि आपला परंपरागत चालत आलेला वाटमारीचा आणि लुबाडत राहण्याचा धंदा कायमचा चालू राहून शूद्र लोक आपले कायमचे गुलाम व्हावेत म्हणून त्यांच्यात उच्चनीचतेची भावना कायम ठासून भटभिक्षुकांनी जातिभेद उत्पन्न केला.

मनुस्मृतीला आव्हान देताना जोतिबा लिहतात-

“ आता तरी तुम्ही मागे फिरु नका/ धिक्कारुनि टाका मनमूत/

  विद्या शिकताच पावाल ते सुख/ घ्यावा माझा लेख जोती म्हणे/”

१९व्या शतकात जोतिबांना हिंदू धर्म ब्राम्हणी धर्मात दिसला आणि अशा प्रकारच्या धर्माला त्यांनी स्पष्ट नकार दिला.  जाति-वर्ण व्यवस्था ही बहुजनांच्या गुलामगिरीचे मूळ आहे व हाच ब्राम्हणी धर्माचा पाया आहे अशी मांडणी त्यांनी अनेकदा केली. ‘ ख्रिस्ती व महंमदी(इस्लाम) धर्मांमध्ये अनुयायांना हिंदू धर्मीयांप्रमाणे श्रेष्ठ-कनिष्ठ न मानता समानतेची वागणूक मिळते’

असे जोतिबा स्पष्ट लिहितात; परंतु यापैकी कोणत्याही धर्माला अथवा मनुष्य व ईश्वर यांच्यातील मध्यस्थ बनू पाहणा-या अन्यायी धर्मसत्तेला त्यांनी ठाम नकार दिला. प्रचलित धर्मव्यवस्थेला पर्याय म्हणून त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली.

     

आपले धर्माबाबतचे विचार त्यांनी सार्वजनिक सत्यधर्म ( १८८९) या ग्रंथात मांडले आहेत.

‘सत्य सर्वांचे आदी घर/ सर्व धर्मांचे माहेर’                                  ​

ईश्वराच्या उपासनेत कर्मकांडाचे स्तोम माजवणे जोतिबांना अमान्य होते;पण मनुष्यस्वभाव लक्षात घेता आपल्या सामाजिक जीवनातून धार्मिक विधींना पूर्णपणे फाटा देणे शक्य होणार नाही याची त्यांना जाणीव होती म्हणून जन्म, लग्न, श्राध्द, अंत्यक्रिया, प्रार्थना आदी विधींच्या संदर्भात त्यांनी विवेचन केले आहे. ईश्वर एकच असून त्याला ते निर्मिक ( विश्वाची निर्मिती करणारा) या स्वरुपात पाहतात. डॉ.मालशे आणि धनंजय कीर यांच्या मते ‘सार्वजनिक सत्यधर्म’मध्ये जोतिरावांच्या मानवविषयक संकल्पनेचे समग्र दर्शन घडते जणू विश्वकुटुंबाची ती एक गाथाच आहे. धार्मिक सहिष्णुता, मानवी प्रतिष्ठा आणि मानवी समानता ही मूल्ये या ग्रंथांची मूलाधार आहेत. सर्व भूखंडावरील लोकांनी एकजुटीने, एकमताने, सर्वांचे सारखे हक्क मान्य करुन, देशाभिमान आणि धर्माभिमान यांच्या पलिकडे पहावे, ही आधुनिक मानवतावादी दृष्टी दिसून येते.

    “शेतक-याचा आसूड” ( १८८३) या ग्रंथात जोतीरावांनी शेतकरी व शेती यांची परखड चिकित्सा केली आहे. अडाणी शेतक-यांच्या दृष्टीने ‘ब्राम्हण सांगतील तो धर्म आणि इंग्रज करतील ते कायदे’ आहेत ! भगवतगीतेतील ‘कर्मण्येवाधिकारस्ते’ या न्यायाखाली कितीही अन्याय व जुलूम झाले तरी तो आपल्या नशीबाचाच भाग समजून ते सहन करतात. ‘तोंड दाबून बुक्क्यांचा मार’ अशी त्यांची अवस्था आहे. जोतीरावांच्या मते शेतक-यांच्या या अगतिकतेचे मूळ त्यांच्या अज्ञानात आहे. त्यामुळेच ‘ इतके सारे अनर्थ एका अविद्येने केले’ असे ते सांगतात. शेतीच्या विकासाच्या दृष्टीने ते उपायही सुचवतात. शेतीचे आधुनिकीकरण करावे, दुष्काळात कर्ज देण्याची सुविधा करावी, पशुधन पाळावे, धरणे व कालवे बांधावेत, शेतक-यांच्या मुलांच्या शिक्षणाची सोय करावी, वृक्षतोड थांबवावी, पावसावर अवलंबून न राहता नव्या उपकरणांचा स्वीकार करावा, उत्तम पिके काढणा-यांना बक्षीसे द्यावीत…इ असे अनेक उपाय ते मांडतात. शेतक-यातील आर्थिक स्तरीकरणाचीही त्यांना जाण होती आणि प्रामुख्याने कोरडवाहू शेतकरी हाच त्यांनी दृष्टीसमोर ठेवला.

   स्त्री-पुरुष समतेकडे जाण्याचा मार्ग म्हणून जोतिबांनी स्त्री-शिक्षणाकडे पाहिले. जाती-वर्ण व्यवस्था उलथवून टाकण्यासाठी स्त्री-शूद्रांचे शिक्षण व त्यायोगे होणारे आर्थिक –वैचारिक सबलीकरण त्यांना अभिप्रेत होते. तथाकथित उच्चवर्णीय शहाण्यांप्रमाणे या विषयी जाहीर भाषणे न ठोकता जोतिबांनी याची सुरुवात स्वतःपासून केली. सावित्रीबाईंच्या शिक्षणाची सोय करुन त्यांना शिक्षिका बनवले व १८४८ साली सर्वजातीय मुलींसाठी शाळा काढली. अर्थातच सनातनी धार्मिक मंडळीच्या पचनी ही बाब पडली नाही व जोतिबा आणि सावित्री यांना अनेकदा मनस्ताप भोगावा लागला.

      ‘गुलामगिरी’ (१८७३) हा ग्रंथ जोतिबांनी निग्रो गुलामांच्या मुक्तीसाठी सुरु असलेल्या अमेरिकेतील चळवळीला अर्पण करतात, हे उदाहरण समोर ठेऊन आपले देशबांधव समाजातील शूद्र बांधवांची ब्राम्हणी धर्माच्या गुलामगिरीतून मुक्तता करतील अशी त्यांची अपेक्षा आहे. बहुजनांना नव्या शासनयंत्रणेत सामावून घेतले जावे असे ते सुचवतात. यासाठी त्यांनी सार्वत्रिक शिक्षणाची मागणी केली आहे आणि शिक्षण वरिष्ठ वर्गातून खाली झिरपत जाईल, या सिध्दांताचा धिक्कार केला. ‘ शूद्र लोक हेच या देशाचे जीवन व शक्ती आहेत. आर्थिक –राजकीय संकराच्या वेळी सरकारने त्यांच्यावरच अवलंबून असले पाहिजे’ असे ते सुचवतात. पुराणातील वेगवेगळ्या अवतारकथांची त्यांनी चिकित्सा केली आहे. यात ऐतिहासिकतेचा भाग किती, हा वादाचा विषय असला तरी या कथातून प्रतीत होणारे शूद्रातिशूद्रांचे शोषणावर त्यांनी अचूक बोट ठेवले आहे. हिंदू धर्माचा आधार असणारे वेद ‘निर्गुण निराकार असणा-या ईश्वराने कसे लिहिले व त्याला ब्राम्हणांच्या गप्पाष्ट्कांशिवाय दुसरे प्रमाण काय?’ असे रास्त प्रश्न जोतिबा विचारतात.

फुल्यांची थोरवी गाणे हा या लेखाचा उद्देश नाही. इतर कोणत्याही मनुष्याप्रमाणे फुल्यांनाही स्थलकालाच्या मर्यादा आहेत. अंध गौरवीकरण हे महापुरुषांच्या पराभवाचे कारण ठरते. फुल्यांचे कार्य आणि ‘सत्यशोधक’ विचारसरणी यातून मानवमुक्तीच्या शक्यता शोधणे हा फुले अभ्यासण्याचा मूळ हेतू आहे. एकविसाव्या शतकात गुलामगिरीचे स्वरुप आणि विस्तार फुल्यांच्या काळापेक्षा गुंतागुंतीचा आणि व्यापक आहे. धर्म आणि जात यांसारख्या सामाजिक संस्था आजही पाय रोवुन उभ्या आहेत. मंडल आयोगानंतरच्या काळात ओबीसी-माळी समाजाने आपली ‘अस्मिता’ म्हणून फुल्यांना पुढे केले तर दुसरीकडे ब्राम्हणप्रणित हिंदुत्ववादी विचारसरणीने प्रखर ब्राम्हणविरोध मावळलेले फुले उभे करण्याचा प्रयत्न केला आहे. तत्कालीन सामाजिक राजकीय परिस्थितीची गरज म्हणून फुल्यांची ही रुपे पुढे आलेली पाहता येतात. स्वतःच्या भूमिकांबद्दल अत्यंत स्पष्ट असणारे फुले अस्पष्ट व संदिग्ध स्वरुपात पुढे आणण्याच्या प्रयत्नांना खीळ घालणे त्यामुळेच महत्वाचे ठरते. परिवर्तनवादी व मानवतावादी चळवळींपुढील हे आजचे आव्हान आहे. 

 -सागर जासूद 

( इंजिनियर असलेला सागर हा स्पर्धा परीक्षांचा अभ्यासक आहे )

 

  • लेखकाच्या वैयक्तिक मताशी साहित्य संस्कृती सहमत असेलच असे नाही. 

About the Author

सागर जासूद's picture
सागर जासूद