आपापलं ‘जादुई भिंग’

 

    “ आपण सगळेच चालत असतो आणि आपापल्या वाटा शोधत असतो. कधीकधी एकटं चालावं लागतं. जिथे चाललोय तिथल्या सावल्याच दाहक असतात... आणि त्यांचा दाहकपणा फक्त आपल्यालाच आपल्याकडच्या जादुई भिंगातून दिसत असतो. हे 'फक्त आपल्याला(च)' दिसणं कधीकधी वेदनादायक असू शकतं. त्यात आपल्याला दिसतंय ते दुसऱ्यांनाही दाखवायचं असतं. या सगळ्यात आपल्यासारखे अस्तित्वात आहेत, ही जाणीव वेदना कमी करते आणि आपण चालत राहतो.”  अनवट वाटेवरच्या धूसर प्रदेशात जाताना होणा-या वेदनेची नस पकडण्याचा प्रयत्न करताना राही श्रुती गणेश
                                                                                                   

डोकं भणभणतच होतं मी तिथे पोचले तेव्हा. दाहक सावलीने व्यापलेला प्रचंड उघडा-विस्तीर्ण प्रदेश. धूसर -राखाडी, पण चकचकीत. दूर तो डोंगर होता. क्षितिजाजवळ. लहानसाच.आणि शेकडो नद्या होत्या. त्या डोंगराच्या आणि माझ्या मध्ये. मला तो उघडा प्रदेश ओलांडून डोंगराच्या शिखरावर पोचायचं होतं आणि माझ्या हातातलं भिंग उगवत्या सूर्याच्या किरणांत धरून या संपूर्ण उघड्या, विस्तीर्ण, धूसर, राखाडी प्रदेशावर गार कवडसा पाडायचा होता. जड झालेल्या डोक्याला एका हाताने आधार देऊन निश्चयाने निघाले ठामपणे पुढे-डोंगराच्या दिशेने. दुरून तसा सुंदर -हिरवा दिसत होता तो. पण मला ठाऊक होतं की दुरूनच तो साजिरा दिसतो. रस्ता काहीच नव्हता, पण नद्या टाळत डोंगर गाठायचा होता, कारण त्या नद्या विषारी होत्या (की बहुतेक मला त्या पाण्याची भीती होती?).

अचानक काही अंतरावर मला काही माणसं दिसली.

'अरेरे!' मी नकळत उद्गारले. आता मला आडोसे शोधत पुढे जावं लागेल. या लोकांसमोर आले तर मरणार मी नक्की. काहीही झालं तरी मी मीच राहणार होते, कारण माझ्या खिशात जादुचं भिंग होतं आणि मी त्यांच्यासारखी होणार नव्हते, त्यामुळे त्यांनी मला जिवंत ठेवलं नसतं. आडोसा म्हणून बरेच मोठेमोठे खडक होते वाटेवर हे माझ्या पहिल्यांदाच लक्षात आलं. इतका वेळ मी बहुतेक त्यांच्याकडे वाटेतले अडथळे म्हणून पाहत होते. आता लपत-छपत मी पुढे जाऊ लागले.

एकदाच मी हळूच डोकावून त्या माणसांकडे पाहिलं. एकमेकांचा जीव घेण्याच्या प्रयत्नात होते ते. मला आश्चर्य वाटलं नाही. त्या सगळ्यांची खूप दया आली फक्त. या दाहक सावलीमुळे झालं होतं ते. माझ्या कवडश्याचीच वाट पाहात होते ते सगळे. मग काय, चालत राहिले तशीच.कितीतरी मैल.

दुपार होऊ लागली तसा सावलीचा दाहकपणा वाढू लागला एकदम. दरम्यान मी डोंगर चढू लागले होते. प्रचंड धाप लागली होती आणि घसा कोरडा पडला होता. आजबाजूला अनेक नद्या होत्या, पण मी त्यांच्यापासून जमेल तितकं दूर राहात होते. मध्येच एका क्षणी डोळ्यासमोर अंधारी आली आणि पोटात पीळ पडून असह्य वेदना होऊ लागल्या. हातापायाची आग होऊ लागली आणि डोकं अधिकच जड झालं. हा प्रवास का करत होते मी? आणि कशाच्या बळावर? काही क्षण चाल मंदावली माझी. पण मग एकदम मला आठवलं की या प्रवासात मला सोबत होती. आत्ता माझ्यासोबत नसले तरी वेगवेगळ्या रस्त्यांनी मी जात होते तिथेच निघालेले माझे सोबती. आणि मग मला ते शिखर दिसलं. माझं ध्येय. आता नद्या आणखी रूंद होऊ लागल्या आणि पुढे जायला वाट मिळेना. लपायला आडोसाही दिसेना. तरी जात राहिले मी पुढे.

एकदम मागे वळून पाहिलं आणि भीतीनं मी गोठून गेले इतक्या प्रचंड उंचीवर पोचले होते. त्याक्षणी ते आले. माझी सोबत. सुरुवातीला मी ओळखलंच नाही त्यांना. खूप वर्षांनी दिसत होते ना. शिवाय मी नवं काही ओळखण्याच्या परिस्थितीतच नव्हते. ही जुनी ओळख म्हणून मी ओळखीचं हसले. तेसुद्धा निखळ, प्रेमळ हसले. उरलेला काही पावलांचा प्रवास आम्ही एकत्र केला न बोलता आणि पोचलेच मी शिखरावर. त्या अरुंद टोकावर कशीबशी ताठ उभी राहिले आणि खिशातलं जुनंच जादुई भिंग काढलं. उगवत्या सूर्याच्या किरणांनी माझ्याकडे हसून पाहिलं. आजूबाजूच्या दाहक सावलीच्या प्रदेशात हळूच एक थंड झुळूक आली. मी प्रचंड आत्मविश्वासानं आणि सकारात्मकतेनं हातातलं भिंग घट्ट धरून उंचावलं.

-राही श्रुती गणेश

rahee.ananya@gmail.com

(प्रथम वर्ष पदवी कलेचे शिक्षण घेणारी राही उदयोन्मुख कलावती आहे. चौरस वाचन असणारी राही कथाकार, कवयित्री आणि चित्रकार आहे)

About the Author

राही's picture
राही