फुले आंबेडकरांमुळेच मी इथवरः नागराज मंजुळे

फुले आंबेडकरांमुळेच मी इथवरः नागराज मंजुळे 

(Nagraj Manjule about his work, childhood and his journey! Fandry and Sairat)

नागराज, पिस्तुल्या या तुझ्या शॉर्टफिल्मला नॅशनल अवॉर्ड मिळालं आणि आता फॅन्ड्री या सिनेमाला राष्ट्रीय आंतराष्ट्रीय पुरस्कार मिळत आहेत. सगळीकडे फॅन्ड्रीची चर्चा आहे. श्याम बेनेगल,बुध्द्देव दासगुप्ता, जब्बार पटेल, दीपा मेहता,अंजुम राजबली आणि अनेकांनी तुझ्या फिल्मचं कौतुक केलं आहे. थोडक्यात आज-कल तेरे फॅन्ड्री की चर्चा हर जबान पर.

मला सांग पिस्तुल्या असो वा आताची फॅन्ड्री दोन्हीमध्ये लहान मुलाची कथा आहे. हा तुझ्या बालपणातील आठवणींचा प्रभाव आहे का ?

हो. पिस्तुल्या आणि फॅन्ड्री या दोन्ही कथांचं बीज माझ्या बालपणातच आहे. माझं लहानपण ही फारच मजेशीर गोष्ट आहे. मी खूपच वाह्यात मुलगा होतो. चौथीत असताना मी दारु प्यायला लागलो. वडलांना दारु आणून देताना मी मध्येच बाटलीतून कोरी दारु प्यायचो. आणि नंतर हापशाच्या पाण्यानं भरुन वडलांसमोर मी आताच दारुची बाटली उघडतो आहे, असं नाटक करायचो. नंतर सातवीत दारु सोडली. गांजा ओढायचो. सिगारेट ओढायचं व्यसन लागलं होतं. सिगारेट घ्यायला पैसे नसायचे. सिगारेट ओढणा-या माणसानं कमी सिगारेट ओढावी आणि पायाखाली चिरडू नये असं वाटायचं. उरलेलं थोटुक मी ओढायचो. पिक्चरचा नाद मला पहिल्यापासूनच होता. करमाळ्याच्या( जि.सोलापूर) सागर थिएटरला पिक्चर पहायचो. कधी पैसे नसले तर चोरुन बघायचो. अगदी चौथी-पाचवीत असताना मी ब्लू-फिल्म्स पाहिल्या. असं दिशाहीन आयुष्य होतं. या सगळ्यात एक कॉमन होतं ते म्हणजे माझा पिक्चर बघण्याचा नाद.

 

त्यावेळी कोणत्या फिल्म्स पाहिलेल्या तुला आठवतात?

सागरला(थिएटर) जो कोणता सिनेमा लागेल तो मी पहायला जायचो. अमिताभ बच्चन,गोविंदा यांच्या फिल्म्स मला फार आवडायच्या. माझं गाव जेऊर;पण मला आठवतं तसं मी करमाळ्यातच रहायला होतो.मला माझ्या चुलत्यांकडं दत्तक म्हणून दिलेलं. ना घर का न घाट का अशी काहीतरी विचित्र अवस्था होती माझी. सातवीपर्यंत करमाळ्यालाच होतो. त्यावेळी रामायण महाभारत लागायचं. ब्लॅक ऍन्ड व्हाइट टीव्ही. कुणाच्या तरी घरी टीव्ही असायचा. खिडकीतून तरी पाहता यावं म्हणून आम्ही गर्दी करायचो. नंतर रामायणाचं नाटक केलेलं आठवतं. शिवसेनेच्या बालशाखेत मी होतो. राष्टीय स्वयंसेवक संघा्चे खेळ सुरु असायचे. आमच्या खेळांपेक्षा फारच सुसंस्कृत खेळ सुरु असायचे तिथे. तिथल्या शाखेतही मी गेलो.  

 

….पण हे सारं सुरु असताना तुझा शाळेतला ऍकेडिमिक परफॉर्मन्स कसा होता?

अजिबातच चांगला नव्हता. मला शाळेतच जाऊ वाटत नव्हतं. दोन गोष्टींची मला भीती वाटायची एक म्हणजे दवाखाना आणि दुसरं म्हणजे शाळा. दवाखान्याची भीती स्वाभाविक होती कारण मी आजही इंजेक्शनला घाबरतो;पण शाळेची भीती वाटणं मला आज चुकीच वाटतं. असं नव्हतं व्हायला पाहिजे. शाळा हा चाप्टर कधी एकदा संपतोय आणि पुढं काही तरी नवं घडतंय अशी मी वाट पहायचो.

म्हणजे अगदी मार्क व्टेन म्हणतो तसं मी आणि माझं शिक्षण यात शाळा आडवी आली.

(हसत) अगदी खरंय. कारण शाळेमुळं मी घडलो असं मला अजिबातच वाटत नाही.शाळेतला अभ्यास करायचो नाही. आई-वडिल अडाणी. अभ्यासाला बस म्हटलं की मी नागराज मंजुळे हे माझं नाव दोन दोन पान लिहून काढायचो. ज्या ज्या म्हणून चुका करता येतील त्या मी केल्या आणि त्यातून शिकलो. मी नक्की काय करतोय हे आई-वडिलांनाही माहीत नसायचं. हे चुका करण्याचं स्वातंत्र्य मला नकळतपणे मिळालं होतं.

तुझे पालक सुशिक्षित असते तर तुला या चुका करण्याची मुभा कदाचित मिळाली नसती. आज मागं वळून पाहताना सजग पालकत्व हा पाल्याच्या विकासातील अडथळा आहे असं तुला वाटतं का ?

पालक सुशिक्षित असते तर कदाचित थोडा फार फरक पडला असता. पण आजच्या पुण्या मुंबईच्या सुशिक्षित पालकांकडे पाहून वाटतं की झालं ते बरं झालं. मला चुकांमधून शिकता आलं. सजग पालक हा एका अर्थाने पाल्याच्या विकासातील अडथळाच आहे म्हणजे मुलांना चुका करण्याची मुभाच नाही. मुलांनी १०० % बरोबर असावं ही अपेक्षाच किती गैरलागू आहे !पालकांच्या अपेक्षांच्या ओझ्यानं ही मुलं दबली आहेत.

 

हे अगदीच खरं आहे. शिक्षणाच्या प्रक्रियेत शाळा आडवी यावी अशी एकूण अवस्था  असतानाही शिकलं पाहिजे ही प्रेरणा कशी निर्माण झाली? कारण तू एकटाच पोस्ट ग्रॅज्युएट आहेस. इतरांचं शिक्षण सुटलं… तू सुध्दा दहावीला तीनदा नापास झालास तरीही शिकलंच पाहिजे असं का वाटलं?

मला दहावीत कळालं मी शिकलंच पाहिजे. मी दहावीला फेल झालो. माझे बाकीचे मित्र पुढच्या वर्गात गेले. त्याच वेळी ज्यांनी मला दत्तक घेतलं होतं ते माझे वडील बाबुराव मंजुळे वारले. एक रिकामेपण आलं. त्या काळी घरी पैसेही नव्हते. आतापर्यंत मी कधी मला एकटेपण वाटू दिलं नव्हतं. फिल्म बघायचो. दारु प्यायचो. काही ना काही करुन एकटेपण येऊ द्यायचो नाही. आता फिल्म बघायला किंवा कोणत्याही प्रकारची करमणूक करायला पैसेच नव्हते माझ्याकडे. त्यामुळं स्वतःजवळ थांबण्याची वेळ आली. स्वतःला लपवताच येईना. झाकता येईना. स्वस्तातली करमणूक म्हणून मी पुस्तकांकडं वळलो. वाचायची आवड लागली. माझ्या आत्याचा मुलगा आंबादास चौगुले तो पोलीस टाइम्स आणायचा. मी आख्खा पोलीस टाइम्स वाचून काढायचो. मग बुक स्टॉलवर कमी किमतीत काय मिळतंय का ते बघायचो. चांदोबा, गृहशोभिका असं काय वाट्टेल ते वाचायचो. नंतर मला कळालं की गावात एक लायब्ररीपण आहे. मग त्या सहा-सात महिन्यात जी पुस्तकं मिळतील ती मी वाचून काढली आणि मग वाटायला लागलं की शिकायलाच पाहिजे. गणित आणि इंग्रजी मला अवघड जात होतं. गणिताची मला भीती वाटायची;पण एकदा एवढा गणिताचा टप्पा पार केला की मग काय गणित नाही म्हणून मला हायसं वाटायचं. दहावीत आसिफ शेख या माझ्या वर्गमित्रानं बेरीज वजाबाकी गुणाकार इतकं बेसिक शिकवलं. गणिताला ५२ ला पास होतं आमच्यावेळी. मला बरोबर ५२ मिळाले होते. आणि इंग्रजीत ३५ ला पास तर मला ३९ मार्क्स होते. आणि हे मार्क मला आत्यंतिक कष्ट करुन मिळाले होते. साइन कॉस टॅन च्या कचाट्यातून आपण बाहेर पडलो याचं मला खूप बरं वाटलं. सुटका झाली.

घरच्यांचा असा काही फोर्स नव्हता की शिकलंच पाहिजे

फोर्स असं नाही.आई-वडील म्हणायचेच ना -शिका. आम्ही शिकलो नाही, दगड फोडतोय. तुम्ही तरी शिका.माझा धाकटा भाऊ शेषराज त्यानं आधीच शाळा सोडली होती. तो गवंडीकाम करत होता. वडलांना (पोपटराव मंजुळे) विश्वास होता की मी शिकेन म्हणून.  दुसरं म्हणजे शिकायची इच्छा होती याचं दुसरं कारण म्हणजे कॉलेजचं आकर्षण. कॉलेजचं मुक्त वातावरण. रंगीबिरंगी कपडे घालायला मिळतील. सुंदर मुलींशी बोलता येईल असं वाटायचं. त्या काळी मुलींशी बोलणं म्हणजे काहीतरी पराक्रम केल्यासारखं वाटायचं.

शाळेत किंवा नंतर कॉलेजात असताना तुला कोण असं मार्गदर्शक शिक्षक असं भेटलं का ?

करमाळ्याला सातवी झाली की मी जेऊरला गेलो. तिथंच दहावी पास झालो आणि भारत कॉलेजला ऍडमिशन घेतलं. मी बारावीला असताना संजय चौधरी म्हणून एक सर बीएला शिकवत होते. तो असा पहिला माणूस मला भेटला की जो शिक्षकी चौकटीपासून बाहेर पडलेला खरा शिक्षक होता. कविता हा आमच्यातला समान धागा होता.

तुझा “उन्हाच्या कटाविरुध्द”  हा कवितासंग्रह प्रसिध्द झाला आहे. तुझ्या आयुष्यात कवितेनं कशी एन्ट्री केली?

 

दहावीत असतानाच आणखी एक गोष्ट अशी घडली की मी वाचू लागलो.त्यातल्याच कुठल्या तरी पुस्तकात मी वाचलं की रोजनिशी लिहायला पाहिजे. मग  मला रोजनिशी लिहण्याची सवय लागली. मग मी दररोज सकाळी उठलो. इकडं भटकलो अन रोज रोज तेच ते लिहू लागलो. मला कंटाळा यायला लागला की रोज आपण तेच ते लिहतोय मग ठरवलं की जेव्हा आपल्याला काही वेगळं लिहावं वाटेल तेव्हाच रोजनिशी लिहायला लागलो. आठवड्यातून मी रोजनिशी लिहायला लागलो आणि मग गद्यात लिहिता लिहिता त्याचं पद्यात रुपांतर व्हायला लागलं. म्हणजे अनुभव काही तरी वेगळेच असायचे आणि मी लिहायचो वेगळंच काहीसं.

थोडक्यात रोजनिशीची साप्ताहिकनिशी झाली ! पण मला सांग नागराज एका मुलाखतीत तू म्हणाला होतास की आडवं लिहिण्याच्या ऐवजी उभं लिहिलं की कविता होते असं तुला वाटायचं. कवितेच्या इतक्या ढोबळ आकलनापासून तुझी आताची कवितेबाबतची परिपक्वता हा प्रवास कसा झाला ? तुझी पहिली कविता आठवते का ?

अगदी ओळी आठवत नाहीत पण झालं असं की  'पाहुणेर' ही पुरुषोत्तम पाटलांची कविता मी वाचली. खूप साधी आणि छान. मला ती आवडली. आपण असं लिहायला पाहिजे असं मला वाटायला लागलं.  पुरुषोत्तम पाटलांच्या कवितेचं अनुकरण करुन मी ‘त्या काठी’ नावाची एक कविता लिहिली;पण ते पूर्ण अनुकरण होतं. मग वाटलं असं आपण नाही लिहायला पाहिजे. आपल्याला जे वाटतं ते लिहायला पाहिजे. मग एक कविता मी सोलापूरच्या संचारला पाठवली. ती छापूनही आली. त्या आधी मला वाटायचं हे लोक आडवं लिहायचं सोडून उभं का लिहतात. दहावीला असतानाच मी पाचवीपासूनची मराठी-हिंदीची पुस्तकं मिळवून वाचली आणि कविता मला आवडायला लागली. कवितेचं कसं आहे कविता तुम्हाला तंबाखूसारखी किक देते. दोन ओळी तुम्ही वाचता आणि किकच बसते. नशा येते. कविता वाचून मला मजा यायला लागली. सुरुवातीच्या काळात कुसुमाग्रजांच्या खूप कविता मी वाचल्या. मला त्या फार आवडल्या. कविता म्हणजे काहीतरी सांगायचंय, नीट सांगता येत नाही. काहीतरी निसरडं आहे. हुलकावणी देतंय आणि पकडता येत नाही आणि सगळ्यांनाच ते सांगता येत नाही ते मला कवितेतून सांगता येतंय  ते मला कवितेत सापडतंय असं मला वाटल. प्रेशर कुकरसारख्या तुमच्या सगळ्या वाटा बंद झाल्या की कुठूनतरी कविता बाहेर येते असं मला वाटतं.

कवितेचा समांतर प्रवास सुरु होताच ;पण बीए करत असतानाच एमए पुण्यात करायचं असं तू ठरवलं होतंस का ?

झालं असं की बास्केटबॉलच्या निमित्तानं  राम पवार नावाचा माझा एक मित्र झाला होता. शाळेत असल्यापासून मी बास्केटबॉल खेळायचो. रामचा भाऊ शाम पवार. तो पुण्यात कमवा शिका करुन शिकत होता. नंतर तो पुणं सोडून आला. तो जेऊरला आला की पुण्याचं वर्णन करायचा. पुणं कसं भारी आहे अन काय काय. माझ्या आत्याचा मुलगा राजू देवकर म्हणून तो आधीपासून पुण्यात होता आणि दहावीत असताना मिलिट्रीच्या भरतीसाठी मी एकदा पुण्यात आलो होतो तेव्हापासून पुण्यात यावं अशी माझी फार इच्छा होती. एम ए मराठी करायला माझ्या चार मित्रांसोबत मी पुण्याला आलो.

एम ए शिकत असताना तुला आपण पैसे कमवण्यासाठी काहीच करत नाही याचा ताण तुला वाटायचा का, कारण घरात तू सगळ्यात थोरला.

हो बाकी मी कितीही काही करत असलो तरी कमवण्याच्या बाबतीत नालायक ठरलो होतो. पण चोथा झालेलं जगणं मला नको होतं. माझा सगळ्यात धाकटा भाऊ भूषण तेव्हा पोलिसात नोकरीला लागला होता. त्याहून मोठा भाऊ भारत तोही पोलिसात होता. दोघंही मला मदत करत होते. कधी भेटलो की हळूच माझ्या खिशात पैसे ठेवून जायचे दोघं. घरातल्या सगळ्यांनीच खूप सपोर्ट केला म्हणून मी शिकू शकलो.

पुणे विद्यापीठात तू एम ए केलंस. आणि नंतर नगरच्या कॉलेजमध्ये  मास कम्युनिकेशनमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन केलंस. हे कसं काय झालं? एकदम मोर्चा मासकॉमकडे कसा काय वळला?

एम ए कसाबसा फर्स्ट क्लास मिळवून पास झालो. पुढं काय कराव्ं ते कळेना. बी एड करुन प्राध्यापक व्हावं वाटायचं पण मग त्यासाठीचा पैसा नव्हता. भारत म्हणायचा की आपण पैसे भरु;पण एकूणात ते काही परवडणारं नव्हतं. मला वाटायचं की ड्रायविंग लायसन्स काढून  ड्रायवर व्हावं. अशात एक वर्ष वाया गेलं. पुण्यात रहायचं तर मग कुठे रहायचं. विद्यापीठ् ही त्यासाठीची खूप सेफ प्लेस होती. मला एम फिलला ऍडमिशन मिळालं. त्याच काळात माझे वडील (पोपटराव मंजुळे) वारले. पुन्हा आयुष्यात एक पोकळी निर्माण झाली. इस्त्रीच्या दुकानात काही काळ काम केलं तर कधी वॉचमन म्हणून.  त्याच वेळी मिथुनचंद्र चौधरी या माझ्या मित्राची भेट झाली. हनुमंत लोखंडे हा आमचा कॉमन मित्र. त्या वेळी मिथुनच्या कम्पलसरी हेल्मेट या शॉर्ट्फिल्मला चेन्नईच्या फेस्टीवलमध्ये प्राइझ मिळालं होतं. त्याचं अभिनंदन करण्यासाठी मला त्याला भेटायचं होतं. आणि मिथुनला त्याच्या कविता मला ऐकवायच्या होत्या म्हणून भेटायचं होतं अशा प्रकारे पुणे विद्यापीठात आमची भेट झाली. माझं थोडं काही काम झालं की मी परत जेऊरला जाऊन रहायचो. मिथुन मला म्हणायचा- तू गावात जाऊन काय करतोस? तुझ्यात एवढं टॅलेन्ट आहे. तू इथंच थांब. मग मी मिथुनसोबत पाषाणला राहू लागलो. सेट-नेटची तयारी करावी म्हणून आम्ही प्रयत्न केले. मिथुन पहिल्याच प्रयत्नात सेट-नेट पास झाला. मी अनेकवेळा प्रयत्न करुनही सेट नेट पास झालो नाही. सेट-नेट झाल्यामुळं मिथुनला नगरच्या कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून नोकरी लागली. त्या कॉलेजसाठी मी ज्युनियर विद्यार्थ्यांना सांगत होतो की तुम्ही मासकॉमला ऍडमिशन घ्या म्हणून. गणेश जसवंत या माझ्या मित्राला मी नगरच्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घे म्हणून सांगितलं तेव्हा तो म्हणाला की तूच चांगल्या पध्दतीनं मासकॉम करु शकतोस. पण मासकॉमची फी होती पंचवीस हजार. माझ्याकडं एवढे पैसे नव्हते. मिथुननं मला हफ्त्या-हफ्त्यानं फी भरायची सवलत दिली. शॉर्ट्फिल्म करायला मिळेल असं मला वाटत होतं शेवटी घाबरत घाबरत मी मासकॉमला ऍडमिशन घेतलं.

पण याच काळात तुझ्या मनात आत्महत्येचे विचार येत होते. तुझ्या कवितही तू लिहिलं आहेस “माझ्या जगण्यामरण्याला नसतो कवितेविना अन्य पर्याय”. या काळात तुला जगण्याची तगण्याची इच्छा कशी बलवत्तर राहिली?

मी टकमक टोकावरुन परत आलोय ते केवळ माझ्या मित्रांमुळे. त्या काळात मित्रांनीच मला समजावलं. त्यांनीच मला माणसात आणलं. त्यांनी पैसे जमा करुन मला एका मानसोपचारतज्ञाकडं नेलं तेव्हा मला माझा मूर्खपणा समजला. 

कविता हाच मला नेहमी माझ्या दुःखावरचा रामबाण उपाय वाटला आहे. तिच्यामुळेच एक आउटलेट मिळतो आणि म्हणून जगण्या मरण्याला कवितेशिवाय अन्य पर्याय नसतो, असं मला वाटतं.

नगरच्या कॉलेजात असताना तुला पिस्तुल्या या लघुपटासाठीची कथा सुचली. कशी सुचली तुला ही कथा? तू अनेकदा सांगतोस की पिस्तुल्या किंवा फॅन्ड्री या दोन्हीचं कथाबीज तुझ्या आयुष्यात दडलेलं होतं..

अगदी एका वाक्यात सांगायचं तर पिस्तुल्याची कथा  ही एका भटक्या विमुक्त जमातीतील मुलाच्या शिक्षणासाठीच्या संघर्षाची कथा आहे आणि मी आयुष्यात शिक्षणासाठी खूप संघर्ष केलेला आहे. शाळेत फी भरायला पैसे नसायचे. शिक्षक शाळेतून हाकलून द्यायचे. वडिलांशी काय बोलणार. कळायचं की त्यांच्याकडं पैसे नाहीत. त्या काळात आम्हा चार भावांकडं दोनच स्लीपर पॅरागॉनच्या. ते आमचं चिल्ड्रेन ऑफ हेवन होतं म्हणजे बाहेर दोघं गेले की आम्ही दोघं घरात थांबायचो कारण दोनच चपला. आणि मी आजूबाजूला पहात होतो की कुणी शिकलेलंच नाही. त्यामुळं शिक्षण हा माझ्यासाठी अत्यंत महत्वाचा मुद्दा होता पहिल्यापासून. एका नातेवाईकानं तर मुलगा डाव्या हातानं लिहितो म्हणून इतकं मारलं की पोरानं शाळाच सोडून दिली. उजवं म्हणजे शुभ आणि डावं म्हणजे अशुभ असल्या आपल्या धारणा. शिक्षण नसल्यामुळं खूप नुकसान झालं आपल्या समाजाचं म्हणून मला वाटायचं की शिक्षणासाठीचा हा संघर्ष मांडला पाहिजे.

सूरज पवार या मुलाची निवड तू पिस्तुल्या या शॉर्ट्फिल्मसाठी केलीस. जेऊरजवळच्या पोफळज गावचा सूरज हा नॉन ऍक्टर तू निवडलास. त्याला देखील ऍक्टिंगसाठी नॅशनल अवार्ड मिळालं. अगदी आता फॅन्ड्रीमध्येही छाया कदम आणि किशोर कदम सोडले तर बाकीची सगळी मंडळी ही नवखी होती. नॉन ऍक्टर होती

कॅरॅक्टरला जे सूट होईल त्याला किंवा तिला घ्यायचं एवढाच माझा निकष होता. सूरज हाच पिस्तुल्या म्हणून योग्य ठरु शकतो असं मला वाटलं म्हणून मी त्याला घेतलं.एक भूमिका म्हणून माझं असं होतं की मला पुण्या-मुंबईचे सर्टिफाइड ऍक्टर लोक नको होते. टॅलेन्ट कुठंही असू शकतो मात्र आपण ते हेरायला हवं.

काय पार्श्वभूमी आहे सूरजची?

सूरज हा एक पारध्याचा मुलगा आहे. माझ्या एका मित्राच्या शाळेत तो मला भेटला. पिस्तुल्याच्या कॅरॅक्टरसाठी तो मला अत्यंत योग्य वाटला.  गम्मत बघ,पिस्तुल्याला दोन नॅशनल अवार्ड मिळाले -बेस्ट डिरेक्शनचं मला आणि बेस्ट ऍक्टरचं सूरजला. फॅन्ड्रीचं शूटिंग सुरु असताना माझ्या जेऊरच्या घरातून नॅशनल अवार्ड चोरीला गेलं. मला त्याचं वाईट अजिबात वाटलं नाही. शेवटी चोरांना नॅशनल अवार्ड कधी मिळणार ? पण चोरीचा आळ जेव्हा सूरजच्या कुटुंबावर घेतला गेला तेव्हा मात्र फार वाईट वाटलं. आजही पारधी म्हणजे चोरी करणारी जमात असं समजलं जातं.

पारधीवरुन आठवलं थोडा “उजेड ठेवा अंधार फार झाला” या आपल्या चळवळीच्या गीतातली एक ओळ आहे- “शोधात कस्तुरीच्या आहेत पारधी हे”

बघ ना म्हणजे किती रुजलं आहे हे सारं. आपल्या धारणा पुन्हा तपासायला हव्यात. 

पिस्तुल्या, फॅन्ड्री किंवा उन्हाच्या कटाविरुध्द हा तुझा कवितासंग्रह या सा-यातून तू दलितांच्या वेदना समर्थपणे मांडल्या आहेस.हे सगळं कशातून आलं. जे भोगलं त्यातून?

जन्मानं मी दलितच आहे पण मी अशा जातीत जन्माला आलो की जी जात स्वतःला दलित मानत नाही. कैकाडी,वडार हे स्वतःला दलित मानत नाहीत. महार सोडले तर सगळे स्वतःला हिंदू म्हणवून घेतात. आपण दलित आहोत अशी जाणीवही त्यांना नाही. दलित असण्याचे सारे चटके आम्ही सोसत होतो ;पण दलित आहोत हे कळत नव्हतं. जसं मी तुला म्हणालो संघाच्या शाखेत जायचो. आंबेडकरांना शिव्या घालायचो.

दलित असून आंबेडकरांना शिव्या घालायचास?

कळतच नव्हतं ना मी दलित आहे म्हणून. आणि संघाच्या शाखेत दुसरं मी काय बोलणार !आमच्या घरात अंधश्रध्दा होती. तुळजापूरला जाऊन घरचे काय काय विधी करायचे.आमच्या घरचे महारांना घरात येऊ द्यायचे नाहीत. आणि आमच्या घरच्यांना इतर लोक त्यांच्या घरात येऊ द्यायचे नाहीत.

रुढ अर्थाने आपण ज्याला दलित चळवळ म्हणतो अशा चळवळीत तू कधीच नव्हतास.

शक्यच नाही ना. दलित आहे हे कळायचंच नाही मला. बीएला असताना मला थोडं थोडं कळायला लागलं. बीएला असताना आंबेडकरांचं एक छोटं चरित्र वाचलं आणि लक्षात आलं की या माणसामुळं आपण आज इथं आहोत. फुले आंबेडकर हे आपले बाप आहेत. मग लक्षात आलं की कितीतरी दिवस आपण आपल्याच विरोधात उभे आहोत.

आजच्या दलित चळवळीची जी भूमिका आहे त्याविषयी काय म्हणशील?

मला अनेकदा ती आततायी भूमिका वाटते. म्हणजे तू माझा छळ केला म्हणून मी आता तुझा छळ करणं ही भावना बदल्याची आहे. याच्यापलिकडं येऊन आपण माणूस म्हणून जगायला शिकलं पाहिजे. आपली गम्मत काय आहे आपल्याला दृष्य दुश्मन लागतो. अमूर्त शत्रूसोबत लढायची आपली तयारी नाही.

 

ही तुझी माणूसपणाची भूमिका तुझ्या कवितेतूनही दिसते. तू कुठला विशिष्ट आयडियॉलॉजीची भूमिका घेत नाहीस.

खरंतर मला मुळात ते कळतंच नाही. आंबेडकरांवर माझा फार अभ्यास आहे अशातला भाग नाही पण त्यांची प्रेरणा मात्र नक्कीच आहे. मी कविता लिहायचो तेव्हा मला कळायचंच नाही की ही कविता आहे. ब-याच वेळा मी कविता लपवून ठेवायचो. त्या चोरीला जातील असं वाटायचं. ही कविता आहे आणि चांगली कविता आहे असा आत्मविश्वास मला संजय चौधरी, डॉ.प्रदीप आवटे, नागनाथ कोतापल्ले, राजेंद्र दास यांच्यामुळं मिळाला. कवितारतीला मी कविता पाठवल्या. पुरुषोत्तम पाटलांनी सहाच्या सहा कविता छापल्या. माझ्या कविता छापून आल्या की वडील खूप अभिमानानं सांगायचे आणि आई मात्र विचारायची याचे तुला किती पैसे मिळतात. या सगळ्या जगण्यातून कविता आकाराला आली. त्यामुळेच तिच्यावर कोणताही शिक्का नाही.

 

तू दलितांच्या वेदना मांडल्यास पण तुझ्या कवितेची भाषा मात्र अभिजन आहे

मला माहीत नाही;कदाचित शुध्द बोलण्याच्या प्रयत्नातून ते आलं असावं किंवा माझा माझ्या भाषेबाबतच्या न्यूनगंडातून ते आलं असावं. न आणि ण हे मला अजून नीट म्हणता येत नाही. एकदा आठवण नावाच्या कवितेचं वाचन मला रेडिओवर करायचं होतं आणि मला ण बाणाचा ण म्हणताच येईना.

ती आठवण अजून ताजी आहे. फॅन्ड्री किंवा पिस्तुल्या या दोन्ही कथा तुझ्या बालपणीच्या आहेत;पण आता जात-वास्तव बदललं आहे असं तुला वाटतं का कारण अनेकजण जात संपली आहे असं बोलत असतात.

जात संपली आहे ! एकतर असं म्हणणारे लोक ठार अज्ञानी आहेत किंवा जातीचे फायदे उठवण्यात त्यांना अजून रस आहे. जात अजूनही भयावह स्वरुपात टिकून आहे.

 

तू कवितेकडून फिल्मकडं वळलास, तुला हे माध्यमांतर करताना अडचणी नाही आल्या ?

माध्यम म्हणून मला अडचणी आल्या नाहीत. ज्या अडचणी असतात त्या मग जगण्याच्याच अडचणी असतात.

चित्रपट या माध्यमाची मर्यादा नाही का तुला वाटत? म्हणजे “कोसला”तील पांडुरंग सांगवीकर तुझा वेगळा असतो माझा वेगळा असतो. व्हिज्युलायझेशनचं जे स्वातंत्र्य तुला कादंबरी देते ते चित्रपट देत नाही. पात्र लॉक होऊन जातात.

तू म्हणतोस ते बरोबर आहे. या अर्थाने कादंबरी किंवा अगदी कविता देखील प्रभावी माध्यम आहे. पण कादंबरी किंवा कवितेची एक मर्यादा म्हणजे तिची भाषा. मी मराठीतच कविता करु शकतो. चित्रपट या माध्यमातून मी भाषेच्या मर्यादा ओलांडू शकलो. म्हणजे पिफमध्ये शॅले नावाच्या ऑस्ट्रेलियाच्या मुलीनं दोन वेळा फॅन्ड्री पाहिला. बंगलोरमधे थिएटरमध्ये झाडू मारणा-या एका महिलेनं सिनेमा पाहिल्यानंतर मला मिठीच मारली. ती बराच वेळ कन्नडमध्ये काहीतरी बोलत होती. जेव्हा शेजारच्या एका इसमाने मला कन्नड कळत नाही असे तिला सांगितले तेव्हा ती फक्त ब्युटीफुल फिल्म ब्युटीफुल फिल्म असं म्हणत राहिली. सिनेमा हे वैश्विक माध्यम असल्यानं हे शक्य आहे.

 

फॅन्ड्री या सिनेमाच्या निर्मितीमध्ये तुला कोणा-कोणाची मदत झाली ?

या फिल्मची स्क्रिप्ट मी अवघ्या महीनाभरात लिहिली. त्यानंतर ज्योती सुभाष, प्रदीप आवटे, समर नखाते यांनी या पटकथेला ऍप्रिशीएट केलं. त्यानंतर गार्गी कुलकर्णी, प्रियंका दुबे, कुतुबुद्दीन इनामदार, मिथुन चौधरी,पूजा डोळस यांनी मला फिल्मच्या दरम्यान खूप मोलाची मदत केली.

 

मी चुकत नसेन तर केरळ फिल्म फेस्टीवलच्या दरम्यान तुला दाभोलकरांविषयी प्रश्न विचारला होता. काय प्रश्न होता तो ?

 

फॅन्ड्री या सिनेमात चंक्या नावाचं एक पात्र अंधश्रध्दाळू दाखवलेलं आहे. फिल्म पाहिल्यानंतर केरळमधील पत्रकारांना प्रश्न पडला की एवढी समाजसुधारकांची मोठी परंपरा असणा-या महाराष्ट्रात अजूनही अशा प्रकारच्या अंधश्रध्दा आहेत का. त्या संदर्भानं त्यांनी मला प्रश्न विचारला होता. महाराष्ट्र प्रतिगामी असल्याचं तिथं बोललं गेलं तेव्हा मला फार वाईट वाटलं.

 

एक ज्येष्ठ साहित्यिक असं म्हणाले की फॅन्ड्री ही देशीवादी साहित्यिकांना मारलेली चपराक आहे. देशीवाद्यांनी नेहमीच गावगाड्याचं उदात्तीकरण केलं आहे. तुला काय वाटतं?

चपराक मारलेली आहे असं मी म्हणणार नाही कारण ती चपराक मारायची म्हणून मी फिल्म केलेली नाही. चपराक बसली आहे असं मलाही वाटतं.

नेमाडे असो किंवा इतर देशीवादी या सा-यांनी बलुतेदारी असूनही लोक कसे आनंदी होते, गुण्यागोंविद्यानं रहात होते असं सांगितलं आहे . खरंतर असं कधीच नव्हतं.  जरं हे खरं असलं असतं तर पिफमध्ये फॅन्ड्री पाहिल्यानंतर एका दलित मुलानं मला मिठी मारुन कानात नसतं सांगितलं की तो दलित आहे ! फॅन्ड्रीत मी या गावगाड्याचं वास्तव चित्रण करण्याचा प्रयत्न केला आहे.

 

 

तुला असं वाटत नाही का की दिग्दर्शक नागराज मंजुळे कवी नागराज मंजुळेवर अन्याय करतोय? 

(यावर नुसतं हसतं नागराजनं प्रश्न डक केला) 

 

तुझे फ्युचर प्लॅन काय आहेत?

सैराट नावाची आणखी एक फिल्मवर सध्या मी काम करतोय पण खरं सांगू प्लॅनिंग करुन जगावं असं नाही मला वाटत. 

वाट मिळेल तसं जगायचं हाच माझा जगण्याचा प्लान आहे असं वाटतं

-श्रीरंजन आवटे

 

कविता/ लेखन पाठवण्यासाठी पत्ता-eksakhee@gmail.com

 

 

About the Author

साहित्यसंस्कृती