हा देह तुझा....

हा देह तुझा 
----------------------------------

“हा देह तुझा; पण या देहातील तू कोण ?

हा देह तुझा; पण या देहाविण तू कोण ?

हा देह जन्मतो, वाढत जातो सरतो

ना जन्म मरण ना देहातील तो म्हणतो”

रॉय किणीकरांच्या या ओळी मला आठवत होत्या “शिप ऑफ थिसियस” हा आनंद गांधी यांचा सिनेमा पाहताना. अवयवदानाचे मध्यवर्ती सूत्र घेऊन जीवनातील मूलगामी प्रश्नांना भिडणारे हे शिप सर्वार्थाने वेगळे आहे, अभिनव आहे ते आशय,शैली आणि सादरीकरण या सा-याच पातळीवर. हे नावीन्य दिग्दर्शकाच्या दृष्टीतच आहे.सिनेमातील हरेक फ्रेम,सीन प्रचंड बोलका आहे.मुळात या सिनेमात तीन भिन्न कथा एका समान सूत्राने गुंफल्या आहेत.प्रत्येक कथा अस्तित्वविषयक मूलभूत प्रश्न उपस्थित करते.

        डोळे नसताना उत्तम फोटोग्राफी करणा-या मुलीला दिसू लागल्यावर नव्या दृश्य संवेदनेमुळे बदललेले तिचे भावविश्व तिला गोंधळात टाकणारे आहे कारण ही दृश्य संवेदना सुटी नसते. ती इतर संवेदनांसमवेत सुसंघटित झालेली असते.त्यामुळेच कृष्णधवल रंगांमध्ये जगू पाहणा-या मुलीला भरधाव धावणा-या चौकात वेगवान लौकिक जगण्याच्या नानाविध रंगछटा दिसू लागतात. तिला पुन्हा तिच्या “डोळस” जगात जाता येत नाही. नवे डोळे मिळाल्यावर तिचे आरशात पहात स्वतःला निरखत रहाणे विलक्षण लोभसवाणे आहे.एखाद्या नवजात अर्भकाच्या दृष्टीने ती जगाकडे पाहू लागते दुस-या(?) कुणा अनामिकाच्या डोळ्याने.

       दुस-या कथेतला साधू भूतलावरील सर्व प्राणिमात्रांशी नातं जोडू पहातो पण माणूस आणि पर्यावरण यात सीमारेषाच आखता येत नाही कारण माणूस स्वतःच पर्यावरणाचा अविभाज्य भाग आहे.कोणताच घटक सुटा नाही. प्रत्येकाची एक वसाहतच आहे. आपापली अशी एक परिसंस्था आहे. केवळ नाना घटकांची एकत्रित मांडणी त्या एन्टिटीला सजीवत्व बहाल करत नाही. ते असण्यासाठी वा निर्माण करण्यासाठी एखाद्या दुव्याची/कनेक्टिंग फॅक्टरची गरज असते. “पाच आंधळे आणि हत्ती” या गोष्टीत प्रत्येकजण हत्तीच्या एकेका अवयवाची वेगवेळ्या वस्तूंसोबत तुलना करतो किंवा ते अवयव विशिष्ट वस्तू असल्याचा दावा करतो आणि खरे म्हणजे त्या असतातही स्वतंत्रपणे ; पण हत्तीच्या सजीव संघटनाच्या परिसंस्थेत त्यांच्या अस्तित्वाला एक वेगळा आयाम प्राप्त होतो. मागे ओशोंनी एका भाषणात एक किस्सा सांगितला होता. एक राजा नागसेन नावाच्या तत्वज्ञाला राजवाड्यात येण्यासाठी आमंत्रण देतो. राजाचा सेवक राजाचे आमंत्रण घेऊन नागसेनकडे जातो. नागसेनला राजाचा निरोप देतो. नागसेन म्हणतो , “ नागसेन नावाचं इथं कुणी नाही पण तुम्ही मला बोलावत असाल तर मी येतो.” सेवक चक्रावून जातो. तो आजूबाजूच्या लोकांना विचारतो की हेच महाशय नागसेन आहेत का ? तो नागसेन असल्याची खातरजमा करुन सेवक नागसेनला दरबारात घेऊन येतो. सेवक घडला प्रकार राजाला सांगतो. राजा विचारतो, “ नागसेन, हा काय मूर्खपणा आहे- ‘नागसेन नावाचं कुणी नाही पण मला बोलावलं असेल तर येतो.’ या विचित्रपणाचा अर्थ काय ?”

नागसेन म्हणतो, “ महाराज,तुम्ही माझ्यासाठी रथ पाठविलात पण मी म्हणतो हा रथ नाही”

राजा चिडतो. “हा काय मूर्खपणा आहे ?” राजा.

नागसेन रथापासून घोडे वेगळे करतो आणि राजाला विचारतो “ काय हा रथ आहे ?”

राजा म्हणतो, “ अरे हे तर घोडे आहेत.”

नागसेन पुन्हा रथाची चाकं वेगळी करतो आणि राजाला विचारतो, “ काय हा रथ आहे ?”

राजा म्हणतो, “ अरे काय हा वेडेपणा लावलाय. ही चाकं आहेत.”

नागसेन रथाचा एक एक पार्ट वेगळा करत जातो नि राजाला तोच तोच प्रश्न पुन्हा पुन्हा विचारत राहतो. अखेरीस राजाच्या पुढ्यात काहीच रहात नाही.

नागसेन उत्तरतो, “ महाराज, मी आपणाला म्हणालो हा रथ नाही. इथे काहीच नाही. हा सगळा जुगाड आहे. त्याप्रमाणे नागसेन नावाची कोणतीही व्यक्ती नाही. सा-या वेगवेगळ्या घटकांच्या सहजीवी संघटनांचे हे नाममात्र नाव आहे.” 

     अगदी असेच संघटित-विघटित,संश्लेषित-विश्लेषित असे आलटून-पालटून आनंद गांधी अस्तित्वाच्या व्दैती,दुहेरी धारणांबाबतचे सनातन,मूलभूत प्रश्न प्रेक्षकासमोर उपस्थित करतात. माधवाचार्य नामांतरित चार्वाक जेव्हा साधूला भेटतो आणि त्यांच्या वादविवादाच्या दरम्यान साधू सांगतो की व्यक्ती आणि समष्टीला जोडणारा पूल म्हणजे आपला देह होय आणि मग आपली कृती आणि तिचा समष्टीवर होणारा परिणाम याचा सहसंबंध जोडता येतो का याची चाचपणी करणारा साधू प्राण्यांना मारुन औषधं तयार केली जातात म्हणून ते घेण्याचे नाकारतो. चार्वाकला साधूची ही कृती निरर्थक वाटते. त्याच्या मते साधूने औषधं-गोळ्या न घेण्यानं काय फरक पडणार तर साधूचा युक्तिवाद असतो की जर कशानेच काही फरक पडत नसेल तर मग जगणेच निरर्थक आहे. व्यक्ती-समष्टीच्या मधोमध असणा-या मरुभूमीवर जगण्याची अर्थपूर्णता शोधू पहाणारा चित्रपट म्हणूनच अधिक गंभीर प्रश्न उपस्थित करतो.

   तिस-या कथेतला नविन किडनी ट्रान्सप्लान्ट झाल्यानंतर त्याच्या व्यवहारी,लौकिक जगण्याच्या बाहेर डोकावून पहायला लागतो आणि अस्तित्वाच्या गहन प्रश्नातच बुडून जातो. आजीसोबतच्या संवादातून त्याच्या जगण्याबाबतच्या मूल्यात्मक जाणिवेचे विकसन पहायला मिळते. गरीब शंकरला मदत करुनही नविनला हवे ते साध्य करता येत नाही.तो निराश होतो. तेव्हा त्याची अनुभवी आजी शांतपणे म्हणते, “ बेटा इतनाही होता है पर करना चाहिए” त्या आजीच्या वाक्यातून व्यक्त होणारा प्रखर आशावाद सारे उन्हाळे पावसाळे पाहून झाल्यानंतरचा आहे आणि म्हणूनच तो महत्वाचा आहे. सारे हवे तसे घडत नसले तरी किमान एक पाऊल पुढे टाकण्याची किंवा ते टाकण्यासाठी मदत करण्याची वृत्ती सोडता कामा नये हे सांगणारे ते महावाक्य. शेअर बाजारातल्या आकड्यांमध्ये रमणा-या आणि तेच आयुष्य समजणा-या नविनला प्रश्न पडतो- “पुरझे बदल जाने से आदमी क्यू नही बदलता ?” माणसाच्या देहाचे अवयव बदलले तरी तो तसाच राहतो का ? अवयवांचे ट्रान्सप्लान्ट होते तसे संवेदनेचे प्रतिरोपण होत नाही का ? आणि जर माणसाचा देह तसाच रहात असेल तर त्याचे “तसे असणे” टिकवून ठेवणारी गोष्ट काय आहे ? पर्यायाने सिनेमा शाश्वततेचा शोध घेतो. हा शाश्वततेचा शोध मोठा रंजक आहे. गंभीर आहे. आतून हलवणारा आहे.अंतर्मुख करणारा आहे. क्षण आणि युग यांची नस पकडू पाहणारा, नश्वर-चिरंतनाची भेट घडवून आणणारा आहे.

       चित्रपटाच्या शेवटी तिन्ही कथांचे समान सूत्र आकळल्यावर त्यातील व्दैत-अव्दैत भाव ध्यानात येतो आणि तरीही त्याला दैवी स्वरुप नाही. अखेरच्या गुहेतल्या फ्रेमने हा सनातन शोध सूचित केला आहे. स्टेटमेंट केलेले नाही. प्रश्नांकित केलेले आहे. शिप ऑफ थिसियस हे मिथकच मुळी सिम्बॉलिक आहे. जीवनदायी बोटीचा प्रत्येक पार्ट बदलला जातो मग प्रश्न निर्माण होतो ही बोट तीच आहे का ?असेल तर शाश्वत फॅक्टर कोणता आहे जो हे अस्तित्व जतन करतो ?

       स्थळ-काळ-अवकाशाच्या त्रिमितीय प्रतलावरचा प्रत्येक बिंदू विलोभनीय क्षणासारखा, चिमटीत नाही पकडता येत. त्याला पकडेपर्यंत निसटून जातो तो पा-यासारखा. त्याचे अस्तित्व तेवढेच. त्याचा जगण्याचा,तगण्याचा कालावधी तेवढाच. पुन्हा तसे होणे नाही. आभाळाची नक्षी क्षणाक्षणाला बदलत जाते तसेच काहीसे. मग आपल्या आत-आत होत चाललेले हे बदल कसे समजावून घ्यायचे ? मागील क्षणाशी प्रामाणिक राहून त्याच्याशी नातं सांगणार स्वतःतलं स्थित्यंतर कसं आकळून घ्यायचं ?ही प्रश्नांची गुहाच जणू पडद्यावर दिसत राहते. ते पाहताना मला वाटलं आपण जणू जॉन रॉल्सच्या अज्ञाताच्या गुहेत –veil of ignorance कडे चाललो आहोत. प्रारंभाच्या अवस्थेकडे निघालो आहोत. आयडेण्टीटीज वितळण्यासाठी सबंध शारीर अस्तित्वासह जिथे प्रत्येक क्षणाला मरता येईल पुन्हा नव्याने जन्मता येईल आणि ख-या अर्थाने गाता येईल –

“ एकाच या जन्मी जणू फिरुनी पुन्हा जन्मेन मी !”

-श्रीरंजन आवटे

  shriranjan91@gmail.com

About the Author

श्रीरंजन's picture
श्रीरंजन

शैक्षणिक पात्रताः 

फर्ग्युसन महाविद्यालयातून भौतिकशास्त्रात पदवी- 

  स.प महाविद्यालयातून पदव्युत्तर पदवी- राज्यशास्त्र 

  

परिचयः-

  • संपादक, पाखरांची शाळा ( बालकांसाठी्चे मासिक)
  • सल्लागार संपादक, सुंबरान (मासिक)
  • ‘कवितारती’, ‘अक्षर’, ‘परिवर्तनाचा वाटसरु’, ‘ऐसी अक्षरे’(ऑनलाइन दिवाळी अंक), ‘अनाहत’ ( इ-नियतकालिक) यामध्ये कविता प्रसिध्द
  •  दै.सकाळ,लोकमत,दिव्य मराठी,महाराष्ट्र टाइम्स, कृषीवल साप्ताहिक लोकप्रभा,कलमनामा, परिवर्तनाचा वाटसरु, ऐसी अक्षरे,’कलात्म’ मध्ये सामाजिक,राजकीय, साहित्यिक विषयांवरील लेख प्रसिध्द.
  •  ‘जागतिकीकरणाचे चित्रण करणारी कविता’ या विषयावरील राष्ट्रीय चर्चासत्र, मंचर पुणे येथे याच विषयावरील शोधनिबंधाचे वाचन. 
  • अनेक राज्यस्तरीय वक्तृत्व आणि वादविवाद स्पर्धांमध्ये यश संपादन