प्राइड परेड

  प्राइड परेड    
-सुरेश खोले

 

  समलिंगी, विषमलिंगी,तृतीयपंथी, बायसेक्शुअल्स या सा-यांनाच आहे एक नागरिक म्हणून सन्मानाने जगण्याचा अधिकार ! समपथिक ही संस्था हा अधिकार या सर्वांना मिळावा यासाठी प्रयत्नशील आहे. त्यांचा हा अधिकार  आहे हे ठामपणे  सांगण्यासाठी गेली ४ वर्षे ते प्राइड  परेड काढत आहेत. या प्राइड परेडमागील हेतूविषयी आणि लैंगिकतेच्या समाज-राजकीय कंगो-यांविषयी सांगतोय क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्त्री अभ्यास केंद्राचा विद्यार्थी सुरेश खोले

 

पुण्यात नुकताच क्वीर प्राईड परेड म्हणजेच अभिमान मोर्चा झाला. हे त्याचे चौथे वर्ष होते. त्यानिमित्ताने मी इतर चळवळीतील खुप मित्र-मैत्रीणींना आमंत्रित केले होते, त्यांच्याकडून अनेक प्रश्न आले, त्यातील काही प्रातिनिधीक प्रश्नांची उत्तरे देताना आणि ह्यावेळी जरी त्यांनी उपस्थित राहणं जमलं नसेल तरी पुढच्या वेळी नक्कीच त्यांनी जमवावे म्हणून हा लेखन प्रपंच. पुण्यात पहिल्यांदा २०११ च्या डिसेंबर ११ ला प्राईड परेड घेण्यात आली, ह्या वर्षीची ही प्राईड चौथी होती. ह्या वर्षी प्राईड परेडमध्ये ‘य़ंगीस्तान जिंदाबाद’ अशी थीम घेतली गेली होती आणि नवयुवकांनी युवतींनी जास्ती संख्येने सहभागी व्हावे अशी आशा करण्यात आली, त्याप्रमाणे अनेक युवक युवतींनी सहभाग घेतलाही.

पहिल्यांदाच ३००च्या वर मुले मुली ह्या परेडसाठी जमली होती, जरी संख्या आत्ता कमी वाटत असली तरीही पहिल्या प्राईड परेडच्या तुलनेत ही संख्या जवळपास दुपट्टीने वाढत आल्याचे दिसले आहे. आणि मागच्यावेळी जिथे १५० ते १७० लोक आले होते त्या तुलनेत ह्यावेळची संख्या नक्कीच जास्त होती. ह्यावेळी मुंबईहून लक्षणीय संख्येने लोक आले होते. मुंबईच्या प्राईडच्या तुलनेने पुण्याची प्राईड कमी रंगीबिरंगी असते तेही कारण एवढ्या कमी संख्येला आहे. पुण्याच्या प्राईडचे वेगळेपण हे त्याचे खरे कारण आहे; पण ह्या प्रकारच्या शिस्तबध्द आणि सभ्यतेच्या संकेतावर आधारित प्राईडची नक्कीच लोकांना सवय लागेल अशी आशा आहे.

 

कोण आहेत एल-जी-बी-टी-आय? प्राईड म्हणजे नक्की काय?

लेस्बीयन – स्त्री समलिंगींना इंग्रजीत लेस्बीयन म्हणतात. समलिंगीना स्वत:च्या लिंगाच्या माणसांविषयी लैंगिक आकर्षण असते. त्यांच्या शरिरात विषमलिंगी लैंगिकता असलेल्या माणसापेक्षा वेगळे असे काहीच नसते.
गे – पुरुष समलिंगीना इंग्रजी मध्ये गे म्हणतात.
बायसेक्स्युल – पुरुष किंवा स्त्री ज्यांना दोन्हींही लिंगाच्या व्यक्तिंबाबत लैंगिक अभिव्यक्ती असते त्यांना बायसेक्स्युल म्हणतात. ह्यांच्याही शारिरीक पातळीवर विषमलिंगी आकर्षण असणाऱ्या माणसांच्या शरिरापेक्षा काहीच वेगळेपण नसते.
ट्रान्सजेंडर – जे पुरुष किंवा स्त्री म्हणून जन्माला आले असतील त्या विरुध्दच्या लिंगभावाचे असल्याची जाणिव आणि नेणिव असते त्यांना ट्रान्सजेंडर म्हणतात. जन्माला येताना त्यांना दिल्या गेलेल्या लिंगाशी ज्यांना नकारार्थी भावना असतात व आपण त्या विरुध्दच्या किंवा वेगळ्या लिंगाचे आहोत असे ज्यांना वाटते.
इंटरसेक्स – शारिरीक पातळीवर जे जन्माला आल्याच्या वेळेला घोषीत केलेल्या लिंगाविरुध्दचे लिंग असल्याचे जेव्हा त्यांच्याकडून सांगितले जाते, आणि तशा प्रकारचे शारिरीक बदलही ते करुन घेतात, त्यांना इंटरसेक्स म्हणले जाते. शारिरीक बदल फ़क्त इंटरसेक्स व्यक्तिंच करुन घेतात किंवा ते बदल आधीपासूनच अस्तित्वात असतात.
हिजडा समाजाचे लोक हे ट्रान्सजेंडर आणि इंटरसेक्स ह्या दोन्हींही मध्ये येऊ शकतात. शारिरीक बदल न करुन घेतलेल्या व्यक्ती स्वत:ला ट्रान्सजेंडर, तर बदल करुन घेतलेल्या व्यक्ती इंटरसेक्स म्हणवतात. बहुतांश हिजडा समाज ह्या इंग्रजी भाषेपासून संकल्पनांपासून दूर असल्याने त्यांना हे शब्द माहित नसतात. त्यामूळे ते स्वत:ला हिजडा ह्याच शब्दाने संबोधतात.
ह्या सगळ्या लोकांनी आपले विशिष्ट प्रदेशातील अस्तित्व दाखविण्यासाठी काढलेल्या मोर्च्याला प्राईड परेड म्हणले जाते. अश्या प्रकारची प्राईड परेड पहिल्यांदा न्यु यॉर्क शहरामध्ये २८ जुन १९७० साली घेण्यात आली आणि नंतर जगभरात अश्या प्राईड परेड घेण्यास लोकांनी सुरुवात केली. ह्यांचा हेतू शहरातील लोकांना स्वत:चे अस्तित्व दाखवून देणे इतकाच होता.

काय आहे हा अभिमान मोर्चा? कोण सहभागी होतं? कोण करतं हा मोर्चा? पुण्यातसुध्दा अश्या गोष्टी होतात?

क्वीर प्राईड परेड म्हणजे समलिंगी, द्वीलिंगी, सर्वलिंगी लैंगिकतेच्या आणि तृतीय पंथी, हिजडे, आणि क्वीर ह्या सगळ्यांच्याच म्हणजेच लैंगिकता हक्कांच्या चळवळीचे एक महत्वाचे हत्यार आहे. वर्षातून एकदा काढण्यात येणाऱ्या ह्या मोर्च्यामध्ये सहभागी होऊन, ह्या सगळ्या लोकांनी “आम्ही ह्या शहरात अस्तित्वात आहोत, आणि आम्ही अभिनाने हे सांगतो आहोत” हे सांगण्यासाठी हा मोर्चा काढला जातो.
हा मोर्चा खरेतर एक मैलाचा दगड आहे. कारण, त्या मोर्चात सहभागी होण्यासाठी तुम्ही तसेही समाजात समलिंगी म्हणून माहिती असता. त्यानंतरच तुम्ही मोर्चात उघडपणे सहभागी होता. त्यामुळे समलिंगी किंवा एकूणच लैंगिक अल्पसंख्यांकांच्या आयुष्यातला हा एक महत्वाचा क्षण आहे, जेव्हा एखादा व्यक्ती खुलेपणाने समलिंगी म्हणून आपले आयुष्य जगतेय, सन्मानाने जगतेय, त्या वैयक्तिक जगण्याचा सामूहिक अविष्कार म्हणजे प्राईड परेड होय.  अनेक किशोरवयीन समलिंगी जे नुकतेच आपल्या लैंगिक जाणिवा आणि समाजातील नीती नियमांच्या विषमलिंगी स्वरुपाला सामोरे जात असतात, त्यांच्यासाठी हा मोर्चा खुप महत्वाचा आधार बनतो.
ह्या मोर्च्यामध्ये अनेक विषमलिंगी लैंगिकतेची म्हणजेच लौकिक अर्थाने ज्यांना ‘सामान्य’ म्हटले जाते ते ही सहभागी होतात. लैंगिक अल्पसंख्यांकांच्या बरोबरीने ते उभे आहेत असा त्याचा अर्थ आहे. अनेक संस्थाही ज्या लैंगिकतेच्या विषयावर प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे काम करतात त्याही ह्या मोर्च्यामध्ये लैंगिक अल्पसंख्यांकाच्या हातात हात घेऊन ह्या मोर्च्यात उतरतात. मानवी हक्कांच्या संरक्षणासाठी लढणाऱ्या आणि स्त्रीयांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या संस्थांचा ह्यात सहभाग आहे.   
त्यासाठी पुण्याच्या प्राईड परेडचे स्वरुपही पूर्णच वेगळे आहे. त्यात सहभागी होताना सर्वांना कडक सुचना असतात. आणि रस्त्यावर वागण्याच्या कमाल सभ्यतेच्या संकेतांचे पालन करितच ह्या मोर्चा प्रत्यक्षात आणला जातो. ह्या वर्षीच्या मोर्च्यामध्येच काही जणांनी पिसे लावलेले मुकूट किंवा टोप्या घातल्या होत्या.
प्राईड परेडचे इतर सर्वच ठिकाणचे स्वरुप खुप वेगळे असते. ज्यामध्ये रस्त्यावर येऊन उच्छाद मांडणे आणि सामाजिक नितीनियमांबरोबच अनेक संकेतांचे आम्ही पालन करत नाही हे जाहीररित्या दाखविण्यासाठी प्राईड परेड घेण्यात येते. आणि प्राईड परेडमध्ये जास्तीत जास्त विचित्र, वेगळे, अगदीच अंगावर येतील अश्याप्रकारची वेशभुषा केली जाते. परंतू पुण्याच्या प्राईड करताना समपथीक ट्रस्टने आयोजनाच्यासाठीच्या बैठकीमध्येच आपली प्राईड कशी वेगळी असेल ह्याबद्दलच्या चर्चांना आणि योजनांना सुरुवात केली होती.  
पुणे शहर काही तुटपुंज्या उधारीच्या पुरोगामी लोकांचा अपवाद सोडता अगदीच पारंपरिक आणि बुरसटलेल्या बाजाचे शहर आहे. पुणे शहरात अश्या प्रकारचा मोर्चा आयोजित करणे हे दिव्य समपथीक ट्रस्टच्या संस्थापक, संचालक बिंदूमाधव खिरे यांच्या गेल्या एक तपाहूनही अधिक काळच्या प्रयत्नांचे फ़लित आहे. अशा प्रकारच्या मोर्च्यांसाठी अनेक प्रकारच्या सरकारी परवानग्यांपासून ते लोकांना प्रत्यक्षात मोर्च्यासाठी एकत्र करण्यापर्यंतच्या सर्वच बाबी त्यांनी समर्थपणे पार पाडल्या आहेत.
खास करुन पोलिसांमध्ये केलेल्या जनजागृती कार्यक्रमांमुळे पोलिसांची खरेतर खूपच मदत ह्या चळवळीला झालेली आहे. ह्या शहरात झालेल्या तिसऱ्या परेडचे स्वागत पोलिसांनी स्वत: गुलाबाची फ़ुले देऊन केलेले आहे. पोलिसांनी लैंगिक अल्पसंख्यांकांच्या चळवळींना अश्याप्रकारचा पाठिंबा देणे ही बाब भारतात तरी इतरत्र कुठेही घडलेली नाहीये. ह्याचे सगळे श्रेय बिंदूमाधव खिरे यांच्या कार्याला जाते.  
वरच्या मुद्यांवरुन हे लक्षात येतच असेल की, पुण्यात होणारी प्राईड परेड ही इतर ठिकाणी झालेल्या प्राईड परेड पेक्षा वेगळीच आहे. किंबहुना पुणे शहरासाठी म्हणून त्या प्राईड परेडचे स्वरुपच वेगळे झालेले आहे.

 

इतर चळवळींनी ह्या प्राईडला का यावं? आम्ही विषमलिंगी/हेटरोसेक्युल लोकांनी का यावं?

मुळातच लैंगिकता आणि लिंगभाव ह्या गोष्टी काही फ़क्त एखाद्याचा खाजगी मुद्दा नाही, ते एक मोठी सामाजिक राजकिय वास्तव आहे. मानवी हक्कांच्या संदर्भातल्या सर्वच चळवळींना ह्या मुद्यावर बोलणे काम करणे हे त्यांच्या स्वत:च्या चळवळींसाठी आवश्यक आहे.
ज्या ज्या चळवळींना असे वाटते की, विषमलिंगी लैंगिककता आणि जाती-पितृसत्ता ह्या विशिष्टप्रकारच्या लिंगभावाच्या आधारे टिकवून ठेवल्या जातात आणि त्यातूनच शोषणव्यवस्था जन्माला येतात त्या सर्व चळवळींनी, व्यक्तिंनी, संस्थांनी ह्या परेडमध्ये सहभागी व्हावे. ही परेड जशी लैंगिक अल्पसंख्यांकांसाठी आहे तशीच ती लैंगिकतेच्या शोषणव्यवस्थांच्या विरोधातही आहेच.
लैंगिकतेच्या आणि लिंगभावाच्या सामाजिक परिघीकरणाशी इतर सगळ्याच सामाजिक परिमाणांचा संबंध येतोच. त्यामुळे जातिअंतांच्या चळवळी, स्त्रियांच्या चळवळी, स्त्रियांसाठी काम करणाऱ्या पुरषांच्या चळवळी, साम्यवादी, समाजवादी ह्या सगळ्यांनीच ह्या मोर्च्याशी आणि जमल्यास चळवळीशी जोडून घ्यावे.
बाबासाहेबांनी आपल्या जातीविषयक लिखाणामध्ये म्हटलेच आहे की, स्त्रिया ह्या जातीच्या द्वाररक्षक आहेत. आणि स्त्रियांच्या लैंगिकतेच्या नियंत्रणावरच जातीव्यवस्था टिकवली जाते. त्याचप्रमाणे फ़ुले यांनीही स्त्रियांच्या लैंगिकतेवर प्रत्यक्ष संस्था उभ्या करुन काम केले आणि दाखवून दिले की, लैंगिकता आणि शरीरं कशा प्रकारे जातीव्यवस्थेद्वारे नियंत्रित केली जातात. त्याविरुध्द काय केले पाहिजे, हे त्यांनी बालहत्या प्रतिबंधक गृह आणि नाभिकांच्या संपाद्वारे दाखवूनही दिले. त्याचबरोबर शरद पाटील यांच्याही लिखाणांमधून स्त्रीसत्तेचा पाडाव आणि पुरुषसत्तांचा उदय ह्या बाबी स्त्रियांच्या लैंगिक नियंत्रणाशी आणि स्त्रीयांच्या लैंगिक कलंकीकरणाशी जोडलेले असल्याचे दाखविले आहेच.
पण प्रत्यक्षात जेव्हा आपण जातीचे मुद्दे ऐरणीवर आणतो तेव्हा लैंगिकता हा मुद्दा आणि लैंगिकतेवर असलेले पितृसत्तेचे नियंत्रण ह्या बाबींसाठी जातीअंताच्या आणि वर्गांताच्या चळवळींनी काय करता येईल ह्याचा विचार अजूनही होताना दिसत नाही.
जास्तीत जास्त विचार लैंगिक नात्यांच्या आंतरजातीय विवाहापर्यंत जातात, पण विवाहसंस्थेच्या ब्राह्मणी स्वरुपाला आणि त्यातल्या पित्रुसत्ताक छुप्या संरचनांना धक्का दिला पाहिजे हा विचार अजुनही पुढे येताना दिसत नाही. तेव्हा तशा प्रकारची संधी लैंगिकता हक्कांच्या चळवळींमध्ये नक्कीच आपल्याला मिळते असे मला वाटते.
याशिवायही लैंगिकता हक्कांच्या चळवळींचे अभिजनवादी मुखचित्र आहे तेही मोडून काढणे गरजेचे आहे, कारण त्या मुखचित्रामुळे जेव्हा लैंगिक हक्कांच्या चळवळींच्या आत होणारी जातीय उतरंड आणि नव्याने उभ्या होत असणा-या सामाजिक संस्थामधील जाती-पितृसत्ता आपल्याला मोडता येईल. अंतर्गत श्रमविभाजन आपण पाहु तेव्हा त्यातही जास्तीत जास्त प्रत्यक्ष लैंगिक हक्कांच्या चळवळींचे प्रत्यक्षातील जमीनीवरचे काम हे हिजडा आणि लैंगिक सेवा पुरविणाऱ्या स्त्रीयांनी केल्याचे दिसते. तेव्हा लैंगिक चळवळीमधील दलित घटकांना दलित चळवळीनी स्वीकारुन आपल्या जातीअंताच्या चळवळीचा भाग म्हणून सामावून घेतल्यास त्यातून दोन्हींही चळवळी समृध्द होण्यास मदत होईल असे मला वाटते.
कायद्यांच्या पातळीवरही महाराष्ट्र राज्य धोरण २०१४ मध्ये हिजड्यांना समाविष्ट करुन घेण्यात आलेले आहे. हिजड्यांसाठी खास प्रकारची सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला अश्या नव्याच प्रवर्गाची निर्मिती करण्यात आलेली आहे.
भारत देश हा अनेक आंतरराष्ट्रीय करारांना बांधील असल्याने त्यांना काही वर्षांतच त्यांना समलिंगी विवाह कायदेशीर करावा लागणार आहेच. त्याचबरोबर मग विवाहसंस्था तिचे कायदे, वारसाहक्काचे कायदे, इ. मध्ये बदल होणे अपरिहार्य आहेतच. अशा अनेक कायद्यांमध्ये जेव्हा बदल केले जातील तेव्हा त्या बदलांचे जाती, वर्ग, लिंगभाव, प्रदेश, इ निहाय सर्वच समाजाच्या मूळ साच्यामध्येच संस्थात्मक बदल केले जातील.
त्या बदलांच्या दरम्यान आपापल्या चळवळींच्या राजकारणाला नवीन वळण मिळणार आहेतच. त्यामुळे त्यामध्ये आत्ताच सहभागी होऊन आपल्या राजकारणांची युती झाल्यास जाती-पितृसत्ताक व्यवस्थांशी लढा थोडासा सुकर होईलच. 

        

एकूणच ह्या प्राईड परेडच्या निमित्ताने लैंगिकता हक्कांच्या चळवळीची एक महत्वाची घटना असलेल्या ह्या परेडविषयी आणि चळवळींच्या एकमेकांशी असलेल्या संवादांना वाचा फ़ोडण्यासाठीची ही सुरुवात होऊ शकते असे मला वाटले. ह्यातून पुढच्या संवादाच्या आशा निर्माण होतील आणि काही संवाद होतील अशी कामना करुन मी हा लेखन प्रपंच संपवितो.

 

सुरेश खोले.

( क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्त्री अभ्यास केंद्राचा  विद्यार्थी असलेला सुरेश विविध समाज-राजकीय चळवळींशी जोडला गेलेला आहे) 

About the Author

सुरेश खोले's picture
सुरेश खोले