घर सोडताना

घर सोडताना त्याच्या डोळ्यात दाटलेलं आषाढीचं आभाळ सांगतो आहे राम जिरवणकर

---------------------------

 

 

   घरात भरलेली बॅग त्याने पुन्हा एकदा उचलून पाहिली व खाली ठेवली. देवघरात तो गेला, हात जोडले  तेवढ्यात त्याच्या आईची हाक आली. प्रार्थना अर्धवट आटोपून तो बाहेर आला. आईच्या सांगण्यावर तो सगळ्यांच्या पाया पडत होतो. काका, काकू, आजी, शेजारची एक मावशी सगळेच जमले होते तो वीस वर्षाचा झाला तरी त्याच्या आजीने तिच्या मळकट बटव्यातून पन्नास रुपयाची एक नोट काढून  त्याला दिली व त्यानेही ती न  संकोचता स्वीकारली.

  अंगणात येऊन तो तुळशीच्या पाया पडला. भरलेली एक बॅग त्याने उचलली व दुसरी बॅग त्याच्या छोट्या भावाने उचलली तेवढ्यात त्याची आई ओरडली, ती बॅग जरा सांभाळून ने त्यात खायचं सामान आहे नायीतर रस्त्यान भुगा होईल. तो घर सोडत होता तेव्हासगळेच त्याला ‘आता अभ्यास कर बर’ एवढंच सांगत होते तोही या वातावरणाने भारावला होता. आपलंच घर आपल्याला एक पाहुणा म्हणून वागवतय हे बघून तो आनंदलाही होता व दु:खीही झाला होता. बरं येतो आता, म्हणून हा चालू लागला. याच्या समोर त्याचा छोटा भाऊ बॅग घेऊन पुढे झाला, घराच्या भिंतीला बसून त्याचे आजोबा बिडी पीत बसले होते त्यांच्या कडे बघून ह्याच्या डोळ्यात पाणी आलं; पण घराबाहेर रहायला लागल्यापासून डोळ्यातलं पाणी, डोळ्यात लपवायला तो चांगलाच तरबेज झाला होता.

त्याच्या छोट्या भावाने सायकल काढली. एक बॅग कॅरिअरला व एक बॅग हॅन्डलला लटकवून तो त्याच्या दादा बरोबर चालू लागला. रस्त्यावर भेटणारे काही ओळखीचे लोक परत आता कधी येणार, असे विचारत होते. गल्ली सोडता-सोडता हळूच त्याचे पाय एका घरासमोर अडकले व त्याने वर बघितलं; पण तिथे कोणीच नव्हत हे त्याच्या बालपणीच्या मैत्रिणीच घर आपल्या दादाला अस अडखळतांना बघून त्याला हसू आल;पण आपला छोटा भाऊ आपल्यावर हसतांना बघून तो चिडला. “चल मुकाट्यान” म्हणत दोघंही निघाले, फाट्यावर आले. सायकलवरच्या बॅगा काढून त्याने अॅटोत ठेवल्या व खिशातली आजीने दिलेली पन्नास रुपयाची नोट तो भावाला देऊ लागला. “हे पैसे मला मायने दिलेत, तू घे अन तिला काही सांगू नको”.

“नको रे दादा आहेत माझ्याकडे”,असं म्हणत त्याने ते नाकारले तेवढ्यात रिक्षा सुरु झाली.

“तू आता सरळ घरी जा, इकड तिकडं फिरकू नको”, असं म्हणत तो अॅटोत बसला व निघून गेला.

अॅटोतून दिसणारी दोन्ही बाजूची हिरवळ, काही वाळकं गवत, त्यातही आनंदाने चरणारी गुरं-ढोरं, राबणारे हात हे सारं बघत मनात कसलातरी विचार करत तो खिन्न मनाने बसला होता. तेवढ्यात त्याचं लक्ष अॅटोच्या समोरच्या काचांकडे गेलं मागून त्याचा छोटा भाऊ सायकलवर येत होता जवळ-जवळ अॅटोच्या  स्पीडने सायकल चालवत होता. त्याला बघून हा फार चिडला जाऊदे पैसे घ्यायला आला असेल असं म्हणत त्याने थोडसं दुर्लक्ष केलं. एकदाचं बसस्टॅन्ड आलं. अॅटोतून त्याने बॅगा खाली उतरवल्या, अॅटोचे पैसे दिले. “चला या राजे” असं म्हणत अॅटोवाला निघून गेला. तेवढ्यात याचा छोटा भाऊ आला, त्याला बघून याने हात उगारत म्हणाला “मूर्खा, तुला इकडे कोणी यायला सांगितलं होत! तो मात्र भीत-भीतच बोलू लागला.  “चल धरू लाग ही बॅग ही” आता असं म्हणत त्याने एक बॅग स्वतः घेतली व छोट्या भावासाठी एक बॅग सोडून तो बसस्टॅन्ड मध्ये निघाला तो बिचारा त्याच्या मागे-मागे ओझं सावरत येत होता. गाडी लागलेलीच होती, जागा मिळाली, बॅगा ठेवल्या व दोघंही खाली आले. पुन्हा त्याने खिशातली पन्नास रुपयाची नोट काढली व आपल्या छोट्या भावाच्या हातात दिली. नको रे दादा आहेत माझ्याकडे, म्हणत पुन्हा त्याने नाकारले व स्वता:च्या खिशातून शंभर रुपयाची नोट काढून त्याच्या दादा ला म्हणाला दादा हे घे तुला पैसे एरव्ही ते तुलाच लागतात. एवढे पैसे तुला कुणी दिले हा प्रश्नार्थक भाव त्याच्या चेह-यावर होता. मग त्याने सगळी कहाणी सांगितली व तो ते पैसे आपल्या भावाला देऊ पहात होता. आपल्या छोट्याकडे बघून नकळत त्याच्या डोळ्यात पाणी आलं. “घे रे दादा, माझ्याकडे आहेत अजून”, असं म्हणत, त्याच्या छोट्या भावाने पुन्हा हात पुढे केला व त्यानेही ते पैसे घेतले व सरळ तो गाडीत जाऊन बसला त्याच्याकडे शब्दही नव्हते व माफी साठी वयही नव्हतं. खिडकीतून दिसणाऱ्या व डोळ्यातील थेंबामुळे धूसर-धूसर होत जाणाऱ्या आपल्या भावाच्या त्या निरागस प्रतिमेकडे तो एकटक बघत होता. ज्याला छोटा म्हणून हिणवत होतो तो आज खरच किती मोठा झाला होता! बाजारच्या दिवशी त्याला तीन व मला दोन जिलब्या का अस म्हणत रडणारा मी मात्र अजून ही तेवढाच होतो पण तो खरच किती मोठा झालाय!

 त्याच विचार चक्र चालूच होत.

डोळ्यातल्या खारट पाण्याबरोबर त्याच घर, त्याची माणस, जिथं पाय अडकले ते दार, व स्वतः पेक्षा कितीतरी मोठा झालेला आपला भाऊ हे सारेच सप्तरंगी चित्र त्याच्या हृदयात जिवंत झाले होते. खरतर तोच आज जिवंत झाला होता जिवंत !

आणि गाडी सुरु झाली होती !

 

राम जिरवणकर.
ram24.j@gmail.com

About the Author

राम जिरवणकर's picture
राम जिरवणकर