
"चार नगरातील माझे विश्व"
डॉ. जयंत नारळीकरांच्या चार नगरातील माझे विश्व या आत्मचरित्राला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला. त्यानिमित्त या आत्मचरित्राचा परिचय करुन देत आहेत सई कोडोलीकर
------------------------------
डॉ. जयंत नारळीकरांच्या 'चार नगरातील माझे विश्व'ला साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला . हे एक नितांतसुंदर, ओघवतं, निर्भेळ आत्मचरित्र आहे. अगदीच प्रामाणिक, कसलाच मोठेपणाचा तोरा नसलेलं, साधंसुधं, आजपर्यंतच्या आयुष्याची गोष्ट कसला आडपडदा न ठेवता सांगणारं. यातली भाषा आपुलकीची आहे.
बनारस हिंदू विद्यापीठामधे वाढलेल्या शिकलेल्या माणसाची असूनही मराठी मात्र पुण्यामुंबईची, म्हणजे रोजच्या ओळखीची. वाराणसी, केंब्रिज, मुंबई आणि पुणे या चारी शहरातली वास्तव्यं हा खरंतर अनुक्रमे त्यांच्या प्रगतीचाच आलेख, पण त्रयस्थपणे, अत्यंत संयतपणे मांडलेला. ही रूढार्थाने आत्मकथा असली तरी तिला एक उच्च साहित्यिक मूल्य आहे.
उच्च विद्याविभूषित आई-वडिलांमुळे या दोघा भावांना बालपण फार समृद्ध लाभलं. डॉक्टरांनी बनारस युनिव्हर्सिटीतलं वातावरण खुप सुरेख चितारलंय. वडील रँग्लर आणि मुलगाही रँग्लर अशा दुर्मिळातील दुर्मिळ घटनेचे, केंब्रिज परिसर, तिथल्या इमारती, परंपरा, देशोदेशीचे विद्यार्थी, प्राध्यापकांचे नमुने, ऑक्स्फर्डशी सततच्या निरोगी स्पर्धात्मक वातावरणाचं, त्यांनी केलेल्या सहलींचं सुंदर वर्णन मंत्रमुग्ध करतं.
त्या पती पत्नींचा अभ्यास, संशोधन, नोक-या, इंग्लंडातली जिवलग भारतीय मित्रमंडळी, नारळीकरांचे गाईड फ्रेड हॉईल आणि डॉक्टरांपेक्षा वयाने कितीतरी ज्येष्ठ असलेले 'ए पॆसेज टू इंडिया'चे लेखक इ. एम्. फॉर्स्टर या दोघांशी निर्माण झालेले दृढ मैत्र, टीआयएफआरमधली कारकीर्द आणि नंतर आयुका उभारणी हेदेखील वाचनीय अनुभव आहेत.
मंगलाताईंसारखी तोडीस तोड बुद्धिमान पत्नी लाभल्यामुळे त्यांना त्यांच्या संशोधनावर लक्ष केंद्रित करता आले. एरवी इतर कुणाबाबतीत हे चित्र वेगळं दिसू शकलं असतं; पण ही दोघंही पाय जमिनीवर असणारी माणसं आहेत. त्यांना मुंबईत स्थलांतर केल्यावर आलेल्या अडचणी वाचताना आश्चर्य वाटत रहातं. तिन्ही मुलीही पुढे त्यांचा वारसा चालवणा-या आहेत.
तसं बघायला गेलं तर एका संशोधकाचं एक सरळसोट आयुष्य आहे पण त्या आयुष्याने मला मात्र खिळवून ठेवलं आणि मनावर कायमचा एक सुखद आदरणीय पगडा निर्माण केला हे सत्य. योगायोगाने दोन वर्षांपूर्वी ख्रिसमसच्याच काळात पंधरा दिवस या ठोकळ्यात अगदी रमून गेले होते. वाचल्यावर वाटलं, त्यांनी ही गोष्ट लिहीली ते बरं झालं, अशीही माणसं असतात ह्यावर विश्वास बसला. पुरस्कार अगदी योग्य पुस्तकाला मिळाला, डॉ. नारळीकरांचे मन:पुर्वक अभिनंदन.
सई कोडोलीकर