
साने गुरुजी हे व्यक्तिमत्व खऱ्या अर्थाने कधी आपल्यापर्यंत पोहोचलेच नाही. कधी त्यांना आपण उदात्त मातृभक्तीत गुरफटवून टाकले तर कधी त्यांच्या भाबडेपणावर उगाच हसून खिल्ली उडवली;पण त्यांच्या विचारांचा टीकात्मक पद्धतीने उहापोह करण्याचा प्रयत्न कितीजणांनी केला आहे? त्यांनी स्थापिलेल्या ‘आंतरभारती’सारख्या संस्थांचे महत्व आपल्याला पटलेले आहे का? लोकांपर्यंत त्यांचे महत्व पोचलेले आहे का?
साने गुरुजींकडे चौकटी बाहेरुन पाहते आहे राज्यशास्त्राची लेक्चरर आणि कवयित्री गायत्री लेले
----------------------------------
माझे चौथी पाचवीपर्यंतचे आयुष्य मला एकाच लेखकाने व्यापलेले आठवते. तो लेखक म्हणजे साने गुरुजी. साने गुरुजी हा माझा एक हळवा कोपरा होऊन बसला होता. गुरुजींशी माझी ओळख त्यांच्या 'गोड गोष्टीं'मधून झाली आणि त्यानंतर शामच्या आईने मला वेड लावले होते. 'शाम' आणि 'धडपडणारा शाम' ही पुस्तकेसुध्दा मला तितकीच भावली होती. त्यावेळेस छोट्या शामशी मी स्वतःला रिलेट करू शकत होते, त्याच्यात स्वतःला पाहू शकत होते आणि म्हणूनच कदाचित इतकी समरस होत होते. गुरुजींच्या इतर विपुल अशा साहित्याशी नंतरच्या काळात तोंड ओळख झाली, आणि मग साने गुरुजी हे काय रसायन असेल याचा थोडाफार अंदाज येऊ लागला. मग माझ्या आयुष्यातली ‘शाम’ ची फेज संपुष्टात येऊन साने गुरुजींकडे लेखक म्हणून, माणूस म्हणून निराळ्या रीतीने पाहावेसे वाटू लागले.
पण माझ्यावरचा श्यामचा प्रभाव पूर्णतः गेला का? मला वाटत नाही. आज इतक्या वर्षांनी त्यांच्यावर लिहितानासुध्दा मी शामकडे तितक्याच मैत्रीपूर्ण भावनेने पाहू शकतेय, त्याच्या गोष्टींत पुन्हा गुंतू शकतेय, पूर्वीच्याच आस्थेने! आज त्याला अधिक जवळून, समीक्षक नजरेने पाहण्याची शक्ती माझ्यात आहे , त्याच्यावर मला टीकासुध्दा करू वाटते; पण कुठेतरी अजूनही, त्याचे दोष पोटात घालावेसे वाटतात. कुठेतरी अजूनही तो अगदी जवळचा, बेस्टफ्रेंड वाटतो. कुठेतरी अजूनही, तो भेटतो, मला माझ्यात.. पुन्हा पुन्हा!
साने गुरुजी वाचताना पूर्वी मला त्यांच्या गोष्टी भावत असत. त्या गोष्टींमधून ते जे विचार सांगू पाहत, ते तेवढेसे समजत नसत;परंतु आता मात्र ते समजतात, अंतर्मुख व्हायला लावतात. पूर्वी गोष्टींत विचार आहेत असं वाटायचं. आता मात्र वाटतं की, गुरुजींनी विचारांना गोष्टींचं रूप दिलं आहे. आणि तेही किती सहज, ओघवत्या शैलीत आणि निरागसपणे!
गुरुजींचं मन अत्यंत संस्कारक्षम आणि संवेदनशील होतं. कुठल्याही गोष्टीचा त्यांच्यावर अगदी चटकन परिणाम होत असे. त्यामुळेच कदाचित ते जातील त्या क्षेत्रात स्वतःचा ठसा उमटवू शकले, इतरांवर स्वतःचा प्रभाव पाडू शकले. कधीतरी वाटतं, हा अति विचारी- संवेदनशील स्वभावच त्यांना घातक ठरला का? स्वतःवर प्रमाणाबाहेर टीका करणं, स्वतःला कमी लेखणं, सतत आत्मपरीक्षण करणं या सगळ्याचाच फार उद्रेक झाला का? गुरुजींचं नंतरचं जगणं आणि अंतिमतः त्यांची झालेली घुसमट याची मुळं या शाममध्ये दडलेली आहेत का? जितका विचार करू तितकं सारं कठीण होत जातं.
'शामची आई', 'शाम' आणि 'धडपडणारा शाम' या पुस्तकांतून त्यांनी स्वतःच्या जीवनातल्या घडामोडींचा आधार वेगवेगळे विचार मांडायला घेतला आहे. ते अधिक स्पष्ट करण्यासाठी कधी ते इतर साहित्यिकांच्या लेखनाचा दाखल देतात, तर कधी लोककथा-गीते-पुराणकथा-कविता-संस्कृत श्लोकांचा आधार घेतात. या सर्व गोष्टींची एकूण व्याप्ती आणि बाज ध्यानात घेतला तर साने गुरुजी हे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व म्हणून समोर येते.
' धर्म' आणि 'जात' माणसाबरोबर नाईलाजास्तव चिकटून आलेल्या गोष्टी. कितीही नाकारायच्या झाल्या तरीही सुटता सुटत नाहीत. स्वतःला सोडवून घेण्याच्या लढाईत माणूस हतबल मात्र होतो. गुरुजींना कुठेतरी ही हतबलता आली होती का? 'अक्काचे लग्न' (शामची आई, रात्र दुसरी) या गोष्टीत हुंड्याविरोधात बोलताना ते म्हणतात- ' गायीसही विकू नये असे सांगणारा माझा थोर धर्म; परंतु त्याच धर्माचे अनुयायी मुलामुलींसही विकतात यापरता अधर्म कोणता?' खरेच! हुंडा देणे असो, कन्यादान करणे असो वा लाजाहोमासारखी पद्धत असो… हे मुलींना वस्तुप्रमाणेच वागवणे नाही का? धर्म खरोखरीच का असे सांगत असेल?
धर्मग्रंथ, पोथ्या, पुराणकथांबाबतही गुरुजींचे विचार अत्यंत परखड आणि पुरोगामी होते. 'शाम' मध्ये एके ठिकाणी त्यांनी म्हटले आहे- '' ज्या शनिमहात्म्याला लहानपणी मी विकत घेतले ते समाजातून कधी एकदा नाहीसे होईल असे मला झाले आहे.… सुटसुटीत, सोपे ग्रंथ निर्माण झाले तर आपोआप ही शानिमहात्म्ये आणि गुरुचरित्रे बंद पडतील. … बावळट श्रद्धेला मूठमातीच दिली पाहिजे. '' एके ठिकाणी तर श्रीमंतांचे लोणी चोरून गरीब सवंगड्यांना देणाऱ्या गोपाळकृष्णास त्यांनी ' भारतवर्षातील पहिला साम्यवादी महात्मा' असे म्हटले आहे! आता ही अतिशयोक्ती किंवा आत्यंतिक भाबडेपणा वाटू शकतो. परंतु पुढे समाजवादी विचारांशी नाळ जुळलेल्या साने गुरुजींच्या विचारबैठकीचा अंदाज या अशा वैचित्र्यपूर्ण विश्लेषणातून येतो.
लग्नसंस्थेबाबत, समाजातील स्त्रियांच्या स्थानाबद्दलही त्यांच्या निश्चित अशा धारणा होत्या. आपल्या ' अर्धनारी नटेश्वर'( श्यामची आई, रात्र २३ वी) या गोष्टीत ते म्हणतात- ''अर्धनारी नटेश्वर हे मानवाचे ध्येय आहे. पुरुषांच्या हृदयात स्त्रीगुण येणे व स्त्रीजवळ पुरुषगुण येणे म्हणजे विवाह होय.' विवाहाची ही किती साधी सरळ व्याख्या आहे! टोकाची पुरुषप्रधान व्यवस्था आणि टोकाचा स्त्रीवाद यातून काढलेला हा सुवर्णमध्य आहे. कितीजणांना तो रुचेल आणि पटेल?
साने गुरुजी निस्सीम देशभक्त होते. ते एक कट्टर गांधीवादी, विनोबा भावेंचे निकटचे सहकारी होते. स्वातंत्र्यलढ्यात भाग घेता यावा म्हणून त्यांनी शाळेतली नोकरी सोडून दिली. आपल्या आयुष्याचा उत्तरार्ध त्यांनी गावोगावी विचारजागरण करण्यात, लेखनात आणि लढ्यात सक्रिय होण्यात घालवला. '' खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे'' असं म्हणणारे साने गुरुजी '' आता उठवू सारे रान, आता पेटवू सारे रान'' असंही म्हणत असत. किती भावभावनांचा कल्लोळ सतत त्यांच्या मनात सुरु असेल!
गुरुजी सच्चे देशभक्त होते, पण ती देशभक्ती आंधळी नव्हती. आपल्या समाजातले गुण-दोष त्यांना पक्के ठाऊक होते. स्वातंत्र्य, खऱ्या अर्थाने, समाज उत्क्रांत झाल्याशिवाय व विकासाच्या एका टप्प्यावर येउन पोहोचल्यावर मिळत नाही हे सत्य ते जाणून होते. एका जागी ते म्हणतात- "… आपणांत सहकार्याचा पूर्ण अभाव अहे. सामुदायिक भावना आपल्यात नाही. व्यक्तीला आपण क्षणभरही विसरत नाही. सहकार्य तेव्हाच असेल जेव्हा व्देष आणि मत्सर नसेल''. तेव्हा त्यांनी लिहून ठेवलेली ही वाक्ये आजही किती लागू पडतात!
जगाला शहाणं करणाऱ्या गुरुजींचे वैयक्तिक आयुष्य मात्र तितकेसे आनंददायी आणि सुखी नव्हते. कसलातरी असह्य त्रास त्यांना सतत होत असे. स्वतःनेच निर्माण केलेल्या अवास्तव आदर्श कल्पनांचे ओझे ते सहन करू शकले नाहीत. या ओढाताणीतच कुठेतरी त्यांना लागलेली प्रेमाची आस दिसते. तीच काय ती त्यांच्या दुखऱ्या मनाची मलमपट्टी होती. म्हणूनच कदाचित शामसारखा चार गोड, मायेच्या शब्दांच्या शोधात राहिला. ते मिळाले की त्यांचे मन आनंदाने फुलत असे. ' शाम' मध्ये ते एके ठिकाणी म्हणतात - '' ज्या कर्तव्यात हृदयाचा जिव्हाळा ओतलेला नाही, ते कर्तव्य कितीही चांगल्या प्रकारे केले तरी जगाला जिंकू शकणार नाही. … वस्तूवर प्रेमाचे किरण पाडा, म्हणजे ती अंतर्बाह्य सुंदर दिसेल. ''
या प्रेमाच्या शोधापायीच कदाचित गुरुजींनी प्रत्येकाला आपलेसे करू पाहिले. मग तो हिंदू असो,मुसलमान असो, अस्पृश्य असो वा परप्रांतीय असो… त्यांना सारे प्रिय होते. एका पारंपरिक ब्राह्मण घरात वाढलेले त्यांचे मन अगदीच अब्राह्मणी होते. त्यामुळे त्यांनी शेवटपर्यंत बराच त्रास सहन केला.
मला असे वाटते की, साने गुरुजी हे व्यक्तिमत्व खऱ्या अर्थाने कधी आपल्यापर्यंत पोहोचलेच नाही. कधी त्यांना आपण उदात्त मातृभक्तीत गुरफटवून टाकले तर कधी त्यांच्या भाबडेपणावर उगाच हसून खिल्ली उडवली;पण त्यांच्या विचारांचा टीकात्मक पद्धतीने उहापोह करण्याचा प्रयत्न कितीजणांनी केला आहे? त्यांनी स्थापिलेल्या ‘आंतरभारती’सारख्या संस्थांचे महत्व आपल्याला पटलेले आहे का? लोकांपर्यंत त्यांचे महत्व पोचलेले आहे का? मला माहीत नाही. आजच्या काळात जिथे स्वतःच्या भाषेतील साहित्यच तरुणांना परिचित नाही, तिथे साने गुरुजींचे व्यक्तित्व आणि कर्तृत्व दुर्लक्षित राहिल्यास नवल नाही. कदाचित हेच त्यांचे आणि आपले दुर्दैव आहे.
त्यांच्या ११५ व्या वाढदिवशी त्यांचाच शब्दांत आशा व्यक्त करावीशी वाटते-
'हातांत हात घेऊन, हृदयास हृदय जोडून
ऐक्याचा मंत्र जपून, या कार्य करायाला हो
बलसागर भारत होवो!'
गुरूजींसारखे विचारवंत देशाला लाभले आणि त्या विचारांवर विचार केला गेला, ( मुळात विचार करायला आपण शिकलो) तर सर्व बाजूंनी खरोखरीच देश बलसागर होईल यात शंका नाही!
- गायत्री लेले
( राज्यशास्त्राची लेक्चरर असलेली गायत्री साहित्याची अभ्यासक आणि कवयित्री आहे)