
‘चिंब’ भिजताना……..!
तरुण लेखक क्षितिज कुलकर्णीच्या 'चिंब' या कादंबरीचा परिचय करुन देतोय तरुण कथाकार क्षितिज देसाई. ही कुठल्याही अर्थाने समीक्षा नाही, त्याची स्वतःची वैयक्तिक मतं आहेत, हे क्षितिज देसाई आवर्जून नमूद करतो. जागतिकीकरणानंतरच्या साहित्याच्या समीक्षेच्या दुष्काळी वातावरणात तरुण पिढीच आपल्या साहित्याची ओळख स्वतः करुन देते आहे, हे लक्षणीय ठरावं.
-संपादक
आदिती...
असं वाटलं, अंगातल्या शेकडो छिद्रातून काहीतरी वाहून गेलंय... पसरलंय.
एकेका थेंबाचं झाड होतंय. पाण्याचं झाड.
आणि त्या पाण्याच्या झाडात एकेक रंग मिसळत जाताहेत.
धावत सुटलेत ते... अनेक रंग.
आणि डोळ्यादेखत ते फुटलं. नखशिखान्त भिजलो.
'नखशिखान्त' मोठा शब्द आहे...
अशा भिजण्याला एक छोटा शब्द पण आहे यार...
आठवतच नाहीये... हे असंच होतं...
पावसाला... कधीच भिजता येत नाही.
एका तरुण लेखकाची नव्या वळणावरची लक्षवेधी कादंबरी!
------------------
'तरुण लेखकाची कादंबरी' असं ब्लर्बवर वाचल्यावर 'भारतीय इंग्रजी महाविद्यालयीन प्रेमकथा' असतात तसं एखादं पुस्तक असेल असं वाटलं;पण जसं जसं कादंबरी वाचत गेलो, तसा हा गैरसमज दूर झाला. पहिलं वाक्य बघा: 'पावसाला कधीच भिजता येत नाही'
कादंबरीच्या शैलीपासूनच हा वेगळेपणा लक्षात येतो. असलग कथानक/ निवेदन आवडू लागलं. क्रिस्तोफर नोलनच्या चित्रपटासारखं. म्हणजे पुढचा परिच्छेद बघा:
'पंधरा वर्षाचा होतो तेव्हाची गोष्ट
जाऊ दे-
नंतर कधीतरी.'
अभ्यंग सुरेश सरदेसाई हा या कादंबरीचा निवेदक. त्याचा मित्र शशांक नाट्य दिग्दर्शक आहे. अभ्यंग, आणि शशांकचा नाटकाचा ग्रूप ही या कादंबरीची साधारण गोष्ट. त्याबरोबर अभ्यंगच्या आयुष्यातले इतर अनुभव, त्याचे आई वडील, त्याची शाळेतली 'क्रश' अदिती नगरकर ह्यासगळ्या गोष्टी कादंबरीत येतात. आणि या सगळ्या गोष्टी कोणत्याही उलट सुलट क्रमाने, तुकड्या तुकड्याने कथानकात येतात.
शशांकला त्याच्या नाटकासाठी नवीन जर्म हवा असतो. त्याच्या आसपास बोलताना अभ्यंगने कधीतरी अदिती बद्दल सांगितलेलं असतं. शशांक तिला मध्यवर्ती पात्र ठेवून तिच्यावर नाटक बसवण्याचा घाट घालतो. त्या नाटकाचा प्रवास या कथानकात दिसतो. त्या सोबत अभ्यंगच्यामनात चाललेलं व्दंव्द, त्याची वर्गातल्या मुलांबदल अदितीच्या अनुषंगाने एकूण नैतिकता- अनैतिकतेविषयीची मतं हे सारं..
ब-याच ठिकाणी काव्यात्म वाटते कादंबरी. म्हणजे, त्यातल्या शाळेसंबंधी उल्लेख: 'टेबलावर सरस्वती आणि ड्रॉवर मध्ये लक्ष्मी.' किंवा मग 'मी.. मी..' हा परिच्छेद. आणि ब-याच ठिकाणी दिसणार्या बंडखोरीच्या छोट्या छोट्या खुणा:
दहावा... दशक्रिया
"कावळा लगेच शिवला रे!!"
आई आत आल्याआल्या म्हणाली.
"भूक लागली असेल !"
ती वैतागून बाथरूममध्ये गेली.
पात्रांना दिलेली नावं (जॉनी डेप मांजर, बावरलेल्या चेह-याचा कोवळा मुलगा) किंवा काही उल्लेख (दोन भाऊ, एक बहीण आणि तीन चुलत, एक मावस, काही आते असे न पुरणारे नातेवाईक) मस्तच.
अभ्यंग पुष्कळ वेळेस आदितीचा उल्लेख करतो. पण कादंबरीत आपल्याशी तिची भेट होत नाही. तिच्यापेक्षा जास्त शशांक आणि अभ्यंग स्वत:च आपल्याला जास्त भेटतात. अभ्यंगला जरी वाटत असलं की तो आदिती बद्दल सांगतोय तरी लेखकाला मात्र अभ्यंग बद्दल सांगायचंअसतं.
चिंब ही महत्वाची वाचनीय कादंबरी आहे, यात शंका नाही.
(ही समीक्षा/ परीक्षण बिलकूल नाही, माझी वैयक्तिक मतं आहेत.)
कादंबरीचे नाव- चिंब
लेखक- क्षितिज कुलकर्णी
पाने १४४
मूल्य १६०
क्षितिज देसाई
इंजिनियरिंगच्या शेवटच्या वर्षाला असणारा क्षितिज उत्तम तरुण कथाकार आहे.