डॉ. प्रकाश बाबा आमटे चित्रपटाच्या निमित्ताने..

सफरचंद कधी डोक्यावर पडेल याची वाट पाहणारी माझी पिढी. म्हणजेच आपल्या करीयरमध्ये काही फार चांगलं होणार आहे, अशी आशा बाळगून असलेली; पण मास्लोवने सांगितलेल्या तिन्ही पातळ्या ओलांडून आपण पुढे कधी जाणार ? डॉ. प्रकाश बाबा आमटे पाहिल्यानंतर अंतर्यामी हललेल्या पुष्कर कांबळेचा हा स्नॅपशॉट

 

     मास्लोवने सर्वप्रथम मानवी गरजांची चढत्या क्रमाने यादी तयार केली. या यादीत साधारणपणे  चार पातळ्या आहेत. पहिली पातळी म्हणजे हवा, पाणी, अन्न आणि मैथुन या गरजा, म्हणजे अगदी प्राथमिक पातळी. त्यानंतरची मोठी गरज म्हणजे सुरक्षितता. या दुसऱ्या पातळीत  वैयक्तिक सुरक्षा, उपजीविकेच्या साधनांची सुरक्षा, आणि कौटुंबिक सुरक्षा हे सगळं आलं. सुरक्षिततेची गरज भागली, की मग माणसाला सामाजिक आयुष्याची गरज असते – तिसरी पातळी. तिसऱ्या पातळीत मैत्री, विश्वास, आपुलकी आणि कौटुंबिक सुख या सगळ्या गोष्टी सामाविष्ट आहेत. त्यानंतर येतो स्वाभिमान, ह्या चौथ्या पातळीत आत्मविश्वास, परमतसहिष्णुता ह्यासारख्या गरजा अभिप्रेत आहेत. त्यातच सर्वोच्च पातळीवर आहे ती म्हणजे स्व – निश्चितता. वास्तवाचा स्वीकार करणं, पूर्वग्रह काढून टाकणं, उस्फूर्तता, आणि सर्वात शेवटी स्पिरिचुआलिटी, म्हणजे आत्मिक ज्ञान, हे सगळं सर्वोच्च पातळीवरचं.

     साधारणपणे सामान्य लोक पहिल्या तीन पातळ्यांवरच जगतात. त्यातलं काही कळतं तर काही कळतही नाही आणि हे सगळं कळून तरी काय उपयोग? अगदी प्रत्येकाचं अर्ध आयुष्य पहिल्या तीन पातळ्यांवरच्या गरजा भागवतानाच संपून जाणारं.

     अगदी लहानपणापासून सुरुवात करूया. अगदी घीसापीटा प्रश्न -  मोठं झाल्यावर कोण व्हायचं तुला? अर्थात डॉक्टर, इंजिनियर, आय ए एस आणि हल्ली हल्ली एरोनोटिकल इंजिनियर, कार्डीओलोजीस्ट,एम्बेडेड सिस्टमस स्पेशालीस्ट... 

    चिमुरडी स्वप्नही अगदी कॉम्प्लेक्स.

     ही माझी पिढी.

     आणि या सगळ्या कॉम्प्लेक्स स्वप्नांचं ध्येय काय? बंगला, गाडी, ऐशोआराम आणि मनपसंत जोडीदार. शेवटी हवा, अन्न, पाणी, निवारा, मैथुन आणि सुरक्षितता एवढंच. मास्लोव ने दर्शवलेल्या पहिल्या –तीन - पातळ्या. बाकीच्या पातळ्यांचं काय? एक माणूस म्हणून आपल्याला त्याच्या वरही पोहोचता येतं याचा विचार आजही जरासा अप्रचलित.

     आणि हे सगळं ज्यांना कळतंय (अगदी माझ्यासकट), त्यांचा त्यावर एक चतुर शेरा. सिस्टमच अशी आहे तर आपण तरी काय करणार ना?

     डॉ. प्रकाश बाबा आमटे. कालच चित्रपट पहिला.

     डॉ. प्रकाश - डॉ. मंदाकिनी आणि गर्द वनांत वसलेलं हेमलकसा – माडिया गोंड लोकांचं घर. रेमन मॅगसेसे पुरस्कार आणि असे अनेक पुरस्कार जिंकलेले हे दाम्पत्य. आनंदवनात वडील बाबा आमटे याचं कार्य पाहून त्यांनी खुणगाठ बांधून टाकली होती की समाजासाठी काम करायचं. बाबांसोबत हेमलकसाला आल्यावर त्यांनी माडिया गोंड लोकांची अगदी प्राथमिक अवस्थेतली परिस्थिती पाहिली होती. माडिया गोंड लोक आपापलं नैसर्गिक आयुष्य कसल्याही साधनांशिवाय जगत आहेतच, पण त्यांनाही माणूस म्हणजे काय हे समजून घेऊन एका चांगल्या पातळीवर जगण्याचा अधिकार आहे, त्यासाठी त्यांना जागरूक करून प्रवाहात आणायचं हा त्यांचा विचार.

     वडिलांनी पाहिलेलं स्वप्न स्वतःच आयुष्यं बनवून ते तंतोतंत जगणारी किती मुलं आहेत या जगात? त्यासाठी आपलं सगळं वैयक्तिक आयुष्य पणाला लावून एका व्यापक अर्थाने चांगल्या भविष्यकाळासाठी स्वतःच सुखासीन भविष्य बाजूला ठेवू शकतं कोणी? व्यक्तिगत स्थैर्य शोधण्याच्या अनादी मानवी इच्छेला कुणी इतकं रिप्रेस करू शकतं?

    मेडिकलची डिग्री घेऊन जंगलात करियर करायला जाताना दोघांनाही नक्कीच खूप धाडस लागलं असेल. कारण प्रवास परतीचा नव्हता. तिथे राहून स्वतःला सिद्ध करणं हेही तितकंच महत्वाचं होतं. चित्रपटात एक संवाद आहे. “यांच्याकडे पाहून मनुष्यप्राणी या शब्दाचा अर्थ कळतो” – इतकं प्राथमिक अवस्थेत जगणारे माडिया गोंड लोक. अगदी रोजचं जीवन जगायलाही किती अडचणी आल्या असतील... घर, वीज, सुरक्षितता, शुद्ध पाणी, रस्ते, आरोग्य सुविधा, शाळा, भाषा आणि सुसंस्कृत समाज यातलं काहीही  - म्हणजे पहिल्या तीन पातळीतल्या गरजांची नीटशी उपलब्धी नसताना इतका शुद्ध हेतू ठेवून काम करणं आजकाल कुणाला जमेल? आज यातल्या सगळ्या गरजांची पूर्ती लोक बिरादरी प्रकल्पाच्या माध्यमातून हेमलकसाला झाली आहे.

     जेव्हा थंडीने काकडणारं उघडं नागडं पोर पाहून स्वतःच्या कपडे घालण्याची लाज वाटायला लागते तेव्हा मास्लोवने सांगितलेल्या गरजांच्या तक्त्यात आपण सर्वोच्च पातळीवर राहून आपण शोधत असतो मानवी जीवनाचा अर्थ आणि त्याच्या संदर्भात आपली भूमिका. “मी” या संकल्पनेचं निराकरण करणं हे एका ध्यान पद्धतीत अभिप्रेत असतं. याहून वेगळं हे “self destrution” काय असू शकतं? ही एक प्रकारची ध्यानसाधनाच नाही का? नेगल नावाचा लेपर्ड जेव्हा मरतो, तेव्हा सगळे इतका आक्रोश करतात. जनावरांवरही माणूस इतका आपलेपणा का दाखवतो? हे विश्वची माझे घर – चा इतकं समर्पक उदाहरण दुसरं काय असू शकेल?

     पीटर रसेल नावाच्या एका भौतिकशास्त्रज्ञाचा सिद्धांत आहे, की विश्वातली प्रत्येक गोष्ट, प्रत्येक अणू – रेणू हा जागृत आहे. आजपर्यंत “चेतना” – म्हणजे आपल्या सभोवाराविषयी जागृत असणं ही केवळ सजीवांची ओळख होती. आज निर्जीव गोष्टींमध्ये अगदी अल्प प्रमाणात का असेना; पण चेतना असते, असं भाकीत होऊ लागलं आहे. म्हणजे अगदी साधी गृहीतकं बदलायची वेळ आलेली आहे आणि निसर्गाप्रती एकदम काळजीपूर्वक वागण्याचीही. डॉ. आमटे देवाला उद्देशून एके ठिकाणी म्हणतात, “मी तुला मानत नाही; पण निसर्गाला मानतो. तो आपल्या सर्वांचा देव. तो एकदा कोपला की कुणाचं काही खरं नाही.”

   मनातल्या अगणित सुट्या दोऱ्यांची एकत्र गाठ मारणारा हा सिनेमा. माणूस म्हणून आपली ओळख काय, जगण्यासाठी लागणारं धैर्य कसं मिळवावं, आणि संपूर्ण समाजाच्या तुलनेत आपलं स्थान काय हे समजणं म्हणजे मोठं होणं. स्व – निश्चितता म्हणतात काय ती हीच. गरजांच्या पातळीतली सर्वोच्च. स्व – निश्चिततेचंच दुसरं नाव मोक्ष, निर्वाण, मुक्ती...

     शेवटी काय सफरचंद कधी डोक्यावर पडतंय याची वाट पाहणारी माझी पिढी. म्हणजेच आपापल्या करियर मध्ये एक फार चांगलं काहीतरी होणार आहे अशी आशा मनात बाळगून असलेली. हा सिनेमा एक इन्स्पिरेशन नक्कीच आहे. सिनेमा पाहून कळतं – पर्सिवरन्स ठेवला तर सगळं काही शक्य आहे, नाही का?

पुष्कर कांबळे

pushkarkamble@gmail.com

( इंजिनियर असलेला पुष्कर सध्या प्रोजेक्ट इंटर्न असून तो एक चांगला कवी आहे. )

 

About the Author

पुष्कर कांबळे's picture
पुष्कर कांबळे