अक्षरपाऊलः अक्षरांचा सुरेख पदन्यास !

बांधकाम मजूरांच्या मुलांच्या शिक्षणासाठी काम करणा-या अक्षरपाऊल संस्थेबाबत माहिती देत आहेत त्या संस्थेसोबत काम करणा-या कवयित्री आणि कलाकार चैताली आहेर

 

अगदी अपघाताने ‘अक्षरपाऊल’ या संस्थेसोबत माझा परिचय झाला. शाळाबाह्य मुलांना शाळेच्या अंगणात कसं आणता येईल यासाठी सातत्याने झटणारी ही संस्था. मध्यंतरी एका वृत्तवाहिनीने या अक्षरपाऊलच्या कामाचे वृत्तांकन केले. मी या संस्थेसोबत जोडली गेलेली असल्याने अनेकांनी या संस्थेबाबत अत्यंत आस्थेने चौकशी केली तसेच स्वतःहून मदत करण्याची इच्छाही व्यक्त केली, याचा मला आनंद आहे. या संस्थेबाबत वाचकांना माहिती करुन देण्यासाठी हा लेखनप्रपंच.

‘अक्षरपाऊल’ ही एक सामाजिक संस्था आहे.  संस्था १६ मार्च २०१३ पासून बांधकाम मजूरांच्या मुलांच्या शिक्षणासाठी बांधकाम साईटवर काम करीत असून, मुलांना व पालकांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देऊन त्यांना अक्षर ओळख करून देण्याचे काम अक्षरपाऊल करीत आहे. शिक्षणाच्या माध्यमातून मुलांचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न संस्था करीत आहे. अक्षरपाऊल संस्थेमार्फत पुणे,नाशिक येथे बांधकाम साईटवर पाळणाघर, बालवाडी, शाळा पूर्वतयारी वर्ग, शिकवणी वर्ग चालवले जातात.  संस्था १ ते १४ या वयोगटावर शिक्षणासाठी काम करीत आहे. मुलांचे शिक्षण योग्य वयात, योग्य संस्कारांच्या माध्यमांतून दिले पाहिजे त्यासाठी सगळ्यांच्या योगदानाने अक्षर पाऊल संस्था कार्यरत आहे.

स्वामी विवेकानंदानी म्हटले आहे, “मुले शाळेपर्यंत पोहू शकत नसतील तर शाळा त्यांच्या दारात गेली पाहिजे.” हाच विचार स्वीकारून बांधकाम साईटवरील कामगारांच्या मुलांसाठी त्यांच्या दारात शाळा सुरू करण्याचे ठरविले.

बांधकाम-मजुरांची मुले शिक्षणापासून दूर राहतात. आई वडील मजुरीवर गेल्यानंतर मोठ्या मुलांनी आपल्या लहान भावंडाना सांभाळावे हीच या पालकांची इच्छा असते किंवा त्यांच्याकडे दुसरा पर्यायही उपलब्ध नसतो. कारण बहुतांशी पालक हे भारताच्या कानाकोपऱ्यातून पोटार्थी कामगार म्हणून आलेले असतात. मुलांनी शाळा शिकणे ही त्यांच्यासाठी चैनीची गोष्ट असते. शाळा-शिक्षणापेक्षा मुलांची सुरक्षितता हा मुख्य प्रश्न त्यांना सतावत असतो,जी सहसा बांधकाम साईटवर मिळण्याची शक्यता दुरापास्त असते.

मात्र पालक मुलांना शाळेत घालत नाहीत याचा अर्थ प्रत्येकवेळी असा नसतो की त्यांना मुलांना शिकवायचे नसते. पालकांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवणे व शिक्षणासाठी त्यांना मार्गदर्शन करणे हे संस्थेपुढील मोठे आव्हान आहे. शिक्षणामुळे विचारांमध्ये होणारा बदल आणि शिक्षणाचे महत्त्व पालकांना सांगणे गरजेचे असते. अश्या  बांधकाम साईटवरील कामगारांना  मुलांचे शिक्षण योग्य वयात सुरु करण्याचे गांभीर्य पटवून देणे हे महत्वाचे काम “अक्षरपाऊल” संस्था करत आहे.

आतापर्यंत म्हणजे मार्च २०१३ पासून पुणे, नाशिक आणि शिरवळ (जि. सातारा)येथील बांधकाम साईटवर वर्ग सुरु केले आहेत. मात्र पुणे मुंबई किंवा फक्त मोठी शहरं हेच कार्यक्षेत्र न ठेवता तर पूर्ण महाराष्ट्रभर वंचित मुलांना शिक्षण मिळावे यासाठी संस्थेचे शिक्षक,संचालक झटत आहे. यात स्वयंसेवक देखील स्वखुशीने मदत करत आहेत. छोट्या गावांमध्ये बांधकाम साईटवर देखील मुलांना शिक्षण मिळावे यासाठी संस्था प्रयत्न करत आहे. फक्त बांधकाम साईटवर वर्ग सुरु करून संस्थेचे शिक्षक,संचालक,स्वयंसेवक नि:श्वास सोडत नाहीत तर त्या मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणे सुद्धा तेवढेच गरजेचे आहे याची जाणीव देखील सर्वाना आहे. त्यासाठी मुलांच्या शिक्षणाचे महत्त्व व त्याचे फायदे याबाबत पालकांशी चर्चा करून संस्थेच्या माध्यमातून मुलांना पालकांच्या मदतीने शाळेत दाखल करतात.

 R.T.E.(राईट टू एज्युकेशन)नुसार मुलांना कधीही सरकारी शाळांमध्ये दाखला मिळू शकतो त्यासाठी जून किंवा ऑक्टोबर महिनाच हवा, असे नाही. R.T.E. चा होणारा अजून एक फायदा म्हणजे दाखल्याची गरज लागत नाही. ड्रेस पुस्तक ट्रान्सपोर्ट भोजन मोफत मिळते, याची कल्पना पालकांना ब-याचदा नसते. हे सांगितल्यावर पालकांना मूल खर्च न होता शिक्षण घेते याचे समाधान मिळते.

R.T.E. मुळे मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणे सुकर झाले आहे.मात्र इथेच संस्थेचे काम संपत नाही;मुले शाळेत दाखल केली तरी टिकली पाहिजेत यासाठी कार्यरत राहणे.शाळेला, मुलांना व पालकांना शिक्षणाबाबत येणा-या अडचणी सोडविणे हे ही महत्वाचे काम आहे.

साईटवर वर्ग घेताना शिक्षिका सकाळी व दुपारी वस्तीमध्ये घरोघरी जाऊन मुलांना गोळा करून आणण्याचे काम शिक्षिका करतात. सर्व मुले आलेली असतील तरीही वस्तीत मुलांना बोलावण्यासाठी फेरी मारणे ही अक्षर पाऊल शिक्षिकेची जबाबदारी असते आणि शिक्षिका ती आनंदाने उचलतात. वर्गाला न येण्या-या मुलांच्या पालकांना वारंवार भेटून मुलांना वर्गावर आणण्याचा प्रयत्न शिक्षिका करतात. दर महिन्याला होणाऱ्या पालक मीटिंगचा निश्चितच सकारात्मक परिणाम होतो.

वेळ पडल्यास स्वत: संचालक आणि स्वयंसेवक देखील पालकांना भेटून याबाबत माहिती घेतात. बांधकाम साईट वरील प्रत्येक मुलाला शिक्षणाचा हक्क मिळावा हाच यामागचा उद्देश आहे.

संस्था मुलांसाठी बाल-आनंदमेळा, चित्रपटगृहात मुलांना चित्रपट दाखवणे, मुलांसाठी शैक्षणिक सहली हे उपक्रम स्वयंसेवकांच्या मदतीने आयोजित करते. अशा उपक्रमांमध्ये स्वयंसेवकआर्थिक मदत करतात तसेच स्वतः सहभाग घेवून मुलांसोबत राहून आनंद लुटतात.

अक्षरपाऊल संस्थेमार्फत पुणे,नाशिक आणि शिरवळ (जिल्हा सातारा)येथे बांधकाम साईटवर पाळणाघर, बालवाडी, शाळा पुर्वतयारी वर्ग, शिकवणी वर्ग चालवले जातात.संस्था १ ते १४ या वयोगटावर शिक्षणासाठी काम करत आहे.

पुण्यामध्ये शिवणे भागात झेड.पी आणि प्रायव्हेट शाळेत १२ मुले आणि नाशिकमध्ये तिडके कॉलनी भागात मनपा शाळेत १५ मुले दाखल झाली आहेत. संस्था काम करत नसती तर वरील २७ मुले शिक्षणापासून वंचित राहिली असती.

“अक्षरपाऊल” या संस्थेच्या नावाचा अर्थच पालकांनी,समाजाने किंवा एका साध्या नागरिकाने एक छोटंसं पाऊल मुलांच्या शिक्षणासाठी उचलावं असा आहे.

आपण सगळेच एक जबाबदार नागरिक म्हणून एक-एक पाऊल अशा प्रकारच्या सामाजिक काम करणाऱ्या कोणत्याही संस्थांसाठी उचलायला हवं ज्यायोगे शिक्षणक्षेत्रात निश्चितच सकारात्मक बदल होईल.

अक्षरपाऊल संस्थेला तुम्ही फंड्सव्यतिरिक्त इतरही अनेक प्रकारे साह्य करू शकता, तुमच्या मदतीचा एक हात आणि एक हाक या मुलांसाठी खूप मोठी मदत होऊ शकते. स्वयंसेवक म्हणून तुम्ही खालीलप्रकारे कोणतीही मदत करू शकाल.

१. माहिती इंग्लिश/मराठी मध्ये भाषांतरित करून देणे.

२. शैक्षणिक साधनं बनवणे. (साहित्य अक्षरपाऊल तर्फे पुरवले जाईल.)

३. चित्रांचा वापर करून गोष्टींचे flash-cards तयार करून देणे.

४. पपेट्स तयार करणे.

५. मुलांसाठी drawing books बनवणे.

६. चित्रकोडी (puzzles) तयार करणे.

७. जुनी चित्रांची/गोष्टींची पुस्तकं/पेन्सिल्स/खोडरबर/क्रेयोन्स जमा करून देणे.

८. Power- point प्रेझेन्टेशन तयार करणे.

९. संस्थेचा deta/कॉम्प्युटर फाईलिंग अजून कश्याप्रकारे करता येईल. उदा. रिपोर्ट्स,मस्टर इ. अजून चांगल्या पदधतीने मांडणी करणे.

१०. एखाद्या कंपनीमध्ये प्रेझेन्टेशनसाठी ओळख करून देणे,जेणेकरून अक्षरपाऊलची माहिती जास्तीत जास्त  लोकांपर्यंत पोहोचवली जाईल.

११. संस्थेची माहिती अजून कशाप्रकारे लोकांपर्यंत पोहोचवली जाऊ शकते यात मदत करणे.

           ----चैताली आहेर.

संपर्क :

अक्षर पाऊल,

सी-२/१०, धनलक्ष्मी पार्क , भुसारी कॉलनी,

पौड रोड, कोथरूड डेपो, पुणे- ४११०३८

मो. नं. ९७६६६७०७०७

ई मेल - aksharpaaul@gmail.com

वेबसाईट  - www.aksharpaaul.org

      

dingiaher@gmail.com

अक्षरपाऊल या संस्थेमध्ये काम करणा-या चैताली या कवयित्री असून ‘यू मी आणि चाय’ या प्रसिध्द प्रयोगातील त्या उत्तम कलाकार आहेत

About the Author

चैताली

अक्षरपाऊल या संस्थेमध्ये काम करणा-या चैताली या कवयित्री असून ‘यू मी आणि चाय’ या प्रसिध्द नाटकातील उत्तम कलाकार आहेत