MSD, थोडी घाईच केलीस का रे ?

 

 

महेंद्रसिंग धोनीच्या राजीनाम्यानंतर त्याला निमेश वहाळकरने लिहिलेले भावुक पत्र

----------------------------------

 

 

इतकी सारी संक्रमणं तुझ्या डोळ्यांसमोर होत असताना कधी एखाद्या निर्विकारासारखा ,कधी एखाद्या स्थितप्रज्ञासारखा, पूर्णपणे डिफेन्सिव्ह मोडवर राहिलास. आणि अशा या ऐन प्रसंगी असा ऍग्रेसिव्ह कसा काय झालास? असं करण्याची खरंच गरज होती का?

तू काही राहुल द्रविड नव्हतास की तुला क्रीझवर उभं राहिलेलं पाहून कुणीतरी पाठीवर हात ठेऊन भिऊ नको, मी आहे..

असं आश्वस्त केल्याचा भास व्हावा. तू काही व्हीव्हीएस लक्ष्मण नव्हतास की तुझा एखादा चौकार पाहताच एखाद्या गायकाने छानशी हरकत घेत समेवर येताच जसा हात पुढे येतो, तसा दाद देत हात पुढे यावा. तू सचिन तेंडुलकर तर अर्थातच नव्हतास, की तुला पायाला पॅड्‌स बांधून, हातात बॅट घेऊन मैदानावर नुसतं उतरताना जरी पाहिलं तरी देहभान हरपून जावं आणि तू मैदानावर उतरल्यापासून ते पुन्हा पॅव्हिलियनमध्ये परतेपर्यंतचा एकेक क्षण तुझ्या चौकार-षटकारांसहीत एखाद्या महाकाव्यासारखा गुंफला जावा. तू फक्त एक कर्णधार होतास. केवळ एक कप्तान. त्या मैदानावरील पात्रांचा दिग्दर्शक. २००७च्या टी-ट्वेंटी विश्वचषक विजयानंतर सर्वांनी एक कप्तान म्हणून तुला मनोमन स्वीकारलं होतं. आणि सर्वजण त्यानंतर तुला एक कप्तान म्हणूनच पाहात आले. गांगुली-चॅपेल वाद, त्यानंतर गांगुलीच्या कर्णधारपदाच्या कारकिर्दीचा झालेला दुर्दैवी अंत, द्रविडसारख्या महान खेळाडूची व कर्णधाराची चॅपेलचक्रात झालेली फरफट, गांगुलीचं ते बारावा खेळाडू म्हणून पाण्याच्या बाटल्या घेऊन मैदानावर फिरणं.. हे सारे दुःखद क्षण आम्हा क्रिकेट चाहत्यांनी मोठ्या जड अंतःकरणाने पचवले होते. मात्र २००७ च्या एकदिवसीय विश्वचषकाने आमच्या भावविश्वावर कधीही न भरून निघणारा आघात केला. आपल्या एकाहून एक दिग्गज खेळाडूंचा संघ, सुरूवातीलाच ज्याप्रकारे बांगलादेशसारख्या संघाकडून हरला आणि ज्याप्रकारे पहिल्याच फेरीत आपली अब्रू अक्षरशः धुळीस मिळवून बाहेर हाकलला गेला, त्यानंतर क्रिकेट म्हणजे दुःख हेच एक समीकरण बनलं. त्या विश्वचषकातून ज्या सामन्यात आपण बाहेर पडलो, त्या श्रीलंकेविरूद्धच्या सामन्यात आपले एकेक फलंदाज बाद होताना आणि त्या विश्वचषकातून आपली इतकी दुर्दैवी एक्झिट होत असताना कर्णधार द्रविड पॅव्हिलियनमध्ये हाताशपणे मैदानाकडे पाहात बसलेला होता. त्याच्या डोळ्यांत अश्रू होते आणि द्रविड-गांगुली-लक्ष्मण आणि कुंबळेच्या त्या पर्वाच्या अस्ताच्या खुणा. द्रविडला तसं पाहताना आमचा अक्षरशः थरकाप उडाला होता. द्रविडच्या शेजारी सचिन, गांगुली, सेहवाग, वगैरे बसले होते. जुन्या हिंदी सिनेमातल्या खलनायकाकडून गोळी-बिळी लागल्यावर अखेरच्या घटका मोजणा-या साईड हीरोसारखा चेहरा करून. ते दृश्य आजही एखाद्या भयाण स्वप्नासारखं डोळ्यांपुढे उभं राहतं. एक फार मोठी पोकळी निर्माण होऊ पाहात होती. जशी पोकळी ६२च्या चीन युद्धातल्या मानहानीकारक पराभवानंतर, नेहरूंच्या निधनानंतर, गुरूदत्तच्या एक्झिटनंतर भारतीय समाजमनावर निर्माण झाली होती. त्याच वेळेस तू एखाद्या धूमकेतूसारखा उगवलास. अगदी त्यावेळच्या राजेश खन्नासारखा. टी-२०चा विश्वचषक काय जिंकून दिलास आणि रातोरात लोकांच्या क्रिकेटमनाचा जणू ताबाच घेतलास.

कसं काय जमलं रे तुला? काहीही टीमहोती रे ती. त्यावेळेस सचिन-द्रविड-गांगुलीशिवाय संघ पाहायची सवयच नव्हती.

सचिनशिवाय तर नाहीच नाही. बरं, असंही नाही की तुझ्या त्या संघानं पूर्ण मालिकेवर अगदी वर्चस्व गाजवलंय. तो अंतिम सामना तर गेलाच होता. कसला झोडत होता तो मिसबाह.. तू काय रेकी वगैरे केलीस का? की त्याने इतका दळभद्री फटका मारावा? आणि श्रीशांतनेही चक्क वेळेवर तिथे पोहोचून तो झेल घ्यावा? जिंकलो होतो आपण..  आम्हाला काही क्षण काय झालंय ते कळालंच नव्हतं. आणि अरे, तू शेवटची षटकंसुद्धा कोणाला देत होतास? जोगिंदर शर्मा? जोगिंदर शर्मा हा काय विश्वचषकाच्या अंतिम निर्णायक सामन्यात शेवटची षटकं देण्याचा माणूस आहे? (एखादा माणूस नुसता डोळ्यांसमोर जरी आला किंवा त्याचं नाव जरी काढलं तरी सगळा उत्साहच जातो, प्रचंड मरगळ येते. उदा. उदय चोप्रा, जोगिंदर शर्मा..) तू जो जुगार खेळत होतास, त्यामुळे कित्येक लोक नशीब वगैरे गोष्टी मानू लागले होते. त्या नशीबाच्या जोरावर की कशाच्या जोरावर ठाऊक नाही, तू जिंकतच गेलास. कुंबळेनेही मग अशीच मध्येच निवृत्ती घेतली. कसोटी कर्णधारपदही मग तुझ्याकडे आलं, आणि मग तू सुटलासच. अधे-मधे थांबलासच नाहीस. तुझी दौड जाऊन पोहोचली ती थेट २०११ एकदिवसीय विश्वचषकापर्यंत..

किती धोक्याचा काळ होता अरे तो? पूर्ण एक पिढी, अगदी तुझ्या संघातलेच निम्मे लोक, ज्यांचं क्रिकेट पाहात बालवाडीतून कॉलेजात आले, ते सारे मैदान सोडत होते. कुंबळे, गांगुली, लक्ष्मण, द्रविड.. उभा होता तो फक्त सचिन. पण सचिन तर पूर्ण वेगळाच पडला होता ना रे. त्याला या सा-या गदारोळात केसालाही धक्का लागणार नाही अशा अढळ स्थानी पोहोचला होता. (आणि एक, ग्वाल्हेरला सचिन तेव्हा १९० च्या पुढे आलेला होता, तेव्हा तू अचानक येऊन चौकार-षटकार उडवायला लागलास. तेव्हा आम्ही तुला मनोमन शिव्या घातल्या होत्या. अरे, शेवटच्या एक-दोन ओव्हर्स राहिल्या, तरी तू सचिनला स्ट्राइकच देत नव्हतास. जगातला तू एकमेव कर्णधार असशील जो मैदानावर चौकार-षटकारांची आतषबाजी करतोय आणि त्याच्याच देशातले लोक त्याला शिव्यांची लाखोली वाहतायत. आणि अर्थात, म्हणूनच तू एक सच्चा कर्णधार होतास. लोकांच्या शिव्यांची, मूडची पर्वा न करता, धावफलकाची गरज ओळखून तू खेळलास. अगदी सचिनसारखा वटवृक्ष समोर उभा असताना. अर्थात आम्हाला ही अक्कल फार उशीरा आली.)

२०११ विश्वचषकापर्यंत तू उगवता तारा किंवा आशास्थान वगैरे होतास. त्या विजयानंतर तू त्याच्या पुढच्या रेंजमध्ये जाऊन पोहोचलास. स्वतःचा नवा संघ वगैरे बांधू लागलास. नवे खेळाडू, ते यशस्वी ठरोत किंवा अयशस्वी, त्यांना पुढे आणत राहिलास. धवन, पुजारा, जडेजा, अश्विन.. ही सारी खास तुझी बांधणी. नंतर तर गांगुली-द्रविडच्याही पुढच्या पिढीतले सेहवाग, युवराज, झहीर, हरभजन, गंभीर.. हे सारे चक्क घरी बसले. (सचिन मात्र होताच..) नव्या दमाचा संघ म्हणून हा संघ नावाजू लागला. पण कुठे साली दृष्ट लागली काय माहीत. ऑस्ट्रेलिया, इंग्लंडमध्ये जाऊन आपण चक्क व्हाईटवॉश घ्यावेत? तिथली परिस्थिती वगैरे सगळं ठीके. पण एखादा सामना जिंकणं तर दूरच, अनिर्णितही राखता येऊ नये? हा विश्वविजेता संघ चक्क ४-० इतका लाजीरवाणा होतो? हे सारं कमी होतं की काय, म्हणून द्रविड-लक्ष्मण निवृत्त झाले. आणि मग मात्र सचिनची निवृत्ती समोर दिसू लागली आणि दडपण येऊ लागलं. जशी ऑस्ट्रेलियाचा २००३ मधील तो स्वप्नवत संघ. हेडन, गिलख्रिस्ट, पॉन्टींग, मॅक्‌ग्राथ.. हे सगळे गेल्यावर आताच्या ऑस्ट्रेलिया संघातील चार नावंही धड सांगता येणार नाहीत अशी अवस्था झाली तशीच अवस्था आपल्या भारतीय संघाबाबतही होते की काय अशी भीती वाटू लागली. खरी ही सुवर्णसंधी होती तुझ्यापुढे. इतिहावर स्वतःचा ठसा उमटवायची. आणि तो उमटवणं कसोटी क्रिकेटमधूनच शक्य होतं. तुझे ते वन-डे, टी-२० काय, येतात-जातात. पण अस्सल, मूऴचं असतं ते कसोटीच. (अर्थात हे आम्ही तुला सांगण्याची गरज नाही म्हणा.) खरंतर, जेवढा आनंद आपण २०११ चा विश्वचषक जिंकल्यावर जेवढा आनंद झाला नव्हता तेवढा कसोटी मानांकनात पहिला क्रमांक मिळवल्यावर आणि ऑस्ट्रेलियाला भारतात आणून व्हाईटवॉश दिल्यावर झाला होता. गांगुलीनंतर तुझ्याकडे फार मोठ्या आशेने पाहिलं होतं आम्ही. कसोटीत ते ऑस्ट्रेलिया, द. आफ्रीकावाले कसे निर्विवाद वर्चस्व गाजवतात. सहजपणे, तीळगूळ वाटल्याप्रमाणे व्हाईटवॉश देऊ करतात.. तशा स्थानावर आपणही एक दिवस जाऊ, तू तिथे घेऊन जाशील अशी आशा बाळगली होती. या स्वप्नांची सुरूवात गांगुलीने केली होती. परदेशात आपण जिंकू शकतो, समजा जिंकलो नाही तरी किमान आत्मसन्मानाने उभं राहू शकतो हा विश्वास गांगुलीने दिला होता. त्या पायावर तू ते निर्विवाद वर्चस्वाचं विश्व उभं करशील याची वाट पाहात होतो. एक स्थित्यंतराचा काळ म्हणून आम्ही तुझ्या इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, पुन्हा इंग्लंड.. या सा-या पराभवाच्या मालिका पचवल्या. अच्छे दिन येणारच असा दृढ विश्वास त्यावेळेस कायम राहिला. तू विचारी आहेस. विवेकी आहेस. तू ही संधी सोडणार नाहीस असं मनोमन वाटत होतं. नव्या संघासह, नव्या वातावरणात तू हे करून दाखवशील असं वाटलं होतं. आणि तू हे असं करून बसलास. अगदी एक शेवटचा एक सामनादेखील न खेळता असा अर्धवट माघारी फिरलास. काय गरज होती असं करण्याची? एमएसडी.. खरंच तू थोडी घाईच केलीस.

असो. त्यामागे तुझीही काही कारणं असतील. कदाचित एकेका कसोटीनंतर पांढ-या पडत चाललेल्या तुझ्या केसांची तुला काऴजी वाटली असेल. संघात तुझ्याविरूद्ध काही कारस्थानं रचली जातायत वगैरे चर्चा होत आहे. कदाचित तूही बीसीसीआयच्या घाणेरड्या राजकारणाचा बळी ठरला असशील. तुझ्या निर्णयाचं स्वागत करायलाच हवं. अर्थात हा निर्णय पूर्णपणे तुझाच असला तरच.. एकदिवसीय विश्वचषकही समोर येऊन थांबलाय. आणि कदाचित तुझ्या कर्णधारपदाच्या कारकिर्दीची अखेरही समोर येऊन थांबलंय. त्यामुळे सर्वार्थाने येता विश्वचषक तुझ्यासाठी महत्वाचा असेल.. त्यामुळे तू तुझ्या कर्णधारत्वाला साजेसा त्याला सामोरा जाशील आणि ही अखेरची संधी सोडणार नाहीस अशी खात्री वाटते.

 

निमेश वहाळकर, पुणे.

संपर्क- ९८२३६९३३०८.

nsv.cpn@gmail.com

 

(पत्रकारितेचा विद्यार्थी असलेल्या निमेशने राज्यशास्त्रातून पदवी घेतली असून तो उत्तम तबलावादक आहे)

About the Author

निमेश वहाळकर's picture
निमेश वहाळकर