
--------------------
भारतातल्या पहिल्या शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याशी त्यांच्या १८४ व्या जयंतीच्या दिवशी अश्विनी सातव-डोके यांनी साधलेला संवाद
-
सप्रेम नमस्कार,
काय गंमत आहे बघ, मला अक्षर-ओळख होऊन किमान २५ वर्ष झाली असतील. खरंतर तुझ्याचमुळे झाली ही अक्षर ओळख. एकदाही त्याबद्दल तुझ्याशी बोलले नाही ग; पण आज इतक्या वर्षांनी तुझ्याशी बोलावं असं वाटतंय. मन मोकळ करावं वाटतय. आता हे सगळ का वाटतय? का कुणास ठाऊक असं मुळीच म्हणणार नाही. अग खुप सारी कारण आहेत तुझ्याशी बोलायची. म्हणुन आज तुझ्या जन्मदिनी तुझ्याशी बोलताना मी स्वताला पण शोधणार आहे. तुझ्या मदतीन माझ्यातला ‘स्व’ मला शोधायचाय अन त्यासाठीच हा सारा अट्टहास बघ.
मी तुला पाहण्याचा प्रश्नच येत नाही. मी तुझ्यापेक्षा खुप लहान आपल्या दोघींमध्ये काहीशे वर्षांचं अंतर. असं असलं तरी तुझी माझी नाळ किती घट्ट बांधली गेलीये. तुला पुस्तकांमधून वाचलं. शालेय अभ्यासक्रमात भारतातील पहिली स्त्री शिक्षिका म्हणुन तू आमच्यासमोर आली. गमंत माहिती तुला, एक किंवा दोन मार्कांचा प्रश्न असायचा परीक्षेत. तुझ्या कार्याबद्दल विचारला जाणार. अन तोदेखील ‘एका वाक्यात उत्तर लिहा’ अथवा ‘थोडक्यात उत्तर लिहा’या गटात. आमचं उत्तरपण तोंडपाठ करून घेतलेले असायचं. मग आम्ही लिहायचो. ‘सावित्रीबाई फुले ह्या भारतातल्या पहिल्या स्त्री शिक्षिका. ज्योतिबा फुले यांच्या पत्नी. त्यांनी पुण्यात भिडे वाड्यात मुलींची पहिली शाळा सुरु केली.’ शालेय जीवनात एक-दोन मार्कांपुरताच तुझा माझा संबंध आला बघ.
जसजशी मोठी होते गेले तशी शाळेच्या पुस्तकांव्यतिरिक्त इतरही वाचायला लागले. चळवळीत गेले. तिथं तुझ्याबद्दल ऐकलं. तेव्हा कुठं तुझ्या कार्याचा आवाका लक्षात यायला लागला अन मी अवाक झाले. अग किती मोठे उपकार केलेस तू आमच्यावर. आमच्या पिढीच्या शब्दात बोलायचं तर तु ‘सिंपली ग्रेट’, ‘यु रॉक्ड’, ‘अमेझिंग’ अन खुप काही आहेस !
तुझा काळ म्हणजे १८ व्या शतकातला. अगदीच भयाण म्हणावा असा. जातीभेद, वर्णभेद, वर्गभेद, अस्पृश्यता, अशिक्षितपणा यासाऱ्या अनिष्ट रूढी-परंपरानी खच्चुन भरलेला. कट्टर सनातनी विचारांच्या ओझ्याखाली दबलेला. जातीच्या उतरंडीमध्ये मनु नावाच्या कुण्या इसमानं सगळ्यांना जोखडात बांधून ठेवलेला तो काळ. खालच्या जातीच्या लोकांच जगणं तर किती भयाण होत ग. अन त्यात बायकांचं जिण म्हणजे जितेपणीच्या नरक यातनाच ! मला तर त्या जिण्याची कल्पना सुद्धा करवत नाही बघ. तुझ्याच शब्दात तो काळ सांगायचा झाला तर,-
‘ पुढे पेशवाई तिचे
पुढे पेशवाई तिचे राज्य आले /
अनाचार देखी अतिशूद्र भ्याले /
स्वथुंकी थुंकाया गळा गाडगे ते /
खुणानाश या ढुंगणी झाप होते /
किती भयंकर ग होत सगळं. मला तर कल्पना करतानाच अंगावर काटा उभा राहतोय. काय तर म्हणे, बायांनी उंबरा ओलांडायचा नाही, शिकायचं नाही, पतीची सेवा करायची, पती निधनानंतर सती जायचं, केशवपन करायचं, विधवांनी पुनर्विवाह करायचा नाही. किती सारी ही बंधन. कुण्या मनूनं घालून दिलेली. त्यानच ठरवलं, बायांची अक्कल गहाण, शुद्राहून शुद्र कोण तर बाया. मग त्यांचा विटाळ. अशी सारी परिस्थिती. आणि या अशा परिस्थितीत जोतीबांच्या साथीनं तू विद्रोहाची ठिणगी टाकली. खरं तर स्फोटच केलास. व्यक्ती विरुद्ध नाही तर व्यवस्थेविरूद्धच. बिथरले की सगळेच सनातनी. अन बिथरणारच की. त्यांच्या सत्तेला सुरुंग लावलास की तू. थेट अस्पृशांच्या पोरींसाठी शाळा सुरु केली. भिडे वाडयात. मग हे बिथरलेले सनातनी गप्प कसे बसतील. त्यांनी तुला अडवण्याचे नाना प्रकार केले. शेणा-मातीचे गोळे, दगड मारले ग तुला. इतकं करूनही तू घाबरत नाही म्हटल्यावर त्यांनी विश्रामबाग वाड्याजवळ तुझा हात धरून थेट अब्रूलाच हात घातला. पण घाबरशील ती तू कसली ! तू काढली की चप्पल. अन पळाले सगळे. तू वाघीणच आहेस. किती अन काय काय केल तू. फसलेल्या विधवांचा सांभाळ केला. त्यांच्या मुलांसाठी अनाथालय काढलं, इतकचं नाही तर एका फसलेल्या विधवेच्या मुलाला यशवंताला दत्तक घेऊन डॉक्टर केलस. तू जोतीबांची सावली नाही राहिलीस तर त्यांनी स्थापन केलेल्या सत्यधर्म प्रकाशात तेजानं तळपत राहिलीस. त्यांच्यानंतरसुद्धा तू खंबीरपणे उभी राहिलीस. अजुन किती केलंस ग. काव्य लिहिलंस. अन ते साधे सुधे नाही तर क्रांतीचं काव्य लिहिलंस. तुझ काम आभाळाहून मोठं आहे. मला तर ते माझ्या कवेत सामावून घेता येत नाही. म्हणूनच म्हणाले ना तू ग्रेट आहेस.
अठराव्या शतकात तू हे सारे केलं. तुझ्याच मूळ आज आम्ही चार अक्षर शिकलो. उंबऱ्याबाहेर पण पाऊल टाकल. तू मुख्याध्यापिका होतीस; पण आम्ही तुझ्या लेकी देशाच्या प्रमुख झालो. परकल पोलक. नववारी साडी यातून प्यांट-शर्ट मध्ये आलो. अग सारं आकाशच आम्ही आमच्या मुठीत घेऊन फिरतोय बघ. असं कोणतच क्षेत्र नाही जिथं तुझ्या या लेकींचा वावर नाही. हरखून गेलीस का ग हे वाचून? अगदी खुश झाली असणार. तुझ्या लेकींची ही प्रगती ऐकून. हो ना ?
सावित्रीमाई तुला सांगू का ग, खूप वरवरचं आहे ग हे सगळं. अग तू आम्हाला अक्षर ओळख करून दिली स्वतःच्या पायावर उभं राहून गुलामीच्या बेडया तोडता याव्यात म्हणून. आम्ही आमच्या पायावर उभं राहिलोत खऱ्या; पण पायातल्या गुलामीच्या बेडया काही आम्हाला तोडता आल्या नाहीत. मनूनं बांधलेली विषमतेची भिंत तू पाडली; पण आम्ही मात्र, त्या अदृश्य भिंतीत आजही अडकून पडलोय. तू नाकारलेली कर्मकांडं आम्ही खूप आनंदानं साजरी करतोय.
तूच म्हणाली होतीस,
नवस करिती / बकरू मशीन
नवस फेडीन / बाळ जन्मी
धोंडे मुले देते / नवसा पावती
लग्न का करिती / नारी नर
हे या विज्ञानयुगातही आम्हाला उमजलं नाही. अग पोरांसाठीच नाही तर परिक्षेत चांगले मार्क मिळावे. चांगला नवरा मिळावा आणि अजून काय काय भौतिक सुख मिळावीत म्हणून आम्ही व्रत, उपवास, नवस करतो बघ. तुझ्यामुळं साक्षर झालो; पण विवेक नाही आला आमच्यात. आम्ही पोथी-पुराण वाचण्यासाठी तू शिकवलेल्या अक्षरांचा उपयोग करतोय बघ.
या पुरुषप्रधान व्यवस्थेत आजही आम्ही दुय्यमच. पुरुषाची उपभोगाची वस्तू आहोत. घरचं आणि दारचं अशा दोन्ही आघाड्या सांभाळतोय. घडयाळाच्या काटयाप्रमाणं राबतोय सगळीकडे. पण ना निर्णयस्वातंत्र्य ना आर्थिक स्वातंत्र्य, अशी तर आमची अवस्था. अग अलीकडच्या मुलीना काय, कोणालाच तू पहिली स्त्री शिक्षिका होतीस हे माहित नाही. विसरत चाललेत सगळे. अग इतरांचं सोड मलाही नव्हतं ग माहित तू पुण्यात कुठ पहिली शाळा सुरु केलीस ते. भिडे वाडा मागच्या वर्षीपर्यंत पहिला नव्हता. लाज वाटते ग माझी मला. तू ज्या ठिकाणी पहिली शाळा सुरु केली त्या भिडे वाडयाची अवस्था पाहून पाणी आल डोळ्यात. अगदी मोडकळीला आलाय तो. आम्हाला जाणच नाही राहिली. तुझ्यामुळ अगदी आयतं मिळालं सगळं. कसलाच संघर्ष नाही ना करावा लागला.
तुला माहिती आहे का ग, तुझ्या या लेकींना जन्माचा अधिकारच नाकरला जातोय. हुंड्यासाठी आजही त्यांचे बळी दिले जातात. रस्तोरस्तीच नाही तर घरातदेखील त्यांच्या अब्रुचे धिंडवडे काढले जातात. अग मूल जन्माला घालण्यासाठी तिच्या महत्वाच्या शरीरधर्माचापण विटाळ मानला जातोय. तिला माणुसपणाची वागणूकही नाही मिळत अजून. आणि तीही झगडा करायचा विसरत चालली बघ. तुला जोतीबांची साथ मिळाली;पण आज तुझ्या लेकींना साथ देणारे जोतिबा शोधावे लागतात.
सावित्रीमाई, पण तुझ्या काही लेकी लढतात या सगळ्याविरुद्ध. खूप कमी आहेत त्या. अजून संघटित नाही झाल्या. विखुरलेल्या आहेत. त्यामुळे कदाचित त्यांना त्यांची ताकद लक्षात येत नसेल. काही जणी करतात प्रयत्न एकत्र येऊन लढण्याचा. करतात संघर्ष आत्मसन्मान मिळवण्यासाठी. मीही ठरवलंय या साऱ्या लेकींना एकत्र आणायचं. तू दिलेला ज्ञानाचा वसा न्यायचा पुढे. तुझ्याजोतिबाप्रमाणं माझा जोतिबा देतोय मला साथ.
खुप बोलले ना ग. पण अजून खूप काही बोलावं वाटतंय.;पण शब्द अपुरे पडतात. मन मोकळं झाल्यासारखं वाटतंय. झाकोळलेलं आभाळ दूर झाल्यासारखं वाटतंय. आता बोलत राहीन तुझ्याशी अधून मधून. घेईल प्रेरणा लढण्याची तुझ्या कार्यातून.
तुझीच लेक,
अश्विनी
अश्विनी सातव-डोके
(अश्विनी या झुंजार तरुण पत्रकार असून राष्ट्र सेवा दलाच्या त्या महामंत्री आहेत. या वर्षीचा पिंपरी महानगरपालिकेच्या वतीने देण्यात येणारा सावित्रीबाई फुले स्मृती पुरस्कार त्यांना मिळाला असून सावित्रीबाईंच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचं त्या आयोजन करत असतात.)