सिनेमा आणि प्रायोगिकता

                           जगभरच्या लोकशाही निम-लोकशाही  ते थेट ठोकशाही अशा अनेक ठिकाणी अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणाचा प्रयत्न करुन स्वतंत्र जाणीव-संवेदना आवाज दाबण्याचे प्रयोग इतिहासात झाले. सर्वांत भयाण रूप हिटलरच्या काळात पाहायला मिळालं. आपल्या बाजूने असो किंवा आपल्या विरुध्दचा असो स्वतंत्र वेगळा आवाज हा राजसत्तेला कधीही थोडासा घाबरून टाकणारा असतो. जेंव्हा सामाजिक  आत्मिक सांस्कृतिक राजकीय स्वातंत्र्य जन्माला येते किंबहुना ते स्वातंत्र्य ती स्वातंत्र्याची अवस्था काही रक्त , काही शाई, काही अश्रू घाम गाळूनच जन्माला आलेली असते. स्वतंत्र होणे ही आपल्या मनाची अवस्था आहे” सिनेमा आणि प्रायोगिकता याबाबत मूलभूत चिंतन करणारा लेख उदयोन्मुख दिग्दर्शक अक्षय इंडीकरचा

-----------

art is born and takes hold wherever there is a timeless and insatiable longing for the spiritual ,for the ideal, that longing which draws people to art.—sculpting in time , andrey tarkovsky ,page 38.

भारतीय परिप्रेक्ष्यातून सिनेमा या कलामाध्यामाबाद्द्ल विचार करायचा झाल्यास सिनेमा मधील प्रायोगिकता या संदर्भाने काही लिहायचं झाल्यास सिनेमा माध्यमाच्या काही मूलभूत घटकाविषयी विचार करणे अगत्याचे ठरते. सिनेमा त्याच्या जन्मापासून आणि आजपर्यंत म्हणजे उण्यापुऱ्या सव्वाशे वर्षाच्या काळात खूप वेडी-वाकडी वळणे घेत विकसित होत गेला आणि तरीपण आज त्याच्या स्वरूपाविषयी आपण निश्चित आणि ठाम  सर्वसमावेशक असं विधान करू शकत नाही. सिनेमा माध्यमाच्या आक्राळ-विक्राळ स्वरूपाकडे पाहिल्यावर ह्या मुद्द्याचे गांभीर्य  आपल्याला लक्षात येते. सिनेमा फ्रान्समध्ये जन्माला आला आणि जगातल्या इतर देशात विकसित झाला. भारतात पोहोचला. फाळकेंनी भारतात सिनेमाच रोपटं लावलं. सिनेमा मग विकास पाऊ लागला. अनेक मान्यवर कलावंत त्यात जन्माला आले. त्यांनी आपल्या आपल्या आपल्या जीवन- धारणेनुसार सिनेमाला आणि पर्यायाने देशाच्या कलासंस्कृतीला समृध्द केले. सामाजिक ,राजकीय, सांस्कृतिक ,कलात्मक ह्या सर्व मानवनिर्मित व्यवहाराला कवेत घेण्याची ताकद असणारी सिनेमा ही कला भारतात कशी विकसित होत गेली, हे आपण जाणतो.प्रस्तुत लेखाचा मुख्यतः विषय आहे तो म्हणजे सिनेमा आणि प्रायोगिकता.

इतर कला माध्यमांच्या  तुलनेत चित्रपट या कालामाध्यामाचा उगम विकास गूढ नाही . सरळ सरळ तारीख वार सांगून सिनेमा कधी जन्माला आला, ते सांगता येतं किंबहुना आपण त्याला सिनेमा संस्कृतीचा उगम असं म्हणूया . इथेच संस्कृती या शब्दाची व्याप्ती स्पष्ट होते. सिनेमा या गोष्टीची वेगळी संस्कृती असा शब्द आपल्याला वापरावा लागतो.  संस्कृती म्हणजे कला- विज्ञान सर्व ज्ञान शाखा आंतरविद्या शाखा इतिहास नैसर्गिक आपत्ती तत्त्वज्ञानातील विविध प्रवाह, धर्म या सगळ्यातून आकाराला येणारी विराट व्यवस्था. यावर दोन चार पानात भाष्य करून आपण काहीच साधत नसतो. किंबहुना  संस्कृतीची पूर्ण व्याप्ती स्पष्ट करण्याची आपली कुवतच नसते . आपण सगळ्या गोष्टी मानवकेन्द्री आहेत असं समजून एक निबंध लिहून सर्व संस्कृतीवर अंतिम विधान करू शकत नाही कारण संस्कृती सारख्या गोष्टीकडे कोणत्या परिप्रेक्ष्यातून आपण पहात आहोत त्याला खूप महत्त्व आहे. उद्या भारतीय संस्कृतीचा अभिमान बाळगायचा झाला किंवा त्याविषयी काही भाष्य करायचं झालं, तर ते भाष्य चातुर्वण्य व्यवस्थेत खालच्या वर्गाने लिहले तर ते वेगळंच असणार आहे आणि सवर्ण वर्गाने लिहिले तर ते वेगळं असणार आहे. म्हणून कोण कशाकडे कुठल्या स्थानावरून पाहतो यालाच ‘सापेक्षतावादाचा सिद्धांत’ म्हंटल जातं. ज्याचा मूलाधार स्थळ आणि काळ या घटकांनी साकार होतो. चित्रकलेचा इतिहास किंवा शिल्प, कला, संगीत… इत्यादी कलांचा इतिहास –उगम- विकास ही अत्यंत गुंतागुंतीची आणि व्यामिश्र संकल्पना आहे.जागतिक सिनेमाच्या बाबतीत त्याचा विकास ज्या पध्दतीने सांगता येतो, त्याचं पद्धतीने भारतीय सिनेमाचा इतिहास आपल्याला सहज- रित्या सांगता येऊ शकतो. फ्रान्समध्ये लुई आणि अगस्त लुमिए या दोन बंधूनी सुरु केलेली पडद्यावरची हालत्या चित्रांची जादू साऱ्या जगावर पाहता पाहता पसरली. cinematograph नावाने सुरु झालेल्या त्या दृष्टीसातत्य या वैज्ञानिक नियमावर आधारित जादूने जगाला मोहित केलं. संस्कृती संवर्धन आणि जतन करण्याच्या मानवी इतिहासतील एका युगाला प्रारंभ झाला. बघता बघता ही जादू भारतात पोहोचली.

सिनेमा मुख्यतः सहा घटकांच्या सहाय्याने साकार होतो. स्थळ, काळ, दृश्य, ध्वनी, आशय आणि अभिव्यक्ती किंवा घाट. या सहा घटकांच्या अनुषंगाने आपण सिनेमा या माध्यमातील प्रयोग व्यवहाराकडे बघणार आहोत.

‘काळ’ हा सिनेमा या माध्यमाचा सगळ्यात मूलभूत असा घटक आहे. सिनेमा काळात साकार होतो. साध्या भाषेत सिनेमा एवढ्या एवढ्या वेळात साकार होतो आणि सिनेमामध्ये आपण स्थळ बघतो किंवा अवकाश पाहतो. मग तो अवकाश कितीही अमूर्त असो. अगदी अंधार सुद्धा. सिनेमाच्या जन्मापासून काळ आणि स्थळ ह्या दोन जाणीवांच्या पासून सिनेमा वेगळा काढता येत नाही. या अनुषंगाने काही महत्वाच्या प्रयोगाविषयी मी मांडणी करतो आहे.

स्थापत्य , चित्रकला , नाट्य , शिल्पकला यांच्याप्रमाणे सिनेमा ही देखील एक दृश्य कला आहे. सिनेमा या कलेला आणखी एक परिमाण लाभेलेलं आहे ते म्हणजे १९३२ पासून ध्वनीची जोड मिळाली . सिनेमातील दृश्यात्मकता आणि सिनेमामधील ध्वनीरचनेची  एक स्वतंत्र स्वायत्त व्यवस्था यांच्या परस्पर-संबंधातून आकाराला येणारं एक रूप याबाबत जागतिक आणि भारतीय सिनेमाच्या इतिहासात अनेक महान कलावंतानी खूप महत्वाचे प्रयोग करून ठेवले आहे आहेत. त्यातील काही मोजक्या कालावंतांच्या काही कलाकृतींमधील काही  अंशांकडे आपण नजर टाकूया.

कुठल्याही कलाव्यवहारात विशिष्ट पातळीवरचा अर्थ बांधणे त्याचे अर्थनिर्णयन करणे आणि अर्थ निर्णयानाच्या विविध्य टप्प्यांकडे जाणे त्यातील  रसव्यवस्थेकडे जाणे त्यातून आपल्याला अभिप्रेत असणाऱ्या चिन्ह-व्यवस्थेचा संकेत व्यवस्थांचा अभ्यास करणे आणि त्या अर्थ-व्यवहाराला व्यक्त करण्यासाठी त्या त्या कालामाध्यामात आपण कुठली अभिव्यक्तीची भाषा वापरतो हे देखील तितकेच महत्वाचे ठरते. आशयाला अभिव्यक्त करण्यासाठी घाट किंवा अभिव्यक्तीतून निर्माण होणारा आशय अशा व्दंव्दात्मक मांडणीकडे आपण पाहू शकतो.आपल्याला विचार व्यवस्थेत कुठ्लाय्ही कलात्मक अविष्काराचे अर्थ-निर्णयन करत असताना जाणीवेच्या पातळीवर किंवा नेणिवेच्या पातळीवर आपण अनेक गोष्टींशी असणारा सहसंबंध पडताळून पाहत असतो . आपण त्या कलाकृतीशी आपल्या भवातालातील परिस्थितीशी त्यातील  व्यक्ती व्यक्तींच्या किंवा व्यक्ती आणि सामष्टी यांच्यातील परस्परपूरक संबंधाकडे कलेच्या अंगाने पाहत असताना आपण अनेक पातळ्यांवर संवाद साधत असतो. आशय आणि अभिव्यक्ती ह्यांच्या संदर्भात काही महान दिग्दर्शकांनी काही  प्रयोग केले आणि त्यांनी या माध्यमाला समृध्द केले.

स्थळ आणि काळ – वर्तोव , आय्झेन्स्तीन , तर्कोव्स्की , यांची रशियन परंपराः-

सिनेमामधील काळ या संकल्पनेचा विचार रशियन ( पूर्वीचा सोवियत रशिया) यांच्यामधील दिग्दर्शकांनी जितका केला असेल तितका क्वचितच जगातील इतर देशातील दिग्दर्शकांनी केला असेल. संकलन ज्याला ‘मोन्ताज’ असे संबोधले जाते, त्या विचारपध्दतीचा शोध  सर्गेई आय्झेन्स्तीन ह्या जगप्रसिध्द  दिग्दर्शकाने लावला. त्याने सिनेमा माध्यमातील अचाट शक्यतांचा जगात प्रथमच विचार केला. दोन शॉटच्या संबंधातून निर्माण होणारा, ध्वनित होणारा विचार यांच्याशी एडिटिंगच्या तंत्राने खेळण्याचा जगात पहिल्यांदाच प्रयत्न केला. सिनेमा माध्यमातील  हा सगळ्यात मोठा प्रयोग होता. दोन शॉटच्या जोडणीतून तिसरा अर्थ निर्माण करणे आणि पुढे त्यातूनच कलात्मक भूगोल ( Creative geogrpahy ) ही संकल्पना अस्तित्वात आली आणि त्या नंतर सिनेमा या माध्यमाच्या सगळ्या शक्यता बदलल्या. स्थळ आणि काळ यांच्या संदर्भात प्रायोगिकतेचा विचार करायचा झाल्यास आयझेन्स्तीन ह्यांचा काळाकडे पाहण्याचा दृष्टीकोन क्रांतिकारी ठरला. त्यांनी रूढ केलेले संकलनाचे पाच प्रमुख प्रकार 

१)मेट्रिक मोन्ताज २) रिदमिक मोन्ताज

३) टोनल मोन्ताज ४) ओवर टोनल मोन्ताज

५) इंत्लेक्चुल मोन्ताज

यांनी सिनेमा माध्यमाच्या  प्रायोगिकतेचा पाया रोवला. त्यांनी बनविलेल्या फिल्म्स सिनेमा माध्यमासाठी वरदान ठरल्या.

रशियन परंपरेतील दुसरे महत्वाचे नाव म्हणजे झिगा वर्तोव : man with a movie camera या त्यांनी बनविलेल्या  सिनेमामध्ये स्थळ किंवा अवकाश या सिनेमात अनन्यसाधारण महत्त्व असणाऱ्या संकल्पनेचा विचार खूप चांगल्या प्रकारे केला आहे. या सिनेमाला ‘सिनेमामधील ऑर्केस्ट्रा’ असेही बरेच जण संबोधतात .या सिनेमाच्या सुरवातीला वर्तोव यांनी काही विचार मांडले ज्याचा सार साधारण असा होता: -

हा सिनेमा म्हणजे सिनेमा ह्या माध्यमाला साहित्य संगीत नाट्य चित्रकला ह्यांच्यापासून दूर नेऊन तसंच स्वतंत्र अस्तित्त्व दाखवण्यासाठी केलेला  प्रयोग आहे’’. म्हणून या चित्रपटाचे सिनेमा इतिहासातील महत्त्व आपल्याला नाकारता येत नाही. त्यात केलेलं दृश्य रचेनेचे आणि काळासोबत केलेलं प्रयोग आजही थक्क करून सोडणारे आहे. तेंव्हा तर ते काळाच्या दृष्टीने खूपच पुढे होते. 'सिनेमा माध्यमाच्या अंतर्भूत ताकदीचा विचार करणारा महान दिग्दर्शक',म्हणून वर्तोवला इतिहास स्मरतो.

जागतिक सिनेमा इतिहासात ज्यांच्या बद्दल बोलताना केवळ ‘अद्भुत’ असा शब्द काही लोकांसाठी वापरता येऊ शकतो. त्यातील सगळ्यात महत्वाचे नाव म्हणजे आंद्रेई तार्कोव्स्क्यी. या निबंधाच्या सुरवातीला वापरलेल्या विधानाकडे पाहिल्यास त्यांच्या कलाविषयक जाणीवेची आपल्याला माहिती होऊ शकते. सिनेमा आणि काळ त्यांच्या अनेकाअनेक शक्यता काळात अंतर्भूत असणारा अवकाश आणि अवकाशात अवगुंठीत होणारा काल यांच्या मधील परस्परपूरक संबंधाचा विचार तार्कोव्स्की यांनी आपल्या सिनेमामधून केला. मिरर ,सोलारीस , नोस्ताल्जीया या सिनेमामधून काल या संकल्पनेचे अनेक पोत तर्कोव्स्क्यी ह्यांनी उलगडून दाखवले. त्यांचे सिनेमातील काळ ह्या संक्ल्पनेंचे विस्तृत विचार आपल्याला sculptting in time  या त्यांच्या सिनेमावरच्या महान पुस्तकात वाचायला मिळतात.अवकाशाकडे बघण्याची तर्कोवस्की ह्यांची पध्दतसुध्दा अभ्यासनीय आहे. शांत लयीत हलणारा कॅमेरा आपल्याला एका वेगळ्याच अनुभव विश्वात घेऊन जातो. आणि शब्दातीत अनुभवाच्या ऐंद्रिय संवेदनांच्या प्रदेशात लीलया फिरवतो.  त्यांचे सिनेमा म्हणजे या माध्यमातील ‘अजिंठा वेरूळ’ आहेत . कालातीत. कालबध्द.

दृश्य व ध्वनी आणि प्रायोगिकता काही विचार काही कलाविष्कार  : रोबर्ट ब्रेसो, मनी कौल ,कार्लोस रेगादास

Make visible what, without you, might perhaps never have been seen.:- Bresson.

 दृश्य आणि ध्वनी यांच्यातील नात्याविषयी सगळ्यात महत्त्वाचा प्रयोग केला तो म्हणजे रोबेर्ट bresson या फ्रेंच दिग्दर्शकाने. पिकपोकेट , मुशेत’, मनी  या सिनेमामधून रोबेर्ट ब्रेसोन यांनी दृश्य आणि ध्वनी यांना एकमेकांचे गुलाम म्हणून न वापरता, त्यांना त्यांची स्वतंत्र स्वायत्त जागा आहे ह्याच पुरेपूर भान राखून वापरलं आणि एका नवीन सिनेमाचा जन्म झाला. त्यांनी बनविलेल्या सिनेमामध्ये दृश्य आणि ध्वनी यांचा एक अव्दितीय कलात्मक अविष्कार पाहायला मिळतो. मुशेत या सिनेमामधील ध्वनीची रचना अत्यंत खुबीने केली आहे. पिकपोकेट या सिनेमा मधील पात्रांच्या मानसिक अवस्थेला गडद करण्यासाठी वापरलेली ध्वनी रचना सिनेमा च्या कलात्मक अनुभवाला व्दिगुणीत करते.

समोर दिसत असणाऱ्या दृश्याच्या मागे वापरलेल्या अनेक पातळ्या ध्वनी च्या माध्यमातून आपल्या सिनेमा मधून रोबर्ट ब्रेसो ह्यांनी दाखवल्या. या बाबतीत त्यांनी केलेले प्रयोग भारतीय सांस्कृतिक पर्यावरणात लोककलेच्या आणि भारतीय शास्त्रीय संगीताच्या संदर्भात मनी कौल ह्यांनी खूप सुंदरपणे वापरले. दुविधा , उसकी रोटी , सिध्देश्वरी , सतह से उठता आदमी या सिनेमामधून मनी कौल यांनी दृश्य आणि ध्वनी यांच्या मांडणीत खूप प्रयोग केले. ‘सिध्देश्वरी’मध्ये त्यांनी दृश्य रचनेमध्ये आणि संकलनात केलेले प्रयोग हे हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या लयतत्वाचा वापर करून केल्यासारखे आहेत. त्यांच्या उदयन वाजपेयी यांनी घेतलेल्या मुलाखतीमध्ये त्यांचे सिनेमा आणि कलाविषयक विचार आपल्याला वाचायला मिळतात .’सतह से उठता आदमी’मध्ये त्यांनी  वेगवेगळ्या लेन्सेसचा वापर करून मिळवलेल्या दृश्याच्या सघनता आणि खोली ह्या बाबींचा विचार केल्यास त्यांच्या अफाट प्रतिभेची जाणीव होते.

पाल्म डी ओर या कान्स चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट सिनेमासाठीचा पुरस्कार मिळालेला सिनेमा ‘आफ्टर डार्कनेस लाईट’. याचा दिग्दर्शक कार्लोस रेगादास. याच्या दृश्य रचनेबद्दल बोलायचं झाल्यास सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे समोर दिसणाऱ्या अवकाशाला पाहण्याची त्याची स्वतःची अशी अव्दितीय दृष्टी . वर उल्लेखलेल्या सिनेमाच्या सुरवातीच्या दृश्यामध्ये पावसाळ्याच्या वातावरणाचे सिनेमा माध्यमातील कलात्मक रूप कसे साकार होते  यासाठी शब्द अपुरे आहेत आणि शब्द जिथे संपतात तिथे सिनेमा सुरु होतो ह्याच उत्तम उदारहण म्हणजे रेगादास चे सिनेमे. कुठलीही कला विश्वाकडे कलावंत कसा पाहतो, यातून आकाराला येते . रेगादास आपल्याला त्याच्या दृष्टीने जग बघयला सांगतो. मेक्सीन भाषेत सिनेमा बनवणारा हा तरुण दिग्दर्शक सात्तात्याने प्रयोगशील सिनेमाची निर्मिती करत आहे. जागतिक सिनेमाच्या क्षेत्रात आपली मोहोर उमटवली आहे.

आशय आणि अभिव्यक्ती – अब्बास किअरोत्सामी तीन प्रयोग –

आपण त्यांच्याविषयी त्यांनाच  उद्देशून लिहूया.

‘’ प्रिय  ( अब्बास किरोत्सामी )  तुम्ही सिनेमात एक गोष्ट आणली जी आणण्यासाठी जगातल्या लाखो कलावंताला महत्प्रयास करावे लागतात.तुम्ही सिनेमात साधेपणा आणला. जी सगळ्यात अवघड गोष्ट असते. आपल्या रोजच्या जगण्यातील तपशीलांना तुम्ही खूप माणूसपणाच्या पातळीवर आणून त्यातील ऊर्जा आणि जीवन जगत राहण्याची उर्मी तुम्ही स्थळ-काळात बांधलीत. वळणावळणाने जाणा-या अवघड रस्त्यावरून तुम्ही लहनग्या मुलाला सोडलंत. त्याला त्याचा रस्ता शोधू देत . त्याचा अनुभव त्याला घेऊ देत. लहान मुलाच्या शाळेतील गृहपाठ पूर्ण करण्याच्या साध्या वाटणाऱ्या प्रसंगातून तुम्ही बुध्द जी शिकवण देऊन गेला होता, तो विचार तुम्ही या माध्यमातून मांडता. ( व्हेअर इज माय फ्रेंड्स होम)  टागोरांनी म्हटल्याप्रमाणे महानता साधेपणात वसते. तुम्ही साधेपणा कसा व्यक्त केला ते पाहणं फार रोचक ठरतं. सिनेमा माध्यमाची आमची जाणं विकसित करणारं ठरतं. सिनेमा बनवायला काय लागतं, असा प्रश्न येतो. जागा लागते, काळ लागतो किंवा असतोच  आणि माणसं लागतात .सिनेमा जागा पाहतो आणि माणसं पाहतो... हे तुम्ही ओळखलं.. हुकुमशाही इराणी राजवटीमधून  कलावंतांच्या सृजनशील उर्मीच काय होतं हे आम्ही पाहिलं  जाफर पनाहीला देश सोडवा लागतो ,म्ख्माल्बफना देश सोडवा लागतो असगर फरहादिना  देश सोडवा लागतो तुम्हालाही तो सोडवा लागला. मुलांना केंद्र्स्थानी ठेऊन तुम्ही पहिल्या काही फिल्म्स बनवल्या , आपल्याला अभिप्रेत असणारा आशय अभिव्यक्त करण्यासाठी तुम्ही अनेक घाट स्वीकारले . खूप प्रयोग केले. .ओझुला अर्पण केलेल्या तुमच्या फिल्म मध्ये केवळ पाच शॉट आहेत. एकही संवाद नाही. एकही पात्र नाही. कथा तर बिलकुलच नाही.तरीपण तुम्हला काही अनुभव पोहोचवायचा आहे त्यात तुम्ही यशस्वी होता. टेन नावाच्या सिनेमात तुमचा कॅमेरा पूर्ण सिनेमाभर नव्वद मिनिटे कार मध्येच राहतो. दोन पात्रे बोलत राहतात. असा प्रयोग असो किंवा टेस्ट ऑफ शिरीन मध्ये पूर्ण सिनेमाभर तुम्ही इराणमधील सिनेमागृहात चित्रपट पाहत असणाऱ्या स्त्रियांच्या चेहऱ्यांना दाखवत राहता. आणि संवाद साधायला लावता. तुमच्यापाशी सिनेमा संपला असे कुणीतरी म्हंटले आहे, ते सार्थ आहे.”

जगभरच्या लोकशाही निम-लोकशाही  ते थेट ठोकशाही अशा अनेक ठिकाणी अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणारे दडपशाही करून स्वतंत्र जाणीव संवेदना आवाज दाबण्याचे प्रयोग इतिहासात झाले. सर्वात भयाण रूप हिटलरच्या काळात पाहायला मिळालं. आपल्या बाजूने असो किंवा आपल्या विरुध्दचा असो स्वतंत्र वेगळा आवाज हा राजसत्तेला कधीही थोडासा घाबरून टाकणारा असतो. जेंव्हा सामाजिक  आत्मिक सांस्कृतिक राजकीय स्वातंत्र्य जन्माला येते किंबहुना ते स्वातंत्र्य ती स्वातंत्र्याची अवस्था काही रक्त , काही शाई, काही अश्रू घाम गाळूनच जन्माला आलेली असते. स्वतंत्र होणे ही आपल्या मनाची अवस्था आहे, तिच्यावर बाहेरच्या अनेक बाबींचा शिरकाव होणे ही दुसरी गोष्ट आहे .किरोस्तास्मी मनातून पूर्णपणे स्वतंत्र असणारे कलावंत आहे. आशयाला अभिव्यक्त  करण्यासाठी त्यांनी वापरलेले प्रयोग जगभरच्या कलावंताला प्रेरणा देणारे ठरतात.

 भारतीय परीप्रेक्षाय्तून सिनेमा या कला-माध्यमाकडे पाहत असताना आपल्याला अनेक अंगाने त्या कलाप्रकाराला भिडता येऊ शकते.किंबहुना कुठल्याही कला माध्यमाला भिडताना आपल्याला विविध आंतरविद्याशाखीय अभ्यासातूनच त्याच्या आस्वादन अभ्यास प्रक्रियेकडे जावे लागते. भारतात सिनेमा दादासाहेब फाळके यांच्यापासून सुरु झाला. त्यांनी केलेला पहिला प्रयोग माझ्या मते, आशयाच्या दृष्टीने होता. हिंदू मिथकशास्त्र त्यातील राजा हरीश्चंद्र आणि त्याची गोष्ट तत्कालीन भारतीय समाजात काही मुल्यांचा पुनरुच्चार करण्यासाठी त्यांनी वापर केला. भारतीय सिनेमा परंपरेत आदर्शवादाचा पायंडा पाडण्याचा पहिला प्रयोग माझ्या मते फाळकेंनी केला. आशयच्या दृष्टीने भारतात झालेला हा पहिला प्रयोग होता. अर्देशीर इराणी नावाच्या माणसाने सिनेमाला भारतीय सिनेमाला बोलतं केलं. सिनेमा या माध्यमाला स्वतःची भाषा असताना त्याला अजून एका भाषा घटकाची आवश्यकता भासली ती का?? सिनेमा ही कला जर बोलीभाषेशिवाय संवाद साधणारी असेल तर मग त्यात त्या कलेला त्या  कलावंताला सिनेमा माध्यमात मानवी संस्कृती संवर्धनातील सर्वात महत्वाची भूमिका वठवणाऱ्या भाषा या मानवी कृतीची गरज का भासली?? याचं माझ्या मते उत्तर संस्कृती आणि भाषा यांचा परस्परपूरक संबंध . कलावंताला संस्कृती टिपण्यासाठी भाषा हे माध्यम घ्यावं लागलं. अर्थातच चित्रपट या कलेची म्हणून असणारी जी भाषा आहे जी शॉट टेकिंग , mise en scene, montage , scene constrution , shot maginfication, charactres positions within frame , या सर्व घटकांनी साकार होते; पण सोबत उच्चारीत शब्दांची पण गरज भासते. जाणीवपूर्वक बनविलेल्या मूकपटांचा अपवाद वगळून.चित्रपटात व्यक्त होणारा आशय त्या आशयाला परिणामकारकरित्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी लागणारी दिग्दर्शकीय निवड यांच्यामध्ये शब्द या घटकाचे अनन्यसाधारण महत्व आपल्यला नाकारता येत नाही. भारतीय सिनेमाच्या जन्मानंतर अनेक राज्यात हा व्यवसाय सुरु झाला. जाणीवपूर्वक ‘व्यवसाय’ हा शब्द मी वापरतो आहे. व्यवसाय ह्या शब्दाची व्याख्या आपण सर्व जण जाणतो. ज्या गोष्टीला विक्री मूल्य असते, त्यातून चलन निर्मिती अभिप्रेत असते अशा कृतीस व्यवसाय म्हणूया . तर भारतात सिनेमा माध्यम व्यवसाय म्हणून रुजले साहजिकच जिथे भांडवल असते, तिथेच कुठलाही व्यवसाय रुजतो. वृध्दिंगत होतो. तसंच सिनेमाचं झालं. मोठं-मोठ्या धनिकांच्या हातात भांडवलदारी वर्गाच्या हातात हे माध्यम जाऊन बसलं आणि मग त्यातून विशिष्ट विक्रीमूल्य असलेया सिनेमाची निर्मिती होत राहिली. ज्याला आपण आपल्या भारतीय सिनेमाची परंपरा म्हणूया . ज्या परंपरेत विविध विचार प्रवाह असणाऱ्या परंपरा अनुस्यूत आहेत . या सर्व परंपरांचा समावेश करून भारतीय सिनेमा नावाची महाकाय संकल्पना साकार होते. जिचा इतिहास नुसता वस्तुनिष्ठपणे ( जो कधीच सांगता येत नसतो) सांगायचं म्हंटले तरी, माझ्या आयुष्याला मर्यादा आहेत कारण मी काळात बांधील आहे. सिनेमा या माध्यमाच्या भावी काळाबद्दल आपण काहीच निश्चित कुठलेच विधान करू शकत नाही. जोपर्यंत माणूस आहे आणि माणसाला आपला भवतालाला त्याच्या सर्व व्यामिश्र गुंतागुंतीसोबत समजून घ्यावासा वाटणार आहे तो पर्यंत त्यला सिनेमा बनवत रहावासा वाटणार आहे. त्यात काही तंत्रज्ञांनाच्या दृष्टीने बदल होतील. काही गोष्टी मूलभूत राहतील. त्या काय असतील यांचा आपण शोध घेऊया.

   ( clockwise images- cinema 1:- तार्कोवर्स्की ,cinema 2-  रॉबर्ट ब्रेसॉन,  
cinema3-सतह से उठा आदमी मनीकौल यांच्या सिनेमाचे पोस्टर 
  )                                                                           

       -  अक्षय इंडीकर
           akshayindikar1@gmail.com

 ( अक्षय इंडीकर हा उदयोन्मुख प्रयोगशील तरुण दिग्दर्शक असून ‘डोह’ ही त्याची प्रसिध्द शॉर्टफिल्म. या शॉर्टफिल्मची निवड केरळ फिल्म फेस्टीवलमध्ये झाली होती. इतर अनेक ठिकाणी या लघुपटाची वाहवा झाली. सिनेमा दिग्दर्शक असणारा अक्षय मराठी साहित्याचा प्रगाढ वाचक आहे.) 

About the Author

अक्षय's picture
अक्षय

अक्षय इंडीकर हा उदयोन्मुख प्रयोगशील तरुण दिग्दर्शक असून डोहही त्याची प्रसिध्द शॉर्टफिल्म. या शॉर्टफिल्मची निवड केरळ फिल्म फेस्टीवलमध्ये झाली होती. इतर अनेक ठिकाणी या लघुपटाची वाहवा झाली. सिनेमा दिग्दर्शक असणारा अक्षय मराठी साहित्याचा प्रगाढ वाचक आहे