जेरूसलेम’: एक चरित्रकथा !

                                                                                                             

                                                                             

हे शहर अब्राहमिक धर्मांमधल्या संघर्षाचा केंद्रबिंदू आहे, दिवसेंदिवस लोकप्रिय होत चाललेल्या ख्रिश्चन, ज्यू आणि मुसलमान मूलतत्ववाद्यांचं तीर्थस्थान आहे आणि त्याच वेळी एकमेकींवर कुरघोडी करू इच्छिणा-या संस्कृतींसाठी डावपेच आखून लढण्याची युद्धभूमी देखील आहे. निरीश्वरवाद आणि श्रद्धा यांत सीमारेषा आखणारं शहर हेच; सर्वधर्मसमभावाची प्रेरणा देणारं शहरही हेच आणि दिवसाचे चोवीस तास जगभरातले कॅमेरे रोखलेला लखलखीत रंगमंच म्हणजे देखील हेच शहर!

‘जेरुसलेम’ या सायमन सीबग माटफिऑरी पुस्तकाविषयी सांगतो आहे युवाभारत चळवळीचा सक्रिय कार्यकर्ता एस वनराज

भारतात राहणार्‍या प्रत्येक व्यक्तीच्या कानावर ‘जेरूसलेम’ हे नाव अधून मधून पडत असतं. वर्तमान पत्रातून किंवा प्रसारमाध्यमांतून पॅलेस्टाईन व इस्राईल संघर्षाची बातमी जेव्हा-जेव्हा येते तेव्हा तेव्हा ‘जेरूसलेम’ हे नाव घेतलं जातं. या व्यतिरिक्त ‘जेरूसलेम’ या नावाकडे विशेष लक्ष देण्याची गरज आपल्यापैकी बहुतेकांना वाटत नाही. पण आपल्याला जर कोणी असं सांगितलं की “जेरूसलेम ची कहाणी सार्‍या विश्वाची कहाणी आहे!” तर मात्र आपली उत्सुकता शिगेला पोहचल्याशिवाय राहणार नाही.

सायमन सीबग मांटफिऑरी यांचे ‘जेरूसलेम एक चरित्रकथा’ हे पुस्तक सामान्य वाचकापासून ते अभ्यासक विद्यार्थ्यांपर्यंत सर्वांचीच उत्सुकता शमवणारा आणि सद्य जागतिक परिस्थितीकडे अधिक डोळसपणे पहायला शिकवणारा असा महत्वाचा ग्रंथ आहे. डायमंड पब्लिकेशन्सने इंग्रजीतून भाषांतरीत करून बाजारात आणलेला हा ग्रंथ म्हणजे मराठी वाचकांची जागतिक राजकारणाची समज विकसित करण्याच्या दिशेने केलेला एक गंभीर प्रयत्न आहे.

ऐतिहासिक काळापासून जेरूसलेम हे शहर संपत्ती व श्रद्धा, सत्ता व शुद्धता, कुकर्म व पवित्रता; धर्म, धार्मिकता व धर्मांधता यांचे केंद्र राहिले आहे. ज्यू, ख्रिश्चन आणि इस्लाम या तिन्ही धर्मांचे उगमस्थान असलेली जेरूसलेम नगरी म्हणजे गेल्या तीन हजार वर्षांचा जीवंत इतिहासच आहे. हा तीन हजार वर्षांचा इतिहास मांटफिऑरी यांनी त्यांच्या ७५३ पानी ग्रंथात अत्यंत विस्तृतपणे मांडला आहे. नऊ विभागांमध्ये विभागलेल्या या पुस्तकात एकूण ५३ प्रकरणे आहेत.

चरित्र लेखनासाठी प्रसिद्ध असलेले व केंब्रिज विद्यापीठातून इतिहास विषयाची पदवी घेतलेल्या मांटफिऑरी यांनी त्यांच्या खास शैलीत जेरूसलेमची चरित्रकथा रेखाटलेली आहे. तर्क आणि सत्याऐवजी श्रद्धा आणि भावनांनी राज्य केलेल्या जेरूसलेम नगरीचं चरित्र लिहिणं हे फारच जोखमीचं आणि आव्हानात्मक काम आहे; पण लेखक मांटफिऑरी म्हणतात की “हे पुस्तक लिहिण्याची तयारी जणूकाही मी संपूर्ण आयुष्यभरच करत होतो, असं मला वाटतं.” लेखक इतिहासाच्या पानांतून ज्या सहजपणे फिरत-फिरत त्याची नाळ आपल्या सर्वांच्या वर्तमानाशी जोडून देतो ते पाहिले की वाचकाला  देखील लेखकाचे वरील उद्गार पटतील. जेरूसलेमला जगाच्या इतिहासाच्या केंद्रस्थानी ठेऊन हा चरित्रात्मक इतिहास लिहिण्यात आलेला आहे. त्यामुळेच डेव्हिड, मक्काबी, हेरड, उमायद, बाल्ड्विन, सलादिन, हुसैनी, खलिदी, स्पॅफर्ड, रॉथशिल्ड्स, मांटफिऑरी इत्यादि घरण्यांचा इतिहास आणि रोमन व ग्रीक साम्राज्यातील ऐतिहासिक घडामोडी यांचा आढावा जेरूसलेमच्या अनुषंगानेच घेण्यात आलेला आहे. 

“दुसर्‍या धर्माने एखाद्या ठिकाणावर हक्क सांगितल्यानंतर त्या ठिकाणाचं पावित्र्य जेवढं वाढीस लागतं, तेवढं इतर कशानेही लागत नाही.” ज्यू, ख्रिश्चन आणि इस्लाम या धर्मांच्या दृष्टीने ‘पवित्रस्थान’ असलेले हे ठिकाण वरासदारांच्या यादीने आणि वरसाहक्कासाठी लढल्या गेलेल्या असंख्य लढयांचे केंद्र म्हणून सदैव चर्चेत राहिले आहे. जेरूसलेमचं महत्व स्पष्ट करताना लेखक म्हणतो की, “हे शहर अब्राहमिक धर्मांमधल्या संघर्षाचा केंद्रबिंदू आहे, दिवसेंदिवस लोकप्रिय होत चाललेल्या ख्रिश्चन, ज्यू आणि मुसलमान मूलतत्ववाद्यांचं तीर्थस्थान आहे आणि त्याच वेळी एकमेकींवर कुरघोडी करू इच्छिणार्‍या संस्कृतींसाठी डावपेच आखून लढण्याची युद्धभूमी देखील आहे. निरीश्वरवाद आणि श्रद्धा यांत सीमारेषा आखणारं शहर हेच; सर्वधर्मसमभावाची प्रेरणा देणारं शहरही हेच आणि दिवसाचे चोवीस तास जगभरातले कॅमेरे रोखलेला लखलखीत रंगमंच म्हणजे देखील हेच शहर! धार्मिक,राजनैतिक आणि प्रसारमाध्यमांच्या एकमेकांवर पोसल्याजाणार्‍या हितसंबंधांमुळे कधी नव्हे एवढ्या बारकाईने आज इथल्या घडामोडींचे विश्लेषण केलं जातं”. अशा या जेरूसलेम नगरीचे चरित्र वाचता-वाचता अर्थसत्ता-धर्मसत्ता आणि राजकारण यांची सरमिसळ होत-होत एकोणीसाव्या व विसाव्या शतकात जगभर उभे राहिलेले अनेक ‘जेरूसलेम’ आपल्या अवती-भवती आपल्याला दिसू लागतात. म्हणूनच “जेरूसलेमची कहाणी सार्‍या विश्वाची कहाणी आहे” हे अनेक अर्थांनी खरं आहे.

जेरूसलेमची कथा सांगणार्‍या या पुस्तकात अनेक रोमांचकारी गोष्टी, घटना आणि प्रसंग अनुषंगाने येत राहतात. प्राथमिक अवस्थेतील मानवी समाजाच्या धर्म संकल्पना, संस्कृतींचा उगम, अर्थसत्ता व धर्म सत्तेचे अतूट नातेसंबंध,अनेक रोमांचकारी युद्ध कथा, युद्धातील डावपेच, कौटुंबिक सत्तास्पर्धा, व्यक्तिगत महत्वाकांक्षा, ईर्ष्या, द्वेष आणि मत्सर; अनेक साहसी आणि ध्येयवादी मोहिमा इत्यादी इत्यादी गोष्टींनी हे पुस्तक पुरेपूर भरलेले आहे.

आज जेरूसलेमवर हजारो पुस्तके लिहिली गेली आहेत. तरीही ज्याप्रमाणे कॅरन आर्मस्ट्रॉंग यांच्या ‘जेरूसलेम : वन सिटी थ्री फेथस्’ या पुस्तकाचे महत्व अबाधित आहे. त्याचप्रमाणे जेरूसलेम विषयीचे ऐतिहासिक सत्य समजून घेण्याच्या दृष्टीने मांटफिऑरी यांच्या या पुस्तकाचे महत्व अनन्यसाधारण आहे. इतिहासाचे विद्यार्थी व अभ्यासक असलेल्या मांटफिऑरी यांनी ऐतिहासिक सत्याचा मागोवा घेत असताना श्रद्धा, भावना, भाकडकथा आणि आर्थिक व राजकीय हितसंबंध यांचा अडथळा व संकोच होणार नाही याची पुरेशी काळजी घेतलेली दिसते. पण त्याच बरोबर “ ‘धर्म’ या कल्पनेबद्दल थोडातरी आदर बाळगल्याशिवाय जेरूसलेमला पूर्णपणे समजून घेणं  अशक्य आहे;” याची जाणीव त्यांना आहे. जेरूसलेमच्या दगडा—मातीच्या इतिहासात लेखकाने मानवी भावनांचाही समावेश केलेला आहे.

“इसवी सन पूर्व १३५० मध्ये जेरूसलेमचा राजा अब्दी-हेपा याने नवइजिप्त राज्याचा फॅरो आखेनातेन याला मदतीसाठी लिहिलेल्या पत्रापासून” (इतिहासात नोंद झालेल्या पहिल्या जेरूसलमवासीयचे शब्द) ते विसाव्या शतकातील अनेक महत्वाच्या नोंदींनी हे पुस्तक ओतप्रोत भरलेले आहे. मात्र असे असूनही पुस्तकाचा उद्देश हा जेरूसलेमची चरित्रकथा सांगणे हा असल्याने पुस्तक कुठेही कंटाळवाणे होत नाही. लेखकाने पुस्तकाला जोडलेले तेरा पानी प्रास्ताविक हे अत्यंत समर्पक आणि विषयाचे सखोल विवेचन करणारे आहे. विषयप्रवेश करून भव्य इतिहास पटाकडे जाण्यापूर्वीच वाचकाची मानसिक तयारी करून घेण्याच्या दृष्टीने आणि विषयाचे गांभीर्य कळण्यासाठी या प्रास्ताविकाची फारच मदत होते.

डेविडच्या प्राचीन इतिहास आणि कथांपासून सुरू होणारा पुस्तक व वाचक यांचा प्रवास झायनवादाच्या आधुनिक अवतारपर्यंत येऊन थांबतो. जेरूसलेम विषयी लिहीलेल्या या ग्रंथाच्या निमित्ताने ज्यू, ख्रिश्चन आणि इस्लाम या तिन्ही धर्मांचा उगम, त्यामागची ऐतिहासिक पार्श्वभूमी व त्यांचा संघर्षमय विकास वाचकाला स्पष्ट होत जातो. मानव समाजाची आत्यंतिक गरज म्हणून आपले अस्तित्व आणि महत्व टिकवून असलेल्या ‘धर्म’ या संकल्पने भोवती गुंफलेली समतेची, मानव कल्याणाची मूलतत्वे आणि त्यांचा संकोच होऊन धर्माच्याच नावाने उभा राहणारे सत्तेचे, वर्चस्वाचे राजकारण यांचे धागेदोरे आणि त्यातली गुंतागुंत हे पुस्तक उलगडून दाखवते. आधुनिक काळातही धर्माच्या आधाराने खेळले जाणारे आर्थिक, राजकीय व सांस्कृतिक सत्तेचे खेळ समजून घ्यायला हे पुस्तक वाचकाला मदत करते.    

प्राचीन-मध्ययुगीन आणि आधुनिक या तिन्ही काळांना सामोरे जाणारी ही नगरी युरोप आणि पश्चिम आशिया मधील अनेक ऐतिहासिक घडामोडींचे केंद्रस्थान राहिली आहे. “जेरूसलेमचा इतिहास लिहिणार्‍याला स्वप्नरंजनवादी व साम्राज्यवादी पश्चात्यांचा शहरावर पडलेला प्रभाव हा दाखवावाच लागतो. कारण त्यामुळेच या महासत्ताना वाटणार मध्यपूर्वेचं महत्व समजून घेता येतं.” या गोष्टीचं भान ठेवत लेखकाने पुस्तकाच्या शेवटच्या काही प्रकरणांत एकोणीसाव्या आणि विशेषत: विसाव्या शतकात जेरूसलेम भोवती उभा राहणारं पश्चिमात्यांच राजकारण हा विषय सविस्तरपणे हाताळलेला आहे. स्पेन, इंग्लंड, अमेरिका, रशिया इ. देशांतील सरकार आणि अनेक राजघराणी;तसेच जेरूसलेमशी नाते सांगणारी अनेक कुटुंबे व काही महत्वाच्या व्यक्ति (विशेषत: या व्यक्तींनी लिहिलेली ‘द ज्युईश स्टेट’, ‘सिकिंग झायन’, ‘रोम अँड जेरूसलेम - द लास्ट नॅशनल क्वेस्चन’ यांसारखी पुस्तके) यांची भूमिका आधुनिक काळातील ‘जेरूसलेम’ नगरीचे ‘राजकीय भवितव्य’ ठरवण्यात अत्यंत महत्वाची राहिली आहे असे लेखकाचे म्हणने आहे.

“आधुनिक काळात धर्माचे महत्व कमी होत जाईल”, असा अनेक बुद्धिवंतांचा समज मागील काही दशकांनी पूर्णपणे चुकीचा ठरवलेला आहे. नव्वद नंतरच्या दशकात जगभर धर्माचे व धर्माच्या आधारे उभा राहणार्‍या राजकारणाचे पुनुरुज्जीवन झाले. आधुनिक काळात झालेल्या या पुनुरुज्जीवन प्रक्रियेच्या केंद्रस्थानी पुन्हा एकदा ‘जेरूसलेम’ या नगरीचे दर्शन आपल्याला होते.

आज भारतासारख्या देशात आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने होणारा धर्माचा प्रचार-प्रसार, मध्यमवर्गीय तसेच उच्चशिक्षित समूहांमध्ये वाढणारे धर्माचे व बाबाबुवांचे प्रस्थ आणि ‘विवेकवादी’ विचारांना येणारे अपयश हे आपण रोज अनुभवत आहोत. या पार्श्वभूमीवर जगातील अत्यंत महत्वाच्या अशा तीन धर्मांचे केंद्रस्थान असलेल्या ‘जेरूसलेम’ नगरीचा इतिहास समजून घेणे व ‘धर्म’ या संकल्पने भोवती उभा राहणारे समता-विषमता, नीती-अनीती,व्यक्तिगत स्वार्थ व मानव कल्याण; शोषण, वर्चस्ववाद व मुक्तता यांचे राजकारण समजून घेणे हे अत्यंत उद्बोधक ठरेल असे वाटते.

एस. वनराज

shindevanraj@gmail.com

 

About the Author

एस. वनराज

 कायद्याचा अभ्यास करणारा एस.वनराज हा युवाभारत संघटनेचा सक्रिय कार्यकर्ता आहे )