सुखाचा शोध

दिवसभराचा शीण घालवण्यासाठी ती वर आपल्या खोलीत आली. तिने खिडकीवर जमलेले धुके हाताने हलकेच पुसले. बाहेर  बर्फ पडत होता. तिला कॉफिची  तलफ आली नसती तरच नवल. कॉफीचा मग हातात  घेत ती खुर्ची वर बसली. लांबूनच तिला दोन काळे ठिपके हलताना दिसले. तिने थोडं अजून जवळ जाऊन पहिलं. त्या दोन काळ्या  स्वेटरमध्ये आता तिला दोन  गोंडस चेहरे दिसले. बर्फाचे गोळे एकमेकांवर मारत मारत त्या दोन मुली जणू काही आजूबाजूचं  सगळ जगंच विसरल्या होत्या. त्या क्षणाला त्यांच्या इतकं  आनंदी कुणीच नसेल असं  तिला उगाचच वाटून गेलं. बर्फाचा तो मऊ भुसभुशीत गोळा  आपणही हातात घ्यावा अशी खुळचट इच्छा तिच्या मनात निर्माण झाली. तिने तो विचर झटकून टाकला आणि पुन्हा त्या लहानग्यांवर लक्ष केंद्रित केलं. कितीआनंदी होते ते जीव आणि आपण! अडगळीच्या खोलीतून शोधावा  तसा आपल्याला आनंद शोधावा लागतो.

तिच्या लहानपणी मयुसोबत घालवलेले काही क्षण तिच्या डोळ्यासमोर आले. दुपारच्या वेळी झाडाच्या  सावलीत बसून भविष्याची  त्यांनी रंगवलेली स्वप्न आठवली. आपण मोठ्या होऊ. आपली लग्नं  होतील. भेटणं  जरा कठीण होईल. म्हणजे आता जशा निवांत बसलोय तसा वेळ मुळीच नाही मिळणार. पण आपण महिन्यातून एकदा तरी भेटायचं. दोघींनी घरं  पार्ल्यात जवळ जवळ घ्यायची. दोघींनी मिळून स्वतःचं  एक फार्म हाउस बांधायचं. आणि महिन्यातून एकदा तरी  कुटुंबासोबत तिथे धमाल करायची!

तिच्या चेहऱ्यावर हलकेच हसू उमटलं. महिन्यातून एकदा! - आता दोन वर्षातून एकदा एखादा फोने होतो. तेंव्हा ठरवलेलं  काहीच पूर्ण झालं  नाही मग तरीही त्या आठवणी अजूनही छान का वाटतात? असं  काय होतं  त्या दिवसांमध्ये, त्या क्षणांमध्ये? आज सगळं  आहे पण तरीही एखादी ट्रिप  ठरवून  उसना आनंद का शोधावा लागतो? ती संपली की एखादा चित्रपट, एखादी पार्टी. आनंद असा ठरवून  ठरवून का मिळवावा लागतो?

सुख म्हणजे नेमकं काय? आणि ते कधी मिळेल?

दिवसभरातली सगळी कामं पूर्ण करणे , बारीक सारीक उरलेल्या गोष्टी आटपणे  , एखादा विडीओ किंवा लिंक बघणे यात कित्येकदा आपण आपला आनंद मिळवण्याचा प्रयत्न करत असतो.

 

प्रोमोशन मिळालं कि सुख मिळेल, अजून थोडं  मोठं  घर मग अजून थोडं सुख! कदाचित आपण आपलं  राहणीमान वाढवत गेलो कि सुख मिळेल असं  आपल्याला वाटत राहतं. एखाद्या पुढच्या ट्रीप वर किंवा असाच कधी मोकळा वेळ मिळाला स्वतःला relax  करायला कि निवांतं  सुख मिळेल असाच विचार करतो ना आपण.

आणि या सुखाच्या  मागे पळताना आपण जगणंच विसरतो. तो क्षण जगायचा राहून जातो. नुसतच पळत राहतो.

अक्वेरिअम मध्ये गेल्यावर किती वेळ आपण मासे डोळे भरून पाहिले? त्यांना कॅमेरऱ्यात बंद करायच्या घाईत आपण आपल्या डोळ्यांनी त्यांना बघायचंच विसरलो. पण मयुसोबत घालवलेला एक एक क्षण आपण जगलो. त्यातल्या बऱ्याचश्या गोष्टी पूर्ण झाल्या नसतील कदाचित पण त्या क्षणी ती स्वप्नं आपण तेंव्हाच जगून घेतली कसलीही घाई गर्दी न करता!

 

हातातली कॉफी थंड झाली होती. तिने मग तसाच बाजूला ठेवला. नवीन वर्षाच्या तिच्या नव्या डायरीत नव्या गोल्स मध्ये तिने लिहायला सुरवात केली

 

प्रत्येक क्षण मनमुराद जगायचा. घाई करायची नाही. आलेल्या प्रत्येक क्षणाला नीट न्याहाळायच त्यातल्या छोट्या छोट्या गोष्टी निरखून त्यात समाधान शोधायचं. जे आता या क्षणी आहे त्याबद्दल कृतज्ञ राहायचं. ज्या गोष्टींमुळे त्रास होतोय त्यांना उगीच त्रासून बाजूला सारायचा प्रयत्न करायचा नाही. छोट्या छोट्या गोष्टींमुळे खजील व्हायचं नाही .

आणि हे सगळं  या क्षणापासून  सुरु करायचं ! आत्ताच, अगदी या क्षणापासून!

तिने कॉफी गरम करून आणली आणि बाहेरचा बर्फ न्याहाळू लगली. या वेळी तिला ते बर्फाचे कण तिच्याकडे पाहून हसल्याचा भास झाला!

 

 

About the Author

Dipti Salvi's picture
Dipti Salvi