म्युरल

बऱ्याच  दिवसांनी शिकागो सारख्या मोठ्या शहरातून फिरत होते. शहरची ओढ हि प्रत्येकालाच असते. परंतु या शहरात गर्दी, धावपळ, उंचच उंच इमारती यासोबत अजून एका वेगळ्याच गोष्टीने माझं लक्षं वेधून घेतलं. ते म्हणजे भिंतींवर रंगवलेली सुंदर चित्रे. म्हणजेच म्युरल आर्ट. याबाबत अजून माहिती नैनाकडून मिळेल म्हणून घरी पोहोचल्यावर सर्वप्रथम नैनाला भेटले. नैना इथे युनिवर्सिटीमध्ये शिकवते. म्युरल आर्टबद्दल तिच्याकडून बरीचशी नवीन माहिती मिळाली..

म्युरल म्हणजे काय?

भिंतींवर पूर्ण केलेलं चित्र म्हणजे म्युरल.

 म्युरल शब्दाची व्युत्पत्ती लॅटिन ‘murus’ म्हणजेच भिंतं  या शब्दावरून झाली.  म्युरल हे चित्रकलेच्या इतर प्रकारांपेक्षा  वेगळे  आहे कारण ही चित्रं  म्हणजे लोकांनी लाकांसाठी काढलेली चित्रं असतात.

नुकतीच भारतात ठिकठिकाणी स्वच्छता मोहीम राबवण्यात आली आहे. उद्देश एकच कि आपला आजूबाजूचा परिसर स्वच्छ  दिसावा आणि रोगराई दूर व्हाही. आपल्या परिसरातील ज्या भिंती आहेत उदा: कचरा पेटीच्या मागची भिंत, मोठ्याला इमारतीच्या भिंती, कुंपणाच्या भिंती  येथेच हि म्युरल  आर्ट जन्म घेते. शहरातल्या कुठल्याही रिकाम्या भिंती म्हणजे तरुणांसाठी त्यांची कलात्मकता जोपासण्याची तसंच काही सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याची एक आदर्श जागाच!

आपला सांस्कृतिक वारसा जतन करण्यासाठी  आणि समाजात सुधारणा आणण्यासाठी फारसे  आर्थिक पाठबळ नसतानाही  काही प्रयत्न केले जातात. यापैकीच महत्वाचा  असा  शैक्षणिक उपक्रम ज्यामध्ये कला जोपासण्याच्या या कृतींमध्ये तरुणांचा सहभाग आहे ते म्हणजे म्युरल आर्ट.

 

म्युरल कशासाठी?

एक सामाजिक कला म्हणून म्युरल  सामाजिक, राजकीय, आर्थिक समस्या हाताळते. या  समस्यांना वाचा फोडते. सहजरित्या प्रत्येकापर्यंत हि चित्रे पोहोचतात. यातूनच समाजात खोलवर रुजलेल्या काही चुकीच्या रूढी, समज यावर प्रत्येकजण जाता येता थोडा वेळ का होईना विचार जरूर करतो. हि म्युरल्स, बघणाऱ्याशी  या चित्रांद्वारे  संवाद साधतात. चित्रकलेच्या इतर प्रकारांप्रमाणेच यातही चित्रं काढणाऱ्याची कल्पनाशक्ती महत्वाची असते.

म्युरल बऱ्याचदा काही प्रतीकांचा  वापर करून समाजामध्ये जागरूकता निर्माण करतात. जी गावे किंवा ज्या जागा अजूनही बऱ्याच प्रमाणात दुर्लक्षित आहेत त्यांना समाजाच्या वर्तुळात आणण्यासाठी, अशा ठिकाणी म्युरल आर्ट महत्वाची भूमिका बजावते. जागतिक शांतात, पर्यावरण, बंधुभाव, भूतदया, शिक्षण, कुटुंब, युगपुरुष, क्रांतिकारी, समता, सामाजिक न्याय, सांस्कृतिक वारसा यांना बढावा देणे तसेच अमली पदार्थांचे सेवन, स्त्रीभ्रूण हत्या, हुंडाबळी, अंधश्रद्धा यासारख्या घातक गोष्टीना विरोध करून समाजात त्याविषयी जागरुकता निर्माण करणे यामध्ये म्युरल आर्ट महत्वाची भूमिका बाजू शकते. जिथे जिथे म्युरल आर्ट सर्रास बघितले जातात त्या समजासाठी तो त्यांच्या जीवनाचा एक अविभाज्य घटक बनला आहे. म्युरल आर्टचे काही दृश्य परिणामही नोंदले गेले आहेत. ऑक्टोबर महिन्यात दिल्लीमध्ये ‘स्ट्रीट आर्ट दिल्ली’ या  फेस्टिवल दरम्यान काही भारतीय आणि आंतरराष्ट्रीय स्ट्रीट आर्टीस्ट एक महिना एकत्र आले आणि त्यांनी हे शहर विविध चित्रांनी रंगवुन टाकले. दिल्ली पोलिसांच्या हेडक्वार्टर वरील महात्मा गांधींचे हे चित्रं भारतातील सर्वात मोठे वॉल म्युरल ठरले आहे. 

 

म्युरल आर्ट हा काही अंशी सामुहिक उपक्रम आहे कारण यामध्ये समाजातीलच व्यक्ती या कलाकार आणि प्रेक्षक दोन्ही असतात. तरुणांचा यातील सहभाग हा विशेष सकारात्मक आहे. हा एक परिवर्तनशील सामाजिक उपक्रम आहे ज्यामध्ये शैक्षणिक मुल्यांसोबतच व्यक्तिमत्व विकासही होतो. यामुळे विद्यार्थ्याला स्वतःला व्यक्त करण्यची संधी मिळ्ते. एकत्रित बनवलेल्या म्युरलमुळे समाजाने साधलेल्या कामाची व कलेची  कायमस्वरूपी साक्षच तयार होते जो एक अतिशय महत्वाचा सौंदर्यानुभव ठरू शकतो. म्युरलची ही कला तरुणांमधील सर्जनशीलतेला वाव देते. यामधून त्यांचा इतिहास, संस्कृती, पारंपारिक वारसा आणि अनुभव प्रतिबिंबित होतात. एकत्रित काढलेल्या म्युरल्समुळे सांघिक एकात्मकता वाढीस लगते.

आपल्याला कलेची गरज आहे. कला हे आपले पहिले वैशिष्टय आहे आणि आपण ते स्वतःला व्यक्त करण्यासाठी कुठेही वापरू शकतो. (उदा: अश्मयुगातील भित्तिचित्रे, प्राचीन लेणी, शिल्प).  कलेचे  आपल्या आयुष्यातील स्थान किती महत्वाचे आहे यासाठी म्युरल हि कला विद्यार्थ्यांसाठी निश्चितच महत्वाची आहे. कलात्मक दृष्टी आपला जगाकडे बघयचा दृष्टीकोन बदलू शकतो. निसर्गरम्य , आदर्श समाज घडावा यासाठी म्युरलद्वारे सुसंवाद केला जाऊ शकतो. झाडे आणि फुले यांचे रमणीय लँडस्केप्स, खेळत असलेली मुलं, गाणारे पक्षी अशी सुंदर म्युरल मनाला एक प्रकारचा तजेला आणतात. दोन घरं  एकमेकांचे हात धरून उभी आहेत अशा प्रकारची चित्रे शेजाऱ्यांनमधील बंधुभाव दाखवून देतात. या सगळ्यामध्ये परिसराला एक सौंदर्य  लाभते हा भागही  निश्चितच महत्वाचा!

 

म्युरल आर्ट हि प्रेक्षकाच्या शोधत नसते तर ती जागेच्या शोधत असते . जेथे म्युरल बनवणाऱ्या  व्यक्तीच्या  आणि प्रेक्षकांच्या  भावना  व्यक्त होतात.  भिंतींवरील हि चित्रे  सामाजिक जीवन जसे होते, जसे आहे आणि जसे हवे यावर भाष्य करतात.

जागतिकीकरणाच्या या काळात जेथे अनेक समूहांचे, भाषांचे, संस्कृतींची माणसे एकत्र राहतात तिथे एकमेकांशी सुसंवाद साधत, एकेमेकांना आदर देत, एकमेकांच्या मतांचा आदर राखत त्यांना समजून घेऊन, स्वीकारून एकत्रित सामाजिक स्थैर्य प्रस्थापित करण्यसाठी म्युरल या कलेला जास्तीत जास्त लोकांपर्यंत, समूहापर्यंत पोहोचवणे गरजेचे आहे.  आजपर्यंत ज्या ठिकाणी आपण रंग उडालेल्या भिंती आणि फाटलेली पोस्टर्स पहिली तिथे विविध रंगानी चित्रांनी सुशोभित केलेल्या भिंती बघणे किती छान असेल!

About the Author

Dipti Salvi's picture
Dipti Salvi