आपः व्यवस्था परिवर्तनाचे स्वप्न की सत्य ?

आम आदमी पार्टीची वाटचाल जवळून अनुभवणारी प्रणिता वारे हिने या पक्षाबाबत मांडलेली ही भूमिका

--------------

आम आदमी पार्टी- सामान्यातल्या सामान्य माणसाचा विकास व्हावा आणि समाजातल्या शेवटच्या व्यक्तीला विकासाची फळं चाखता यावीत या उद्देशाने निर्माण झालेला राजकीय पक्ष. खरंतर आंदोलनातून निर्माण झालेला पक्ष. २०११साली आण्णा हजारेंनी दिल्लीच्या जंतरमंतर वरुन भ्रष्टाचाराच्या विरोधात आवाज उठवला आणि त्यानंतर ठिकठिकाणाहून हजारो लोक विशेषतः तरुण वर्ग मोठ्या प्रमाणावर यात सामील झाला. त्या आंदोलनातील प्रमुख व्यक्ती होत्या सामाजिक कार्यकर्ते आण्णा हजारे, माजी IPS अधिकारी किरण बेदी, माजी IRS अरविंद केजरीवाल;परंतु या सर्व आंदोलनकर्त्यांना सत्ताधारी पक्षाने ‘फक्त मेणबत्तीवाले’ म्हणून हिणवलं आणि हे आंदोलन किरकोळात काढलं कारण त्यांच्या मते हे सर्व लोक केवळ आंदोलनच करु शकतात. फक्त बाहेरुन विरोध करणंच यांना जमतं. प्रत्यक्ष सरकार चालवणं ही सोपी गोष्ट नाही. मग आता हे राजकारण बदलायचं तर आधी त्याचा भाग होणं गरजेचं आहे. या विचारातूनच पुढे आली- ‘आम आदमी पार्टी’ !

२६ नोव्हें २०११ रोजी स्थापन झालेल्या या पक्षाचा मूळ उद्देश संविधान हे पायाभूत तत्व मानून त्यानुसार देश चालवणं, हे आहे. सत्तापरिवर्तन नाही तर व्यवस्थापरिवर्तन हे महत्वाचे कर्तव्य आपने मानले. याचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी ही जबाबदारी स्वीकारली. या पक्षात प्रत्यक्ष राजकारणाचा अनुभव नसलेले;पण समाजकारणाची इत्थंभूत माहिती असणारी माणसं एकत्र आली आणि राजकारणातील एका नव्या पर्वाला सुरुवात झाली.

सुरुवातीला केवळ दिल्ली निवडणुकांपर्यंतच हा पक्ष मर्यादित होता. त्यावेळी मात्र क्रांती झाल्यासारखी आणि जादूची कांडी फिरावी त्याप्रमाणे २८ जागा जिंकून आम आदमी पार्टी सेकंड लार्जेस्ट पार्टी ठरली. जनतेला विचारुन कॉन्ग्रेसचा पाठिंबा घेऊन सरकार स्थापन झालं आणि अरविंद केजरीवाल दिल्लीचे मुख्यमंत्री झाले.

हे सरकार जरी ४९ दिवसच टिकलं असलं तरी या AK-49 ने अनेक महत्वपूर्ण कामं केली. या ४९ दिवसात अनेक गोष्टी घडल्याः वीज बिलात घट, दिल्लीत सुरक्षाव्यवस्था(पोलीस खाते) केंद्र सरकारच्या ऐवजी दिल्ली सरकारचे अधिपत्याखाली यावे, यासाठी प्रजासत्ताक दिनाच्या तोंडावर केलेले धरणे आंदोलन, भ्रष्टाचार रोखण्यासाठी उभी केलेली यंत्रणा, लोकपाल बिल मंजूर करुन घेण्यासाठी केलेले प्रयत्न, आणि त्यानंतर स्वतःच्या तत्वांसाठी सत्तेचा नि खुर्चीचा केलेला त्याग. तत्व जपण्यासाठी सोडलेली सत्ता ही पक्षाच्या भवितव्यासाठी घोडचूक ठरली कारण तत्व या गोष्टीसाठी कोणी सत्ता सोडू शकतो, ही कल्पनाच जनतेला माहीत नव्हती. त्यामुळेच सर्वांनी अरविंद केजरीवालांना ‘पळपुटा’ आणि ‘धोकेबाज’ म्हणून घोषित केलं कारण जनतेच्या मते सरकारने दिलेली आश्वासनं पूण न करताच राजीनामा दिला होता. असं झालं तरी पक्ष जोमाने काम करत राहिला.

‘आप’ने जास्तीत जास्त उमेदवार लोकसभेला उभं करण्याचं ठरवलं. त्यासाठी उमेदवार निवडीची विशिष्ट पध्दत ठरवण्यात आली.त्यानुसार उमेदवाराची सामाजिक राजकीय आर्थिक सांस्कृतिक पार्श्वभूमी पाहून उच्चशिक्षित, प्रामाणिक, निष्कलंक, जाणकार अशी माणसे निवडण्यात आली आणि संपूर्ण देशभरात ४३५ उमेदवार उभे करण्यात आले. सार्वत्रिक निवडणुकांच्या प्रचाराचा बिगुल वाजला.  

एकूणच सर्व सूत्रं तरुणांच्या हातात होती. उत्साह, जोश, जिद्द, चिकाटी, समर्पण या कशालाच तोड नव्हती आणि प्रचाराची पध्दतही वेगळी होती. गाड्यांचे कर्कश हॉर्न नव्हते की मोठा डी जे नव्हता, एकाच व्यक्तीच्या नावाचा जयजयकार नव्हता. पैशांचं भरघोस वाटपही नव्हतं. त्याऐवजी संघर्षाचं प्रतीक मानली जाणारी डफली त्यासोबत सामान्य माणसाच्य सुखासोबत जोडलं जाणारं नातं सर्वांना सोबत घेऊन साधल्या जाणा-या विकासाचे स्वप्न दाखवणा-या घोषणा आणि स्वखर्चाने स्वतःची नोकरी, घर सांभाळून तितक्याच उमेदीने रस्त्यावर उतरलेले तरुण.  मग ते वस्त्या वस्त्या पिंजून काढणं असो की चौकाचौकात पत्रकं वाटणं असो. घरोघरी जाऊन प्रचार करणं असो की शाळा कॉलेजात विविध उपक्रम राबवणं असो.रोजच्या प्रचारांचं नियोजन असो वा मोठ-मोठ्या सभांचं, प्रत्येकजण जीव ओतून काम करत होता. त्यातच अरविंद केजरीवालांनी वाराणसीत जाऊन मोदींना दिलेलं आव्हान सर्वांमध्ये चैतन्य निर्माण करत होतं. मंतरलेले दिवस होते ते. आप नावाचं एक मोठं कुटुंब निर्माण झालं होतं. जनतेकडून मिळणारा प्रतिसाद मोलाचा होता.

परंतु २०१४ लोकसभेचा निकाल मात्र सर्वांसाठीच धक्कादायक होता. संपूर्ण देशभरातून ‘आप’च्या केवळ ४ जागा ( फक्त पंजाबमधून) निवडून आल्या. मेधा पाटकर, योगेंद्र यादव, कुमार विश्वास अशा मोठ्या नेत्यांचीही अनामत रक्कम जप्त झाली. संपूर्ण देशात नरेंद्र मोदींची लाट होती आणि त्या जोरावर भाजपने २८३ जागा मिळवल्या.साठ वर्षे सत्तेच्या केंद्रस्थानी असणा-या कॉन्ग्रेस पक्षसुध्दा भुईसपाट झाला.

या परिस्थितीचं मूळ कारण असं दिसतं की, दिल्लीच्या सत्तेचा केलेला त्याग- त्यातून जनतेचा रोष आणि त्याहीपुढे या पक्षाला खरंच बहुमत मिळेल का आणि मिळाला तर कॉन्ग्रेसचा पाठिंबा घेऊन सरकार बनेल की काय असा जनतेच्या मनात निर्माण झालेला संभ्रम अशी कारणं दिसतात तसंच संघटनात्मक बांधणीचा अभाव आणि वैचारिक मतभेद हेदेखील कारण दिसतं.

 हे सगळं जरी खरं असलं तरी ‘आप’ची भविष्यातील वाटचाल आशादायी वाटते कारण ज्या मानवतावादी तत्वांवर हा पक्ष उभारलेला आहे तीच लोकशाही समाजवादाची मुळं आहेत. आपापसातील वैचारिक मतभेद दूर सारुन, एकत्र येऊन संगनमताने निर्णय घेऊन आणि गावपातळीपासून भक्कम संघटना उभी केल्यास हे व्यवस्था परिवर्तन शक्य होईल असं वाटतं.

तरीही ‘आप’ने दाखवलेले हे व्यवस्था परिवर्तनाचे स्वप्न सत्यात उतरते का, की केवळ स्वप्नच राहते हे नजीकच्या काळात पाहणे महत्वाचे ठरेल.

 -प्रणिता वारे

( बीएस्सी बायोटेक्नॉलॉजी करणारी प्रणिता आम आदमी पार्टीची कार्यकर्ती आहे.)

About the Author

प्रणिता वारे