
'कॉमन मॅन'चे जनक आणि ज्येष्ठ व्यंगचित्रकार आर. के. लक्ष्मण यांचे वयाच्या ९४व्या वर्षी सोमवारी संध्याकाळी पुण्यात निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू होते.
'द टाइम्स ऑफ इंडिया' वृत्तपत्रातून त्यांनी काढलेली व्यंगचित्रे खूप गाजली होती. 'कॉमन मॅन' या व्यक्तिरेखेच्या माध्यमातून त्यांनी भोवतालच्या राजकीय, सामाजिक, आर्थिक घडामोडींवर मार्मिक भाष्य केले होते. त्यांनी लिहिलेली प्रवासवर्णने तसेच 'मालगुडी डेज' या कादंबरीसाठी रेखाटलेली अर्कचित्रे लोकप्रिय झाली होती. भारतीय व्यंगचित्रकलेला त्यांनी नवी ओळख मिळवून दिली.
त्यांच्या योगदानाबद्दल भारत सरकारने १९७१ साली पद्मभूषण आणि २००५ साली पद्मविभूषण पुरस्काराने त्यांना सन्मानित केले. १९८४ साली मॅगसेसे पुरस्काराने आर. के. लक्ष्मण यांचा गौरव करण्यात आला होता.
जवळपास ५० वर्षे त्यांनी 'टाईम्स ऑफ इंडिया'मध्ये व्यंगचित्र रेखाटली.
साहित्यसंस्कृती परिवारातर्फे आर. के. लक्ष्मण यांना श्रद्धांजली