नथुरामला 'शहीद' करण्यापूर्वी!

नथुरामला 'शहीद' करण्यापूर्वी ..!

-        सलील तांबोळी

 

गांधी-हत्या ही भारतीय राजकीय वास्तवातील एक अतिशय दुर्दैवी घटना. गांधी म्हणजे राम नि गांधी म्हणजे रावण अशी टोकाची मांडणी गांधीबाबत होत असते आणि म्हणूनच गांधी हत्या करणारा नथुराम गोडसे एका विशिष्ट गटासाठी परमपूज्य असतो, बलिदान करणारा शहीद असतो. राष्ट्रपित्याचा खून करणा-या नथुरामची देखील काही बाजू असू शकते, हे समजावून घेऊन ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ हे नाटकही इथे सुरु असते. राष्ट्रपित्याचा खून करणा-या माथेफिरुची कैफियत देखील सादर करण्याची परवानगी जिथे असते तिथल्या उदारमतवादी वातावरणात सत्याचा अपलाप करण्याचा प्रयत्न धाडसाने आणि संवेदनहीनतेने जेव्हा होतो तेव्हा सलील तांबोळी सारख्या युवकाला काही सांगावंसं वाटतं..

 

 

 “त्या टकल्याने लई मोठी चूक केलीय, त्याच्यामुळेच सगळं झालंय.” ,असे शब्द कानावर पडले आणि मी जागचा थांबलो.

“त्यानेच भारताची फाळणी केली आणि पाकिस्तानला पैसे दिलेत, भगतसिंग सुद्धा त्याच्यामुळेच मेला.” ,हे ऐकून मी सुन्न झालो.

व्हाट्स एप अणि फेसबुकच्या माध्यमातून अनेकदा गांधीजींवर आणि पंडित नेहरूंवर घाणेरडे आरोप करणा-या कमेंट्स आणि एडीट केलेले फोटो पाहिले,आक्षेपार्ह आणि अफवा पसरवणारे संदेश वाचले; पण प्रत्यक्ष तरुणांच्या आणि तेही इंजीनियरिंगच्या विद्यार्थ्यांच्या टोळक्यात अशी चर्चा पहिल्यांदाच ऐकली. या सर्व अफवांमुळेच यांचे विचार असे झाले असतील, असा विचार केला आणि जड पावलांनी घरी परतलो;पण काही केल्या ते दृश्य मनातून जात नव्हते. अफवा पसरवणा-यांचा खूप राग येत होता; परंतु या अफवा पसरवल्या कोणी आणि लोकांनीही शहानिशा न करता डोळे झाकून त्यांच्यावर कसा काय विश्वास ठेवला? खरंच भारतीय समाज एवढा मूर्ख आहे का, की कोणीही त्यांना सहजपणे फसवू शकतो? खरोखरच भारताच्या आंतरराष्ट्रीय प्रतिमा लोकांच्या मनातून इतक्या उतरल्या आहेत की एकेरी नावाने अत्यंत शेलक्या शब्दात त्यांची निंदा व्हावी? मध्यंतरी फेसबुकवर शिवाजी महाराज आणि बाळासाहेब ठाकरेंच्या प्रतिमेची विटंबना झाल्यावर रस्त्यावर उतरणाऱ्या आणि जाळपोळ करणाऱ्या तरुणांना याच्याविरुद्ध आवाज उठवावा, असे का वाटले नाही? उलट हसत हसत त्यांनी त्या अफवा शेअर केल्या, दुस-यांना पाठवल्या;पण समाजमनाची पातळी एवढी का खालावली? आपल्यावर केलेले या थोर स्वातंत्र्यसैनिकांचे उपकार, निःस्वार्थीपणे केलेलं बलिदान ते कसे काय विसरले? विसरले की त्याकडे जाणुनबुजून दुर्लक्ष केले? थोडा विचार केला आणि सारं काही लक्षात आलं...

      खरंतरं याची पाळेमुळे फार जुनी आहेत आणि ज्यावेळी आपल्याला स्वातंत्र्य मिळाले, तेंव्हापासूनची आहेत. ज्या गटाने गांधीजींची हत्या केली तोच गट हे काम फार पूर्वी पासून करत आलेला आहे आणि आत्ताही फार जोमाने करतोय हे अगदी स्पष्ट आहे कारण हेच तर त्यांचे राजकारण आहे.

      “महागाई, भ्रष्टाचार, पर्यावरण प्रदूषण यांच्यापेक्षाही मुसलमान हा तुमचा सर्वात मोठा शत्रू आहे, त्याला वेळेवर आळा घातला नाही तर भारत हे मुस्लीम राष्ट्र होईल.

‘कॉंग्रेस’ हा नेहमी मुसलमानांचे लांगुलचालन करतो, म्हणून कॉंग्रेससुध्दा तुमचा दुश्मन आहे” असा प्रचार या टोळीने नेहमी केला अणि आत्ताच्या लोकसभेच्या निवडणुकीत तर अगदी जोमाने केला. व्हाट्स एप अणि फेसबुकवर मुस्लिमविरोधी आणि समाजभावना भडकवणारे अनेक मेसेजेस पसरवण्यात आले. व्यंगचित्रे, अश्लील विनोद, एडीट केलेल्या खोट्या फोटोमार्फत प्रचंड प्रमाणात अफवा लोकांच्या विशेषतः तरुणांच्या गळी उतरवल्या गेल्या. इतिहासाचे आणि समाजकारणाचे अल्पज्ञान असणारे लोकदेखील यालाच खरा इतिहास मानत आहेत. हे खरोखरच फार धक्कादायक आहे. सोशल मिडीयाच्या माध्यमातून आलेला मेसेज खरा आहे की खोटा, याची शहानिशा न करता तो आणखी पसरवला जातो;परंतु कुठे तरी आपण केवढी मोठी चूक करतोय, याचा जरासुद्धा थांगपत्ता या लोकांना नसतो.  म्हणूनच महात्मा गांधी, पंडित नेहरू यांच्या बदनामीचा खुलेआम प्रचार-प्रसार होताना दिसतो की जेणेकरून कॉंग्रेसला मते न मिळता ते विरोधी पक्षांना मिळावेत. त्यासाठी हिंदू-मुस्लीम दंगली होऊन शेकडो लोक मेले तरी चालतील; पण बहुसंख्य असणारा हिंदू समाज हा मुस्लीमविरोधी द्वेषामुळे कॉंग्रेस पासून दूरावला पाहिजे,ही भावना त्यामागे असते. त्यात हैदराबादचे ओवैसी बंधू आणि मुस्लीम दहशतवादी गट आगीत तेल ओतण्याचे काम करत आहेत;पण याचा अर्थ कॉंग्रेसने काहीच केले नाही, कॉंग्रेस पूर्णपणे निर्दोष आहे असेही नाही.प्रचंड भ्रष्टाचार, भोंगळ कारभार याच्यामुळे लोकांमध्ये कॉन्ग्रेसविरुद्ध राग असणे स्वाभाविक आहे;परंतु या असंतोषाला एक वेगळा जातीय रंग देण्याचे काम अत्यंत चालाखीपणे चालू आहे, हे निश्चित. त्यासाठी कोणत्याही थराला जाऊन महापुरुषांची बदनामी करण्याची शरमपण या लोकांना वाटत नाही.असो;पण एवढं खरं कि गांधीजींच्या विरोधात कितीही जणांनी घाणेरडा प्रचार केला, तरी सार्वजनिकरित्या नाखुशीने का होईना त्यांना पुजावे लागतेच,कारण सर्वसामान्य, सहिष्णू आणि निधर्मी लोकांच्या जवळ जायचे असेल तर त्यांच्या नावाचा आणि आदर्शांचा वापर करावाच लागतो. नंतर पडद्यामागे शिव्या शाप द्यायचे तर ठरलेलेच असते.

      आर.एस.एस. (राष्ट्रीय स्वयंसेवक संघ) फार पूर्वीपासून गांधीजींच्या आणि नेहरूंच्या अगदी कट्टर विरोधात असलेली संस्था. याच संघाच्या केरळ शाखेच्या मुखपत्रात एका संघस्वयंसेवकाने एका लेखात असे लिहिले आहे कि, “नथुराम गोडसेने गांधीजींचा खून करण्याऐवजी पंडित नेहरूंचा खून केला असते तर अधिक बरे झाले असते.” ज्या संपादकाने असा लेख पाहूनही आपल्या वृत्तपत्रात प्रकाशित होऊ दिला ते सारे  लोक खुनी (एक प्रकारे तालिबानी) मानसिकतेत किती गुरफटलेले आहेत, हे स्पष्ट होते. या कृतीचा सर्व स्तरातून अगदी तीव्र निषेध करायला पाहिजे होता. भारतीय मिडियानेही या विषयाला उचलून धरले पाहिजे होते; पण या गोष्टीला जास्त महत्त्व दिले गेले नाही, हे तर त्यापेक्षाही जास्त धक्कादायक आहे.

सध्या प्रधानमंत्र्यांनी चालू केलेल्या ‘महात्मा गांधी स्वच्छ भारत’ योजनेची जोरात चर्चा आहे;पण खरोखरच गांधीजींचे नाव सारखे भाषणात घेणारे त्यांनी सांगितलेल्या मूल्यांप्रमाणे आचरण करतात का? गांधीजींना आपले मानणारे कॉंग्रेसवाले तरी त्यांचे विचार आणि मूल्ये कितपत आचरणात आणतात, हे त्यांनाच माहीत !आज साऱ्या जगात धार्मिक कट्टरपंथीयांचे पीक माजले आहे. आजच्या राजकारणाचे स्वरूप ज्या प्रमाणात बदलत आहे, लोकांमध्ये ज्या प्रमाणात कट्टरवाद आणि असहिष्णू वृत्ती वाढत आहे, ही खरोखरच देशाच्या भविष्यासाठी फार चिंतेची बाब आहे. त्यात पेडन्युजमुळे तर अशा लोकांचे चांगलेच फावते. यावर स्वतःला पुरोगामी आणि बुध्दिजीवी म्हणवणाऱ्या लोकांनी नक्कीच विचार करावा आणि तातडीने पावले उचलावी नाही तर नथुराम गोडसेच्या पुढे ‘ शहीद ’ ही पदवी लागण्यास जास्त वेळ लागणार नाही...!

 

- सलील तांबोळी 

( इंजिनीयर असलेला सलील उत्तम गायक असून विविध चळवळींशी जोडलेला आहे.)

(*लेखात व्यक्त झालेली मते ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. साहित्य-संस्कृती संपादन मंडळ त्या विचारांशी सहमत असेलच, असे नाही.)

About the Author

सलील तांबोळी's picture
सलील तांबोळी